Thursday, June 25, 2026

अयोध्या राम मंदिर घोटाळा ( श्रद्देची अवहेलना )

अयोध्या राम मंदिर घोटाळा ( श्रद्देची अवहेलना )


राम मंदिर अयोध्या येथील दानपात्रातील घोटाळा आता जगजाहीर झाला आहे. एक दोन नव्हे हजारो करोडो रुपयाची लूट आता समोर आली आहे. उत्तर प्रदेशाचे मुख्यमंत्री योगि यांनी ( आज तरी मी त्यांना योगीजीं म्हणणार नाही ) या संबंधि SIT स्थापन केली आहे. दररोज नवनवीन खुलासे होत आहेत. आज सिंधी समाज म्हणतो आम्ही २०० किलो चांदी दिली त्याची पावती आम्हाला मिळाली नाही. एक नाही दोन नाही अशा अनेक कथा समोर येत आहेत. सर्व न्यूज चॅनल सांगत आहेत कीं फक्त ४५ दिवसाचेच CCTV फुटेज प्राप्त आहे. 


लोकांकडून एक एक वीट द्या असे मागणारे, देशाच्या प्रत्येक भागातील माती द्या असे सांगणारे, राम मंदिराचा "अक्षत कलश" घराघरामध्ये पोहोचवणारे आणि चंदा जमा करणारे विश्व हिंदू परिषद, राष्ट्रीय स्वयंसेवक संघ, भाजप आणि निरमोही आखाडा या सारख्या महाकाय संघटनानी भाविकांच्या मनात निर्माण केलेला विश्वास एका क्षणात धुळीला मिळाला आहे. आता सर्वच चिडीचूप्प आहेत. "विवेक" कुठे आहे समजतच नाही.


SIT च्या प्राथमिक अहवालानुसार यामध्ये मंदिराचे काही ट्रस्टी सुद्धा सामील आहेत. ट्रस्ट ह्या शब्दाचाच मुळी अर्थ विश्वास आणि त्या विश्वासालाच तडा गेला आहे. या सर्व प्रकरणामुळे करोडो हिंदूंच्या भावना दुखावल्या गेल्या आहेत. आज जगात एक गोष्ट जाहीर झाली कीं भारतात कोणत्याही ठिकाणी आणि कधीही भ्रस्टाचार होऊ शकतो.



मा. नरेंद्र मोदीजी यांनी ५ फेब्रुवारी २०२० रोजी, "राम जन्मभूमी तीर्थक्षेत्र" हे ट्रस्ट भारत सरकारने स्थापन केल्याची घोषणा लोकसभेमध्ये केली. ट्रस्टचे काम एकच. मंदिर पुनरनिर्माण आणि व्यवस्थापन. काही लोकांनी जबानी दिली आहे कीं ट्रस्टने एकंदर १०४ एकर जमीन आजूबाजूच्या लोकांकडून दाम दुप्पट भावाने खरेदी केली. शिवाय पुनरनिर्माण मध्ये अनेक वस्तू दीड पट भावाने खरेदी केल्या आणि ह्या सर्वात ४०% पर्यंत कमीशन खोरी केली. म्हणजे निर्माण सुरू झाल्यापासून ह्यात घोटाळे झाले आहेत असे साक्षीदार म्हणतात. अनेक आरोपिंच्या मालमत्तेमध्ये १०० पटीनी वाढ झाली आहे. म्हणजे करोडो लोकांनी जीं देणगी श्रद्देने अर्पण केली गेली त्याचे व्यवस्थापन करण्यात भारत सरकार कमी पडले हेच सत्य आहे. 


नुकतेच उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगीं आदित्यनाथ यांचे भाषण ऐकले. ते म्हणतात "श्रद्धालुओंके भावनाओकीं खिलवाड मैं नही करने दूंगा". पण लक्षात घ्या "अब पछताए होत क्या, जब चिड़िया चुग गई खेत". ज्या गोष्टी गेले ६ वर्ष कमी अधिक प्रमाणात सुरू आहेत त्या तुमच्या कंट्रोलच्या बाहेर गेल्यावर तुम्ही जागे झालात. आता सुशासनाचा डंका तुम्ही कसा काय मिरवणार? नुसते बुलडोजर चालवून व्यवस्थापन होत नसते. त्याला इतर पैलू सुद्धा असतात. विरोधी पक्षांनी हा मुद्धा उचलून धरल्यानंतर तुम्ही जागे झाले अहात.आता होणार ते फक्त पोस्ट मार्टेम आणि शिक्षा. पण मूळ प्रश्न राहतोच कीं ह्यांच्यावर विश्वास कसा ठेवायचा? 


राम जन्मभूमी तीर्थक्षेत्र ट्रस्ट हे भारत सरकारने स्थापना केल्यामुळे भारत सरकार, उत्तर प्रदेश सरकार हे या विषयाला थेट जबाबदार आहेत.


SIT ने प्राथमिक अहवालमध्ये FIR नोंदवायची शिफारस केली आहे. भारत सरकारने ह्या सर्व गुन्हेगारांना भारतीय न्याय संहिता कलम १११, संघटित गुन्हेगारीची कलमे लावून त्यांच्या मुसक्या बांधायला हवे. आणि शक्य असेल तेव्हडी जास्तीजास्त शिक्षा करण्याची तजवीज करावी.


आज बहुतेक सर्व प्रसिद्ध मोठ्या मंदिरामध्ये व्यवस्थापनात अनागोंदि आहे. कधी प्रसादा मध्ये भ्रस्टाचार तर कधी त्यामध्ये चरबी युक्त प्रसाद. कधी दागिन्यांची चोरी तरी कधी काही. राजकारणीलोकांची आपली वर्णी तेथे लावून घेण्यासाठी चढाओढ सुरू असते. 


खरोखर आपण हिंदू म्हणून घ्यायला लायक राहिलो आहोत का? खरा हिंदू असा आहे का? चोर, भ्रष्टाचारी, भ्रस्टाचार खपवून घेणारा? तुम्हीच उत्तर द्या.


माधव भोळे 



No comments:

Post a Comment