Tuesday, March 25, 2025

महाराष्ट्राचे अर्थसंकल्पिय अधिवेशन २०२५ आणि गुन्हेगारी

 २६.०३ २०२५


महाराष्ट्राचे अर्थसंकल्पिय अधिवेशन २०२५ आणि गुन्हेगारी 


महाराष्ट्राचे अर्थसंकल्पिय अधिवेशन दिनांक ३ मार्च २०२५ ते २६ मार्च २०२५ या कालावधी मध्ये आटपत आले आहे. 

या अधिवेशना मध्ये राज्याच्या उत्पन्नापेक्षा, उत्पन्न मिळवण्यासाठी झालेला खर्च ४५,८९१ कोटी रुपये जास्त असलेला तुटीचा अर्थसंकल्प मांडला गेला. तर राज्याचे एकंदर उत्पन्न आणि एकंदर खर्च यामधील फरक ( fiscal deficit) रु. १,३२,८७३ कोटी एव्हडा झाला, महाराष्ट्राचे कर्ज ९.३२ लाख कोटी म्हणजेच सकल राज्य देशांतर्गत उत्पन्नाच्या ( ग्रॉस स्टेट डोमेस्टिक प्रॉडक्ट्स ( GSDP)) १८.८७% एव्हडे मांडले गेले. म्हणजेच महाराष्ट्रातील प्रत्येक नागरिकाच्या डोक्यावर रुपये ७३,१५५ आणि ४२ पैसे एव्हडे कर्ज झाले आहे. ( महाराष्ट्र १२.७४ कोटी जनगणना ). १९६० साला पासून आतापर्यंत मांडलेल्या अर्थसंकल्पतील ह्या सर्वात मोठ्या तुटी आहेत. 


एव्हडे गंभीर प्रश्न असताना आमदार त्यावर अभ्यासपूर्वक प्रश्न विचारत नाहीत. प्रश्न विचारणारे आमदार त्या तासाला गैरहजर असतात. राज्याला दिशा देणे, त्यातील उद्योग व्यवसायांना गुंडांपासून संरक्षण देणे, एक्स्पोर्टला आणि उत्पादनांना प्रोत्साहन देणे आणि त्या योगे रोजगाराच्या संधी निर्माण करणे, शासकीय भ्रष्टाचाराचा नि:पात करणे, पर्यावरण संवर्धन करणे, शेतकऱ्यांना योग्य ते प्रशिक्षण आणि लागणारी साधन सामुद्री उपलब्ध करून देणे, राज्यातील पर्यटन स्थळें, गड किल्ले यांची दुरुस्ती करून त्याला प्रेक्षणीय आणि ऐतिहासिक दर्जा प्राप्त करून देणे आणि त्यांचे संवर्धन करणे. प्रचंड मोठा समुद्र किनारा असल्यामुळे मत्स व्यवसाय आणि मरिन इकोलॉजीवर लक्ष केंद्रित करणे, विद्यापीठातील संशोधन सामान्य माणसाच्या उपयोगात येईल या साठी योजना आखणे, इत्यादी अनेक महत्वाच्या विषयावर चर्चा होतानाच दिसत नाही. 


या उलट विधानसभेमध्ये विषय काय तर प्रशांत कोरटकर, दिशा सालियन, स्व. संतोष देशमुख, कुणाल कामारा, नागपूर दंगल, जयकुमार गोरे, मल्हार सर्टिफिकेट, वाघ्याचा पुतळा हलवणे, औरंगाजेबाची कबर उखाडणे आणि कोण कोणाची पोल खोल करणे वगैर. 


मीं म्हणतो यातील बरेच विषय कोणा ना कोणासाठी महत्वाचे असतीलहि पण त्यासाठी महाराष्ट्रतील गुन्हेगारी या विषयावर एखादे विशेष अधिवेशन घ्यावे आणि महाराष्ट्रातील गुन्हेगारीचा दबदबा कमी करावा. 


