Tuesday, December 2, 2025

धर्म एक अफूची गोळी, भारत आणि विरोधाभास

धर्म एक अफूची गोळी, भारत आणि विरोधाभास 


आज बिहार मधील पूर्व चंपारणमध्ये विराट रामायण मंदिर परिसरात, ३३ फूट उंच, १७.८ फूट परीघ असलेली २१० टन वजन असलेली, एकाच ग्रानाईट दगडातून कोरलेली, सहस्त्रलिंग शिवलिंगाची महाकाय मूर्ती स्थापन करण्यासाठी तामिळनाडू मधील महाबलीपुरम मधून निघाली असे वाचले. 


दिवसेंदिवस वेगवेगळ्या राज्यांमध्ये अशा प्रकारची देवळे स्थापून करून किंवा असलेल्या देवळानचा जीर्णोद्धार करून गेल्या ५०० वर्षात धर्माची आणि आस्थेची विस्कटलेली घडी पुन्हा बसवण्याचा प्रयत्न बहुतेक सत्ताधाऱ्यांकडुन होताना दिसत आहे. ही समाधानाची बाब आहे. पण त्या मागे नक्की विचार काय आहे हे जाणून घ्यायला हवा.


पूर्वीचे राजे महाराजे जनता भुकी किंवा अर्ध पोटी असताना सुद्धा अशा प्रकारची मंदिरे बांधून आपली धर्माबद्दलची आस्था, कर्तव्य आणि कलासक्ती याचे प्रदर्शन करीत. जनतेच्या अडीअडचणी, त्यांची सुख दुःखे आणि प्रशासनात बोकाळत चाललेला भ्रस्टाचार याच्याशी त्यांचे सोयर सुतक नव्हते कीवा ते जाणून घेण्याची तसदी ते घेत नसतं. एखाद दुसरा गुन्हेगार पकडला गेला तर त्याला कडेलोट करायचा की झाले काम ( ED सारखे ).


आज कालचे सर्वच राजकीय पक्ष अश्याच प्रकारचा विचार करतात. काल झालेल्या नगर पंचायत आणि नगर परिषदांमध्ये मतदानासाठी पैसे वाटून जागा जिंकण्याच्या कार्यक्रमात तर जणू स्पर्धाच लागली होती. कारण त्यांना माहिती आहे की एकदा जिंकून आले की जेव्हडे खर्च केले त्यांच्या १०० ते १००० पट ते हडप करू शकतात. सरकारी अनुदान, निधी वाटप, भूखंड लाटणे, टेंडर घोटाळे, टेंडर शिवाय वर्क ऑर्डर काढणे, नाले सफाई या साठी त्यांच्या सभामध्ये राजरोस हाणामाऱ्या होताना लोकांना दिसतात ते काही देशप्रेम म्हणून नव्हे. आणि या गोष्टी फक्त बदनाम नेत्यांबद्दलच नाही तर त्यांच्या चेल्या चपाट्या पासुन ते गल्ली मधील छोटया कार्यकर्त्या पर्यंत लागू आहेत. एव्हडी सरकारी ऑडिट होऊन सुद्धा हे घडते म्हणजे विचार करा. भ्रस्टाचार नुसता निधी खाण्यातच नाही तर सामान्य माणसांच्या सेवा पुरवण्यात सुद्धा होत आहे. मृत बॉडी पोस्ट मार्तंम केल्या नंतर पैसे दिल्याशिवाय लवकर मिळत नाही ही अवस्था आहे. ( सारांश सिनेमा बघा. पण ही सत्य परिस्थिती आहे.)


अशा वेळी मूळ मुद्धे झाकण्यासाठी, लोकांच्या अडचणीकडे दुर्लक्ष व्हावे म्हूणन आणि लोकांची दिशाभूल करण्यासाठी धर्म ही एक अफूची गोळी म्हणून अनेक राज्यकर्त्यांनी कित्येक शतके याचा वापर केला आहे. 


औरंगजेब कोणतेही नीच कृत्य करताना ते इस्लामच्या इफाजतीसाठी करत आहे असे सांगून करायचा मग ते सक्ख्या भावाला दारा शु्कोहोला मारणे असून दे की जन्म दात्या बापाला कैदेत टाकणे असून दे आणि त्याचे पोसलेले मौलवी त्याच्या निर्णयावर हाजी म्हणायचे. बस.


