Wednesday, June 28, 2023
आपले पूर्वज आणि त्यांचे नातेसंबंध
आपले पूर्वज आणि त्यांचे नातेसंबंध
नुकतेच एका धार्मिक कार्यक्रमाला गेलो होतो. सर्व कार्यक्रम झाल्यावर गुरुजींनी काय काय विधी केले याची थोडक्यात माहिती दिली. आधी पुण्याहवाचन, नंतर नांदीश्राद्ध वगैरे वगैरे. एका उत्साही व्यक्तीने प्रश्न विचारला नांदीश्राद्ध म्हणजे काय? गुरुजी म्हणाले की कोणतेही पुण्यकर्म करताना आपण आपल्या पूर्वजांची आठवण करतो, तो विधी म्हणजे नांदीश्राद्ध.
हिंदू धर्मात आपल्या पूर्वजांच्या तिथीला किंवा पितृ पक्षात किंवा तिथी माहिती नसल्यास सर्व पित्री अमावास्येला आपल्या पूर्वजांची म्हणजे पितरांची आठवण ठेवण्यासाठी वेगवेगळे विधी सांगितले आहेत. अनेक लोकांना, कदाचित अहंकारामुळे असेल, आपण स्वकर्तुत्वाने यश प्राप्त करतो आणि त्यामुळे असे काही करण्याची आपल्याला गरजच नाही असे वाटते, ते किती सत्य आहे या बद्दल हे विवेचन.
प्रथम आपण हे समजणे आवश्यक आहे की पृथ्वीवर असलेल्या वनस्पती, पक्षी, प्राणिमात्र, कृमी कीटक या सर्वात श्रेष्ठ असलेल्या मानव जातीत आपला जन्म झाला आहे. असे म्हणतात की मानव जन्म ८४ लक्ष योनीमधून येतो. आपण मानव बनण्यासाठी आपले पूर्वज सुद्धा मानव असणे आवश्यक आहे.
मानव ज्यावेळी जन्म घेतो त्यावेळी त्याच्या माता पित्याच्या जननेंद्रियांमधून जे द्रव्य बाहेर पडते त्याला क्रोमोझोंम (गुणसूत्रे) असे म्हणतात. मानवाची प्रत्येक पेशी 23 प्रकारच्या क्रोमोझोंम पासून बनते त्या पैकी 22 क्रोमोझोंमना ऑटोक्रोमोझोंम असे म्हणतात. ऑटोक्रोमोझोंम शरीराचे वेगवेगळे मूलभूत चलनवलन, मेंदूकडे संदेश वाहन, रूप, रंग, स्पर्श, दृष्टी, चव वगैरे देते आणि नियंत्रण करते तर 23 वा क्रोमोझोंम हा आपले लिंग ( स्त्री किंवा पुरुष) निर्धारित करतो. असे एकंदर 23 क्रोमोझोंम स्त्रीच्या शरीरातून आणि 23 क्रोमोझोंम पुरुषाच्या शरीरातून निघून ज्यावेळी आदर्श स्थितीत ( ideal condition) एकत्र येतात त्यानंतर एका ठराविक वेळेला बीज धारणा होऊन गर्भधारणा होते. ( साधारण पणे स्त्री च्या पाळीच्या आधी पाच दिवस किंवा नंतर पाच दिवस ) पण प्रत्येक वेळी गर्भधारणा होईलच असे नाही.
प्रत्येक क्रोमोझोंम मध्ये शेकडो जीन्स आणि कोट्यवधी बेस जोड्या असतात त्या आपल्या पूर्वजांची बीजसुत्र सांभाळून ठेवतात आणि पुढच्या पिढीला प्रदान करतात त्याला DNA असे म्हणतात. एखाद्या बाळाची आई किंवा बाबा शोधायचे असतील तर अशा वेळी बाळाची आणि माता पित्यांची DNA टेस्ट केली जाते ती ह्याच कारणासाठी.
काही वेळेला ही गर्भधारणा होतेवेळी एखादा क्रोमोझोंम हा चुकीच्या पद्धतीने किंवा कमकुवत पणे संमिलित होतो त्यावेळी त्याचे परिणाम गर्भधारणे वर होतात आणि होणाऱ्या बाळामध्ये काहीतरी त्रुटी निर्माण होतात. अनेक दिव्यांग किंवा बौद्धिक कमकुवत किंवा शारीरिक कमकुवत मुले ज्याला आपण स्पेशल बाळ म्हणतो ती याच मुळे निर्माण होतात. सध्या वैधकशास्त्र एव्हडे प्रगत आहे की गर्भधारणा झाल्यानंतर बाळाच्या बाजूला असलेल्या द्रव्याची परीक्षा करून होणारे बाळ कमकुवत किंवा स्पेशल चाईल्ड होणार आहे का हे तपासता येते आणि असेल तर त्यावर उपाययोजना करता येते पण त्याला काही सरकारी नियम आहेत.
जर पूर्वज नसते तर आपण नसतो आणि पूर्वजांच्या जीन्स मध्ये काही त्रुटी असतील तर त्या आपल्याकडे सुद्धा आल्या असत्या. असे अनेक रोग आहेत जे परंपरिक रित्या आपल्याकडे येतात हे आपणास माहीतच असेल. आपल्याकडे येणारे गुण किंवा दोष हे सुद्धा आपल्या पूर्वजांकडून आपल्यामध्ये येतात. अर्थात ते संस्कार किंवा आजूबाजूच्या परिस्थिती नुसार सुद्धा बदलतात, पण मुख्यतवे पूर्वजांकडून. आता तुमच्या लक्षात आले असेल की आपल्या जैविक जडणघडणी मध्ये आपल्या पूर्वजांच्या किती मोठा सहभाग आहे? आता मी, माझे यश, माझी प्रगती याच्यामध्ये पूर्वज्यांचे किती स्थान आहे ते. मराठीत एक म्हण आहे "आढ्यात नाही तर पोहोऱ्यात कुठून येणार?".
त्यामुळे आपण पूर्वजांच्या अगणतीत ऋणात आहोत हे नक्की. आता ते अल्प प्रमाणात का होईना फेडणे आवश्यक आहे पण त्यासाठी धार्मिक विधीच केले पाहिजेत असे नाही. त्यांच्या आठवणीने कोणतेही पुण्य कृत्य करा, त्यामुळे आपण अल्प प्रमाणात का होईना त्यांचे ऋण हलके करू शकू.
माधव भोळे
Subscribe to:
Posts (Atom)