Wednesday, June 25, 2025

पुणे स्टेशनला बाजीराव पेशवे यांचे नांव देणे बाबत.

 पुणे स्टेशनला बाजीराव पेशवे यांचे नांव देणे बाबत.


पुण्याच्या खासदार, सौं. मेधाताई कुलकर्णी यांनी पुणे रेल्वे स्टेशनला बाजीराव पेशवे यांचे नांव देण्याची मागणी केली आहे. 


सर्व प्रथम मीं नमूद करू इच्छितो की ज्या रेल्वे स्टेशनची किंवा शहरांची नांवे ब्रिटिश, पोर्च्युगिझ, मोगल किंवा भारतावरील अन्य आक्रमकांच्या वंशावळी मधील आहेत ती बदलण्याबद्दल मीं नक्कीच आग्रही आहे, पण पुणे शहराचे नांव बदलण्याचे कारणच काय?  पुणे ही महाराष्ट्राची सांस्कृतिक राजधानी म्हटले जाते. 


मेधाताई पुण्यातील आपल्या मतदारांना खूष करण्यासाठी असे विचित्र खेळ खेळत आहेत. जे वाद तयार करतात. काहीतरी विधायक कार्य करा. रस्ते वाढवून ट्राफिक जाम कमी करा. 


त्यातून खरोखरचं पुणे स्टेशनचे नांव बदलाचे आणि कोण्या महापुरुषाचे किंवा नामांकित महिलेचे नांव द्यायचे असेल तर त्यात प्रथम क्रमांक छत्रपती शिवाजीं महाराज यांच्या मातोश्री राजमाता जिजाऊ यांचा लागेल. 


शहाजीराजे भोसले हे आदिलशहाची नोकरीं सोडून निझामाला जाऊन मिळाल्यानंतर, शहाजी राज्यांना जरब बसवण्यासाठी, आदिलशहाने आपला सरदार मुरार जगदेव यांस,  १६३०-३१ मध्ये संपूर्ण पुणे शहर बेचीराख करण्यासाठी पाठवले. त्याने  ते शहर नुसतेच बेचीराख न करता पुण्याच्या जहागिरीवर गाढवाचा नांगर फिरवला.


अशा वेळी शहाजी राज्यांनी छोटा शिवबा, राजमाता जिजाऊ आणि त्यांचा विश्वासू नोकर दादोजी कोंडदेव यांना पुण्याच्या जहागिरीकडे लक्ष देण्यासाठी मुक्कामाला पाठवले. 


पुण्यात आल्यानंतर पुण्याची अवस्था बघून जिजाऊ मातेला आणि शिवबाना संताप अनावर झाला आणि तेथे पडली हिंदवी स्वराज्याची पहिली ठिणगी. जिजाऊ मातेने मोठ्या कष्टाने आणि आपली सर्व संपत्ती पणाला लावून पुण्याची पुन्हा उभारणी केली. छत्रपती शिवाजी महाराजांनी १६४५ साली चैत्र शुद्ध सप्तमी रोजी वयाच्या १६ व्या वर्षी रायरेश्वर येथे जाऊन हिंदवी स्वराज्याची स्थापना करण्याची शपथ घेतली आणि पुढे घडला इतिहास. जर जिजाऊ नसत्या तर??


अर्थात थोरले बाजीराव सुद्धा तेव्हडेच पराक्रमी आणि त्यांचाही योग्य तो मान असायलाच हवा. हिंदवी स्वराज्याच्या पायावर त्यांनी कळस चढवला हे नक्कीच. पण आधी पाया महत्वाचा. तो जिजाऊ नी घातला.


माधव भोळे

Monday, June 23, 2025

निश्चियाचा महामेरू! आपत्ती मधून संधी तयार करणारा १३ वर्षीय तीलक मेहेता.

 निश्चियाचा महामेरू! आपत्ती मधून संधी तयार करणारा १३ वर्षीय तीलक मेहेता. 


आज पर्यंत आपण समजत होतो की IIT, IIM चे MBA, Technologist, वेंचर कॅपिटलच्या सहाय्याने मोठ मोठ्या स्टार्टअप कंपन्या निर्माण करतात आणि असे असूनसुद्धा त्या अनेक वेळा १० / १५ वर्ष तोट्यात असतात, पण तुम्हांला आश्चर्य वाटेल की एका १३ वर्षीय मुलाने एका साधारण घटनेवर विचार करून एक कंपनी बनवली आणि ती आज रु. १०० कोटी वार्षिक उलाढाल करते आणि त्याची व्यक्तिगत मालमत्ता रु. ६५ कोटी आहे.


