स्त्री स्वातंत्र्य आणि समानता, काही आदर्श स्त्रिया.
आज काल समाजात वरील विषयावर बरेच मंथन सुरू असून त्यामध्ये अनेक स्त्रिया आपापल्या परीने योग्य योगदान देत आहेत. काही ठिकाणी ह्या विषयाचे आकलन न झाल्यामुळे अतिरेक होत आहे. समानतेच्या नावाखाली काही स्त्रिया भारतीय संस्कार आणि परंपराना जाणून बोजून छेद देण्याचा प्रयत्न करीत आहेत. सुधारणेच्या नावाखाली काहीही करायच्या गोष्टीकडे कल वाढत चालला आहे. आजकाल दारू, सिगारेट, तोकडे कपडे, विवाह बाह्य संबंध करणे ह्या गोष्टीं स्वीकारणारऱ्यां स्त्रियांना आदर्श मानले जात आहे. पण ते कितपत योग्य आहे?
पूर्वी समाजात स्त्रियांना दुय्यम लेखले जात असे. स्त्रिया एखादी गोष्ट करण्यासाठी सक्षम नाहीत असे समजले जायचे पण तो भ्रम काही स्त्रियांनी तोडला आहे. त्यातील मोजकीच उदाहरण देत आहे. ह्या मंडळींनी आपल्या कार्यक्षेत्रात नुसता पायाच रचला नाही तर मोलाची कामगिरी केली आहे.
सौं. कमला (भागवत) सोहोनी ( १८ जून १९११ ते २८ जून १९९८ )
स्वातंत्र्य पूर्व काळातील गोष्ट. त्यावेळी इंदूर येथील श्री नारायणराव भागवत यांची कन्या आणि माधवराव भागवत यांची पुतणी सौं. कमला सोहोनी हिने इतिहास रचला आहे.
त्याकाळी बंगलोर येथील इंडियन इन्स्टिटयूट ऑफ सायन्स मध्ये नोबेल पारितोषिक विजेते आणि जगप्रसिद्ध शास्त्रज्ञ् डॉ. सी. वि. रमण हे डायरेक्टर म्हणून कार्यरत होते.
कमलाताईंचे वडील नारायणराव भागवत आणि काका माधवराव भागवत, दोन्ही त्या वेळच्या टाटा इन्स्टिटयूट ऑफ फ़ंडमेंटल रिसर्च, बंगलोर ( सध्याची इंडियन इन्स्टिटयूट ऑफ सायन्स ) चे माजी विध्यार्थी होते. त्यांच्या पावलावर पाऊल टाकत त्याच ठिकाणी अभ्यास आणि संशोधन करण्याची ईच्छा कमलाताईंना होती. त्या साठी त्यांनी १९३३ मध्ये मुंबई विद्यापीठातून केमिस्ट्री आणि फिजिक्स मध्ये बी. एस्सी. डिग्री मिळवली.
त्यांनी इंडियन इन्स्टिटयूट ऑफ सायन्स मध्ये MSc संशोधन शिष्यवृत्तीसाठी अर्ज केला. त्यांचे मार्क सुद्धा चांगले होते. परंतु डायरेक्टर डॉ. रमण यांनी तो अर्ज नाकारला. त्यांच्यामते स्त्रिया संशोधना सारखे गहन विषय हाताळण्यास सक्षम नाहीत. त्यावर कमलाताईं, डॉ. रमण यांच्या ऑफिस समोर सत्याग्रहाला बसल्या. ४ ते ५ दिवसानंतर डॉ रमण यांनी त्यांची तावून सुलाखून मुलाखत घेतली आणि त्यांना खालील जाचक आणि अपमानजनक अटींवर संशोधन करण्यास परवानगी दिली.
१. ती नियमित विध्यार्थी ( रेग्युलर स्टुडन्ट ) म्हणून दाखल होणार नाही.
