बापूंच्या देशात!
काल एक हेडलाईन वाचली "मद्य प्रेमी करतात १०,००० कोटींचा चकणा फस्त". वृत्त लेखक लिहिताना लिहितो की १० रुपयाच्या चकण्याच्या पाकिटाची व्याप्ती एव्हडी मोठी आहे की त्याची वार्षिक उलाढाल १०,००० कोटींची होते. अर्थात चकणा हा काही फक्त मद्यपीच खातात असे नाही पण बहूसंख्य मद्यपी वेगवेगळ्या कारणासाठी खूप चकणा खातात.
सहज बघितले की जर चकण्याची उलाढाल रु. १०,००० कोटी असेल तर मद्याची उलाढाल किती असेल आणि आकडेवारी बघून चाट पडलो.
भारतात ४.५ लाख कोटी एवढ्या रुपयाचे मद्य दरवर्षी विकले जाते. त्यातील ९०% हार्ड मद्य जसे की व्हिस्की वगैरे. अल्कोहोलिक बेवरेजेस खपामध्ये मध्ये भारताचा क्रमांक जगात तिसरा लागतो. भारताच्या रु. ३५० लाख कोटी GDP मध्ये मद्याचा वाटा १.२% एव्हडा आहे.
असे म्हणतात की पूर्वी लोक अज्ञानी होते, त्यांची आर्थिक परिस्थिती बिकट होती, त्यांना वेगवेगळ्या समस्या होत्या म्हणून लोक दारू पियत पण आता लोक शिक्षित, उच्च शिक्षित झाले तर त्यांचे मद्य पिण्याचे प्रमाण वाढतच आहे. शिवाय हल्ली कॉलेज आणि नोकरीं करणारे तरुण तरुणी सुद्धा जास्त प्रमाणात मद्य पितात.
फक्त गांधी जयंती आणि धार्मिक सणाच्या दिवशी दारू बंदी ठेवून शुस्क परिणाम होत आहे. दारू बंदी केली तर लोक गावठी, चोरटी दारू पियुन मरत आहेत, त्यावर उपाय काय? दारू पियुन लिव्हर खराब झाल्याचे प्रमाण सुद्धा दिवसेंदिवस वाढत आहे.
या मधील एक कारण म्हणजे स्वप्न आणि वास्तव यामधील अंतर भरून काढण्याची कला किंवा समज ज्या वेळी माणसाकडे येईल त्यावेळी दारू पिण्याचे प्रमाण कमी होईल. जग आणि आपण सर्व एका रेस मध्ये धावत आहोत. मोठे होण्याचे, सर्वांच्या पुढे जाण्याचे स्वप्न पाहत आहोत त्यामुळे ताण, ब्लड प्रेशर, डायबिटीस, हार्टफेल सारख्या समस्या वाढतच आहेत. समस्या आणि ताण कोणाला चुकले आहेत पण मद्य हा त्यावर उपाय नाही.
ज्या वेळी अध्यात्म म्हणजे काय समजेल त्यावेळी दारू पिणाऱ्याचे प्रमाण नक्कीच कमी होईल. या साठी नवनवीन पद्धतीने समाज प्रबोधन करण्याची गरज आहे. अध्यात्म म्हणजे नुसते देव, देवता, पुराण, वेद यांचे बोजड विश्लेषण नव्हे आणि नको पण समाधान प्राप्त होण्याचे साधे आणि सोपे उपाय हवेत.
पण आजकाल कोण कोणाचे ऐकतो?
माधव भोळे
No comments:
Post a Comment