कोण आहे तो महानुभाव ज्याचे बद्धल वर लिहिले आहे? 

हा आहे तिलक मेहता. हा १३ वर्षाचा असताना एकदा आपल्या काकाकडे मुंबईतील एका उपनगरात राहायला गेला होता आणि परत आल्यावर त्याच्या लक्षात आले की त्यानी अभ्यासासाठी नेलेली पुस्तके तो काकाकडे विसरला. त्याची परीक्षा जवळ आल्याने त्याला ती पुस्तके त्याच दिवशी हवी होती. त्यांनी बऱ्याच कुरियर कंपन्याशी संपर्क साधला पण एक तर त्याच दिवशी डिलिव्हरी होणार नव्हती किंवा ते महाग होते.

त्याला वाटले हा प्रॉब्लेम तर अनेकांचा असेल की त्यांना त्याच दिवशी पेपर किंवा पार्सल हवे असते आणि ते सुद्धा कमी खर्चात. 

त्याने कोठेतरी वाचले होते की मुंबईचे डब्बेवाले सर्वात जलद आणि सर्वात अचूक डब्बे डीलीव्हरी करतात. त्याने ठरवले की हा प्रश्न एक कंपनी काढून सोडवायचा. त्याने मुंबईतील डब्बेवाले संघटनेशी संपर्क साधला. हे काम योग्य मोबदल्याच्या बदल्यात करायचे त्यांनी मान्य केले. त्याने १३ व्या ( २०१८ साली ) वर्षी पेपर आणि पार्सल ( Paper N Parcel ) नावाचा ऑनलाईन शिपिंग आणि लॉजिस्टिक प्लॅटफॉर्म काढला. त्याच्या वडिलांनी सुरवातीला आर्थिक मदत केली. अशी झाली सुरवात. 


आज त्याच्या कंपनीमध्ये २०० कायम नोकर, ३०० डब्बेवाले काम करत असून ते दिवसाला सुमारे १३०० डिलिवरी करतात. त्याच्या कंपनीची २०२२ मधील वार्षिक उलाढाल १०० कोटी रुपये आहे. त्या द्वारे २००६ साली जन्म झालेला तिलक मेहता, महिना रु. २ कोटी कमवतो आणि आणि त्याची निव्वळ संपत्ती ( Net worth) ६५ कोटी रुपये आहे.


कठोर मेहेनत, प्रश्न सोडवायची जिद्द, लवचिकता, व्यवहारीक परिपक्वता आणि आउट ऑफ बॉक्स थिंकिंग ह्या काही मोजक्या गुणावर त्यांनी हा मेरू पर्वत उचलला आहे.


एक लक्षात घ्यायला हवे की जर आपला व्यवसाय समाजाचा काही प्रश्न सोडवत असेल तर त्या व्यवसायला नक्कीच मागणी आहे. 


माधव भोळे 

स्त्री स्वातंत्र्य आणि समानता, काही आदर्श स्त्रिया.

 स्त्री स्वातंत्र्य आणि समानता, काही आदर्श स्त्रिया.


आज काल समाजात वरील विषयावर बरेच मंथन सुरू असून त्यामध्ये अनेक स्त्रिया आपापल्या परीने योग्य योगदान देत आहेत. काही ठिकाणी ह्या विषयाचे आकलन न झाल्यामुळे अतिरेक होत आहे. समानतेच्या नावाखाली काही स्त्रिया भारतीय संस्कार आणि परंपराना जाणून बोजून छेद देण्याचा प्रयत्न करीत आहेत. सुधारणेच्या नावाखाली काहीही करायच्या गोष्टीकडे कल वाढत चालला आहे. आजकाल दारू, सिगारेट, तोकडे कपडे, विवाह बाह्य संबंध करणे ह्या गोष्टीं स्वीकारणारऱ्यां स्त्रियांना आदर्श मानले जात आहे. पण ते कितपत योग्य आहे?


