Tuesday, December 2, 2025

धर्म एक अफूची गोळी, भारत आणि विरोधाभास

धर्म एक अफूची गोळी, भारत आणि विरोधाभास 


आज बिहार मधील पूर्व चंपारणमध्ये विराट रामायण मंदिर परिसरात, ३३ फूट उंच, १७.८ फूट परीघ असलेली २१० टन वजन असलेली, एकाच ग्रानाईट दगडातून कोरलेली, सहस्त्रलिंग शिवलिंगाची महाकाय मूर्ती स्थापन करण्यासाठी तामिळनाडू मधील महाबलीपुरम मधून निघाली असे वाचले. 


दिवसेंदिवस वेगवेगळ्या राज्यांमध्ये अशा प्रकारची देवळे स्थापून करून किंवा असलेल्या देवळानचा जीर्णोद्धार करून गेल्या ५०० वर्षात धर्माची आणि आस्थेची विस्कटलेली घडी पुन्हा बसवण्याचा प्रयत्न बहुतेक सत्ताधाऱ्यांकडुन होताना दिसत आहे. ही समाधानाची बाब आहे. पण त्या मागे नक्की विचार काय आहे हे जाणून घ्यायला हवा.


पूर्वीचे राजे महाराजे जनता भुकी किंवा अर्ध पोटी असताना सुद्धा अशा प्रकारची मंदिरे बांधून आपली धर्माबद्दलची आस्था, कर्तव्य आणि कलासक्ती याचे प्रदर्शन करीत. जनतेच्या अडीअडचणी, त्यांची सुख दुःखे आणि प्रशासनात बोकाळत चाललेला भ्रस्टाचार याच्याशी त्यांचे सोयर सुतक नव्हते कीवा ते जाणून घेण्याची तसदी ते घेत नसतं. एखाद दुसरा गुन्हेगार पकडला गेला तर त्याला कडेलोट करायचा की झाले काम ( ED सारखे ).


आज कालचे सर्वच राजकीय पक्ष अश्याच प्रकारचा विचार करतात. काल झालेल्या नगर पंचायत आणि नगर परिषदांमध्ये मतदानासाठी पैसे वाटून जागा जिंकण्याच्या कार्यक्रमात तर जणू स्पर्धाच लागली होती. कारण त्यांना माहिती आहे की एकदा जिंकून आले की जेव्हडे खर्च केले त्यांच्या १०० ते १००० पट ते हडप करू शकतात. सरकारी अनुदान, निधी वाटप, भूखंड लाटणे, टेंडर घोटाळे, टेंडर शिवाय वर्क ऑर्डर काढणे, नाले सफाई या साठी त्यांच्या सभामध्ये राजरोस हाणामाऱ्या होताना लोकांना दिसतात ते काही देशप्रेम म्हणून नव्हे. आणि या गोष्टी फक्त बदनाम नेत्यांबद्दलच नाही तर त्यांच्या चेल्या चपाट्या पासुन ते गल्ली मधील छोटया कार्यकर्त्या पर्यंत लागू आहेत. एव्हडी सरकारी ऑडिट होऊन सुद्धा हे घडते म्हणजे विचार करा. भ्रस्टाचार नुसता निधी खाण्यातच नाही तर सामान्य माणसांच्या सेवा पुरवण्यात सुद्धा होत आहे. मृत बॉडी पोस्ट मार्तंम केल्या नंतर पैसे दिल्याशिवाय लवकर मिळत नाही ही अवस्था आहे. ( सारांश सिनेमा बघा. पण ही सत्य परिस्थिती आहे.)


अशा वेळी मूळ मुद्धे झाकण्यासाठी, लोकांच्या अडचणीकडे दुर्लक्ष व्हावे म्हूणन आणि लोकांची दिशाभूल करण्यासाठी धर्म ही एक अफूची गोळी म्हणून अनेक राज्यकर्त्यांनी कित्येक शतके याचा वापर केला आहे. 


