दाजी पणशिकर यांना श्रद्धांजली.
आज दिनांक ६.६.२०२५ रोजी जेष्ठ विचारवंत दाजी पणशिकर यांच्या निधनाची बातमी त्यांचे चिरंजीव विक्रमादित्य दाजी पणशिकर यांचेकडुन समजली आणि डोळ्यासमोर आले ते सडसडीत बांध्याचे, लांब दाढी असलेले उंच दाजी.
दाजींचे घराणे म्हणजे गिरगांव मधील काळाराम मंदिर मधील वासुदेवशास्त्री पणशिकर यांचे पुजारी घराणे. मोठे विद्वान घराणे. दाजी धरून ४ भाऊ. मोठा आबा पणशिकर, म्हणजे फणसवाडी मधील साईबाबा मंदिरातील पुजारी, ज्याने पुढे एका युरोपयन बाईच्या विनंतीवरून इंग्लंडमध्ये साईबाबा मंदिर स्थापन केले. त्यानंतर त्यानी जर्मनी मधील एका युनिव्हर्सिटी मध्ये ७ वर्ष संस्कृत शिकवले आणि परत इंग्लंडला आल्यावर लीलावात आलेल्या जुन्या चर्चेसना विकत घेऊन तेथे हिंदू मंदिरे बांधली. आबांचा इंग्लंड मध्ये एव्हडा प्रभाव होता की त्यांच्या कोणत्याही धार्मिक कार्याला तेथील धनिकांकडून पूर्ण पाठिंबा असे.
दुसरा भाऊ म्हणजे नाट्य संपदा ह्या नाटक कंपनीचे मालक, जेष्ठ नाट्यकर्मी आणि "तो मीं नव्हेच" फेम लाखोबा लोखंडे उर्फ कै. प्रभाकर पणशिकर.
तिसरा भाऊ कै. दिनकर पणशीकर हे मोठे गानतपस्वी होते. पुरोहित घराणे. पेडणे येथे त्यांचे घर असून श्री रवळनाथाचे पुजारी व पोथी वाचन घराणे. यांचे वडील निर्णयसागर येथे नोकरीला होते. सर्व ग्रंथांची मुद्रित तपासणी करण्याचे त्यांचे काम. अतिशय स्पष्टवक्ते व कोणतीही तडजोड न करणारे व्यक्तीमत्व. कै. वासुदेवशास्त्री पणशीकर यांच्या ग्रंथांची हस्तलिखिते लंडनच्या वाचनालयात आजही जपून ठेवली आहेत. सन्मित्र सदन (आताचे हेरंब) येथील तळवलकर यांचे दाजी जावई. श्रीपादशास्त्री किंजवडेकर हे दाजींचे मामा.
रामायण, महाभारत, भगवदगीता सारख्या ग्रंथांवर दाजींची जबरदस्त पकड होती. अध्यात्म, पुराण, वेद, संत वांगमय या विषयात त्यांचा सखोल अभ्यास होता. त्यांनी a) अपरिचित रामायण, b) कथामृत (भाग १ ते ६ ), c) कपटनीती, d) कर्ण खरा कोण होता? e) महाभारत : एक सूडाचा प्रवास, f) गानसरस्वती आदीशक्तीचा धन्योदगार ( किशोरी अमोणकर यांचे चरित्र ), g) श्रीएकनाथमहाराजकृत भावार्थ रामायण (७ खंड ) अशी एकंदर ३० पुस्तके लिहिली आहेत. वरील विषयात त्यांची देश विदेशात २५०० हुन अधिक व्याख्याने झाली आहेत.
गिरगांवातील हेरंब बिल्डिंगमध्ये ते पूर्वी त्यांचे नातेवाईकांकडे येत असत. तेथे त्यांचा माझा परिचय माझे मित्र प्रकाश वीरकर यांनी करून दिला. त्यांची माझी भेट फार तर दोन तीन वेळाच झाली असेल, पण लक्षात राहील असे व्यक्तिमत्व. त्यावेळी दाजी टिटवाळा येथे रहात असत. एव्हडा मोठा माणूस असून सुद्धा ते निर्गर्वी होते. मला पहिल्या भेटीत असे जाणवलेच नाही की आपण एवढ्या मोठ्या व्यक्तिमत्वाला भेटत आहोत. स्वभावाने अतिशय सरळ असलेले दाजी अतिशय स्पष्टवक्ते होते.
ईश्वर त्यांच्या आत्म्यास सद्गती देवो हीच प्रार्थना.
माधव भोळे
No comments:
Post a Comment