Sunday, October 26, 2025

विवाह जमणे किंवा जमवणे, एक अडथळा शर्यत?

 विवाह जमणे किंवा जमवणे, एक अडथळा शर्यत?


आज काल समाज माध्यमातून एक विशेष चर्चा सुरू असते. ती म्हणजे आजकालच्या मुलामुलींचे विवाह योग्य वयात होत नाहीत. अर्थात त्याची अनेक कारणे आहेत. पण काही तरुणांशी बोलल्यानंतर असे लक्षात आले की आजकालचे विवाह जमणे किंवा जमवणे म्हणजे एक अडथळा शर्यत आहे. आणि समजा तो जमला तर तो विवाह टिकणे म्हणजे आणखी एक दिव्य कसोटी आहे.


ह्या बाबतीत काही व्यक्तींशी चर्चा करता असे लक्षात आले की, वेगवेगळ्या कारणांमुळे समाज विखूरला गेल्यामुळे बहुतेक तरुण तरुणी मॅरेज ब्युरोच्या इंटरनेटवरील ऍपचा वापर करतात. त्यामध्ये आपण किंवा आपल्या पालकांनी विवाहेच्छुक व्यक्तीची, त्याच्या कुटुंबियांची माहिती आणि संभाव्य वधू / वराबद्धल अपेक्षा यांची माहिती भरून देणे इत्यादी. 


येथपर्यंत प्रक्रिया योग्य आहे. खरी मजा पुढेच आहे. ती म्हणजे त्या व्यक्तीचा प्रोफाइल भरताना काही ऍप असे काही अंनशन्ट प्रश्न विचारतात की त्यांचे प्रोफाइल फिल्टरिंग म्हणजे अतिरेक वाटतो. ज्यांना ह्या विषयाचे काही अगाध ज्ञान आहे असे ते समजतात ती मंडळी प्रोफाइल मध्ये खालील प्रश्न विचारतात. ते बघून प्रश्न पडतो की ही मंडळी विवाह जमवण्यासाठी आहेत की आपली मेम्बरशिप कायम राहून गल्ला भरण्यासाठी आहेत?

उदा.?

१. आपण विवाह कशा प्रकारे साजरा करू इच्छिता?

    १.a) साधा समारंभ फक्त जवळचे नातेवाईक सहित १.b) हाय फाय हॉटेल किंवा डेस्टिनेशन विडींग १.c) रजिस्टर्ड विवाह १.d) मित्र मैत्रिणी, जवळचे नातेवाईकां सह.

२. पहिले मुलं लग्न झाल्यानंतर किती वर्षानंतर व्हावे असे वाटते?

    ३.a) 0 ते ३ वर्षांमध्यें ३.b) ३ ते ६ वर्षा मध्ये ३.c) ६ वर्षानंतर ३.d) कधीच नाही.

३. लग्न झाल्यानंतर हनिमूनला कुठे जावे असे वाटते?

    ३. a जवळपास च्या ठिकाणी ३.b भारतात कोठेही ३.c परदेशीं

४. जर आपला घटस्फोट झालाच तर आपण तो कसा हाताळाल ( ह्या प्रश्नाबद्दल मीं खात्री पूर्वक सांगू शकत नाही पण कोणी तरी असे विचारते असे कळते ).

४.a सहमतीने ( mutual consent ) ४.b भरभक्कम पोटगी मागून ४.c समोरच्या व्यक्तीला त्रास होणार नाही अशी आर्थिक सोय मागून.


असे अनेक प्रश्न विचारले जातात. अनेक मंडळी ह्या प्रश्नाची उत्तरे बघूनच अनेक चांगल्या प्रोफाइलकडे दुर्लक्ष करतात. अरे ज्या गोष्टी अजून काहीच ठरल्या नाहीत. अजून त्या दोघांनी एकमेकांची तोंडे सुद्धा बघितली नाहीत त्यांची ह्या विषयातील मते विचारून तुम्ही तरुणांच्या मनात अडथळे आणि गोंधळ निर्माण करत आहेत. कारण नसताना एखाद्या विषयावर काल्पनिक ( hypothetical) चर्चा करणे बरोबर नाही. 


विवाह जमवायचा असेल तर सुरवातीला एकमेकांना भेटायला हवे तुमचे चार चांगले गुण आणि दुसऱ्याचे चांगले चार गुण एकमेकांना माहिती व्हायला हवेत. अनेक प्रश्न चर्चा करून सोडवता येतात. जर आधीच एव्हडे प्रश्न असतील तर कोणताही विषय कधीच सुटू शकणार नाही. 