औरंगजेब कोणतेही नीच कृत्य करताना ते इस्लामच्या इफाजतीसाठी करत आहे असे सांगून करायचा मग ते सक्ख्या भावाला दारा शु्कोहोला मारणे असून दे की जन्म दात्या बापाला कैदेत टाकणे असून दे आणि त्याचे पोसलेले मौलवी त्याच्या निर्णयावर हाजी म्हणायचे. बस.


धर्माचा मूळ उद्धेश अत्याचाराविरुद्ध लढणारा, सुसंस्कृत, संस्कारी नागरिक तयार करणे जों एक न्याय्य व्यवस्था असलेला समाज निर्माण करेल अथवा त्याचा भाग बनेल. त्याचसाठी वेद, रामायण, महाभारत, श्रीमद भगवद गीता, इत्यादी धर्म ग्रंथांची निर्मिती झाली. मंदिर किंवा देवमूर्ती हे त्या धर्माच्या आशा आकांक्षाचे प्रतिक मानले गेले. त्या मूळ उद्धेशाला हरताळ फासून चाललेली ही धर्म पुनरस्थापना हा एक दिखावाच म्हणावा लागेल. याचे कारण राजा कालस्य कारणम. 


मंदिरे बनवूच नयेत या मताचा मीं नाही, परंतु हा देश धर्माने चालावा असे वाटतं असेल तर जमिनीवरील त्रुटी कमी करून सुधारणा होणे सुद्धा तेवढेच आवश्यक आहे असे मीं मानतो. मीं एक सनातनी असून धर्म आणि देव मानतो म्हणून हे लिहावेसे वाटले.


माधव भोळे

Monday, December 1, 2025

देव धर्म आणि कुळाचार

देव धर्म आणि कुळाचार 


आज काल अनेक मंडळींना आपल्या घरचा देव धर्म, कुलदेवता, कुळाचार, गोत्र, इत्यादी गोष्टी माहिती नसतात. मग अडचण आली की लोक कोणा कोणाला तरी विचारत राहतात आणि अर्धवट माहितीवर पुढे काम करतात. 


पुढील पिढी इंग्रजी माध्यमातून शिकलेली असणार अशा वेळी ही माहिती आवश्यक आहे असे वाटते. कित्येक वेळा पुढील पिढीला ते सांभाळायचे असते परंतु त्यांच्याकडे पूर्ण माहिती नसते.


जर आपण अशी माहिती आणि ते कुळाचार कसे करावेत याची थोडक्यात माहिती लिहून ठेवली तर किती सोपे होईल. तसेच प्रत्येक वेळचा नैवेद्य कसा करावा याची सुद्धा थोडक्यात माहिती लिहून ठेवायला हवी. 


आपण जर आपापल्या घरची ही माहिती लिखित स्वरूपात ठेवली किंवा त्याला लॅमिनेट करुन ठेवले तर त्याचा उपयोग आपल्या पुढील पिढ्याना होईल असे वाटते.

मला वाटते यात किमान खालील गोष्ट लिहायला हव्यात 


१. आडनांव

२. गोत्र

३. मूळ गांव आणि मूळ चौथऱ्याचा पत्ता 

४. लेख लिहिला त्या वेळचे वास्तव्य आणि पत्ता 

५. कुल देवता आणि कुल दैवत 

६. ग्राम देवता 

७. चैत्र हळदीकुंकू 

८. श्रावण मांस विशेष 

८.१ नारळी पौर्णिमा नैवेद्य ( जागर )

८.२ गोकुळ अष्टमी उत्सव 

८.३ श्रावण महिन्यातील एकादशण्या

८.४ वार्षिक रुद्र वगैरे करण्याची प्रथा 

९. गणपती आराधना ( किती दिवस ). 

९.१ गणपतीवर एकादशणी करतात कां? अथर्वशिर्ष पठण इत्यादी 

१०. गौरी आराधना ( कशी करतात ). खड्याच्या, मुखवटा, इत्यादी 

१०.१ गौरी नैवेद्य कसे आणि कोणत्या दिवशी करतात.