परंतु राज्याचे अर्थविषयक आलेले अपयश आणि भारतात तिची चाललेली पीछेहाट लपवण्यासाठी असे विषय मुध्दामुन उकरून काढले जातात. लोकांना या विषयात आणि जातीपातीचे राजकारणात गुंतवून महत्वाची पदे आपल्या आणि आपल्या मित्र परिवारात वाटून त्या सर्व संस्थांच्या आर्थिक नाड्या आपल्या हातात ठेवणे एव्हडेच काम या मंडळीचे दिसून येते. जों उठतो तो म्हणतो माझे पुनर्वसन करा, मला आपल्या पक्षात घ्या आणि माझी काळी कर्तूक आपल्या पंखा खाली घ्या. 


महाराष्ट्राने आपली तुलना भारतातील इतर राज्यांशी न करता जगातील इतर पुढरलेल्या देशांबरोबर करायला हवी. वासरात लंगडी गाय शहाणी असे न होता, आपले राज्य जगातील एक नावाजलेले राज्य अशी त्याची ओळख व्हायला हवी. 

फडणवीसांकडून लोकांच्या खूप अपेक्षा आहेत पण त्यांचा सर्व वेळ जयकुमार गोरे, संजय राठोड, पूर्वी धनंजय मुंडे आणि तत्सम अनेक सहकार्यांना झेलण्यात जातो आहे त्यामुळे त्यांनी मुख्यमंत्री म्हणून दावोसला जाऊन १५ लाख कोटीचे करार केलेले दाखवण्यापेक्षा ते आणि त्या सारखे अनेक प्रकल्प राज्यात पुढील ४ वर्षात लवकरात लवकर सुरू होण्यासाठी घालवावा जेणेकरून अनेक योजनाना निधी उपलब्ध होऊन ह्या आर्थिक तुटी कमी होतील. 


आपणांस माहिती असेलच की देशाच्या संविधानाच्या कलम २९३ (३) प्रमाणे राज्याचे कर्ज राज्याच्या ग्रॉस डोमेस्टिक प्रोडक्ट्स च्या ३% पेक्षा जास्त असता कामां नये. कारण त्या नंतर ते राज्य नवीन कर्ज, केंद्र सरकारच्या परवानगी शिवाय उभारु शकणार नाही.



माधव भोळे. 




Sunday, March 16, 2025

नांवात काय आहे?

नांवात काय आहे?

आज सकाळी मुंबई मधील मुंबादेवी भागातून झवेरी बाजार मार्गे क्रॉफर्ड मार्केटच्या दिशेने चालत जातं होतो. झवेरी बाजार, बुलीयन एक्सचेंज म्हणजे अतिशय गर्दीचा आणि रहदारीचा भाग. हातगाड्या, ठेले, रस्त्यावरील स्टॉल, गर्दीच गर्दी. माणसाला चालायला मुश्किल. 


रस्त्याच्या दोन्ही बाजूला छोटी मोठी विश्रांतीगृह / दुकानें होती. विशेष म्हणजे महागड्या सराफांच्या काचेच्या शोरूमच्या बाजूलाच यातील काही विश्रांतीगृह होती. त्या पैकी एकाचे नांव होते " B भगत ताराचंद". अर्थात हे शाकाहारी पंजाबी विश्रांतिगृह आहे. थोडे पुढे गेलो "K भगत ताराचंद ", पुढे गेलो " P भगत ताराचंद", पुढे गेलो " श्री भगत ताराचंद", "R. भगत ताराचंद". एका बाजूला "भगत ताराचंद ओरिजिनल " वगैरे विश्रांतीगृह.


मीं भगत ताराचंद हे हॉटेलचे नांव मीं पूर्वी ऐकले आहे पण झवेरी बाजार सारख्या एका उच्चभ्रू भागात एव्हडी हॉटेल्स म्हणजे काय? 


कोण आहेत हे भगत ताराचंद.?

१८९५ मध्ये पाकिस्तान कराची मध्ये ताराचंद चावला या सदग्रहस्थाने एक छोटासा खाद्य पदार्थांचा ठेला सुरू केला. अर्थात पंजाबी डीशेस. तो माणूस अतिशय दयाळू होता. कोणाकडे पैसे नसले तर तो त्या व्यक्तीला मोफत जेवायला देत असे. ( कर भला सो हो भला ), म्हणून लोकांनी त्याला भगत अशी उपाधी दिली. 


