Tuesday, September 29, 2026

बॉम्बे शेविंग कंपनी

बॉम्बे शेविंग कंपनी तुम्ही ह्या कंपनीचे नांव कदाचित ऐकले असेल. शंतनू देशपांडे नावाच्या एका मराठामोळ्या तरुणाची हीं यशोगाथा आहे. देशपांडे कुटुंब मूळचे इंदूरचे. वडील किरण देशपांडे हे पूर्वी टाटा कन्सलटन्सीतर्फे अमेरिकेत कार्यरत होते. पुढे ते टेक महिंद्रा कंपनीचे मॅनेजिंग डायरेक्टर आणि सीईओ झाले ( १९९६ ते २००१. याच काळात त्यांनी टेक महिंद्राला IPO साठी तयार केले.) शंतनूचा जन्म अमेरिकेतील टेक्सस मध्ये १९८७ साली झाला. पुढे काही वर्षांनी म्हणजे १९९६ साली देशपांडे कुटुंबीय भारतात पुणे येथे परतले. शंतनू पुण्यातील विखे पाटील शाळेत शिकल्यानंतर पुढे त्यांनी नागपूर येथील प्रसिद्ध विश्वेश्वरैया नॅशनल इन्स्टिटयूट ऑफ टेक्नॉलॉजी मधून बी. टेक. आणि पुढे आय आय एम लखनऊ मधून एम.बी. ए. पूर्ण केले. शिक्षण संपल्यानंतर सुरवातीला जून २०११ ते ऑगस्ट २०१५ पर्यंत इतर विद्यार्थ्याप्रमाणे त्यानी मॅकेंझी आणि कंपनी ह्या जगप्रसिद्ध कन्सलटिंग कंपनीमध्ये काम सुरू केले. पण वडिलांप्रमाणे काहीतरी मोठे आणि वेगळे करायचे हे सतत त्यांच्या डोक्यात घोळत होते. त्यांच्या डोक्यात एक कल्पना आली. बाजारात असलेली सौंदर्य प्रसाधने जास्तीतजास्त स्त्रियाना विचारात घेऊन तयार केलेली असतात. पण अलीकडच्या काळात पुरुषांना सुद्धा अशा प्रसाधनांची गरज आहे. त्वचेची निगा राखणारी उत्पादने, हेअर स्टायलिंगची साधने आणि ग्रूमिंग सेवांचे महत्त्व वाढत असल्याने, पुरुष आपले व्यक्तिमत्त्व अधिक आकर्षक बनवण्यासाठी आणि आत्मविश्वास वाढवण्यासाठी नवनवीन मार्ग शोधत आहेत. आपल्या विचारांना मूर्तरूप देण्यासाठी त्यांनी २०१६ साली आपले सहकारी मित्र दिपू पणिकर, रौनक मुनौत आणि रोहित जैस्वाल यांचे बरोबर बॉम्बे शेविंग कंपनी स्थापन केली. त्याचे रजिस्टर्ड नांव Visage लाईन्स पर्सनल केर प्रायव्हेट लिमिटेड. त्यांनी प्रथम २०१६ सालीच एक ६ रेझरचा पॅक असलेले किट २९०० रुपयाला ऑनलाईन विकायला सुरवात केली. परंतु एवढ्या महाग किमतीला कोणी घ्यायला तयार होईना. मग त्यांनी तीच वस्तू कमी किमतीत आणि एक एक करून सुटी विकायला सुरवात केली. त्यांनी प्रस्थापित डिस्ट्रिब्युटर, डीलर, एजंट, विक्रेता हीं साखळी न वापरता इंटरनेट माध्यमातून डायरेक्ट टू कस्टमर ( D2C) हा मार्ग अवलंबला. त्या नंतर हळू हळू आपल्या प्रॉडक्टसची व्याप्ती वाढवली. दाढी करायच्या साधनापासून सुरवात करून मग इलेक्ट्रॉनिक ट्रिमर्स, हेयर रिमूव्हर्स, त्वचा आणि चेहरा प्रसाधने, सुगंधी पर्फुम्स, बॉडी केयर आणि गिफ्ट किट्स इत्यादी उत्पादने बाजारात आणली. या वेळी त्यांनी डीमार्ट, रिलायन्स रिटेल सारखी मोठ मोठाली रिटेल साखळी दुकानें, तसेच blinkit, zomato सारखे क्वीक कॉमर्स कंपन्या यांच्याशी संधान साधले. २०२१ साली त्याने मॅकेंझी मधील नोकरीं सोडली आणि डिजिटल कॉमर्स ह्या विषयासाठी तो मॅकेंझीबरोबर बाह्य सल्लगार म्हणून काम करू लागले. आर्थिक वर्ष २०२६ मध्ये कंपनीच्या वाढीला लक्षणीय गती मिळाली. कंपनीच्या आकडेवारीवर आणि ट्रॅक्सनवर आधारित एका अहवालानुसार, बॉम्बे शेविंग कंपनीची मूळ कंपनी, व्हिसेज लाइन्स पर्सनल केअर प्रायव्हेट लिमिटेडने मार्च २०२६ मध्ये संपलेल्या वर्षासाठी ₹६३५ कोटींचा परिचालन महसूल नोंदवला, जो आर्थिक वर्ष २०२५ मधील ₹२६६ कोटींच्या तुलनेत १३९% ची वार्षिक वाढ दर्शवतो. त्याच वेळी, कंपनीचा निव्वळ तोटा मागील वर्षातील ₹५८ कोटींवरून ८४.५% ने कमी होऊन सुमारे ₹९ कोटींवर आला. सुरवातीला मार्केट आणि प्रॉडक्ट एस्टाब्लिश होई पर्यंत मार्केटिंग खर्च खूप असतो. बार्बर शॉप विथ शंतनू हा त्याचा पॉडकास्ट चॅनल आहे. बॉम्बे शेव्हिंग कंपनीने आता पर्यंत १४ वेळा वेंचर कॅपिटलच्या मार्फत एकंदर ६९.८ मिलीयन डॉलर्स एव्हडा निधी आपल्या कंपनीच्या विस्तार आणि IPO साठी उभारला असून तिचे सध्याचे व्हाल्यूएशन रु. ८२४ कोटी आहे. सिक्सथ सेन्स वेंचर्स (Lead investor), कोलगेट पालमोलिव्ह, फायरसाईड वेंचर्स, रेकीट बेंकिंसर (RB), मलाबार इन्व्हेस्टमेंट्स , पटणी फॅमिली ऑफिस हे त्यांचे काही प्रमुख गुंतवणुकदार आहेत. आक्रमक जाहिरात आणि मार्केटिंग, प्रॉडक्ट नावीन्य, अभ्यासू बिझिनेस मॉडेल, स्ट्राटीजिक विस्तार अशा पैलू मूळे बॉम्बे शेविंग कंपनी जिलेट सारख्या जागतिक दर्जाच्या कंपनीला टक्कर देत आहे. आणि हो, हे सर्व १० वर्षात. जिलेटला भारतात येऊन ४२ वर्ष झाली तर जगात ती १२५ वर्ष काम करीत आहे. माधव भोळे.