११. अनंत पूजा असल्यास ती कधी करतात 

१२. महालय पर्व : श्राद्ध & ते करण्याची पद्धत ( चटावर, पिंडदान इत्यादी ). श्राद्ध करण्याची तिथी. 

पिंडदान करण्यासाठी वडील, आजोबा, पणजोबा यांची तसेच तर्पण करण्यासाठी इतर जवळच्या नातेवाईकांची नांवे आणि गोत्र 

१३. नवरात्र : हिंदू पंचांगात ३/ ४ वेळेला नवरात्र या पैकी कोणतेही एक केले जाते.

१३.१ चैत्र नवरात्री 

१३.२ अश्विन नवरात्री 

१३.३ कार्तिक नवरात्री 

१३.४ मार्गशिर्ष नवरात्र ( खंडोबाचे ) इत्यादीl

नवरात्र स्थापन करणे, नवरात्र करण्याची पद्दत, बसता उठताना सवाष्ण, कुमारिका पूजन, महालक्ष्मी पूजन, अष्टमी होम, नवरात्र उठवणे, दररोज नैवध्य पद्धत 

१४ दीपावली नैवेद्य

१४.१ वार्षिक कार्तिकी किंवा तत्सम ग्राम दैवत उत्सव 

१४.२ देव दीपावली नैवेद्य 

१५. होळी उत्सव ( नैवेद्य गोडे नैवेद्य आणि तिखट नैवेद्य ). होलिका दहन 

१६. धनुर्मास नैवेद्य

१७ संक्रांत : हळदीकुंकू. 

     १७.१ संक्रांत नववधू विशेष.


आम्ही आमच्या वीर गावामध्ये श्री लक्ष्मी मल्लमर्दन देवाचा उत्सव कसा साजरा करावा याचे असेच लिखाण करून ठेवले आहे, जे वज्रलेप पुरवणी मध्ये प्रसिद्ध केले आहे.


यात काही सुधारणा हवी असल्यास कळवावी.


माधव भोळे 


सुयश टिळकची कोलंबोवारी, दित्वा चक्रीवादळ आणि कवित्व

 सुयश टिळकची कोलंबोवारी, दित्वा चक्रीवादळ आणि कवित्व 


काल एक  तडफदार मराठी ब्राह्मण अभिनेता, सुयश टिळक याने श्रीलंकेतील दित्वा चक्री वादळात कोलंबो एअरपोर्ट बंद झाल्यामुळे त्याच्यासहित प्रवाशांचे झालेले हाल, तेथील एयरलाईन्स आणि भारतीय दुतावासाचे कर्मचारी यांनी आपल्या व्यक्तिगत अडचणी बाजूला ठेवून प्रवाश्याना मदत करण्यासाठी केलेले शर्थीच प्रयत्न आणि एकंदर ३८ तासाचा तो कठीण काळ या बद्धल वर्णन करणारी आणि सर्व मदत करणाऱ्या आणि प्रार्थना करणाऱ्या मित्र मंडळीचे आभार व्यक्त करणारी पोस्ट टाकली. पोस्टचा उद्देश सरळ आणि स्पष्ट होता.


परंतु ब्राह्मण माणसाने कुठलीही पोस्ट टाका त्यावर काही ठराविक समाजातील लोकांनी कुसकट, खवचट टिप्पणी नाही केली तर ते स्वतःला संविधान प्रेमी मंडळी कशी म्हणवतील? 


एकाने विचारले, "अरे तू तिकडे विदेशात कशाला गेला होतास? आता तू परत लोकमान्य टिळकांसारखे सोन्याच्या योनीतून प्रवेश करणार कां?".  विषय काय? तू लिहितोस काय? जरा तरी परिस्थिचे गांभीर्य? किती नीच वृतीची ही हलकट माणसे आहेत!!