फाळणीनंतर त्याने आणि त्याच्या मुलांनी देशाच्या वेगवेगळ्या भागात आपली विश्रांतीगृह टाकायला सुरवात केली. त्यातील एक १९७० साली मुंबईमध्ये झवेरी बाजारात प्रथम सुरू झाले. आज झवेरी बाजारातच ह्या कुटुंबियांची कमीतमी ७ हॉटेल्स आहेत आणि मुंबई मध्ये एकंदर १८ ते २० हॉटेल्स आहेत. ही सर्व शुद्ध शाकाहारी आहेत. शिवाय नाशिक आणि सुरत, गुजरात येथे सुद्धा काही हॉटेल्स आहेत. 


त्यांच्या बापजाद्यानी जे नांव कमावले ते त्यांनी टिकवून ठेवले आणि त्याचा प्रसार सुद्धा केला. नाहीतर आमच्या गिरगांवामध्ये एक मराठी हॉटेलचे मालक ४ भाऊ मला एकदा सांगत की आम्ही ४ भाऊ आलटून पालटून दिवसातून प्रत्येकी ४ तास गल्ल्यावर बसतो. मीं त्यांना विचारले की तुम्ही दादर, पार्ले, बोरिवली, नवी मुंबई सारख्या ठिकाणी आपापली हॉटेल्स याच नांवानी का काढत नाहीत ? तर म्हणाले की गिरगांव चे हॉटेल जुने आहे त्यामुळे गिरगांवचा गल्ला जास्त असतो. मग तो सोडून बाकी कुठे जायला कोणताही भाऊ तयार नाही. नवीन विश्रांतीगृह टाकले तरी सेट व्हायला वेळ जाणार?. आता तर गेले वर्षभर हे हॉटेल बंदच झाले असून त्यातील एकाने काही वर्षापूर्वी आपल्याच मेव्हण्याच्या आयुर्वेदिक औषधांच्या एजन्सी दुकाना समोरच आपले पण आयुर्वेदिक औषधांचे दुकान टाकले आहे. म्हणजे घरचाच स्पर्धक. काही मंडळींना तर मीं "आमची कोठेही शाखा नाही" असे लिहिण्यातच धन्यता मानताना मीं बघितले आहे. ज्याच्या हातात कला आहे आणि मनगटात जोर आहे त्यांनी बिनधास्त कोणताही व्यवसाय सुरू करुन तो वाढवावा. ग्राहक खूष तर आपणही खूष. 


नुसते सकाळी उठून "कराग्रे वसते लक्ष्मी, कर मध्ये सरस्वती, कर मुले तू गोविंदम, प्रभाते करदर्शनम" काय उपयोग? त्या म्हणण्याचा खरा अर्थ आहे "अपना हाथ जगन्नाथ". ही लक्ष्मी ज्याला प्रसन्न होते जों आपल्या हाताचा उपयोग सत्कारणी लावतो.


माधव भोळे

शिंमगा आणि पर्यावरण :

 शिंमगा आणि पर्यावरण :


गेल्या दोन तीन दिवसात वेगवेगळ्या गावातील लोकांनी आपापल्या गावात शिंमग्यासाठी झाडें तोडून होळी साजरी केली याचे व्हिडीओ बघितले. परंपरा ह्या नावाखाली वडिलोपार्जित झाडें किंवा जंगलतोड करण्याचा जन्मजात हक्क या मंडळींना कोणी दिला आहे? अनेक डोंगर आणि जंगले आता ओसाड बनायला लागले आहेत. त्या मुळे बिबटे, वाघ, हत्ती या सारखे हिस्त्र प्राणी भर वस्तीत धुमाकूळ घालत आहेत.


पूर्वी थंडी फार पडत असे. अगदी शिवरात्री पर्यंत थंडी असे. अशावेळी हिवाळा संपून उन्हाळ्यात आपण पदार्पण करीत असतो. ऋतूमाना प्रमाणे ह्या काळात शिशिर ऋतू ( माघ आणि फाल्गुन ) मध्ये पानगळ सुरू होते. पुढे चैत्र महिन्यात ( वसंत ऋतू ) वृक्षाना नवीन पालवी फुटते. ह्या जमलेल्या पानगळीचा पाला पाचोळा ह्या होळीमध्ये दहन करावा आणि आपले आवार स्वच्छ करावे असे खरे सूत्र आहे, परंतु होमाचा अग्नी आणखी प्रज्वलीत व्हावा यासाठी लोक भले मोठे लाकडाचे ओंडके त्यात टाकतात. आपली होळी बाकीच्या वाड्यांपेक्षा जास्त उंच आणि मोठी असावी म्हणून जास्तीतजास्त उंच माड आणि मोठमोठाले वृक्ष तोडतात, हे योग्य आहे का? निसर्गाचा ऱ्हास करुन तुमची चढाओढ कशासाठी?