चर्चा केल्यावर माणसाची मते बदलू शकतात. परंतु असे अनशन्ट प्रश्न विचारून तुम्ही ह्या विवाह जमवण्याच्या प्रक्रियेत फक्त अडथळे निर्माण करत असता. शिवाय हजारो प्रोफाइल समोर असल्यामुळे प्रत्येक वेळी बघणाऱ्या व्यक्तीला वाटते की अजून चांगले, अजून चांगले स्थळ मिळेल आणि त्या नादात तो काहींना काही कारण काढून समोर असलेले स्थळ घालवून बसतो. इंग्रजीत एक म्हण आहे "A bird in the hand is worth two in the bush" म्हणजे हातात असलेला पक्षी झुडपात असलेल्या पक्षा पेक्षा जास्त महत्वाचा कारण झुडपातील पक्षी उडून जाऊ शकतो. किंवा हातचे सोडून पळत्याच्या पाठी लागणे.


त्या मुळे विवाह जमवण्यासाठी फक्त आवश्यक तेव्हडीच माहिती घ्यायला हवी. प्रथम एकमेकांना भेटायला हवे, फोन वर किंवा प्रत्यक्ष काही वेळा चर्चा करायला हवी मगच एखाद्या व्यक्तीबद्दल आपण निश्चित मत बनवू शकता.


लोकांच्या मनात असे काही भरलेले असते की सांगता येत नाही. माझा एक मित्र त्याच्या एका ज्योतिष मित्रावर फार विश्वास ठेवे. कोणतीही मुलगी सांगून आली की प्रथम आपल्या मित्राकडे तिची पत्रिका दाखवे. आणि काही ना काही कारण काढून नकार देत असे. एकदा तो म्हणाला "ज्योतिष मित्र म्हणतो मुलीचे बाकी सर्व गुण जुळत आहेत पण तिच्या पहिल्या डिलिव्हरीला थोडा अडथळा आहे. मग काय करू?". मीं मित्राला म्हटले. अरे काय तू विचार करतोस? आधी लग्न तर जमू दे मग पहिल्या डिलिव्हरीचा विचार कर. असे करता करता वयाची ४२ उजाडली तेव्हा एक दिवस अचानक लग्न जमले. 


पूर्वी सुद्धा लोक पत्रिका बघत पण त्यांच्या अपेक्षा आणि अटी कमी असत. मुलगी संसार करण्यासाठी योग्य आहे की नाही याला महत्व जास्त होते आणि बाकीचे विषय गौण मानले जायचे. आता कोणता विषय महत्वाचा आणि कोणता नाही यामध्येच गोंधळ उडतो कारण प्रश्न आणि विषय जास्त झालेत.


बघा तुम्हांला पटते का?


माधव भोळे 



Tuesday, October 21, 2025

हरिबा डेयरी फार्मची यशोगाथा

हरिबा डेयरी फार्मची यशोगाथा 


नुकतेच एका गुजराती माणसाने मला काजू कतलीचा एक तुकडा हातावर ठेवला. त्याची चव अतिशय सुंदर होती. ही काजू कतली, हरिबा डेयरी फार्म, बुधना, भावनागर, गुजरातचे प्रॉडक्ट होते. कोण म्हणेल त्यात काय विशेष आहे?


ह्या डेयरी फार्मचे संस्थापक विनूभाई सुतारिया हे हिरे व्यवसायात नोकरीं करत. त्यांना पहिल्यापासूनच गोपालन करण्याची हौस आणि ईच्छा होती. आपल्या निवृत्तीनंतर त्यांनी आपली ही हौस पुरी करण्याची ईच्छा आपला मुलगा मेहुलकडे व्यक्त केली. मेहुलने सुद्धा त्यांना सहकार्य करण्याचे आश्वासन दिले. 


वेद सांगतात, गाय आपली माता आहे. तीला सन्मानाने वागवले पाहिजे ह्या भावनेने त्यांनी २०१४ ला सुरवातीला २/३ गाई पाळायला बुढाणा येथे सुरवात केली. ह्या साध्या सुध्या गाई नसून गीर गाई आहेत. भारतातील गीर आणि सैहवाल जातीच्या गाई A2 दूध देतात. जगातील सर्वच गाई A2 दूध देत नाहीत.त्यांनी लोकांना वैदिक संस्कृतीचे महत्त्व आणि ते आपल्या दैनंदिन जीवनात कसे समाविष्ट करू शकतो हे समजावून सांगितले.