पूर्वी समाजात स्त्रियांना दुय्यम लेखले जात असे. स्त्रिया एखादी गोष्ट करण्यासाठी सक्षम नाहीत असे समजले जायचे पण तो भ्रम काही स्त्रियांनी तोडला आहे. त्यातील मोजकीच उदाहरण देत आहे. ह्या मंडळींनी आपल्या कार्यक्षेत्रात नुसता पायाच रचला नाही तर मोलाची कामगिरी केली आहे. 


सौं. कमला (भागवत) सोहोनी ( १८ जून १९११ ते २८ जून १९९८ )

स्वातंत्र्य पूर्व काळातील गोष्ट. त्यावेळी इंदूर येथील श्री नारायणराव भागवत यांची कन्या आणि माधवराव भागवत यांची पुतणी सौं. कमला सोहोनी हिने इतिहास रचला आहे. 

त्याकाळी बंगलोर येथील इंडियन इन्स्टिटयूट ऑफ सायन्स मध्ये नोबेल पारितोषिक विजेते आणि जगप्रसिद्ध शास्त्रज्ञ् डॉ. सी. वि. रमण हे डायरेक्टर म्हणून कार्यरत होते. 


कमलाताईंचे वडील नारायणराव भागवत आणि काका माधवराव भागवत, दोन्ही त्या वेळच्या टाटा इन्स्टिटयूट ऑफ फ़ंडमेंटल रिसर्च, बंगलोर ( सध्याची इंडियन इन्स्टिटयूट ऑफ सायन्स ) चे माजी विध्यार्थी होते. त्यांच्या पावलावर पाऊल टाकत त्याच ठिकाणी अभ्यास आणि संशोधन करण्याची ईच्छा कमलाताईंना होती. त्या साठी त्यांनी १९३३ मध्ये मुंबई विद्यापीठातून केमिस्ट्री आणि फिजिक्स मध्ये बी. एस्सी. डिग्री मिळवली. 


त्यांनी इंडियन इन्स्टिटयूट ऑफ सायन्स मध्ये MSc संशोधन शिष्यवृत्तीसाठी अर्ज केला. त्यांचे मार्क सुद्धा चांगले होते. परंतु डायरेक्टर डॉ. रमण यांनी तो अर्ज नाकारला. त्यांच्यामते स्त्रिया संशोधना सारखे गहन विषय हाताळण्यास सक्षम नाहीत. त्यावर कमलाताईं, डॉ. रमण यांच्या ऑफिस समोर सत्याग्रहाला बसल्या.  ४ ते ५ दिवसानंतर डॉ रमण यांनी त्यांची तावून सुलाखून  मुलाखत घेतली आणि त्यांना खालील जाचक आणि अपमानजनक अटींवर संशोधन करण्यास परवानगी दिली.


१. ती नियमित विध्यार्थी ( रेग्युलर स्टुडन्ट ) म्हणून दाखल होणार नाही.

२. ती पूर्ण १ वर्ष प्रोबेशन वर काम करेल आणि त्या काळातील संशोधन आणि अभ्यास जेथे पर्यंत डॉ. रमण यांना  समाधान होत नाही तेथपर्यंत ते ग्राह्य धरले जाणार नाही.

३. संशोधन काळात ती इतर पुरुष वर्गाचे लक्ष आपल्याकडे आकर्षित करून त्यांच्या अभ्यासात व्यत्यय आणणार नाही.


या सर्व अटी नाईलाजाने आणि जिद्दीने मान्य करून त्यांनी मुदतीपूर्वी आपला MSc चा प्रबंध सादर केला आणि त्या १९३६ साली  इंडियन इन्स्टिटयूट ऑफ सायन्सच्या MSc ( विशेष प्रविण्य ) मिळवून त्या पास झाल्या. त्या संस्थेच्या त्या पहिल्या महिला विध्यार्थी ठरल्या. 