धर्माचा मूळ उद्धेश अत्याचाराविरुद्ध लढणारा, सुसंस्कृत, संस्कारी नागरिक तयार करणे जों एक न्याय्य व्यवस्था असलेला समाज निर्माण करेल अथवा त्याचा भाग बनेल. त्याचसाठी वेद, रामायण, महाभारत, श्रीमद भगवद गीता, इत्यादी धर्म ग्रंथांची निर्मिती झाली. मंदिर किंवा देवमूर्ती हे त्या धर्माच्या आशा आकांक्षाचे प्रतिक मानले गेले. त्या मूळ उद्धेशाला हरताळ फासून चाललेली ही धर्म पुनरस्थापना हा एक दिखावाच म्हणावा लागेल. याचे कारण राजा कालस्य कारणम. 


मंदिरे बनवूच नयेत या मताचा मीं नाही, परंतु हा देश धर्माने चालावा असे वाटतं असेल तर जमिनीवरील त्रुटी कमी करून सुधारणा होणे सुद्धा तेवढेच आवश्यक आहे असे मीं मानतो. मीं एक सनातनी असून धर्म आणि देव मानतो म्हणून हे लिहावेसे वाटले.


माधव भोळे

Monday, December 1, 2025

देव धर्म आणि कुळाचार

देव धर्म आणि कुळाचार 


आज काल अनेक मंडळींना आपल्या घरचा देव धर्म, कुलदेवता, कुळाचार, गोत्र, इत्यादी गोष्टी माहिती नसतात. मग अडचण आली की लोक कोणा कोणाला तरी विचारत राहतात आणि अर्धवट माहितीवर पुढे काम करतात. 


पुढील पिढी इंग्रजी माध्यमातून शिकलेली असणार अशा वेळी ही माहिती आवश्यक आहे असे वाटते. कित्येक वेळा पुढील पिढीला ते सांभाळायचे असते परंतु त्यांच्याकडे पूर्ण माहिती नसते.


जर आपण अशी माहिती आणि ते कुळाचार कसे करावेत याची थोडक्यात माहिती लिहून ठेवली तर किती सोपे होईल. तसेच प्रत्येक वेळचा नैवेद्य कसा करावा याची सुद्धा थोडक्यात माहिती लिहून ठेवायला हवी. 


आपण जर आपापल्या घरची ही माहिती लिखित स्वरूपात ठेवली किंवा त्याला लॅमिनेट करुन ठेवले तर त्याचा उपयोग आपल्या पुढील पिढ्याना होईल असे वाटते.

मला वाटते यात किमान खालील गोष्ट लिहायला हव्यात 


१. आडनांव

२. गोत्र

३. मूळ गांव आणि मूळ चौथऱ्याचा पत्ता 

४. लेख लिहिला त्या वेळचे वास्तव्य आणि पत्ता 

५. कुल देवता आणि कुल दैवत 

६. ग्राम देवता 

७. चैत्र हळदीकुंकू 

८. श्रावण मांस विशेष 

८.१ नारळी पौर्णिमा नैवेद्य ( जागर )

८.२ गोकुळ अष्टमी उत्सव 

८.३ श्रावण महिन्यातील एकादशण्या

८.४ वार्षिक रुद्र वगैरे करण्याची प्रथा 

९. गणपती आराधना ( किती दिवस ). 

९.१ गणपतीवर एकादशणी करतात कां? अथर्वशिर्ष पठण इत्यादी 

१०. गौरी आराधना ( कशी करतात ). खड्याच्या, मुखवटा, इत्यादी 

१०.१ गौरी नैवेद्य कसे आणि कोणत्या दिवशी करतात.

११. अनंत पूजा असल्यास ती कधी करतात 

१२. महालय पर्व : श्राद्ध & ते करण्याची पद्धत ( चटावर, पिंडदान इत्यादी ). श्राद्ध करण्याची तिथी. 

पिंडदान करण्यासाठी वडील, आजोबा, पणजोबा यांची तसेच तर्पण करण्यासाठी इतर जवळच्या नातेवाईकांची नांवे आणि गोत्र 

१३. नवरात्र : हिंदू पंचांगात ३/ ४ वेळेला नवरात्र या पैकी कोणतेही एक केले जाते.

१३.१ चैत्र नवरात्री 

१३.२ अश्विन नवरात्री 

१३.३ कार्तिक नवरात्री 

१३.४ मार्गशिर्ष नवरात्र ( खंडोबाचे ) इत्यादीl

नवरात्र स्थापन करणे, नवरात्र करण्याची पद्दत, बसता उठताना सवाष्ण, कुमारिका पूजन, महालक्ष्मी पूजन, अष्टमी होम, नवरात्र उठवणे, दररोज नैवध्य पद्धत 

१४ दीपावली नैवेद्य

१४.१ वार्षिक कार्तिकी किंवा तत्सम ग्राम दैवत उत्सव 

१४.२ देव दीपावली नैवेद्य 

१५. होळी उत्सव ( नैवेद्य गोडे नैवेद्य आणि तिखट नैवेद्य ). होलिका दहन 

१६. धनुर्मास नैवेद्य

१७ संक्रांत : हळदीकुंकू. 