काय आहे हे A2 दूध?

फक्त A2 मध्ये बीटा-केसिन प्रोटीन आहे आणि ते कॅल्शियम, प्रथिने आणि जीवनसत्त्वे A, D आणि B12 सारख्या पोषक तत्वांचा समृद्ध स्रोत आहे, जे हाडांचे आरोग्य, स्नायूंचे कार्य आणि प्रतिकारशक्तीला समर्थन देते. A2 दूध काही लोकांसाठी पचण्यास सोपे आहे. 


वडिलांच्या ह्या विचाराने सुरवात झालेल्या गोपालनाला त्यांचे सुपुत्र मेहुल याचे समर्थन लाभले. मेहुल MBA झाल्यानंतर त्यांनी ७/८ ठिकाणी नोकऱ्या केल्या. त्यानंतर त्याने आपल्या वडिलांच्या छंदाला आकार देण्याचे ठरवले. 


२०१८ मध्ये शुद्ध, सेंद्रिय आणि रासायनमुक्त दुग्धजन्य पदार्थ उपलब्ध करून देण्याच्या उद्देशाने त्याने हरीबा डेयरी फार्म ह्या नावाने एक डेयरी फार्म सुरू केला. हरी बा म्हणजेच "mother nature" किंवा "निसर्गमाता". 


वेदिक पद्धती: भारतीय वैदिक संस्कृती आणि तिच्या मूल्यांवर आधारित ही डेअरी चालवली जाते. वेदामध्ये गायीला मातेचा दर्जा दिला आहे, त्यामुळे हरिबा डेअरी फार्ममध्ये गायींची काळजीपूर्वक आणि सन्मानाने सेवा केली जाते.


खास उत्पादन: त्यांच्या उत्पादनांमध्ये गाईच्या दुधापासून बनवलेले शुद्ध तूप आणि इतर उत्पादने समाविष्ट आहेत. त्यांचे तूप पारंपरिक वैदिक पद्धतीने ( रवी घुसळून लोणी तयार करून कढवून तयार केले जाते., बाकीच्या डेयरी मध्ये यांत्रिक पद्धतीने वेगळ्या प्रोसेसने ते केले जाते ) ज्यामुळे त्याची गुणवत्ता उत्कृष्ट असते. 


नैतिक व्यवसाय:

प्राण्यांची काळजी: हरिबा डेअरी फार्ममध्ये गायींना बांधून ठेवले जात नाही. त्यांना मोकळेपणे फिरण्याची आणि चरण्यासाठी पुरेशी जागा दिली जाते. त्यांच्या आरोग्याची काळजी घेतली जाते आणि त्यांच्यासाठी भक्तिमय संगीत आणि संस्कृत मंत्रांचे पठण केले जाते, ज्यामुळे गायी आनंदी आणि निरोगी राहतात.


शुतक परंपरा: हरिबा डेअरी फार्ममध्ये हिंदुंच्या 'शुतक' परंपरेचे पालन केले जाते, ज्यानुसार जेव्हा गाय वासराला जन्म देते, तेव्हा १५ दिवसांपर्यंत तिचे दूध वापरले जात नाही. त्यामुळे त्यांचे तूप धार्मिक विधींसाठीही योग्य मानले जाते. 


ग्राहकांचा विश्वास:

ग्राहकांचा अनुभव: हरिबा डेअरी फार्मने त्यांच्या उत्कृष्ट उत्पादनांच्या गुणवत्तेमुळे आणि वेळेवर वितरणाबद्दल ग्राहकांचा विश्वास जिंकला आहे. अनेक ग्राहकांनी त्यांच्या उत्पादनांबद्दल, विशेषतः खजूर आणि सुकामेव्यापासून बनवलेल्या मिठाईबद्दल समाधान व्यक्त केले आहे. त्यांची प्रोडक्ट haribadairyfarm.com वर उपलब्ध असून त्यांना देश विदेशातून मागणी आहे. 


मेहुलने वेगवेगळे व्हिडीओ बनवून आणि सोशल मीडियाचे मार्केटिंग तंत्र वापरून आपल्या कंपनीची खूप प्रगती केली आहे. सध्या त्यांच्याकडे ७२ गीर गाई असून गेल्यावर्षीची उलाढाल २ कोटी रुपयाची आहे.


स्थान: हा फार्म गुजरातमध्ये सौराष्ट्रातील बुढाणा गांव,तालुका शिहूर , जिल्हा भावनगर येथे आहे, जिथे गीर जातीच्या गायींचे मूळ स्थान आहे. यामुळे त्यांना गीर गायींची उत्तम काळजी घेणे शक्य झाले आहे.