वीर येथे पर्यटनासाठी संधी!

वीर येथे पर्यटनासाठी संधी! लवकरच वीर काजूर्ली पूल मान्य होऊन पुढील २ वर्षात म्हणजे २०२९ चे आधी काम पूर्ण होईल अशी आशा करूया. ह्या पुलामूळे गणपतीपुळे, जयगड आणि कोळीसरे येथील पर्यटक, राई भातगाव पुला मार्गे काजूर्ली जुगाई देऊळ करत वीर बंदर आणि देवपाट मार्गे वहाळ येथे जातील. श्री लक्ष्मी मल्लमर्दन मंदिर आणि देवपाट धबधबा ह्यांचे खूप मार्केटिंग झाले आहे. त्यात श्री संदेश पांडुरंग वीरकर यांनी केलेल्या गणपती डेकोरेशन देखव्या मूळे वीर गावाचे पर्यटन विषयक महत्व अजून अधोरेखित झाले आहे. आता श्री लक्ष्मी मल्लमर्दन मंदिर, वीर देवपाट धबधबा, वीर नौकानयन, कातळ शिल्प, इत्यादी गोष्टीना लोक आवर्जून भेट देतील. त्यांच्यासाठी बौद्ध वाडी सपाटी, ब्राह्मणवाडी सहाण, वर जावळे वाडी कातळ येथे टेन्ट व्य्वस्था करणे शक्य होईल का याचा विचार करायला हरकत नाही. सहाणेवर एक राईस प्लेट खानावळ आणि एक कॉफ़ी शॉप किंवा फास्ट फूड कॉर्नर उभारले जाऊ शकते. तसेच ज्यांना शक्य असेल ते आपली घरे दुरुस्त करून रंग रांगोटी करून तेथे होमस्टे चालवतील.. संधी नेहमी आपल्या समोर असते. पण ती ओळखता आली पाहिजे. माधव भोळे

Monday, September 28, 2026

केल्याने होत आहे रे...