होय लोकमान्य टिळकांनी आपला मुलगा श्रीधर याचा व्रतबंध करायचे ठरवले त्यावेळी पुण्यातील पुरोहित मंडळींनी त्यांना संगितले की तुम्ही विदेश यात्रा केली आहेत तर हिंदू धर्मातील प्रथेप्रमाणे तुम्ही प्रायश्चित घेतल्याशिवाय आम्ही तुमच्या मुलाची मुंज लावणार नाही. प्रायश्चित चित्त असे की त्यांनी प्रतिमात्मक सोन्याच्या योनीतून प्रवेश करायचा. 


त्यावेळी श्रीधर टिळक म्हणाले की माझी मुंज नाही झाली तरी हरकत नाही पण हे होऊ द्यायचे नाही. त्या वेळी लोकमान्यांनी ब्रह्मवृंदाच्या शब्दाला मान देत तो विधी केला आणि श्रीधरची मुंज लावली. त्या एका गोष्टीसाठी ब्राम्हण विरोधी मंडळींनी त्या काळी लोकमान्यानवर सडकून टीका केली. लोकमान्यांच्या ब्रह्मवृंदानंपुढे नमते घेण्याच्या एका चुकीसाठी त्यांच्या इतर सद्गुणानवर बोळा फिरवणारे हे कोण? ह्यांची काय लायकी?


तो काळ संपला, टिळक सुद्धा गेले आणि ते ब्रम्हवृंद सुद्धा गेले असणार, पण अजून १०० वर्षानंतर सुद्धा हेच ताशे आणि टोमणे लोक अजूनही मारत आहेत. सुंभ जळले तरी पिळ जळत नाही. 


मग कां कोणी वर्मा कर्मा IAS च्या कुटुंबात लोक आपली ब्राह्मण कन्या दान करतील? जों म्हणतो की जेथपर्यंत माझ्यासारख्या सुशिक्षित व्यक्तीच्या मुलाला कोणी ब्राह्मणव्यक्ती जेथ पर्यंत आपली मुलगी देत नाही तेथपर्यंत आरक्षण आवश्यक आहे. त्या मुलीला काय दररोज टोमणे खाऊन आत्महत्या करायची आहे?


जातीच्या भिंती होत्याच त्या अजूनच रुंदावत चालल्या आहेत इतकेच. सुधारणा काहीही नाही कारण द्वेष नसानसात भिनला आहे.


माधव भोळे 


Saturday, November 29, 2025

सयाजी शिंदे यांचे चुकलेच!!

सयाजी शिंदे यांचे चुकलेच!!


सयाजी शिंदे एक उत्तम अभिनेते आणि पर्यावरण प्रेमी आहेत या बद्धल दुमत नाही. साधूग्राम मधील वृक्ष तोड हा सार्वजनिक तसेच जनतेचा विषय आहे तो लोकशाही मार्गाने सोडवायला हवा यातही वाद नाही. परंतु साधू संतांना "ते आले गेले मेले तरी काही फरक पडत नाही " अशी उर्मट भाषा त्यांना शोभतं नाही. माणसाचे संस्कार त्यांच्या वक्तव्यातुन आणि वागणुकीतुन प्रकट होत असतात.


आपल्या मागण्या कायदेशीर, सनदशीर मार्गाने, वृक्ष ऑथॉरिटी, environmental tribunal, कोर्ट आणि जनतेच्या दरबारात जरूर उचलून धरायला हव्यात परंतु लोकांच्या आदरस्थानी असलेला कुंभमेळा, साधू दर्शन आणि त्यांची उपस्थिती यावर अर्वांच्य भाषेत बोलण्याचे काही कारण नाही आणि तसा परवाना त्यांना कोणी दिला? 


यश डोक्यात गेले की माणूस अहंकारी होतो आणि आपले म्हणणेच बरोबर असे सर्वांनां ओरडून सांगायचा प्रयत्न येनकेन प्रकारे करतो. 


सयाजी शिंदे यांचे चुकलेच. त्यांच्या अशा वागण्यामुळे त्यांची चळवळ कमकुवत होते हे त्यांच्या लक्षात येत नाही.