माधव भोळे 

Sunday, October 19, 2025

अर्थव्यवस्थेचा थर्मामीटर

अर्थव्यवस्थेचा थर्मामीटर

गेल्या काही वर्षांमध्ये गणपती, नवरात्री, दिवाळी आणि होळी यां हिंदूंच्या मुख्य सणानमध्ये बाजारात आलेली गर्दी बघितली तर लक्षात येईल की भारतीय अर्थव्यवस्थेला किती झळाली आली आहे. 


वर्ल्ड गोल्ड कौन्सिल च्या आकड्यानुसार २०२४ भारतीय ग्राहकांनी ८०३ टन सोने विकत घेतले. २०२१ पासून दरवर्षी साधारण ७५० ते ८४० टन सोने भारतीय ग्राहक विकत घेत आहेत. 


नुसत्या जी एस टी बचत उत्सवाच्या पहिल्या ८ दिवसात ( नवरात्रामध्ये ) एकट्या मारुती सुझुकी ने १.६५ लाख गाड्या विकल्या आणि त्यांच्याकडे ४.५ लाख गाड्यांचे बुकिंग आहे. 


यां वर्षी गणपती उत्सवात  महाराष्ट्रात ४५ ते ५०,००० कोटींची उलाढाल झाली, तर गेल्या वर्षी फक्त होळी मध्ये भारतात ६०,००० कोटींची उलाढाल झाली. नुसत्या दिवाळीमध्ये जवळजवळ १५,००० कोटीचे फटाके वाजवले जातात. 


गेल्या काहींवर्षात GST कलेक्शन सरासरी ९.४% ने वाढले असून गेल्या वर्षीचे वार्षिक कलेक्शन २२.०८ लाख कोटी रुपये झाले आहे. २०२५ मध्ये महिना सरासरी २ लाख कोटी GST कलेक्शन आहे. 


आता सांगा भारताला डेड इकोनॉमि म्हणणाऱ्या अर्थ तज्ञाला परत शाळेत जायला नको का?


जळगाव ला महाराष्ट्राची सोनेरी राजधानी म्हणतात. महाराष्ट्रात सर्वात जास्त सोने जळगाव येथे विकले जाते. 


माधव भोळे

Wednesday, October 15, 2025

मनाचे श्लोक आणि देऊळ बंद २

मनाचे श्लोक आणि देऊळ बंद २


काल मनाचे श्लोक हा सिनेमा बंद पाडल्या नंतर देऊळ बंद २ ह्या सिनेमाचे शूटिंग थांबवण्याचा निर्णय त्याच्या निर्मात्याने घेतला. 


 सनातन धर्म आणि भारतीय संस्कृती याची खिल्ली उडवण्याची, सो कॉल्ड पुरोगामी मंडळीनची, जणु स्पर्धाच लागली आहे.


या आधी कोणत्याही परधर्मीयांनी आपल्या स्वतःच्या धर्माविरुद्ध काही सिनेमा किंवा नाटक प्रदर्शित केलेले आठवते का? त्यांच्या देवाची खिल्ली उडवली तर कधी कोणी गप्प बसले आहे का? गौतम बुद्ध, भगवान महावीर, गुरु गोविंदसिंग, अल्ल्हा किंवा येशू ख्रिस्त यांची खिल्ली उडवण्याचा कोणी प्रयत्न केला तर त्यांचा समाज कधी गप्प बसला आहे का? मग सहनशिलतेचा ठेका, अभिव्यक्ती स्वातंत्र्याचा ठेका फक्त सनातनी हिंदुनीच घेतला आहे का? 


ज्या संविधानाचा आधार घेत ही मंडळी अभिव्यक्ती स्वातंत्र्याचा डांगोरा पिटतात त्या संविधानाचे "सर्व धर्म समभाव" हे मूलभूत तत्व ते सोईस्कर विसरतात आणि त्या मुळे लोक कायदा हेतात घेतात. कायदा हातात घेणे गैर आहे पण न्यूटन च्या नियमानुसार ऍक्शन ला रिऍक्शन असतेच हा सृष्टीचा नियम आहे.


लोक सिनेमा आणि सिनेकलाकारांना आदर्श मानतात. त्या आपल्या इमेजचा उपयोग ते जाहिराती करून पैसे कमावण्यात करतात, त्या मुळे कोणत्याही धर्माविरुद्ध टीका, टिपण्णी होईल असे कृत्य न घडावे याची मोठी जबाबदारी त्यांच्यावरच आहे. 