केल्याने होत आहे रे... तो ४३ वर्षांचा असा एक माणूस होता ज्याच्याकडे गमावण्यासारखे काहीच उरले नव्हते; त्याची २० लाख युआनची ( चीनचे नाणे युवान, आताचा दर १ युवान म्हणजे १४ रु. ३० पैसे ) फसवणूक झाली होती आणि त्याला नोकरीवरून काढून टाकण्यात आले होते. त्याचे वैवाहिक आयुष्यही मोडकळीस आले होते. अशा परिस्थितीत, त्याने मित्रांकडून २१,००० युआन उसने घेतले आणि शेन्झेन ( चीन मधील एक शहर ) येथील एका जीर्ण अपार्टमेंटमध्ये एक कंपनी सुरू केली. ती कंपनी आता पृथ्वीवरील सर्वात शक्तिशाली दूरसंचार साम्राज्य बनली आहे. ते आहेत हुआवेईचे (Huawei) संस्थापक रेन झेंगफेई. - जन्म: २५ ऑक्टोबर १९४४, झेननिंग काउंटी ( तालुका सारखा विभाग ) गुईझोऊ प्रांत. - डोंगराळ गावातील एका गरीब रहिवासी; आई-वडील ग्रामीण भागातील शिक्षक होते. - सात भावंडांमध्ये सर्वात मोठे. - कुटुंब अत्यंत गरीब असल्याने त्यांची आई प्रत्येकाला मोजून-मापून जेवण देत असे. - वडील विद्यापीठात शिक्षण घेतलेले एक विचारवंत होते. - 'माओच्या सांस्कृतिक क्रांती'च्या काळात त्यांना छळाला सामोरे जावे लागले. - त्यांनी तरुण रेनला एकच गोष्ट सांगितली: 'ज्ञान हीच शक्ती आहे; अभ्यास कर आणि गर्दीच्या मागे जाऊ नकोस.' - त्यांनी चोंगकिंग युनिव्हर्सिटी ऑफ आर्किटेक्चर अँड इंजिनिअरिंगमध्ये शिक्षण घेतले. - संगणक तंत्रज्ञान, स्वयंचलित नियंत्रण प्रणाली (ऑटोमॅटिक कंट्रोल), प्रगत गणित आणि परदेशी भाषांचे स्वतःहून अध्ययन केले. - १९७४ मध्ये बांधकाम अभियंता म्हणून लष्करात रुजू झाले. - 'लियाओ यांग' येथील रासायनिक तंतू (केमिकल फायबर) प्रकल्पावर काम केले. - पदोन्नती मिळवून तांत्रिक उप-रेजिमेंट कमांडरपदापर्यंत मजल मारली. - १९७८ मध्ये बीजिंग येथील राष्ट्रीय विज्ञान परिषदेत सहभाग घेतला. - १९८२ मध्ये चिनी कम्युनिस्ट पक्षाच्या १२ व्या राष्ट्रीय अधिवेशनासाठी प्रतिनिधी म्हणून निवड झाली. - १९८३ मध्ये सैन्यातील त्यांची भूमिका संपली आणि त्यांना सेवेतून मुक्त करण्यात आले. - पत्नीसोबत राहण्यासाठी ते शेन्झेनला गेले. - तिथे एका उपकंपनीमध्ये त्यांची 'डेप्युटी मॅनेजर' म्हणून नियुक्ती झाली. - त्यांना व्यवसायाचा कोणताही अनुभव नव्हता; ते एक सैनिक आणि अभियंता होते. - कंपनीसाठी काम करत असताना त्यांची फसवणूक झाली. - एका लबाड व्यापारी कंपनीने २० लाख युआन घेऊन पोबारा केला. - त्या काळी ही एक प्रचंड मोठी रक्कम होती. - ती रक्कम परत मिळवण्यासाठी त्यांनी वर्षभर प्रयत्न केले आणि अखेरीस त्यातील बहुतांश रक्कम वसूल केली. - तरीही कंपनीने त्याला कामावरून काढून टाकले. - त्याच्या पत्नीने त्याला घटस्फोट दिला. - वय ४३ वर्षे, बेरोजगार; आई-वडील आणि भावंडांसोबत एका अरुंद घरात वास्तव्य. - त्या कुटुंबाला बाजारातून केवळ मेलेले मासे आणि कोळंबी विकत घेणेच परवडत असे. - १९८७: २१,००० युआन उसने घेऊन 'हुवावे'ची (Huawei) स्थापना केली. - या नावाचा अर्थ 'चीनमध्ये क्षमता आहे' असा होता. - तीन कर्मचारी; हाँगकाँगवरून टेलीकॉम स्विचेस (switches) आयात करून त्यांची पुनर्विक्री करण्यापासून सुरुवात केली. - त्यांना केवळ मध्यस्थ राहायचे नव्हते. त्यांना स्वतःचे तंत्रज्ञान विकसित करायचे होते. - १९८९: हुवावेचे स्वतःचे स्विच विकसित करण्यास सुरुवात केली. - १९९०: हुवावेने उत्पादित केलेले पहिले स्विच प्रमाणीकरण ( Certification ) प्रक्रियेत यशस्वी ठरले. - चीनमधील प्रमुख शहरांवर वर्चस्व मिळवण्यासाठी परदेशी दिग्गज कंपन्यांमध्ये स्पर्धा सुरू होती. - रेन यांनी 'हुवावे'ला ग्रामीण भागाकडे वळवले आणि अशा बाजारपेठांवर लक्ष केंद्रित केले ज्यांकडे आंतरराष्ट्रीय कंपन्यांनी दुर्लक्ष केले होते. - ही रणनीती