पुढे १९३९ साली इंग्लंड मधील केब्रिज विद्यापीठाच्या न्यूहॅम कॉलेज मधून त्यांनी बायोलोजीकल नॅचरलं सायन्स ह्या विषयात पी.एच.डी केली. पुढे विवाहानंतर मुंबई मध्ये आल्यावर त्या रॉयल इन्स्टिटयूट ऑफ सायन्स ( सध्याचे इन्स्टिटयूट ऑफ सायन्स ) मध्ये प्रथम प्राध्यापक आणि नंतर डायरेक्टर झाल्या पण स्त्री असल्यामुळेच त्यांना नियोजित काळापेक्षा चार वर्ष उशिरा हे पद मिळाले. त्यांनी बायोकेमिस्ट म्हणून वेगवेगळ्या अन्न धन्यातील पौष्टिक पैलू जसे की प्रोटीन्स,  व्हिटॅमिन्स, आयर्न ची मात्रा इत्यादीवर संशोधन केले. त्या वेळचे राष्ट्रपती डॉ राजेंद्र प्रसाद यांनी त्याना गरिबांचे आणि आदिवासी लोकांचे अमृत म्हणजे ताडापासून मिळालेली नीरा मधील पौष्टिक मूल्यांवर संशोधन करण्यास प्रोत्साहन दिले. विशेषतः गर्भवती महिलांसाठी तिचा असलेला डाएट सप्लिमेंट म्हणून उपयोग ह्या विषयी संशोधन करण्यासाठी उद्युक्त केले.


अशाच दुसऱ्या प्रसिद्ध महिला म्हणजे डॉ. सुधा मूर्ती. ह्या इंजिनियर असून सुद्धा केवळ स्त्री म्हणून त्यांना पुणे येथील टेल्को मधील शॉप फ्लोअर वरील इंजिनियरची नोकरीं नाकारली गेली. त्यावेळी त्या टाटाचे सर्वे सर्वा जे.आर.डी. टाटा यांना भेटून त्यांनी आपली क्षमता पटवून दिली आणि त्या टेल्को मध्ये शॉप फ्लोअरला दाखल झालेल्या पहिला महिला इंजिनियर.


८ व्या आणि ९ व्या शतकातील वेदातील मिमांसा तत्वज्ञान, अद्वैत तत्वज्ञान आणि सन्यास ह्या विषयावर चर्चा  करणारे जगदगुरू आदी शंकराचार्य आणि मंडन मिश्रा यांच्या वादविवादात न्यायाधीश म्हणून काम करणारी उभाया भारती ही मंडन मिश्राची पत्नी होती आणि ती सुद्धा तेव्हडीच विद्वान होती. मंडन मिश्रा हरल्यावर तिने आदी शंकराचार्यना आव्हान दिले होते.


अशा विधायक ठिकाणी आणि विधायक कार्यासाठी स्त्री स्वातंत्र्य आणि समानतेचा आग्रह धरल्यास तो नक्कीच स्तुत्य आहे. 


माधव भोळे

Thursday, June 12, 2025

चिनाब पूल आणि "जी माधवी लता" आधुनिक लीलावती!!

 चिनाब पूल आणि "जी माधवी लता" आधुनिक लीलावती!!


६ जून २०२५ रोजी शुक्रवारी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते उद्घाटन झालेल्या चिनाब पुलाच्या तांत्रिक बाबी संबंधि ही कथा.


1,486 कोटी रुपये खर्चून बांधलेल्या, चिनाब पुलाचे वर्णन "अलिकडच्या इतिहासातील भारतातील कोणत्याही रेल्वे प्रकल्पासमोरील सर्वात मोठे सिव्हिल-इंजिनीअरिंग आव्हान" असे सरकारने केले आहे. 359-मीटरचा पूल आयफेल टॉवरपेक्षा 35 मीटरने उंच आहे. या प्रकल्पामुळे काश्मीर खोऱ्यातील संपर्क सुधारेल.


वेदकळामध्ये भास्कराचार्य ( भास्कर २) यांची कन्या लिलावतीबद्धल माहिती आहे की ती अत्यंत हुशार गणिती होती. अशीच एक गणिती, तंत्रज्ञ्, शास्त्रज्ञ् भारताला लाभली आहे जिचे नांव आहे "जी माधवी लता"


या पुलाच्या यशस्वी बांधकामात एक प्रमुख योगदान म्हणजे प्रोफेसर जी माधवी लता. बेंगळुरू येथील इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ सायन्स (IISc) मधील प्राध्यापिका, त्या चिनाब ब्रिज प्रकल्पात भू-तंत्रज्ञान सल्लागार म्हणून 17 वर्षे गुंतल्या होत्या.