माधव भोळे 

Wednesday, November 26, 2025

भारताचे संविधान कसे तयार झाले?

भारताचे संविधान कसे तयार झाले?

नागरिकांमध्ये संविधानाबद्दल जागरूकता वाढवण्यासाठी भारत सरकारने २६ नोव्हेंबर २०१५ रोजी हा दिवस 'संविधान दिन' म्हणून साजरा करण्याचा निर्णय घेतला. भारताचे संविधान तयार करण्यासाठी १९४६ मध्ये एक संविधान सभा स्थापन करण्यात आली होती. या सभेची पहिली बैठक ९ डिसेंबर १९४६ रोजी झाली. डॉ. सच्चिदानंद सिन्हा हे सभेचे सर्वात वयस्कर सदस्य असल्याने ते तात्पुरते अध्यक्ष बनले. त्यानंतर ११ डिसेंबर १९४६ रोजी डॉ. राजेंद्र प्रसाद यांची स्थायी अध्यक्ष म्हणून निवड झाली. संविधान तयार करण्यासाठी संविधान सभेने १३ समित्या नेमल्या होत्या. यापैकी एक महत्त्वाची समिती होती मसुदा समिती, जिचे अध्यक्ष डॉ. बी.आर. आंबेडकर होते. या समित्यांच्या अहवालांच्या आधारावर सात सदस्यांच्या मसुदा समितीने संविधानाचा अंतिम मसुदा तयार केला. 

'संविधान' शब्दांमध्ये कुणी लिहले होते?

भारतीय संविधान हे जगातील सर्वात मोठे लिखित संविधान आहे. यात ३९५ कलमे, २२ भाग आणि ०८ अनुसूची आहेत. हे संविधान छापलेले किंवा टाईप केलेले नव्हते, तर ते इंग्रजी आणि हिंदीमध्ये हस्तलिखित होते. शांतिनिकेतनच्या कलाकारांनी आचार्य नंदलाल बोस यांच्या मार्गदर्शनाखाली हे संविधान सुंदर अक्षरात लिहिले होते. दिल्लीत प्रेम बिहारी नारायण रायजादा यांनी या संविधानाची सुलेखन (calligraphy) केली. 

सिंधू संस्कृतीपासून ते राष्ट्रीय स्वातंत्र्य चळवळ 

संविधानाच्या मूळ प्रती भारतीय संसदेच्या ग्रंथालयात विशेष हेलियमने भरलेल्या पेट्यांमध्ये सुरक्षित ठेवल्या आहेत. संविधानाच्या प्रत्येक भागाची सुरुवात भारताच्या इतिहासातील एखाद्या दृश्याने होते. नंदलाल बोस यांनी संविधानाच्या प्रत्येक भागाच्या सुरुवातीला भारताच्या राष्ट्रीय इतिहासातील महत्त्वाचे प्रसंग चितारले आहेत. या २२ चित्रांमध्ये सिंधू संस्कृतीपासून ते राष्ट्रीय स्वातंत्र्य चळवळीपर्यंतच्या ४००० वर्षांच्या भारतीय इतिहासाची झलक दिसते. 

४२ वी घटनादुरूस्ती

संविधान १९४९ मध्ये स्वीकारले गेले तेव्हा नागरिकांसाठी मूलभूत कर्तव्यांची (Fundamental Duties) कोणतीही तरतूद नव्हती, जरी मूलभूत हक्कांसाठी (Fundamental Rights) भाग तीन होता. नागरिकांची मूलभूत कर्तव्ये १९७६ मध्ये ४२ व्या घटनादुरुस्तीद्वारे जोडण्यात आली. हे सरदार स्वर्ण सिंग समितीच्या शिफारशींवर आधारित होते. या समितीने सुचवले होते की, नागरिकांनी आपल्या मूलभूत हक्कांचा वापर करताना आपल्या कर्तव्यांकडे दुर्लक्ष करू नये.