यशस्वी ठरली. - १९९७ मध्ये त्यांनी अमेरिकेला भेट दिली आणि 'बेल लॅब्स' (Bell Labs) व 'आयबीएम' (IBM) ला प्रत्यक्ष पाहिले. - खऱ्या अर्थाने आधुनिक उद्योग कसा असतो, हे त्यांनी पाहिले. - परत आल्यावर, 'आयबीएम'च्या सल्लागारांची सेवा घेण्यासाठी त्यांनी प्रचंड मोठी रक्कम खर्च केली. - त्यांनी आपल्या व्यवस्थापकांना अत्यंत कठोर आदेश दिला: पुढील पाच वर्षे सल्लागार सांगतील तंतोतंत तसेच करायचे. कोणतेही बदल नाहीत; - पाच वर्षांनंतर तुम्ही परिस्थितीशी जुळवून घेऊ शकता, तर दहा वर्षांनंतर पुनर्रचना करू शकता. - व्यवस्थापन तत्त्वज्ञान: ग्राहक सर्वात महत्त्वाचा, तर बॉसचा क्रमांक सर्वात शेवटी. - ग्राहकाभिमुख राहा आणि वरिष्ठांकडे पाठ फिरवा. - अशी प्रणाली विकसित केली जिथे 'हुवावे' (Huawei) कोणत्याही एका व्यक्तीवर अवलंबून नाही – अगदी स्वतः त्या व्यक्तीवरही नाही. - 'हुवावे' (Huawei) मधील १ टक्क्यापेक्षा कमी हिस्सा त्यांच्या मालकीचा आहे. - उर्वरित हिस्सा कर्मचाऱ्यांकडे 'व्हर्च्युअल शेअर सिस्टीम'द्वारे (आभासी समभाग प्रणाली) आहे. - त्यांनी याला 'सर्वांची भागीदारी' असे संबोधले. - त्यांची निस्वार्थी वृत्ती हे 'हुवावे'च्या यशामागचे एक कारण होते. - ते त्यांच्या स्पष्टवक्तेपणासाठी ओळखले जातात. - त्यांनी कर्मचाऱ्यांना सांगितले होते की, सर्वात मोठी समस्या म्हणजे खूप जास्त पैसा असणे आणि तो कसा खर्च करावा हे न समजणे. - २००९ मध्ये, हुआवेईने 'फॉर्च्युन ग्लोबल ५००' (Fortune Global 500) यादीत स्थान मिळवले. - २०१८ मध्ये, कंपनीचे उत्पन्न १०७ अब्ज डॉलर्सवर पोहोचले आणि १७० देशांमध्ये तिचे ग्राहक होते. - त्यानंतर जग तिच्या विरोधात गेले. - २०१८ मध्ये, अमेरिकेच्या विनंतीवरून त्यांची कन्या मेंग वानझोऊ हिला कॅनडामध्ये अटक करण्यात आली. - तिला जवळपास तीन वर्षे 'हाऊस अरेस्ट'मध्ये (घरामध्येच नजरकैदेत) ठेवण्यात आले. - २०१९ मध्ये, अमेरिकेने हुआवेईचा समावेश 'एन्टिटी लिस्ट'मध्ये (Entity List) केला आणि अमेरिकन चिप्स व सॉफ्टवेअरचा पुरवठा बंद केला. - रेनने माघार घेतली नाही, उलट त्यांनी आपली गती वाढवली. - हुआवेईने स्वतःचे चिप्स, स्वतःची ऑपरेटिंग सिस्टिम आणि स्वतःची इकोसिस्टिम विकसित केली. - ती कंपनी टिकून राहिली. - २०२५ मध्ये, वयाच्या ८१ व्या वर्षी, त्यांनी शांघायमध्ये 'कॉम्पिटिटिव्ह प्रोग्रामिंग'मधील (स्पर्धात्मक प्रोग्रामिंग) अव्वल दर्जाच्या विद्यार्थ्यांशी संवाद साधला. - त्यांनी एआय (AI), शिक्षण आणि भविष्य या विषयांवर १४,००० शब्दांत आपले विचार मांडले. - चीन आणि अमेरिका हे देश वेगवेगळ्या मार्गांवरून वाटचाल करत असल्याचे त्यांनी सांगितले. - अमेरिका सर्वोच्च शिखरे सर करण्याचा प्रयत्न करत आहे, तर चीन व्यावहारिक समस्या सोडवण्यावर भर देत आहे. - जर तुम्ही उंच ध्येय गाठू शकत असाल, तर खालच्या पातळीवर समाधान मानू नका. - ते आजही कामावर जातात आणि फारशा मुलाखती देत नाहीत. - आजही ते कोणत्याही लवाजम्याशिवाय प्रवास करतात. गुइझोऊमधील एका डोंगराळ गावातील शिक्षकाचा मुलगा. आपली सर्व बचत गमावली, नोकरीवरून काढून टाकले गेले, घटस्फोट झाला आणि वयाच्या ४३ व्या वर्षी ते पूर्णपणे कंगाल झाले होते; तरीही २१,००० युआनचे कर्ज काढून त्यांनी अशी कंपनी उभारली जी आज मानवजातीतील एक-तृतीयांश लोकांना एकमेकांशी जोडते. त्यांनी पैशाने सुरुवात केली नाही, ओळखी-शिफारशींनीही सुरुवात केली नाही; त्यांनी सुरुवात केली ती ज्ञान, शिस्त आणि हार न मानण्याच्या जिद्दीच्या जोरावर. त्यांचे नाव रेन झेंगफेई (Ren Zhengfei) आहे आणि ते ८१ वर्षांचे आहेत. ते अजूनही नवनवीन गोष्टी घडवत आहेत. मूळ इंग्रजी लेख आपल्यासाठी गुगल भाषांतरित माधव भोळे

