Saturday, March 1, 2025

श्री मधुसूदन मुळे काका, एक पर्व संपले.

 श्री मधुसूदन मुळे काका, एक पर्व संपले.


माझी २ नंबरची सक्खी मोठी बहीण कै. शशिताई मुळे हिचा विवाह, विष्णुबाग गिरगांव येथे झाला त्यावेळी मीं १२-१३ वर्षाचा असेन ( तारीख १ एप्रिल साधारण पणे १९६६-६७ साली असावे ). त्यावेळी श्री. मुळे IIT पवई मध्ये अकाउंटस विभागात क्लार्क म्हणून नोकरीं करत होते आणि शशिताई रामवाडी पोस्ट ऑफिस, काळबादेवी येथे क्लार्क म्हणून नोकरीं करीत असे.


त्या वेळी ही मंडळी टाईप H२ क्वार्टरस, पवई तलावाच्या जवळ रहात होते. ( आताच्या हिरानंदानी समोर ). टाईप H२ म्हणजे एक मोठे किचन आणि एक मोठा हॉल. बेडरूम वगैरे वेगळी नाही. यांची खोली तळमजल्यावर होती. वरती राहायला शेट काका आणि काकू होत्या. त्या वेळी पवईला जायचे म्हणजे विक्रोळी वरून एकच बस पवई मेन गेट पर्यंत येत असे. आता सारखी ट्राफिकची वर्दळ नव्हती. मग तेथून टाईप २ पर्यंत चालत किंवा सायकलने प्रवास. त्याकाळी फारच थोड्या स्त्रिया नोकरीला जातं. ताईला घरून सकाळी डबा घेऊन VT मार्गे बसने काळबादेवी पर्यंत जावे लागे. पुढे पुढे, ती पोस्ट मास्टर पदापर्यंत पोहोचल्यावर बलार्ड पियर म्हणजे मुंबईचे दुसरे टोक, तेथपर्यंत नोकरीला जाई. पोस्टात असल्यामुळे तिच्या नेहमी बदल्या होत असत. मुळेकाकांची नोकरीं जवळच कॅम्पसमध्ये असल्यामुळे ते तिला घरी हातभार लावत. सोबत वसंत मुळे म्हणून त्यांचा एक जवळचा नातेवाईक काही वर्ष तेथे रहात होता. तो सुटीच्या दिवशी शशिताईला जेवण बनवण्यात मदत करे. संसाराचा असा खडतर प्रवास सुरू झाला. नाही म्हणायला राहायला वर छप्पर होते. कै. बाळासाहेब कुळकर्णी म्हणजे यमुताईंचे पती ते त्यांचे मार्गदर्शक आणि हितचिंतक सुद्धा. 


मग पुढे कै. शिवलकर सरांच्या पुढाकारांने सारस्वत बँकेने कर्ज दिले आणि आताची श्रद्धामाता १९७०-७१ साली झाली आणि ही मंडळी ब्लॉक मध्ये पवई मेन गेट समोर राहायला आली. नंतर चंदूकाका IIT पवई मध्ये प्रिंटिंग प्रेस डिपार्टमेंटला नोकरींला लागले. काही दिवस ते श्रद्धा माता मध्ये रहात होते. पुष्पा ताई कुळकर्णी जोशी सुद्धा पुढे तेथे नोकरीला लागल्या. 


मीं स्टॅटिस्टिक्स मध्ये बी. एस. सी. पास झाल्यावर कॉम्पुटरचा छोटासा कोर्स केला होता आणि हे श्री मुळ्याना माहिती होते त्यामुळे IIT च्या ऍकडेमिक विभागात स्टॅटिस्टीशीयन कम ज्युनियर टेक्निकल असिस्टंटची जाहिरात आली, त्यावेळी त्यांनी मला कळवले. मीं अर्ज केला आणि रीतसर परीक्षा आणि IIT च्या ५ डबल पी. एच. डी. प्रोफेसरांनी घेतलेला इंटरव्यू देऊन पास झालो. मला डिप्युटी डायरेक्टर प्रोफ. बापट यांचा विशेष असिस्टंट, ऑफिसर ग्रेड म्हणून १९७७ साली जॉईनिंग पोस्ट मिळाली. (त्या आधी मीं सारस्वत बँकेत क्लार्क म्हणून कामाला होतो). हे बापट साहेब ऐरोनोटिकलं डिपार्टमेंटचे मुख्य आणि यांच्या पत्नी सुद्धा गणिताच्या प्रोफेसर होत्या. बापट साहेब भारत सरकारच्या संरक्षण विषयक विमान खरेदी समितीवर सल्लागार होते. त्यांचा पुतण्या डॉ. रवि बापट हे के. ई. एम. हॉस्पिटल चे डीन होते. IIT सारख्या जगप्रसिद्ध संस्थेमध्ये आणि ते सुद्धा प्रोफेसर मंडळी बरोबर काम करायला मिळाल्यामुळे जीवनाकडे बघण्याचा माझा दृष्टीकोनच बदलून गेला. जे काम करायचे ते मन लावून करायचे आणि सतत सर्वोत्कृष्ट काम करण्याचा प्रयत्न करायचा हा मंत्रच मनाने धारण केला.