जी माधवी लथा यांनी भूप्रदेशामुळे निर्माण होणाऱ्या अडथळ्यांवर लक्ष केंद्रित करून पुलाच्या स्ट्रक्चरचे नियोजन, डिझाइन आणि बांधकाम यामध्ये पुलाचे कंत्राटदार Afcons सोबत जवळून काम केले.


कोण आहे जी माधवी लता?

ती सध्या IISc मध्ये HAG प्रोफेसर आहे. डॉ. लता यांनी 1992 मध्ये जवाहरलाल नेहरू टेक्नॉलॉजिकल युनिव्हर्सिटीमधून सिव्हिल इंजिनीअरिंगमध्ये बी.टेक पूर्ण केले, जिथे तिने डिस्टिंक्शनसह प्रथम श्रेणी प्राप्त केली.

तिने वारंगल येथील नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी ( VIT) येथे एम.टेकची विद्यार्थिनी म्हणून सुवर्णपदक मिळवले. तिचे स्पेशलायझेशन जिओटेक्निकल इंजिनीअरिंगमध्ये होते. 

डॉ. लता यांनी 2000 मध्ये जिओटेक्निकल इंजिनिअरिंगमध्ये आयआयटी-मद्रासमधून डॉक्टरेट पूर्ण केली.

गेल्या काही वर्षांत तिला अनेक पुरस्कार मिळाले. 2021 मध्ये, तिला इंडियन जिओटेक्निकल सोसायटीने सर्वोत्कृष्ट महिला जिओटेक्निकल संशोधक पुरस्कार दिला. 2022 मध्ये भारतातील STEAM ( Science, Technology, Engineering, Arts, Mathematics ) मधील टॉप 75 महिलांमध्येही तिचे नाव होते.


चिनाब ब्रिज प्रकल्पात तिची भूमिका?

आव्हानात्मक स्थलाकृति, हवामान परिस्थिती आणि चिनाब पुलाचे दुर्गम स्थान याचा अर्थ असा होतो की या प्रदेशात बांधकाम करणे कठीण होते


हिमालयात चिनाब पूल बांधताना काय आव्हाने होती?

भूकंपीय क्रियाकलाप ( Sesmic activity ): 

हा पूल "झोन-V" मध्ये स्थित आहे, जो एक प्रमुख भूकंपीय क्षेत्र आहे, ज्यामुळे तो असुरक्षित आहे.


वाऱ्याचा प्रतिकार: 

चनाब नदी वरील खोल दरीमध्ये *वाऱ्याचा उच्च दाब* जाणवतो, ज्याचा पुलाच्या डिझाइनमध्ये विचार करावा लागतो.


रॉक मास अस्थिरता: भूप्रदेशात *विषम आणि एनिसोट्रॉपिक खडक वस्तुमान असतात* ज्यामध्ये जवळच्या अंतरावर असलेल्या सांधे असतात, ज्यामुळे स्थिरता ही प्रमुख चिंता असते. ( बदलत्या हवामाना मुळे खडकात भेगा निर्माण होतात )


लपलेल्या पोकळ्या आणि भग्न खडक: अभियंत्यांना *लपवलेल्या पोकळ्या आणि भग्न खडकांची रचना* आढळली जी सुरुवातीच्या सर्वेक्षणांमध्ये स्पष्ट नव्हती, ज्यांना रिअल-टाइम अनुकूल करणे आवश्यक होते.


स्लोप स्टॅबिलिटी: उंच उतारांनी पायाच्या स्थिरतेसाठी आव्हान उभे केले आहे, ज्यासाठी **रॉक अँकर आणि स्लोप स्टॅबिलायझेशन तंत्र* वापरणे आवश्यक आहे.


कठोर हवामान परिस्थिती: या प्रदेशात **अत्यंत थंड तापमान, वाऱ्याचा वेग आणि मुसळधार पाऊस** अनुभवतो, ज्यामुळे बांधकामात गुंतागुंत वाढली.