११ मूलभूत कर्तव्ये

४२ व्या घटनादुरुस्ती, १९७६ नुसार, संविधानात एक नवीन प्रकरण 'IV-A' जोडले गेले, ज्यात फक्त एक कलम, कलम ५१-अ होते. यात नागरिकांसाठी दहा मूलभूत कर्तव्यांचा समावेश होता. मूलभूत कर्तव्ये प्रत्येक नागरिकाला आठवण करून देतात की, संविधानाने त्यांना काही मूलभूत हक्क दिले असले तरी, लोकशाही वर्तनाचे काही मूलभूत नियम पाळणेही आवश्यक आहे. कारण हक्क आणि कर्तव्ये एकमेकांशी जोडलेली आहेत. मूलभूत कर्तव्यांच्या समावेशामुळे आपले संविधान मानवी हक्कांच्या वैश्विक घोषणेच्या (Universal Declaration of Human Rights) कलम २९ (१) शी आणि इतर अनेक आधुनिक देशांच्या संविधानांशी सुसंगत झाले. मूलभूत कर्तव्यांची संकल्पना USSR (सोव्हिएत युनियन) मधून घेण्यात आली. मूलभूत कर्तव्ये भारतीय परंपरा, पौराणिक कथा, धर्म आणि पद्धतींमधून घेतली आहेत. ती भारतीय जीवनशैलीचा अविभाज्य भाग असलेल्या कार्यांचे संहिताकरण आहेत. सुरुवातीला दहा मूलभूत कर्तव्ये होती. नंतर २००२ मध्ये ८६ व्या घटनादुरुस्तीद्वारे ११ वे कर्तव्य जोडले गेले.

Thursday, November 20, 2025

मैथिली ठाकूर

मैथिली ठाकूर 


२५ वर्षाची मैथिली ठाकूर जेव्हा प्रथमच बिहार विधानसभेमध्ये निवडून येते तेव्हा अनेकांचे डोळे विसफारले जातात. तिने असे काय कर्तृत्व केले की तीला लोकांनी निवडून दिले? या उलट जन सुराज्य पक्षाच्या प्रशांत किशोरने बिहार सुधारण्याचे मोठ मोठे वादे केले होते तरी त्याला एकही जागा मिळाली नाही यावर लोक रकाने च्या रकाने लिहत आहेत. 


प्रथम म्हणजे प्रशांत किशोर एक Psephologist ( निवडणूक अभ्यासक ) म्हणून उदयास आला. प्रथम काँग्रेस, नंतर भाजपा, नंतर नितीश कुमार यांच्या निवडणुकामध्ये त्याने Psephologist  म्हणून चांगली कामगिरी केली. त्या नंतर त्याने बिहारला सुधारण्यासाठी जन सुराज्य पार्टी काढली. परंतु ह्या व्यक्तीवर कोणी कशाला विश्वास ठेवेल? आज पर्यंत त्याची कारकीर्द एक निवडणूक कॉन्ट्रॅक्टर म्हणून होती.  निवडणुकीची पोस्टर तयार करणे, राहुल गांधींनी कुठे जेवण करावे, कुठे सभा घ्याव्यात, कुठली स्लोगन चांगली उपयोगाला येईल इत्यादी परंतु स्वतः आपल्या भागात काही चांगले काम केले किंवा काय याबद्धल त्याचे रिपोर्टकार्ड शून्य. एव्हडे असूनसुद्धा त्याने पक्ष काढायची हिम्मत केली म्हणजे जमिनीवर काही नाही आणि आकाशात बंगले बांधण्यासारखेच आहे. जर प्रथम आपली एखादी लहान टीम घेऊन कोणाबरोबर आलायन्स केले असते तर त्याचा उपयोग त्याला झाला असता. 