पुढे एकाच वर्षात म्हणजे १९७८ साली मला IIT मध्ये कॉम्पुटर मध्ये MSc. करायची संधी मिळाली आणि प्रोग्रामर म्हणून प्रमोशन पण मिळाले, त्यामुळे मुळेकाकांना खूप आनंद झाला. ते सर्वांनां नेहमी माझी ओळख करून देत. त्यावेळी कॉम्प्युटर म्हणजे नावीन्यच होते. त्यामुळे मला पण काम करायला खूप हुरूप यायचा . मीं अभ्यासासाठी २ वर्ष त्यांच्याकडेच राहायला होतो. त्यावेळी त्यांनी मला दिलेली वागणूक अगदी सक्ख्या भावासारखी होती. दुपारी जेवायला आम्ही घरी एकत्र असायचो आणि सायकलने परत ऑफिसला जायचो. 


त्यावेळी मुळेकाका फक्त SSC शिकलेले होते. पुढे मुळेकाकांना काय वाटले कोणास ठाऊक, त्यांनी त्यांच्या वैद्य नावाच्या मित्राबरोबर बाहेरून, भोपाळ येथून बी. कॉम. पूर्ण केले आणि मग त्यांना अकाउंटंट म्हणून प्रमोशन मिळाले. ते साधारण १९८० साली असावे. त्या काळी पगार अतिशय कमी असल्यामुळे कायम ओढाताण असे. बरेच वेळा दिवाळी फंडातून कर्ज काढून एखादी नवीन वस्तू विकत घेतली जायची. शिवाय गावाला आजी आजोबांना किंवा घर दुरुस्तीला सुद्धा पैसे पाठवावे लागत. असा सुरवातीचा काळ फारच जिकिरीचा गेला.


पुढे रश्मीताई आणि रुपालीताई मोठ्या झाल्या. दोन्ही मुलींनी शिक्षणात अपेक्षे प्रमाणे प्रगती केली. रश्मी ताईंनी तर PhD केली. हळूहळू यांची परिस्थिती सुद्धा सुधारत चालली. त्यांना शिक्षणाबद्दल आस्था आणि आवड होती. घरातील कोणी शिकले, तर त्यांना त्याचा अभिमान असे. स्वानंद, संजय मुळे, मनुताई यांची प्रगती ते आम्हाला नेहमी सांगत.

टापटीपपणा, शिस्त आणि स्पष्टवक्तेपणा हे त्यांचे अंगजात गुण होते. हिशोबाला चोख आणि काटेकोर असल्यामुळे श्रद्धामाताचे खजिनदारपद आपोआपच त्यांच्याकडे आले. सर्वांनां उपयोगी पडणे. मनात आडमुठेपणा किंवा अहंकार नसे. ते एव्हडे मनमोकळे होते की एखादी गोष्ट दुसऱ्याला सांगितल्याशिवाय त्यांना चैन पडत नसे. त्यांची बहीण कलावतीताई शितूत यांचे त्यांच्यावर विशेष प्रेम होते. गावच्या वाहिनी आणि दादा यांचे त्यांचे चांगले पारिवारिक संबंध होते. 


पूर्वी ते देवरुख येथे शाळेला राहायला असल्यामुळे, त्यांच्यामध्ये देवरुख बद्दल फार आकर्षण होते. निवृत्ती नंतर त्यांनी साडवली, देवरुख येथे एक घर विकत घेतले होते आणि वर्षातून काही महिने ते सपत्नीक तेथे राहायला जायचे पण तेथे मे महिन्यात पाण्याचे दुर्भीक्ष. पुढे शशिताईचा दुर्दैवी अंत झाला आणि ते एकटे पडले. त्यांनी देवरुखचे घर विकून टाकले.


हळू हळू शरीर आणि मन दोन्ही थकत चालले होते. मीं त्यांच्याकडे वर्षातून ३/४ वेळा तरी भेटायला जात असे. हळू हळू ते निराशेकडे झुकत चालले. त्यात २ वेळा पॅरालिसिसचा स्ट्रोक आल्यामुळे त्यांची तब्येत आणखी खालावली. सौं रश्मीताई आणि डॉ समीर भुरे आणि रुपाली ताई ह्यांनी शक्य होईल तेव्हढे सर्व औषधी उपाय योजना आणि त्यांच्या ईच्छेनुसार त्यांची व्यवस्था केली होती परंतु ईश्वरी ईच्छे पुढे उपाय नाही. आज २३ फेब्रुवारी २०२५ रोजी वयाच्या ८७ व्या वर्षी त्यांची प्राणज्योत अल्पशा आजाराने मालवली. गेले ५८ वर्ष त्यांचा सुखद सहवास आम्हाला लाभला हे आमचे भाग्य म्हणायचे. आम्हा भोळे परिवाराला त्यांचा मोठा मानसिक आधार असायचा.


श्री मुळे आणि श्री भुरे कुटुंबियांच्या दुःखात आम्ही भोळे परिवार समदु:खी असून ईश्वर त्यांच्या आत्म्यास सदगती देवो हीच प्रार्थना.


माधव भोळे 



No comments:

Post a Comment