डॉ. लता यांच्या टीमने सर्व अडथळ्यांवर मात करण्यासाठी "डिझाइन-जसे-आपण पुढे -जाता दृष्टिकोन" स्वीकारला. याचा अर्थ भग्न खडक, लपलेल्या पोकळी आणि वेगवेगळ्या खडकाच्या गुणधर्मांसारख्या भूगर्भीय परिस्थितीवर आधारित काम सुरू असतानाच नवनवीन शोध लावणे, जे सुरुवातीच्या सर्वेक्षणांमध्ये स्पष्ट नव्हते. ( सर्व्हे करताना प्रथम अनेक गोष्टी समजल्या नाहीत परंतु जसजसे काम पुढे गेले तसतसें अनेक अडथळे आले तसें त्याप्रमाणे डिझाईन बदलले गेले ).


अलीकडेच तिने इंडियन जिओटेक्निकल जर्नलच्या महिला विशेषांकात "डिझाईन ॲज यू गो: द केस स्टडी ऑफ चिनाब रेल्वे ब्रिज" या शीर्षकाचा शोधनिबंध प्रकाशित केला. संपूर्ण रचना, स्थान आणि प्रकार या साइटच्या भूवैज्ञानिक परिस्थितीनुसार केवळ स्थिरांक असल्याने पुलाचे डिझाइन कसे सतत विकसित होत गेले याचे वर्णन पेपरमध्ये केले आहे.


लोकांच्या माहितीसाठी संकलित आणि भाषांतरित 

माधव भोळे 






Friday, June 6, 2025

दाजी पणशिकर यांना श्रद्धांजली.

 दाजी पणशिकर यांना श्रद्धांजली.


आज दिनांक ६.६.२०२५ रोजी जेष्ठ विचारवंत दाजी पणशिकर यांच्या निधनाची बातमी त्यांचे चिरंजीव विक्रमादित्य दाजी पणशिकर यांचेकडुन समजली आणि डोळ्यासमोर आले ते सडसडीत बांध्याचे, लांब दाढी असलेले उंच दाजी. 


दाजींचे घराणे म्हणजे गिरगांव मधील काळाराम मंदिर मधील वासुदेवशास्त्री पणशिकर यांचे पुजारी घराणे. मोठे विद्वान घराणे. दाजी धरून ४ भाऊ. मोठा आबा पणशिकर, म्हणजे फणसवाडी मधील साईबाबा मंदिरातील पुजारी, ज्याने पुढे एका युरोपयन बाईच्या विनंतीवरून इंग्लंडमध्ये साईबाबा मंदिर स्थापन केले. त्यानंतर त्यानी जर्मनी मधील एका युनिव्हर्सिटी मध्ये ७ वर्ष संस्कृत शिकवले आणि परत इंग्लंडला आल्यावर लीलावात आलेल्या जुन्या चर्चेसना विकत घेऊन तेथे हिंदू मंदिरे बांधली. आबांचा इंग्लंड मध्ये एव्हडा प्रभाव होता की त्यांच्या कोणत्याही धार्मिक कार्याला तेथील धनिकांकडून पूर्ण पाठिंबा असे. 


दुसरा भाऊ म्हणजे नाट्य संपदा ह्या नाटक कंपनीचे मालक, जेष्ठ नाट्यकर्मी आणि "तो मीं नव्हेच" फेम लाखोबा लोखंडे उर्फ कै. प्रभाकर पणशिकर. 


तिसरा भाऊ कै. दिनकर पणशीकर हे मोठे गानतपस्वी होते. पुरोहित घराणे. पेडणे येथे त्यांचे घर असून श्री रवळनाथाचे पुजारी व पोथी वाचन घराणे. यांचे वडील निर्णयसागर येथे नोकरीला होते. सर्व ग्रंथांची मुद्रित तपासणी करण्याचे त्यांचे काम. अतिशय स्पष्टवक्ते व कोणतीही तडजोड न करणारे व्यक्तीमत्व. कै. वासुदेवशास्त्री पणशीकर यांच्या ग्रंथांची हस्तलिखिते लंडनच्या वाचनालयात आजही जपून ठेवली आहेत. सन्मित्र सदन (आताचे हेरंब) येथील तळवलकर यांचे दाजी जावई. श्रीपादशास्त्री किंजवडेकर हे दाजींचे मामा.


