Thursday, June 25, 2026

दुर्दैवी घटना आणि लोक प्रतिक्रिया!

 दुर्दैवी घटना आणि लोक प्रतिक्रिया!


गेल्या आठवड्यात २ धक्कादायक घटना घडल्या. एक पुणे येथील केतन अगरवालचा लोहगडावर दुर्दैवी खून आणि दोन नालासोपारा येथील मयांक लोहार याचा मुंबई लोकल मधील खून. 


यावरून समाज माध्यमावर अतिशय विचित्र आणि निराशादायक प्रतिक्रिया उमटल्या आहेत. चांगले चांगले विचारवंत सुद्धा आताची पिढी आणि या आधीच्या पिढ्या यांची तुलना करत पुढील चित्र किती निराशादायक आणि भयावह आहे, तरुण पिढी कशी वाया गेली आहे वगैरे रंगवून सांगत आहेत.


मुळात म्हणजे १४ करोड लोकसंख्येच्या महाराष्ट्रात किंवा १४० करोड लोकसंख्येच्या भारतात हे घडले हे वानगीदाखल आहे, पण ह्या घटना म्हणजे आपला समाज आहे का? 


एका बाजूला देशामध्ये २२.७९ लाख विद्यार्थी निट परीक्षा, किंवा ५.४९ लाख विद्यार्थी UPSC परीक्षा, १६ लाख विद्यार्थी IIT JEE, ४ ते ६ लाख विद्यार्थी नॅशनल डिफेन्स अकॅडेमी एंट्रन्स सारख्या वेगवेगळ्या आव्हानत्मक परीक्षाची तयारी करत असतात. दुसऱ्याबाजूला २.२३ लाख स्टार्टअप्स रजिस्टर असून त्यातील ५५,२०० हे नुसते गेल्या वर्षभरात नोंदले गेले असताना, तसेच Sarvam AI, krutrim AI, Neysa AI सारखे AI मधील ऍडव्हान्स संशोधन आणि प्रोडक्ट्स तयार होत असताना पुढील चित्र निराशाजनक आहे, पुढील पिढी वाया गेली आहे या सारखे सुर समाज माध्यमातून बडवले जातात ह्यामध्ये त्या लेखकांचे दळभद्री पण दिसून येते. 


वरील दोन घटनांची पार्श्वभूमी अतिशय वेगळी आहे. नालासोपारा येथील मयांक लोहार याला मारणारा रोशन सुवर्णा हा दिवसभर दारू पीणारा एक मजूर होता तर लोहगडावर केतन अगरवाल याला ढकलणारी सिया गोयला हीं बड्या बापाची २० वर्षांची एक मूर्ख मुलगी होती जिने कल्पना पण केली नसेल कीं आपला प्लॅन फेल गेला तर काय होईल. ती तिच्या प्रेमाच्या धुंदीत वहात गेली होती. तिने सिनेमा मध्ये होते तसें केले.


वरील हत्येची दोन उदाहरणे किंवा कोयता गँग किंवा एखादे गँग वॉर म्हणजे संपूर्ण समाज नव्हे. प्रत्येक समाजात चांगली वाईट माणसे असतातच म्हणून संपूर्ण समाजाचे चित्र काळ्या ब्रशने रंगवणे चुकीचे होईल.


पर्वाचीच एक बातमी वाचली. Witkin नावाची एक अमेरिकन युवती भारतात केरळ मध्ये एकटीच फिरायला आली असताना तिचे डेबिट कार्ड ATM मध्ये तसेच राहून गेले आणि ते एका रिक्षा वाल्याला मिळाले. त्या कृष्णा नावाच्या रिक्षावाल्याने, कोणताही मोबदला अपेक्षा न करता १४ तास रिक्षाने जाऊन येऊन प्रवास करत ते कार्ड त्या महिलेला पोहोचवले. या वरून काय लक्षात येते? कीं भारतात अजूनही चांगली माणसे आहेत. 


पूर्वी सुद्धा रामन राघवन, रंगा बिल्ला सारखे खुनी होते पण त्याचवेळी इतरही अनेक मंडळी या समाजाला पुढे नेत होती. पूर्वी रावण सुद्धा होता आणि राम सुद्धा होता. कौरव होते आणि पांडव सुद्धा होते. येशू ख्रिस्त देखील होते आणि त्याला फासावर चढवणारे रोमन साम्राज्य सुद्धा होते. प्रेषित मोहमद पैगंबरांच्या नातवाला हुसैन इब्न अलीला करबला येथे आमंत्रण देऊन पाणी सुद्धा प्यायला न देता त्याची आणि त्याच्या संपुर्ण समूहाची हत्या करणारे सुद्धा होते. म्हणजेच कोणत्याही काळात जगात दुष्ट आणि सुष्ट शक्ती होत्या.


त्यामुळे एक दोन घटनांनी हादरून न जाता, संपुर्ण समाज दलदलित फसला आहे असे न समजता, आशादाई बातम्याची सुद्धा दखल घ्यायला हवी. 


दुर्गंधी लवकर पसरते पण सुगंध दरवळायला वेळ लागतो कारण तो मंद असतो. 


माधव भोळे 

No comments:

Post a Comment