चढओढच करायची असेल तर आपल्या कर्तृत्वाची करा, आपल्या बहादुरीची, आपल्या शिक्षणाची आणि आपल्या समृद्धीतेची करायला हरकत नाही. होळी साजरी करण्यात कसली आली चढओढ? त्यात तुमच्या कोणत्या कर्तृत्वाचा कस लागतो? 


किती लोकांनी आपल्या आयुष्यात नवीन झाडें लावली आहेत? एक झाड मोठे व्हायला कमीतकमी ६-८ वर्ष लागतात. शाळेपासून सोशल मीडिया पर्यंत सर्वत्र शिकवले जाते की झाडें आहेत म्हणून आपण श्वास घेऊ शकतो. झाडें आहेत म्हणून निसर्ग आणि पर्यावरण आहे. ज्या ठिकाणी झाडें नाहीत तेथे पाऊस न पडल्यामुळे वाळवंट झाले आहे. आज आखाती देशात बाहेरून विकत आणून झाडें लावत आहेत. आपण त्याबाबतीत नशीबवान आहोत. अशा परिस्थितीमध्ये झाडें लावणे आणि ती टिकवणे हे आपले आद्य कर्तव्य आहे. 


रंगपंचमी संपल्यानंतर खाली गेलो तर रस्त्यावर फाटक्या प्लास्टिक थैल्यांचा खच पडला होता. हि प्लास्टिक पिशव्या वापरणारी मुले शाळेत प्लास्टिकचा वापर टाळा असे शिकतात, त्यावर प्रोजेक्ट करतात, ते प्रदर्शनात ठेवतात पण रंगपंचमीला प्लास्टिक च्या पिशव्या पाणी भरून फेकतात. त्यांचे पालक सुद्धा त्यांना समाजावून सांगत नाहीत. कारण आपल्याकडे ज्ञान हे फक्त पुस्तकी असते, ते वापरायचे नाही असेच शिकवले जाते हे दुर्दैव.


माधव भोळे 

Saturday, March 1, 2025

श्री मधुसूदन मुळे काका, एक पर्व संपले.

 श्री मधुसूदन मुळे काका, एक पर्व संपले.


माझी २ नंबरची सक्खी मोठी बहीण कै. शशिताई मुळे हिचा विवाह, विष्णुबाग गिरगांव येथे झाला त्यावेळी मीं १२-१३ वर्षाचा असेन ( तारीख १ एप्रिल साधारण पणे १९६६-६७ साली असावे ). त्यावेळी श्री. मुळे IIT पवई मध्ये अकाउंटस विभागात क्लार्क म्हणून नोकरीं करत होते आणि शशिताई रामवाडी पोस्ट ऑफिस, काळबादेवी येथे क्लार्क म्हणून नोकरीं करीत असे.


त्या वेळी ही मंडळी टाईप H२ क्वार्टरस, पवई तलावाच्या जवळ रहात होते. ( आताच्या हिरानंदानी समोर ). टाईप H२ म्हणजे एक मोठे किचन आणि एक मोठा हॉल. बेडरूम वगैरे वेगळी नाही. यांची खोली तळमजल्यावर होती. वरती राहायला शेट काका आणि काकू होत्या. त्या वेळी पवईला जायचे म्हणजे विक्रोळी वरून एकच बस पवई मेन गेट पर्यंत येत असे. आता सारखी ट्राफिकची वर्दळ नव्हती. मग तेथून टाईप २ पर्यंत चालत किंवा सायकलने प्रवास. त्याकाळी फारच थोड्या स्त्रिया नोकरीला जातं. ताईला घरून सकाळी डबा घेऊन VT मार्गे बसने काळबादेवी पर्यंत जावे लागे. पुढे पुढे, ती पोस्ट मास्टर पदापर्यंत पोहोचल्यावर बलार्ड पियर म्हणजे मुंबईचे दुसरे टोक, तेथपर्यंत नोकरीला जाई. पोस्टात असल्यामुळे तिच्या नेहमी बदल्या होत असत. मुळेकाकांची नोकरीं जवळच कॅम्पसमध्ये असल्यामुळे ते तिला घरी हातभार लावत. सोबत वसंत मुळे म्हणून त्यांचा एक जवळचा नातेवाईक काही वर्ष तेथे रहात होता. तो सुटीच्या दिवशी शशिताईला जेवण बनवण्यात मदत करे. संसाराचा असा खडतर प्रवास सुरू झाला. नाही म्हणायला राहायला वर छप्पर होते. कै. बाळासाहेब कुळकर्णी म्हणजे यमुताईंचे पती ते त्यांचे मार्गदर्शक आणि हितचिंतक सुद्धा. 


