Monday, June 15, 2026

स्वप्नांचा बादशहा Elon Musk ( 1st Trilioner on the earth).

स्वप्नांचा बादशहा Elon Musk ( 1st Trilioner on the earth). 

कामाच्या व्यस्ततेमुळे, गेले काही दिवस मी ठरवत होतो कीं फेसबुकवर कोणतीही पोस्ट टाकायची नाहीं, परंतु कालच्या एका घटनेने मला त्या विचारापासून परावृत्त केले आणि त्याचे कारणहीं तसेच आहे.


काल सकाळी म्हणजे अमेरिकेच्या १२ जुनला अमेरिकन NASDAQ ( अमेरिकेचे टेकनॉलॉजि शेयर्स मध्ये ट्रेडिंग करणारे शेयर मार्केट ) मध्ये इलोन मस्क ह्या अमेरिकन प्रमोटर असलेल्या SpaceX कंपनीचा शेयर बाजारात आला आणि तो लिस्ट झाला तोचमुळी एका शेयरला १३५ डॉलर. प्रत्यक्षात कंपनीने ७५ बिलीयन डॉलर्सचे भांडवल उभारण्यासाठी ५५.५५ कोटी एव्हढे शेयर विक्रीसाठी बाजारात आणले पण लोक त्या शेयर्ससाठी २.१ ट्रिलीयन डॉलर्स द्यायला तयार झाले ( १ ट्रिलीयन म्हणजे एका वर १२ शून्य ). सध्याचा त्याच्या एका शेयरचा भाव १६०.९५ डॉलर्स आहे. त्या मुळे SpaceX हीं जगातली ६ वि ट्रिलीयन डॉलर्स मार्केट व्हॅल्यू असलेली कंपनी ठरली, तर स्वतः इलोनकडे असलेल्या शेयर्सची किंमत बघता तो जगातील पहिला ट्रिलीयनर झाला.


काय आहे असे SpaceX मध्ये आणि कोण आहे इलोन मस्क?

इलोन मस्क हा जगातील एक अत्यन्त गाजलेला आणि नावाजलेला इंजिनियर आहे. खरे म्हणजे तो फिजिक्सचा आणि इकोनॉमिक्सचा विध्यार्थी आहे. आजपर्यंत त्याने टेसला सारखी इलेक्ट्रीक कार जीं ड्रायव्हर शिवाय सुद्धा गाडी चालवू शकते अशी कंपनी स्थापना केली, शिवाय सोलार रुफ टाईल्स, हायपर लुप सारखी कॅप्सूल वाहतूक करणारी कंपनी स्थापन करून त्या त्यांचे काम चांगले करीत आहे. 


SpaceX कंपनीचे आतापर्यंतचे सर्वात मोठे यश म्हणजे ज्या वेळी NASA सारखी स्पेस एजन्सी अंतराळात रॉकेट सोडते त्यावेळी एकदा रॉकेट सोडले कीं ते सर्व फुकट जाते या उलट spaceX ने तयार रॉकेट सोडल्यानंतर परत पृथ्वी येते आणि ते परत वापरता येते. त्यामुळे अंतराळात जाण्याची किंमत १/१० होते. नासाने अनेक वेळा SpaceX चे Falcon 9 हे रॉकेट वापरून आपले अंतराळ प्रोग्राम केले आहेत. ज्या गोष्टीचा शास्त्रज्ञानी कधीही विचार केला नसेल अशी गोष्ट इलोनने करून दाखवली आहे. त्याच्या स्वप्नपूर्तीसाठी तो अक्षरशः रात्रंदिवस काम करीत असतो.


इलोन मस्क याची दुसरी कंपनी आहे स्टार लिंक. स्टार लिंक मार्फत त्याने सॅटेलाईट कम्युनिकेशन सुरू केले. त्याचा एक भाग म्हणजे कृत्रिम उपग्रहा मार्फत हाय स्पीड इंटरनेट सर्व्हिसेस. हीं अतिशय फलदाई कंपनी असून ती ६३% प्रॉफिट देते. स्टार लिंक साठी SpaceX कंपनीने अंतराळात १०,४०० ऍक्टिव्ह कृत्रिम उपग्रह सोडले आहेत. पुढील काही काळात हीं संख्या ४२,००० नेण्याचा कंपनीचा मानस आहे. हे सर्व उपग्रह सोडणे आणि ते मेंटेनन्स करणे हे काम SpaceX चे आहे. अर्थात स्टारलिंक आणि spaceX यांची कामे एकमेकाला पूरक आहेत.


आता तिसरे महत्वाचे स्वप्न. सध्या AI चा बोलबाला आहे. आणि जगाचे भवि्तव्य AI वर अवलंबुन असेल असे म्हणतात. नुकतेच SpaceX ने xAI integration आणि infrastructure कंपनी विकत घेतली. Grok हा ह्या कंपनीचा चॅट बॉट प्रसिद्ध आहे.