या उलट मैथिलीचे कर्तृत्व व्यक्तिगत जरी असले तरी ती एका महान राष्ट्रीय पक्षाची उमेदवार होती. त्या पक्षाची कामगिरी गेले कित्येक वर्ष दमदार राहिलेली आहे. तीला एक मोठा पाठिंबा आहे. अजून तरी तिच्यावर कोणता डाग लागलेला नाही. त्या मुळे लोकांनी तीला निवडून दिले. आजपर्यंत अनेक कलाकारांनी अनेक पक्षांमधून निवडणूक लढवली पण त्यातील बरेचसे निवडणूक हरले. मैथिली जरी बिहार सोडून दिल्ली मध्ये स्थायिक असली तरी मैथिलीची भोजपुरी भाषेतील गाणी लोकांना आपली वाटतात. ती आपल्या बिहारी भोजपुरी, मैथिली संस्कृतीचे प्रतिनिधित्व करते असे तेथील लोकांना वाटते. म्हणून लोकांनी तीला निवडून दिल.


आणि सर्वात महत्वाचे म्हणजे "man is known by the company he keeps". त्या मुळे मैथिलीकडुन खूप शिकण्यासारखे आहे. स्वतःचे हॉटेल उघडून यशस्वी चालवायला वेळ लागेल पण कामत किंवा मॅकडोनाल्डची फ्रंचाईज घ्या  तीला यशस्वी व्हायला वेळ लागणार नाही. पण जेथपर्यंत आपण कमी ताकदवान असतो तेथपर्यंत हेच चांगले.


माधव भोळे 


घराणेशाही ??

 घराणेशाही ??


ज्या मोदीजींनी काँग्रेसच्या घराणेशाहीवर आसूड ओढत आपला आणि भाजपाची विजयी अश्वमेध घोड दौड गेली २५ वर्ष पुढे नेलीत त्याच भाजपाला घराणेशाहीनीच पूर्ण पणे ग्रासलेले दिसते. अगदी लोकसभेपासून ते जिल्हा परिषद निवडणुकांपर्यंत सर्वत्र आपल्याच घरात उमेदवारी मिळावी हा त्यांच्या कार्यकर्त्यांचा आणि विद्यमान पदाधिकाऱ्यांचा आग्रह असून त्याला उच्च पदस्थांचा पाठिंबा पदोपदी दिसून येतो.


महाराष्ट्रात तब्बल ३३ भाजपा नेत्यांनी आपल्याच घराण्यातील  पत्नी, सुना, मुले, नातवंडे, नातेवाईक यांना उमेदवारी मिळवून दिली आहे. 

गिरीश महाजन यांच्या पत्नी साधना महाजन,

संजय सावकारे यांच्या पत्नी रजनी सावकारे,

मंगेश चव्हाण यांच्या पत्नी,  जैकुमार रावळ यांच्या मातोश्री नयन कुवर रावळ, भाजपा आमदार तानाजी मुटकुळे मुलगा शिवाजी मुटकुळे. शिवाय सावंतवाडी संस्थांनाची सून सौं. श्रद्धा भोसले. अशी अनेक नांवे घेता येतील.


या आधी विधानसभा आणि लोकसभा निवडणुकीला सुद्धा हेच केले गेले. नितेश राणे, सुजय विखे पाटील, पंकजा मुंडे, प्रीतम मुंडे, पूनम महाजन, रक्षा खडसे इत्यादी वारसदार आधीच काम करीत आहेत. 


मोदी साहेब, जे जे आरोप आपण दुसऱ्यावर केलेत ते ते आता आपल्या पक्षाला चिकटले आहेत, मग ते काँग्रेसच्या भ्रष्टाचाराचे असोत की आणखी काही. ज्या पवार कुटुंबावर आपण ७०,००० कोटीचे घोटाळेबाज म्हणून आरोप केलेत, त्यांच्याच कुबड्या घेऊन आपण महाराष्ट्रात मुख्य मंत्री पद राखत आहात. 


जरी तुमची स्वतःची प्रतिमा स्वच्छ असली तरी आता तुम्ही भ्रस्टाचार मुक्त भारत हा नारा देऊच शकत नाही. 


माधव भोळे