Saturday, September 26, 2026

जगन्नाथ पुरी जवळील कोनार्क / कोणार्क यात्रा

जगन्नाथ पुरी जवळील कोनार्क / कोणार्क यात्रा दुसऱ्या दिवशी आम्ही ओरिसा मधील जगन्नाथपुरी पासून ३५ किलोमीटर दूर असलेले, १९८४ साली युनेस्को जागतिक वारसा स्थळ घोषित झालेले प्राचीन असे कोणार्क सूर्य मंदिर बघायला गेलो. हे सूर्य मंदिर पूर्व गंगा साम्राज्याचा राजा लांगुला नरसिंहदेव-१ याने इ.स. १२३८ मध्ये १२०० कामगारांच्या साहाय्याने १२ वर्षात म्हणजे १२५० मध्ये पूर्ण केले. हे मंदिर सूर्यदेवांना समर्पित केले गेले आहे. मंदिर मूलतहा: पिवळ्या तपकिरी खोंडालाईट दगडापासुन बनवले गेले आहे. संपूर्ण मंदिराची रचना पूर्व पश्चिम अक्षानंवर बसवली असून सूर्याचे पहिले किरण थेट गर्भगृहात जाते. ह्या जागेला कोणार्क सूर्य मंदिर असे म्हणतात कारण संस्कृत मध्ये कोन म्हणजे कोपऱ्यातील आणि अर्क म्हणजे सूर्यदेवाचे किरण किंवा सूर्य देव. हे देऊळ भारताच्या दक्षिण पूर्व भागात आहे म्हणून ते कोन म्हणतात. मूळ २२७ फूट उंच असलेल्या ह्या सूर्यरथ रुपी आकाराच्या वास्तूची आताची इमारत फक्त १०० फूट उंच एव्हडीच आहे. यातील काही भाग १५०८ मध्ये कालिंगवर स्वारी ( ह्या प्रदेशाला पूर्वी कलिंग साम्राज्य म्हणत ) करणाऱ्या मूर्तीभंजक मुसलमान आक्रमक सुलतान सुलेमान करानी ( काळा पहाड ) याने केलेल्या विध्वन्सक आक्रमणामूळे झाली असे इतिहासकार मानतात. तर काही भाग भूकंपाचे हादरे, तकलादु अस्थिर पाया, तसेच त्या विभागातील खाऱ्या हवेमुळे दगड ठिसूळ होऊन ते कोसळले असावेत असा निष्कर्ष आहे. ह्या मंदिराचा आकार सूर्यरथासारखा असून, अरुण नावाचा सारथी आपल्या दोन पत्नी उषा आणि निशा ह्यांना घेऊन तो रथ चालवत आहे. ह्या दोन्ही पत्नी हातात धनुष्यबाण घेऊन अंधःकाराला तिर मारत आपल्या रथाला उजेडाकडे नेत आहेत अशी ती मूळ कल्पना आहे. त्या रथाच्या डाव्या बाजूला रथाची १२ चाके / चक्रे आणि उजव्या बाजूला रथाची १२ चाके / चक्रे असून ती वर्षाच्या १२ महिन्यातील शुक्ल पक्ष आणि कृष्ण पक्ष दर्शवितात. ७ घोडे हा रथ चालवत असून रथाच्या डाव्या बाजूला ४ आणि उजव्या बाजूला ३ घोडे आहेत. सध्या यातील एकच घोडा सुस्थितीत आहे. ह्या असमतोल रचनेमूळे तो रथ कायम वर्तुळाकार फिरेल अशी कल्पना. प्रत्येक चक्र ९ फूट ९ इंच व्यसाचे असून त्यावर नक्षी काम केलेले ८ आऱ्या ( स्पोक्स ) असून त्यामधील कोन परत आणखी ८ आऱ्यानी विभागले आहेत. प्रत्येक दोन मुख्य आरी मधील भूमितीय कोन एका प्रहराला दर्शवतो. एक प्रहर म्हणजे ३ तास. ८ प्रहर म्हणजे २४ तास. हीं चाके एक प्रकारचे सूर्य घड्याळ तबकडी असून जर चाकाच्या अक्षाजवळ आडवी काठीधरली तर तिची सावली जेथे पडेल त्यानुसार वेळ दर्शवते. देऊळ मुख्यत्वे दोन भागात विभागले गेले आहे. सुरवातीला जगमोहन भाग ज्याला आपण सभामंडप म्हणतो जेथे बसुन भक्तगण मुख्य देवतेची आराधना करू शकतात आणि दुसरे गर्भगृह किंवा गाभारा ज्या मध्ये मुख्य देवता असते. हा गाभारा सुमारे २२७ फूट उंच होता. अशी अख्यायिका आहे की ह्या गाभाऱ्यातील मूर्ती अष्टधातूची होती आणि ती हवेत तरंगती होती. ती तरंगण्याचे मुख्य कारण म्हणजे गाभाऱ्याच्या माथ्यावर एक ५२ टन वजनाचा मोठा दगड होता ज्यामध्ये लोहचुंबकीय गुणधर्म होते. ह्याच कारणामूळे त्या भागात युरोपीयन लोखंडी जाहजे आली की ती जोरात खेचली जाऊन कोठेतरी आपटली जायची. म्हणून युरोपिय खलाशी त्याला ब्लॅक पॅगोडा म्हणत. ब्लॅक म्हणजे ब्लॅक मॅजिक किंवा भुताटकी म्हणत. अशी अख्यायिका सांगितली जाते की राजाने त्या १२०० कारागिराना हे मंदिर १२ वर्षाच्या मुदतीत पूर्ण करण्यास सांगितले होते. १२ वर्षाची मुदत पूर्ण व्हायला फक्त एक / दोन रात्र बाकी होती. अजून गाभाऱ्यावरील ५२ टनी दगड २२७ फूट उंचीवर नेऊन बसवायचा बाकी होता. तो तसा बसवला गेला नाही तर १२०० कामगारांना फाशी दिली जाणार होती. मुख्य वास्तूशास्त्रज्ञ् बिशु महाराणा हे सर्व काम बघत होता. त्याचा १२ वर्षाचा मुलगा धर्मपद त्याला भेटायला आला होता. त्याने बघितले की आपले वडील फार चिंतेत आहेत. त्याने त्याचे कारण विचारले. वडिलांनी कारण सांगितल्यावर धर्मपदने डोके चालवले आणि तो ५२ टनी दगड वर रातोरात नेण्यासाठी काहीतरी युक्ती सुचवली आणि त्यामुळे दुसऱ्यादिवशी सकाळी काम पूर्ण झाले. जे काम १२०० कारागिराना जमले नाही ते एका १२ वर्षाच्या मुलाने अगदी कमी वेळात करून दाखवले, हीं बातमी सर्वत्र पसरून आपली नाचक्की होऊ नये यासाठी त्या कामगारांनी बिशू महाराणाला जबरदस्ती केली की तु तुझ्या मुलाला मारून टाक नाहीतर आमची इज्जत जाईल. वडिलांनी ह्या गोष्टीला स्पष्ट नकार दिला. त्या नंतर १२०० कारागीरांची आणि आपल्या वडिलांची अब्रू वाचवण्यासाठी धर्मपदने ३ किलोमीटर दूर असलेल्या चंद्रभागा समुद्र किनाऱ्यावर भर समुद्रात उडी मारून जीव दिला. संपूर्ण देऊळ हे त्या वेळच्या समाज चालीरीती, शृंगारिक शिल्पे आणि पौराणिक कथा दाखवणाऱ्या दगडी भिंती चित्रा( म्युरलस )ने भरले आहे. मंदिराच्या सुरवातीला एक नाट्य मंडप होता त्यातील काही भाग अजून शिल्लक आहे. त्यावर नाट्य, नृत्य आणि संगीता संबंधी चित्रे कोरली आहेत. वरील मंदिरा पैकी मूळ गाभाऱ्याचे शिखर कोसळले असून त्यातील मुख्य मूर्ती आणि तो ५२ टन वजन असलेला दगड गायब आहे. अनेक शिल्प ब्रिटिशांनी आपल्या म्युझियम मध्ये नेऊन ठेवली आहेत. मंदिरा समोरील सूर्य स्तंभ, पुरी येथील जगन्नाथ मंदिरात हलवला गेला आहे. आक्रमकांकडुन खूप लुटालूट आणि तोडफोड झाली आहे. शिवाय ७७५ वर्षात पर्यावरण आणि खाऱ्या हवेतील वातावरणाचा परिणाम सुद्धा झाला आहे. असे हीं सांगितले जाते की कृष्णाचा मुलगा सांब ह्याला महारोग झाला होता. त्याने १२ वर्ष तपश्चऱ्या केल्यानंतर त्याने ह्याच ठिकाणी मूळ सूर्य मंदिर बांधले होते. त्या नंतर ९ व्या शतकात ह्याच ठिकाणी सूर्य उपासक सोमवंशी राज्यांनी येथे एक सूर्य मंदिर बांधले होते. आताचे मंदिर हे त्याची सुधारलेली मोठी आवृत्ती आहे. कोणार्क सूर्यमंदिराची सविस्तर वास्तुशिल्प रचना, नियोजनाचे दस्तऐवज आणि बांधकामाचा इतिहास हे, हिशोब आणि व्यवस्थापन माहिती, १९६० च्या दशकातील सर्वेक्षणादरम्यान कोणार्क परिसरातील गावांमध्ये सापडलेल्या प्राचीन ताडपत्रांवरील हस्तलिखितांमध्ये जतन केलेले आढळले. ह्या सूर्य मंदिराबद्धल अधिक आणि सचित्र माहिती देण्यासाठी इंडियन ऑइल फाउंडेशन तर्फे एक विशेष दालन उभारले गेले आहे. शिवाय तेथे लाईट आणि साउंड शॊ सुद्धा आहे. संपुर्ण परिसर आर्किओलोजीकल सर्व्हे ऑफ इंडिया ह्या भारत सरकारच्या सांस्कृतिक मंत्रालयाच्या विभागाच्या अख्त्यारीत आणि निगराणी खाली आहे. माधव भोळे.