मग पुढे कै. शिवलकर सरांच्या पुढाकारांने सारस्वत बँकेने कर्ज दिले आणि आताची श्रद्धामाता १९७०-७१ साली झाली आणि ही मंडळी ब्लॉक मध्ये पवई मेन गेट समोर राहायला आली. नंतर चंदूकाका IIT पवई मध्ये प्रिंटिंग प्रेस डिपार्टमेंटला नोकरींला लागले. काही दिवस ते श्रद्धा माता मध्ये रहात होते. पुष्पा ताई कुळकर्णी जोशी सुद्धा पुढे तेथे नोकरीला लागल्या. 


मीं स्टॅटिस्टिक्स मध्ये बी. एस. सी. पास झाल्यावर कॉम्पुटरचा छोटासा कोर्स केला होता आणि हे श्री मुळ्याना माहिती होते त्यामुळे IIT च्या ऍकडेमिक विभागात स्टॅटिस्टीशीयन कम ज्युनियर टेक्निकल असिस्टंटची जाहिरात आली, त्यावेळी त्यांनी मला कळवले. मीं अर्ज केला आणि रीतसर परीक्षा आणि IIT च्या ५ डबल पी. एच. डी. प्रोफेसरांनी घेतलेला इंटरव्यू देऊन पास झालो. मला डिप्युटी डायरेक्टर प्रोफ. बापट यांचा विशेष असिस्टंट, ऑफिसर ग्रेड म्हणून १९७७ साली जॉईनिंग पोस्ट मिळाली. (त्या आधी मीं सारस्वत बँकेत क्लार्क म्हणून कामाला होतो). हे बापट साहेब ऐरोनोटिकलं डिपार्टमेंटचे मुख्य आणि यांच्या पत्नी सुद्धा गणिताच्या प्रोफेसर होत्या. बापट साहेब भारत सरकारच्या संरक्षण विषयक विमान खरेदी समितीवर सल्लागार होते. त्यांचा पुतण्या डॉ. रवि बापट हे के. ई. एम. हॉस्पिटल चे डीन होते. IIT सारख्या जगप्रसिद्ध संस्थेमध्ये आणि ते सुद्धा प्रोफेसर मंडळी बरोबर काम करायला मिळाल्यामुळे जीवनाकडे बघण्याचा माझा दृष्टीकोनच बदलून गेला. जे काम करायचे ते मन लावून करायचे आणि सतत सर्वोत्कृष्ट काम करण्याचा प्रयत्न करायचा हा मंत्रच मनाने धारण केला.

पुढे एकाच वर्षात म्हणजे १९७८ साली मला IIT मध्ये कॉम्पुटर मध्ये MSc. करायची संधी मिळाली आणि प्रोग्रामर म्हणून प्रमोशन पण मिळाले, त्यामुळे मुळेकाकांना खूप आनंद झाला. ते सर्वांनां नेहमी माझी ओळख करून देत. त्यावेळी कॉम्प्युटर म्हणजे नावीन्यच होते. त्यामुळे मला पण काम करायला खूप हुरूप यायचा . मीं अभ्यासासाठी २ वर्ष त्यांच्याकडेच राहायला होतो. त्यावेळी त्यांनी मला दिलेली वागणूक अगदी सक्ख्या भावासारखी होती. दुपारी जेवायला आम्ही घरी एकत्र असायचो आणि सायकलने परत ऑफिसला जायचो. 


