नांवात काय आहे?
आज सकाळी मुंबई मधील मुंबादेवी भागातून झवेरी बाजार मार्गे क्रॉफर्ड मार्केटच्या दिशेने चालत जातं होतो. झवेरी बाजार, बुलीयन एक्सचेंज म्हणजे अतिशय गर्दीचा आणि रहदारीचा भाग. हातगाड्या, ठेले, रस्त्यावरील स्टॉल, गर्दीच गर्दी. माणसाला चालायला मुश्किल.
रस्त्याच्या दोन्ही बाजूला छोटी मोठी विश्रांतीगृह / दुकानें होती. विशेष म्हणजे महागड्या सराफांच्या काचेच्या शोरूमच्या बाजूलाच यातील काही विश्रांतीगृह होती. त्या पैकी एकाचे नांव होते " B भगत ताराचंद". अर्थात हे शाकाहारी पंजाबी विश्रांतिगृह आहे. थोडे पुढे गेलो "K भगत ताराचंद ", पुढे गेलो " P भगत ताराचंद", पुढे गेलो " श्री भगत ताराचंद", "R. भगत ताराचंद". एका बाजूला "भगत ताराचंद ओरिजिनल " वगैरे विश्रांतीगृह.
मीं भगत ताराचंद हे हॉटेलचे नांव मीं पूर्वी ऐकले आहे पण झवेरी बाजार सारख्या एका उच्चभ्रू भागात एव्हडी हॉटेल्स म्हणजे काय?
कोण आहेत हे भगत ताराचंद.?
१८९५ मध्ये पाकिस्तान कराची मध्ये ताराचंद चावला या सदग्रहस्थाने एक छोटासा खाद्य पदार्थांचा ठेला सुरू केला. अर्थात पंजाबी डीशेस. तो माणूस अतिशय दयाळू होता. कोणाकडे पैसे नसले तर तो त्या व्यक्तीला मोफत जेवायला देत असे. ( कर भला सो हो भला ), म्हणून लोकांनी त्याला भगत अशी उपाधी दिली.
फाळणीनंतर त्याने आणि त्याच्या मुलांनी देशाच्या वेगवेगळ्या भागात आपली विश्रांतीगृह टाकायला सुरवात केली. त्यातील एक १९७० साली मुंबईमध्ये झवेरी बाजारात प्रथम सुरू झाले. आज झवेरी बाजारातच ह्या कुटुंबियांची कमीतमी ७ हॉटेल्स आहेत आणि मुंबई मध्ये एकंदर १८ ते २० हॉटेल्स आहेत. ही सर्व शुद्ध शाकाहारी आहेत. शिवाय नाशिक आणि सुरत, गुजरात येथे सुद्धा काही हॉटेल्स आहेत.
त्यांच्या बापजाद्यानी जे नांव कमावले ते त्यांनी टिकवून ठेवले आणि त्याचा प्रसार सुद्धा केला. नाहीतर आमच्या गिरगांवामध्ये एक मराठी हॉटेलचे मालक ४ भाऊ मला एकदा सांगत की आम्ही ४ भाऊ आलटून पालटून दिवसातून प्रत्येकी ४ तास गल्ल्यावर बसतो. मीं त्यांना विचारले की तुम्ही दादर, पार्ले, बोरिवली, नवी मुंबई सारख्या ठिकाणी आपापली हॉटेल्स याच नांवानी का काढत नाहीत ? तर म्हणाले की गिरगांव चे हॉटेल जुने आहे त्यामुळे गिरगांवचा गल्ला जास्त असतो. मग तो सोडून बाकी कुठे जायला कोणताही भाऊ तयार नाही. नवीन विश्रांतीगृह टाकले तरी सेट व्हायला वेळ जाणार?. आता तर गेले वर्षभर हे हॉटेल बंदच झाले असून त्यातील एकाने काही वर्षापूर्वी आपल्याच मेव्हण्याच्या आयुर्वेदिक औषधांच्या एजन्सी दुकाना समोरच आपले पण आयुर्वेदिक औषधांचे दुकान टाकले आहे. म्हणजे घरचाच स्पर्धक. काही मंडळींना तर मीं "आमची कोठेही शाखा नाही" असे लिहिण्यातच धन्यता मानताना मीं बघितले आहे. ज्याच्या हातात कला आहे आणि मनगटात जोर आहे त्यांनी बिनधास्त कोणताही व्यवसाय सुरू करुन तो वाढवावा. ग्राहक खूष तर आपणही खूष.
नुसते सकाळी उठून "कराग्रे वसते लक्ष्मी, कर मध्ये सरस्वती, कर मुले तू गोविंदम, प्रभाते करदर्शनम" काय उपयोग? त्या म्हणण्याचा खरा अर्थ आहे "अपना हाथ जगन्नाथ". ही लक्ष्मी ज्याला प्रसन्न होते जों आपल्या हाताचा उपयोग सत्कारणी लावतो.
माधव भोळे
No comments:
Post a Comment