Sunday, September 20, 2026

ब्राह्मण समाज, एक पंचिंग बॅग

ब्राह्मण समाज, एक पंचिंग बॅग काल आय. आय. टी. मुंबई मधील विद्यार्थ्याला कॉपी करताना पकडले आणि त्यामुळे मानसिक तणावा मूळे त्याने आत्महत्या केली आणि आज लगेच समाज माध्यमातून चर्चा सुरू झाली की जातीयवादी शक्ती मूळे त्या विध्यार्थ्याने आत्महत्या केली. झालेली गोष्ट अत्यंत दुर्दैवी असून त्या विद्यार्थ्यांच्या आत्म्यास सद्गती लाभो हीं ईश्वरचरणी प्रार्थना. त्याच्या कुटुंबियांच्या दुःखात आम्ही सर्व सहभागी आहोत. एक ऍडवोकेट म्हणतात २० वर्षात २३ आय आय टी मध्ये १६० विद्यार्थ्यांनी जातीयवादी छळ सहन न झाल्यामुळे आत्महत्या केली. या आत्महत्या नसून या हत्या ब्राह्मणवादी शिक्षण व्यवस्थेमुळेच झाल्या आहेत. आता ब्राह्मणवादी शिक्षण व्यवस्था म्हणायला आय आय टी मध्ये वैदिक किंवा सनातनी शिक्षण तर दिले जात नाही. ना ते संस्कृत मध्ये शिकवले जात. ते तर इंग्रजी मध्ये आणि सायन्स आणि टेक्नॉलॉजी आणि आता ह्युमानुलीटीज आणि मॅनेजमेंट मध्ये शिकवले जाते. येथे कोठे ब्राह्मणवाद किंवा मनुस्मृती आडवी येते? मुद्धा असा की २३ आय आय टी मध्ये एका वर्षाला १८००० विध्यार्थ्यामध्ये २०% राखीव जागा जातीनिहाय असतात. म्हणजेच दरवर्षी सुमारे ३६००. जरी हिशेबसाठी आपण वर्षाला ३००० x २० वर्ष = ६०,००० जातीनिहाय जागां पैकी फक्त त्यांच्याच आकडेवारी नुसार १६० विध्यार्थ्यानी आत्महत्या केली. अर्थात आत्महत्या करणे दुर्दैवी आहे, परंतु ५९,८४० विद्यार्थ्यांनी तर आत्महत्या केली नाही. मग त्याना नाही ब्राह्मणवादाची अडचण आली? उगाच काहीतरी मुद्धे काढून ब्राह्मणांना दोष द्यायचा. ब्राह्मण समाज हा एक पंचिंग बॅग झाली आहे. कुठे काही बिघडले, की यांना ब्राह्मण आडवे येतात. आज देश स्वतंत्र होऊन ७९ वर्ष झाली तरी ३% ब्राह्मण ९७% इतर समाजाला गुलामगिरीत कसा ठेवू शकतो हे जगातील ९ वे आश्चर्य म्हणावे लागेल. अहो आय आय टी मध्ये असलेले सर्व प्राध्यापक काही ब्राह्मण नसतात. तेथे पण शिक्षण तसेच प्रशासनामध्ये राखीव जागा असतात ज्या जातीनिहाय असतात. सर्व ठिकाणी राजकारण करून देशाचा सत्यानाश करू नका. निदान उच्च शिक्षण संस्थामध्ये, मेरिट ला महत्व ध्या मग तो कोणत्याची समाजाचा असो. माधव भोळे

Friday, September 18, 2026

तरकट विद्यानंद बापट!