रामायण, महाभारत, भगवदगीता सारख्या ग्रंथांवर दाजींची जबरदस्त पकड होती. अध्यात्म, पुराण, वेद, संत वांगमय या विषयात त्यांचा सखोल अभ्यास होता. त्यांनी a) अपरिचित रामायण,  b) कथामृत (भाग १ ते ६ ), c) कपटनीती, d) कर्ण खरा कोण होता? e)  महाभारत : एक सूडाचा प्रवास,  f) गानसरस्वती आदीशक्तीचा धन्योदगार ( किशोरी अमोणकर यांचे चरित्र ), g) श्रीएकनाथमहाराजकृत भावार्थ रामायण (७ खंड ) अशी एकंदर ३० पुस्तके लिहिली आहेत. वरील विषयात त्यांची देश विदेशात २५०० हुन अधिक व्याख्याने झाली आहेत.


गिरगांवातील हेरंब बिल्डिंगमध्ये ते पूर्वी त्यांचे नातेवाईकांकडे येत असत. तेथे त्यांचा माझा परिचय माझे मित्र प्रकाश वीरकर यांनी करून दिला. त्यांची माझी भेट फार तर दोन तीन वेळाच झाली असेल, पण लक्षात राहील असे व्यक्तिमत्व. त्यावेळी दाजी टिटवाळा येथे रहात असत.  एव्हडा मोठा माणूस असून सुद्धा ते निर्गर्वी होते. मला पहिल्या भेटीत असे जाणवलेच नाही की आपण एवढ्या मोठ्या व्यक्तिमत्वाला भेटत आहोत. स्वभावाने अतिशय सरळ असलेले दाजी अतिशय स्पष्टवक्ते होते. 


ईश्वर त्यांच्या आत्म्यास सद्गती देवो हीच प्रार्थना.


माधव भोळे

श्री अशोक वा. कोकजे

 दुःखद निधन!

आमचा परममित्र श्री अशोक वा. कोकजे याचे, दिनांक १.०६.२०२५ रोजी, सकाळी, अल्पशा आजाराने, दुःखद निधन झाले. मृत्यू समयी त्याचे वय ७७ होते. शिक्षणाची आवड असलेला अशोक , तरुणपणी B.A., LLB पर्यंत शिक्षण घेतल्यानंतर विविध बँकांमध्ये उच्च पदांवर नोकरी करत असताना C.A.I.I.B. ही बँकिंगची परीक्षा सुद्धा पास झाला. चिकित्सक, अभ्यासू, ज्ञानपिपासू, निस्वार्थी, सरळ मनाचा असलेल्या अशोकला विविध विषयात वाचनाची आवड होती. बँकेतून स्वेछा निवृत्ती घेतल्यानंतर आयुष्याच्या उत्तरार्धात त्याने महाराष्ट्र चेंबर ऑफ कॉमर्स सारख्या नामांकित संस्था स्थानमध्ये सचिव म्हणून काम केले आहे. 


त्याने कुटुंब मित्र, सर्वांगीण व्यक्तिमत्व विकास ( संग्राहक प्र. न. लिमये ; अनुवादक : अशोक वा. कोकजे ), इंग्रजी भाषेचे प्रवेशद्वार (श्री अशोक वा. कोकजे आणि सौ वर्षा जोगळेकर) ही मराठी मधून तर World Business Guide, Multi Lingual Collection of Thoughts on Various subjects, इंग्रजी मधून अशी एकंदर ५ पुस्तके लिहून प्रकाशित केली आहेत.


ज्ञातीतील थोर समाजसेवक कै. वासुदेवराव कोकजे यांचा सुपुत्र असलेला कै. अशोक समाजकार्यात सुद्धा तेव्हढाच तत्पर आणि दक्ष असे. एकेकाळी देवरुख्यांची असलेली सन्मित्र सहकारी बँक येथे संचालक तर देवरुखे ब्राह्मण संघ मुंबई येथे विश्वस्त म्हणून त्याने काही काळ कार्य करून समाजकार्यातील आपला खारीचा वाटा उचलला आहे. 


त्याचे पश्चात पत्नी श्रीमती सुमेधा, मुलगा आणि सून हा परिवार आहे. 


त्याच्या निधनाने एका हरहुन्नरी कार्यकर्त्याला देवरुखे समाज मुकला आहे.


हे दुःख सहन करण्याची ताकद ईश्वर त्याच्या परिवारास देवो आणि त्याच्या आत्म्यास सद्गती देवो हीच प्रार्थना.


आपले नम्र,

माधव भोळे आणि श्रीनिवास कानडे.