त्यावेळी मुळेकाका फक्त SSC शिकलेले होते. पुढे मुळेकाकांना काय वाटले कोणास ठाऊक, त्यांनी त्यांच्या वैद्य नावाच्या मित्राबरोबर बाहेरून, भोपाळ येथून बी. कॉम. पूर्ण केले आणि मग त्यांना अकाउंटंट म्हणून प्रमोशन मिळाले. ते साधारण १९८० साली असावे. त्या काळी पगार अतिशय कमी असल्यामुळे कायम ओढाताण असे. बरेच वेळा दिवाळी फंडातून कर्ज काढून एखादी नवीन वस्तू विकत घेतली जायची. शिवाय गावाला आजी आजोबांना किंवा घर दुरुस्तीला सुद्धा पैसे पाठवावे लागत. असा सुरवातीचा काळ फारच जिकिरीचा गेला.


पुढे रश्मीताई आणि रुपालीताई मोठ्या झाल्या. दोन्ही मुलींनी शिक्षणात अपेक्षे प्रमाणे प्रगती केली. रश्मी ताईंनी तर PhD केली. हळूहळू यांची परिस्थिती सुद्धा सुधारत चालली. त्यांना शिक्षणाबद्दल आस्था आणि आवड होती. घरातील कोणी शिकले, तर त्यांना त्याचा अभिमान असे. स्वानंद, संजय मुळे, मनुताई यांची प्रगती ते आम्हाला नेहमी सांगत.

टापटीपपणा, शिस्त आणि स्पष्टवक्तेपणा हे त्यांचे अंगजात गुण होते. हिशोबाला चोख आणि काटेकोर असल्यामुळे श्रद्धामाताचे खजिनदारपद आपोआपच त्यांच्याकडे आले. सर्वांनां उपयोगी पडणे. मनात आडमुठेपणा किंवा अहंकार नसे. ते एव्हडे मनमोकळे होते की एखादी गोष्ट दुसऱ्याला सांगितल्याशिवाय त्यांना चैन पडत नसे. त्यांची बहीण कलावतीताई शितूत यांचे त्यांच्यावर विशेष प्रेम होते. गावच्या वाहिनी आणि दादा यांचे त्यांचे चांगले पारिवारिक संबंध होते. 


पूर्वी ते देवरुख येथे शाळेला राहायला असल्यामुळे, त्यांच्यामध्ये देवरुख बद्दल फार आकर्षण होते. निवृत्ती नंतर त्यांनी साडवली, देवरुख येथे एक घर विकत घेतले होते आणि वर्षातून काही महिने ते सपत्नीक तेथे राहायला जायचे पण तेथे मे महिन्यात पाण्याचे दुर्भीक्ष. पुढे शशिताईचा दुर्दैवी अंत झाला आणि ते एकटे पडले. त्यांनी देवरुखचे घर विकून टाकले.


हळू हळू शरीर आणि मन दोन्ही थकत चालले होते. मीं त्यांच्याकडे वर्षातून ३/४ वेळा तरी भेटायला जात असे. हळू हळू ते निराशेकडे झुकत चालले. त्यात २ वेळा पॅरालिसिसचा स्ट्रोक आल्यामुळे त्यांची तब्येत आणखी खालावली. सौं रश्मीताई आणि डॉ समीर भुरे आणि रुपाली ताई ह्यांनी शक्य होईल तेव्हढे सर्व औषधी उपाय योजना आणि त्यांच्या ईच्छेनुसार त्यांची व्यवस्था केली होती परंतु ईश्वरी ईच्छे पुढे उपाय नाही. आज २३ फेब्रुवारी २०२५ रोजी वयाच्या ८७ व्या वर्षी त्यांची प्राणज्योत अल्पशा आजाराने मालवली. गेले ५८ वर्ष त्यांचा सुखद सहवास आम्हाला लाभला हे आमचे भाग्य म्हणायचे. आम्हा भोळे परिवाराला त्यांचा मोठा मानसिक आधार असायचा.


श्री मुळे आणि श्री भुरे कुटुंबियांच्या दुःखात आम्ही भोळे परिवार समदु:खी असून ईश्वर त्यांच्या आत्म्यास सदगती देवो हीच प्रार्थना.


माधव भोळे