तरकट विद्यानंद बापट! गेले काही दिवस विद्यानंद बापट नावाचे गारुड सोशल मीडिया आणि TV channels मध्ये गाजत आहे. बापट यांच्या DJ बंदीला माझा पूर्ण पाठिंबा आहे परंत नास्तिक म्हणून गाजत असलेली त्यांची वक्तव्ये मुळातच अपरिपक्व ज्ञानामूळे आहेत असे मी मानतो. नास्तिक माणूस ईश्वराचे अस्तित्वच नाकारत असतो तर श्रद्धाळु किंवा आस्तिक हा कोणत्या तरी शक्तीला सगुण रूपात मानून त्याची पूजा अर्चा करतो आणि त्याद्वारे ईश्वरकृपा प्राप्त करण्याचा प्रयत्न करीत असतो. नास्तिकांना ईश्वर अस्तित्वात नाही हे सिद्ध करायला अनेक तर्क आणि दाखले द्यायला लागतात पण श्रद्धाळू व्यक्तीला ईश्वर अस्तित्वात आहे हे सिद्ध करायची गरजच पडत नाही. कारण तो आहे आणि त्याचा माझ्या आयुष्यात एक विशिष्ट स्थान आहे हीं श्रद्धा आणि विश्वासच त्याला जीवनकार्य पुढे न्यायला मदत करते. ईश्वराचे अस्तित्व नाकारणे म्हणजे संपूर्ण चराचरामध्ये असलेल्या त्याच्या प्रकटीकरणाशी प्रतरणा करणे. महात्मे सांगतात. अहं ब्रह्मास्मि. माझ्यात ब्रह्म आहे. आपल्या शरीराचा प्रत्येक भाग असा बनला आहे की तो दुसरा कोणीही तयार करू शकत नाही. ज्या नास्तिकते बद्दल बापट सांगतात त्यासाठी कोणत्या परकीय लेखकाची ऊदाहरणे ते देतात याचा आपण विचार केला तर कोणते तरी पुस्तक त्यांनी कधीतरी वाचलेले असते त्यातील योग्य संदर्भ ते जेव्हा देतात ते त्यांच्या स्मरणातून बुद्धी तर्क ताडून त्यांच्या स्वरयंत्रा मार्गे व्याकरण शुद्ध भाषेत उदघृत होतात आणि त्याचबरोबर त्या वेळी त्यांचे चेहऱ्यावरचे हावभाव सुद्धा बदलतात. म्हणजे विचार, व्याकरण शुद्ध वाक्य यांचा समतोल सांभाळून हे कार्य त्यांच्याकडून करवून घेणारी हीं शक्ती कोणती? ते ज्यावेळी बाहेर बघतात त्यावेळी बाहेरच्या दृश्याची प्रतिमा त्यांच्या बुभूळामार्फत त्यांच्या मज्जा पटलावर पडते आणि त्या मज्जा पटलावर असलेल्या लाखो बिंदू मध्ये असलेल्या नसामार्फत ती मेंदूमध्ये पोचते, तो मेंदू त्या प्रतिमेचे विश्लेषण करतो आणि त्या प्रतिमेचा संदर्भ लावून एखादी गोष्ट किंवा इतिहास त्यांच्या स्मरणात येतो आणि तो त्यांच्या मनात काही भावना निर्माण करतो. मजा म्हणजे चालू प्रसंगमध्ये मेंदू अशा कमीतकमी १५ ते जास्तीतजास्त २०० प्रतिमा एका सेकंदात मेंदू पर्यंत पोचवून त्याचे विश्लेषण करू शकतो. हृदय शरीरातील अशुद्ध रक्त घेऊन फुपुसे, किडनी आणि लिव्हर मार्फत शुद्ध केलेले रक्त अहो रात्र पंप करीत सर्व शरीराच्या नसानसा मार्फत अत्यंत छोट्या अशा पेशीना पुरवत असते. आपल्या शरीरातील अशी कित्येक कार्य आपापली कार्यें सर्व बिनबोभाट अहो रात्र आणि कित्येक वर्ष करत असतात आणि त्यासाठी लागणारी ऊर्जा काय तर २ वेळचे जेवण. एवढ्या सर्व गोष्टी एकाच शरीरात होत असतात आणि विशेष म्हणजे ज्यावेळी एखाद्या बाळाचा जन्म होतो तेव्हा सुमारे ३.५ ते ४ किलो वजन असलेल्या त्या बाळामध्ये सुद्धा ह्या यंत्रणा ७० ते ८५ टक्के विकसित झालेल्या असतात आणि जसजसे ते बाळ मोठा होत जातो तसा ह्या सर्व यंत्रणाचा आणखी विकास होतो. आता तुम्ही म्हणाल की हे सर्व आता AI सुद्धा करते. होय आता तरी AI काही प्रमाणात करते पण त्याला जेव्हडे शिकवले आहे तेव्हडेच AI चांगले करू शकतो परंतु असे अनेक विषय आहेत की जेथे प्रतिभा शक्ती, नवनिर्मिती आणि संशोधन ह्या विषयामध्ये AI अजून पूर्ण यशस्वी होऊ शकला नाही कारण जे आढ्यात नसेल तर पोहोऱ्यात कुठून येणार? AI साठी प्रचंड प्रमाणात बाह्य ऊर्जा लागते आणि त्यासाठी तसेच डेटा सेंटर चालवण्यासाठी लागणारी ऊर्जा आणि पाणी आणि त्याचे पर्यावरण दुष्परिणाम याचे प्रमाण प्रचंड आहे. या उलट माणसाला हे सर्व करायला कमीकमी ऊर्जा लागते. हे सर्व तयार करणारी आणि नियंत्रण करणारी व्यवस्था म्हणजेच ईश्वर मानला गेला आहे. हीं व्यवस्था निर्गुण आहे परंतु मानवाने सामान्यजनाचा अकालनासाठी त्याला सगुण रूपात आणले आहे. अर्थात यातील अनेक यंत्रणा इतर प्राणी मात्रात आणि चराचरातील श्रुष्टी मध्ये सुद्धा वेगवेगळ्या पद्धतीने विकसित झालेल्या आहेत परंतु त्या ईश्वराला समजण्याची आणि त्याचे आभार मानण्याची बुद्धी ईश्वराने मानवाला दिली आहे तशी ती इतर प्राणीमात्रा मध्ये आहे की नाही याचा अजून तरी शोध लागला नाही. त्यामुळे तुम्ही नास्तिक असणे हा तुमच्या व्यक्तिगत प्रश्न आहे परंतु दुसऱ्यांनी आस्तिक असू नये हे सांगण्याचा कोणताही अधिकार नाही. मी तर म्हणतो ईश्वर नाही हे समजण्यासाठी त्याना बाहेरच्या जगात डोकावे लागले पण ईश्वर आहे हे समजण्यासाठी त्यांनी आपल्या शरीरात जरी डोकावून बघितले असते तरी तो त्याना समजला असता. माधव भोळे

