Thursday, June 25, 2026

नेमेची येतो पावसाळा ??

नेमेची येतो पावसाळा ??


शाळेत असताना आम्हाला वरील आशयचे निबंध लिहावे लागत. आधीच उल्हास मग त्यात फाल्गुन मांस. कुठूनतरी दोन चार ओळी खर्डायच्या आणि शिक्षकांना दाखवायच्या. बाकीचे विद्यार्थी मात्र ३/४ पानी निबंध लिहायचे. त्यावेळी मात्र मला ज्ञानेश्वरांच नक्कीच हेवा वाटायचा. एवढीशी ७०० श्लोकांची भगवद गीता, त्याच्यावर म्हणे त्यांनी टीका केली, ती सुद्धा १८ अध्याय आणि ९०३४ ओव्यानमध्ये साचेबद्ध केली. काय प्रतिभाशक्ती त्या महानुभावाची. एका एका ओवीचा अर्थ आजसुद्धा वाचकाच्या अनुभवानुसार आणि अनुभतीनुसार पुन्हा पुन्हा वेगळा समजला जातो आणि सांगितला जातो. जे सोपे म्हणून करायला गेले ते परत गहन झाले. 


तर सांगायचा मुद्धा म्हणजे ज्या पावसाची आपण गेले एक महिना आतुरतेने चातकासारखी वाट पहात होतो तो आमच्या मालाडच्या धरतीवर आज सकाळी अवतरला. थोडा थोडका नाही तर चक्क अर्धा तास रीप रीप करीत संपुर्ण अंगण भिजवून गेला आणि त्यामुळे;


"रित्या झाल्या अत्तराच्या कुप्या, कोसळती जलधारा भुवरी, 

चिंब होऊन मन, दूर जाई सागरी,

पेटल्या चेतना, जागृत झाल्या भावना,

आठवता दिवसतो, बांध घाली या मना" ( अर्थात कवी गणेशसूत माधव 🤪).


असेच काहीसे काव्य मनात घोळू लागले. कारण गेले काही दिवस संपुर्ण महाराष्ट्र ज्या क्षणाची वाट आतुरतेने पहात होता तो, "नेमेची येतो पावसाळा" अशी त्या पावसाची इतके वर्ष खिल्ली उडवल्यामुळे इतका नाराज झाला होता कीं त्यामुळे मुळात सध्या तोंडात नसलेले सर्व मुंबईकरांचे तोंडचे पाणी पळाले होते.


असो तर आपण कुठलीही गोष्ट अगदी हलकी फुलकी घेतो. पाण्यासारख्या "जीवन" नांव असलेल्या पदार्थाची किंमतच आपण २० रुपये / बाटली ठरवून त्याला एक कमोडीटी म्हणून वापरतो, त्याचा खरा अर्थ या गेल्या एक महिन्यात आम्हाला समजला. आता तरी आपण त्या पाण्याला आणि त्याचा बाप असलेल्या पावसाला योग्य तो मान देऊन त्याचे स्वागत आणि गौरव करूया. 


सर्वांनां पावसाळ्याच्या मनःपूर्वक शुभेच्छा. आणि हो कुठे पावसाळी पिकनिक काढणार असाल तर आम्हाला पण बोलवा गरम गरम भजी खायला आणि तोंड भाजेस्तो गरम चहा प्यायला.


माधव भोळे 






No comments:

Post a Comment