AI साठी महत्वाचे असते ते डेटा सेंटर आणि डेटा सेंटर साठी महत्वाचे असते ते वीज आणि पाणी. वीज डाटा सेंटर चालवते तर पाणी, वापरामुळे गरम झालेले डेटा सेंटर थंड करते. वीज आणि पाणी यांचा वापर एव्हडा भयंकर प्रमाणात करावा लागतो कीं ज्या गावात डेटा सेंटर चालते तेथे पाण्याची टंचाई निर्माण होते. यासाठी चीन सारख्या देशांनी समुद्रामध्ये डेटा सेंटर चालवण्याची अनोखी कल्पना काढली जेणेकरून समुद्रातील पाणी डेटा सेंटर थंड करेल. परंतु ते खर्चीक आहे कारण समुद्राच्या पाण्याचे प्रेशर, खारेपण आणि त्याला लागणारा मेंटेनन्स हा जास्त खर्चिक आहे, शिवाय तो त्याचे आयुष्मान कमी करतो. या साठी इलोन कडे एक नवीन विचार आहे ( कीं स्वप्न आहे?). तो अंतराळामध्ये डेटा सेंटर स्पेस स्टेशनवर चालवायचे म्हणतो. अंतराळा मध्ये सूर्य प्रकाश भरपूर असल्याने डेटा सेंटरला लागणारी वीज तो सोलार विजेतून घेईल आणि अंतराळ थंड असल्यामुळे तेथे पाण्यासारख्या कुलिंग एजन्ट ची गरज नाही. शिवाय अंतराळातील रिसॉर्स भरपूर आणि मोफत आहेत. त्यातील डेटा सेंटर चालवण्यासाठी त्याच्याकडे स्टार लिंकचे हाय स्पीड इंटरनेट सुद्धा आहे. म्हणजे तो सर्व AI प्रॉब्लेम पृथ्वीवरून अंतराळातील डेटा सेंटर मध्ये स्टार लिंकच्या इंटरनेटने तेथे नेईल, ते प्रश्न अंतराळात डेटा सेंटर मध्ये सोडवले जातील आणि परत स्टारलिंक च्या इंटरनेट मार्फत परत पृथ्वीकडे पाठवले जातील. शिवाय ह्या AI चा उपयोग तो कृतिम उपग्रहाची कार्यक्षमता वाढवण्यासाठी सुद्धा करणार आहे. अर्थात हे जरी सर्व सायन्स फिक्शन सारखे वाटतं असले तरी अशक्य नाही. त्यामुळे त्याच्या AI सर्व्हिसेस सर्वात स्वस्त असतील असा त्याचा दावा आहे. याच कारणासाठी डेटा सेंटरला आणि AI ला लागणाऱ्या परंतु अंतराळात टिकू आणि काम करू शकतील अशा कॉम्पुटर चिप्स बनवायची ऑर्डर सुद्धा त्याने युरोपमधील ASML ह्या कंपनीकडे दिली आहे.


जरी आताच्या घडीला spaceX हीं एवढी नफा असलेली कंपनी नसली तरी इलोन मस्कचे याआधीचे सर्व कर्तृत्व बघता, तो वरील सर्व उद्दीष्ट्ये पूर्ण करू शकेल अशी गुंतवणूक दारांना खात्री आहे. आणि म्हणूनच SpaceX चा पब्लिक इस्यू एव्हडा मोठ्या व्हाल्यूएशनला विकला गेला आहे. SpaceX हीं आता जगातील ६ वी मोठी कंपनी झाली आहे.


एका analyst ने यावर पोस्ट टाकली होती. तो म्हणाला कीं जेव्हा संपुर्ण युरोपमध्ये एक रेल्वेलाईन टाकण्याचा विचार झाला तेव्हा त्या रुळानची किंमत हीं त्या लोखंडाची किंमत नसून त्या रेल्वेद्वारे निर्माण होणाऱ्या संधी, त्यामुळे किती शहरे आणि उद्योग धंदे तयार झाले, किती खाणीपर्यंत ती रेल्वे पोचली आणि त्यातून किती व्यापार तयार झाला ह्यावर अवलंबून असते. तसेच इलोन मस्कच्या कंपनीची किंमत हीं त्याच्या पृथ्वीवरून अंतराळासाठी तयार केलेल्या अंतराळ हायवे साठी आहे. पृथ्वीवरील संसाधने हीं मर्यादित आहेत पण अंतराळातील साधने अमर्यादित आहेत. आणि त्याची उपलब्धता करून देण्यासाठी मिळालेली किंमत हा SpaceX चा महसूल असेल.


शेवटी कंपनीच्या शेयरची किंमत, हीं तुम्ही या आधी काय केले आहे आणि तुमचे पुढील प्लॅन काय आहेत आणि ते तुम्ही कसे पूर्ण करणार ह्या दाव्यावरच अवलंबुन असते. निदान गुंतवणूकदार तरी आशादाई आहेत. 


माधव भोळे 




No comments:

Post a Comment