Saturday, September 5, 2026

ईश्वर आणि विधिलिखित

ईश्वर आणि विधिलिखित फेसबुकवर गणेश सुवर्णा तुकाराम ह्या व्यक्तीचा लेख वाचला. तो लिहीत होता तो देवधर्म मानत नाही, तो कोणत्याही दिवशी आणि कोणत्याही वेळी मांसाहार करतो इत्यादी स्वतःची फुशारकी मारत होता आणि त्यासाठी कारणमिमांसा करताना त्याने आपल्या जीवनातील काही कटू प्रसंग दिले होते. त्याला मी दिलेले उत्तर. उत्तर : ईश्वर आणि विधिलिखित ह्या दोन गोष्टी ज्याला समजल्या तो असे कधीच लिहिणार नाही. ईश्वर जग्गनियंता आहे. आईन्स्टाइन म्हणतो मी देवाला मानत नाही परंतु तो म्हणतो की अशी एक शक्ती आहे जीं जगाचे नियंत्रण करते. त्यालाच सामान्य लोक ईश्वर म्हणतात. देवाची उपासना म्हणजेच ईश्वराचे आभार मानण्याची प्रक्रिया. मटण चिकन खाऊन ना तुम्ही बाटत ना ईश्वर बाटत . तुम्ही आपल्याजागी तो आपल्या जागी बरोबर. ज्याचा जसा आहार तसा त्याचा नैवध्य हीं संकल्पना हिंदू धर्माला मान्य आहे. बंगाली लोक मासे शाकाहारी मानतात. ज्या एकविरा देवीला ब्राह्मण शाकाहारी नैवेद्य दाखवतात त्याच एकविरा देवीला कोळी बोकड कापून मांसाहारी निवेद्य दाखवतात. ईश्वर कोणावरही रागवत नाही. जर एखादा देव कोपत असेल तर लोक त्याला पूजणार नाहीत. सर्व धर्मात ईश्वर हीं माणसाने सदाचारी वागण्यासाठी तयार केलेली एक संकल्पना आहे. आपल्या पूर्वजांनीं तो एक आदर्श मानवजाती समोर ठेवला आहे. आपण जीवनातील कटू प्रसंगासाठी देवाला दोषी धरता पण चांगल्या प्रसंगासाठी त्याचे आभार मानता का? की चांगले ते माझ्या कर्तृत्वामुळे आणि वाईट ते ईश्वर कोपामूळे असा आतबटयाचा व्यवहार ईश्वराशी करता? आता विधिलिखित म्हणाल तर ते अटळ आहे. ना ते कृष्णाला चुकले ना रामाला. सावरकर देवांना मानत नव्हते आणि गांधीजी ईश्वर अल्ला एक आहे म्हणून मानत होते तरी सावरकरांना जन्म ठेप झाली त्यातून ते सुटले आणि ८२ वर्ष जगले आणि गांधीजींची ७८ व्या वर्षी हत्या झाली. विधिलिखित कोणीहीं टाळू शकत नाही. ईश्वराला एव्हड्याचसाठी पुजायला हवे की ८४ लक्ष योनीमधून सर्वोत्तम प्रगत असलेला मानवी जन्म आपल्याला मिळाला म्हणून. आणि या साठी आपण जेथपर्यंत जिवंत आहोत तेथपर्यंत आपण त्याचे ऋणी आहोत हे मानायला हरकत नाही. आता कोणी कृतघ्न असतील तर ती त्यांची मर्जी. बाकी सर्व लोक आपापल्या सोयीनुसार लालबागच्या राजा पासून शिर्डीचे साईबाबा आणि तिरुपती बालाजी ला काही रुपया, दागिन्या पासून करोडो रुपये अर्पण करतात ते फक्त देवाशी सौदा करण्याचा प्रयत्न करतात. पण देव थोडाच कच्चा व्यापारी आहे की तुम्ही त्याला एक नारळ द्याल आणि तो तुम्हांला दीर्घायुष्य देईल. बाकी तुम्ही जे सर्व लिहिलेत तो फक्त अहंकार. तुम्ही स्वीकारून किंवा नाकारून देवाचे अस्तिव सिद्ध होत नाही. माधव भोळे