     १७.१ संक्रांत नववधू विशेष.


आम्ही आमच्या वीर गावामध्ये श्री लक्ष्मी मल्लमर्दन देवाचा उत्सव कसा साजरा करावा याचे असेच लिखाण करून ठेवले आहे, जे वज्रलेप पुरवणी मध्ये प्रसिद्ध केले आहे.


यात काही सुधारणा हवी असल्यास कळवावी.


माधव भोळे 


सुयश टिळकची कोलंबोवारी, दित्वा चक्रीवादळ आणि कवित्व

 सुयश टिळकची कोलंबोवारी, दित्वा चक्रीवादळ आणि कवित्व 


काल एक  तडफदार मराठी ब्राह्मण अभिनेता, सुयश टिळक याने श्रीलंकेतील दित्वा चक्री वादळात कोलंबो एअरपोर्ट बंद झाल्यामुळे त्याच्यासहित प्रवाशांचे झालेले हाल, तेथील एयरलाईन्स आणि भारतीय दुतावासाचे कर्मचारी यांनी आपल्या व्यक्तिगत अडचणी बाजूला ठेवून प्रवाश्याना मदत करण्यासाठी केलेले शर्थीच प्रयत्न आणि एकंदर ३८ तासाचा तो कठीण काळ या बद्धल वर्णन करणारी आणि सर्व मदत करणाऱ्या आणि प्रार्थना करणाऱ्या मित्र मंडळीचे आभार व्यक्त करणारी पोस्ट टाकली. पोस्टचा उद्देश सरळ आणि स्पष्ट होता.


परंतु ब्राह्मण माणसाने कुठलीही पोस्ट टाका त्यावर काही ठराविक समाजातील लोकांनी कुसकट, खवचट टिप्पणी नाही केली तर ते स्वतःला संविधान प्रेमी मंडळी कशी म्हणवतील? 


एकाने विचारले, "अरे तू तिकडे विदेशात कशाला गेला होतास? आता तू परत लोकमान्य टिळकांसारखे सोन्याच्या योनीतून प्रवेश करणार कां?".  विषय काय? तू लिहितोस काय? जरा तरी परिस्थिचे गांभीर्य? किती नीच वृतीची ही हलकट माणसे आहेत!!


होय लोकमान्य टिळकांनी आपला मुलगा श्रीधर याचा व्रतबंध करायचे ठरवले त्यावेळी पुण्यातील पुरोहित मंडळींनी त्यांना संगितले की तुम्ही विदेश यात्रा केली आहेत तर हिंदू धर्मातील प्रथेप्रमाणे तुम्ही प्रायश्चित घेतल्याशिवाय आम्ही तुमच्या मुलाची मुंज लावणार नाही. प्रायश्चित चित्त असे की त्यांनी प्रतिमात्मक सोन्याच्या योनीतून प्रवेश करायचा. 


त्यावेळी श्रीधर टिळक म्हणाले की माझी मुंज नाही झाली तरी हरकत नाही पण हे होऊ द्यायचे नाही. त्या वेळी लोकमान्यांनी ब्रह्मवृंदाच्या शब्दाला मान देत तो विधी केला आणि श्रीधरची मुंज लावली. त्या एका गोष्टीसाठी ब्राम्हण विरोधी मंडळींनी त्या काळी लोकमान्यानवर सडकून टीका केली. लोकमान्यांच्या ब्रह्मवृंदानंपुढे नमते घेण्याच्या एका चुकीसाठी त्यांच्या इतर सद्गुणानवर बोळा फिरवणारे हे कोण? ह्यांची काय लायकी?


तो काळ संपला, टिळक सुद्धा गेले आणि ते ब्रम्हवृंद सुद्धा गेले असणार, पण अजून १०० वर्षानंतर सुद्धा हेच ताशे आणि टोमणे लोक अजूनही मारत आहेत. सुंभ जळले तरी पिळ जळत नाही. 


मग कां कोणी वर्मा कर्मा IAS च्या कुटुंबात लोक आपली ब्राह्मण कन्या दान करतील? जों म्हणतो की जेथपर्यंत माझ्यासारख्या सुशिक्षित व्यक्तीच्या मुलाला कोणी ब्राह्मणव्यक्ती जेथ पर्यंत आपली मुलगी देत नाही तेथपर्यंत आरक्षण आवश्यक आहे. त्या मुलीला काय दररोज टोमणे खाऊन आत्महत्या करायची आहे?


जातीच्या भिंती होत्याच त्या अजूनच रुंदावत चालल्या आहेत इतकेच. सुधारणा काहीही नाही कारण द्वेष नसानसात भिनला आहे.


माधव भोळे