२. ती पूर्ण १ वर्ष प्रोबेशन वर काम करेल आणि त्या काळातील संशोधन आणि अभ्यास जेथे पर्यंत डॉ. रमण यांना समाधान होत नाही तेथपर्यंत ते ग्राह्य धरले जाणार नाही.
३. संशोधन काळात ती इतर पुरुष वर्गाचे लक्ष आपल्याकडे आकर्षित करून त्यांच्या अभ्यासात व्यत्यय आणणार नाही.
या सर्व अटी नाईलाजाने आणि जिद्दीने मान्य करून त्यांनी मुदतीपूर्वी आपला MSc चा प्रबंध सादर केला आणि त्या १९३६ साली इंडियन इन्स्टिटयूट ऑफ सायन्सच्या MSc ( विशेष प्रविण्य ) मिळवून त्या पास झाल्या. त्या संस्थेच्या त्या पहिल्या महिला विध्यार्थी ठरल्या.
पुढे १९३९ साली इंग्लंड मधील केब्रिज विद्यापीठाच्या न्यूहॅम कॉलेज मधून त्यांनी बायोलोजीकल नॅचरलं सायन्स ह्या विषयात पी.एच.डी केली. पुढे विवाहानंतर मुंबई मध्ये आल्यावर त्या रॉयल इन्स्टिटयूट ऑफ सायन्स ( सध्याचे इन्स्टिटयूट ऑफ सायन्स ) मध्ये प्रथम प्राध्यापक आणि नंतर डायरेक्टर झाल्या पण स्त्री असल्यामुळेच त्यांना नियोजित काळापेक्षा चार वर्ष उशिरा हे पद मिळाले. त्यांनी बायोकेमिस्ट म्हणून वेगवेगळ्या अन्न धन्यातील पौष्टिक पैलू जसे की प्रोटीन्स, व्हिटॅमिन्स, आयर्न ची मात्रा इत्यादीवर संशोधन केले. त्या वेळचे राष्ट्रपती डॉ राजेंद्र प्रसाद यांनी त्याना गरिबांचे आणि आदिवासी लोकांचे अमृत म्हणजे ताडापासून मिळालेली नीरा मधील पौष्टिक मूल्यांवर संशोधन करण्यास प्रोत्साहन दिले. विशेषतः गर्भवती महिलांसाठी तिचा असलेला डाएट सप्लिमेंट म्हणून उपयोग ह्या विषयी संशोधन करण्यासाठी उद्युक्त केले.
अशाच दुसऱ्या प्रसिद्ध महिला म्हणजे डॉ. सुधा मूर्ती. ह्या इंजिनियर असून सुद्धा केवळ स्त्री म्हणून त्यांना पुणे येथील टेल्को मधील शॉप फ्लोअर वरील इंजिनियरची नोकरीं नाकारली गेली. त्यावेळी त्या टाटाचे सर्वे सर्वा जे.आर.डी. टाटा यांना भेटून त्यांनी आपली क्षमता पटवून दिली आणि त्या टेल्को मध्ये शॉप फ्लोअरला दाखल झालेल्या पहिला महिला इंजिनियर.
८ व्या आणि ९ व्या शतकातील वेदातील मिमांसा तत्वज्ञान, अद्वैत तत्वज्ञान आणि सन्यास ह्या विषयावर चर्चा करणारे जगदगुरू आदी शंकराचार्य आणि मंडन मिश्रा यांच्या वादविवादात न्यायाधीश म्हणून काम करणारी उभाया भारती ही मंडन मिश्राची पत्नी होती आणि ती सुद्धा तेव्हडीच विद्वान होती. मंडन मिश्रा हरल्यावर तिने आदी शंकराचार्यना आव्हान दिले होते.
अशा विधायक ठिकाणी आणि विधायक कार्यासाठी स्त्री स्वातंत्र्य आणि समानतेचा आग्रह धरल्यास तो नक्कीच स्तुत्य आहे.
माधव भोळे
No comments:
Post a Comment