शिंमगा आणि पर्यावरण :
गेल्या दोन तीन दिवसात वेगवेगळ्या गावातील लोकांनी आपापल्या गावात शिंमग्यासाठी झाडें तोडून होळी साजरी केली याचे व्हिडीओ बघितले. परंपरा ह्या नावाखाली वडिलोपार्जित झाडें किंवा जंगलतोड करण्याचा जन्मजात हक्क या मंडळींना कोणी दिला आहे? अनेक डोंगर आणि जंगले आता ओसाड बनायला लागले आहेत. त्या मुळे बिबटे, वाघ, हत्ती या सारखे हिस्त्र प्राणी भर वस्तीत धुमाकूळ घालत आहेत.
पूर्वी थंडी फार पडत असे. अगदी शिवरात्री पर्यंत थंडी असे. अशावेळी हिवाळा संपून उन्हाळ्यात आपण पदार्पण करीत असतो. ऋतूमाना प्रमाणे ह्या काळात शिशिर ऋतू ( माघ आणि फाल्गुन ) मध्ये पानगळ सुरू होते. पुढे चैत्र महिन्यात ( वसंत ऋतू ) वृक्षाना नवीन पालवी फुटते. ह्या जमलेल्या पानगळीचा पाला पाचोळा ह्या होळीमध्ये दहन करावा आणि आपले आवार स्वच्छ करावे असे खरे सूत्र आहे, परंतु होमाचा अग्नी आणखी प्रज्वलीत व्हावा यासाठी लोक भले मोठे लाकडाचे ओंडके त्यात टाकतात. आपली होळी बाकीच्या वाड्यांपेक्षा जास्त उंच आणि मोठी असावी म्हणून जास्तीतजास्त उंच माड आणि मोठमोठाले वृक्ष तोडतात, हे योग्य आहे का? निसर्गाचा ऱ्हास करुन तुमची चढाओढ कशासाठी?
चढओढच करायची असेल तर आपल्या कर्तृत्वाची करा, आपल्या बहादुरीची, आपल्या शिक्षणाची आणि आपल्या समृद्धीतेची करायला हरकत नाही. होळी साजरी करण्यात कसली आली चढओढ? त्यात तुमच्या कोणत्या कर्तृत्वाचा कस लागतो?
किती लोकांनी आपल्या आयुष्यात नवीन झाडें लावली आहेत? एक झाड मोठे व्हायला कमीतकमी ६-८ वर्ष लागतात. शाळेपासून सोशल मीडिया पर्यंत सर्वत्र शिकवले जाते की झाडें आहेत म्हणून आपण श्वास घेऊ शकतो. झाडें आहेत म्हणून निसर्ग आणि पर्यावरण आहे. ज्या ठिकाणी झाडें नाहीत तेथे पाऊस न पडल्यामुळे वाळवंट झाले आहे. आज आखाती देशात बाहेरून विकत आणून झाडें लावत आहेत. आपण त्याबाबतीत नशीबवान आहोत. अशा परिस्थितीमध्ये झाडें लावणे आणि ती टिकवणे हे आपले आद्य कर्तव्य आहे.
रंगपंचमी संपल्यानंतर खाली गेलो तर रस्त्यावर फाटक्या प्लास्टिक थैल्यांचा खच पडला होता. हि प्लास्टिक पिशव्या वापरणारी मुले शाळेत प्लास्टिकचा वापर टाळा असे शिकतात, त्यावर प्रोजेक्ट करतात, ते प्रदर्शनात ठेवतात पण रंगपंचमीला प्लास्टिक च्या पिशव्या पाणी भरून फेकतात. त्यांचे पालक सुद्धा त्यांना समाजावून सांगत नाहीत. कारण आपल्याकडे ज्ञान हे फक्त पुस्तकी असते, ते वापरायचे नाही असेच शिकवले जाते हे दुर्दैव.
माधव भोळे
No comments:
Post a Comment