माधव भोळे 

मरावे परी कीर्ती रूपे उरावे!!

 मरावे परी कीर्ती रूपे उरावे!!


इंद्रनील तावडे नांव आपण कधी ऐकले आहे का? काल मनोज आचार्य ह्या पनवेलला राहणाऱ्या माझ्या परिचिताचा फोन आला होता. डॉक्यूमेंटरी फिल्म तयार करणे, प्रेसेंटेशन तयार करणे हा त्यांचा व्यवसाय आहे. मनोज अतिशय मन लावून काम करतात. सेकण्डरी स्कुल्स एम्प्लॉयीज कॉऑपेरेटिव्ह क्रेडिट सोसायटी लिं. मुंबई ५० वर्ष पूर्ण झाली त्याबद्दल मनोजकडे तिच्या वाटचालीची डॉक्युमेंटरी करण्याचे कंत्राट मिळाले आहे.


त्या संस्थेचा इतिहास बघता त्याची स्थापना इंद्रनील तावडे ह्या सदग्राहस्थाने केली असे त्यांना कळले. आता डॉक्युमेंटरी बनवायची म्हणजे निदान त्या संस्थेच्या संस्थापकाचा फोटो तरी हवा म्हणून त्याने माहिती घ्यायला सुरवात केली . इंद्रनील गिरगांवात रहात असत. मीं पूर्वी गिरगांव मध्ये रहात असल्यामुळे साहजिकच मनोजने मला संपर्क केला आणि कै. इंद्रनील तावडे यांच्याबद्दल विचारले.


इंद्रनील पूर्वी प्रभूसेमिनरी स्कुल, ठाकुरद्वार, गिरगांव येथे इंग्रजीचे शिक्षक होते. माझे नातेवाईक कै. विजय भोळे यांच्या करेलवाडी, ठाकुरद्वार येथील विजय क्लासेस मध्ये इंद्रनील इंग्रजी शिकवत असत त्या मुळे त्यांची माझी थोडीफार ओळख होती. त्यांनी इंग्रजी विषयावर काही पुस्तके सुद्धा लिहून प्रसिद्ध केली होती. त्या पुस्तकांचा प्रसार करण्यासाठी ते विविध शाळांना भेट देत. त्या वेळी शाळेतील शिक्षकांना कमी पगार असत. त्यांना कर्ज वगैरे मिळणे अवघड जाई. सामाजिक पिंड असल्यामुळे तावडे सरांना ह्या विषयात काहीतरी काम करण्याची ईच्छा झाली आणि अशी झाली सेकंण्डरी स्कुल एम्प्लॉईज कोऑप क्रेडिट सोसायटीची सुरवात. यां वर्षी ह्या क्रेडिट सोसायटीला ५० वर्ष पूर्ण होत आहेत. संस्थेच्या २८ शाखा असून गतवर्षीची उलाढाल २२४२ कोटीची आहे. 


ह्या शिवाय कोकणातील उत्पादने आणि आंबा काजू यांना मुंबईमध्ये बाजारपेठ उपलब्ध व्हावी म्हणून त्यांनी "रत्नागिरी फोरम" हे अनऔपचारिक संगठन सुद्धा स्थापन केले. शिवाय मराठा मंदिर संस्था , मराठा उत्कर्ष मंडळ यांसारख्या संस्थामध्ये त्यांचे महत्वाचे योगदान होते. कोकणातील आणि विशेषतः आपल्या समाजाने शिक्षणात आणि उद्योगधंद्यात पुढे यावे यां साठी त्यांचा कायम प्रयत्न असे. 


आज तावडे साहेब नाहीत. तसेच त्या काळची त्यांना ओळखणारी माणसे सुद्धा गिरगांवात रहात नाहीत. ( सर्व विखूरली गेली ). पण योगायोगाने आणि थोड्या प्रयत्नाने मला माझ्या मित्रांद्वारे त्यांच्या मुलाचा संपर्क प्राप्त झाला आणि तो श्री मनोज आचार्य यांच्या पर्यंत पोहोचवण्यात मला यश आले. एका चांगल्या व्यक्तीच्या स्मृतीना उजाळा देण्यात माझा खारीचा वाटा मिळाला हा माझा भाग्याचा क्षण. आज ५० वर्षानंतर सुद्धा तावडे सरांच्या कामाची आठवण आणि नोंद होत आहे हे विशेष आहे.


समाजात वाईट गोष्टी आपोआप पसरतात पण चांगल्या पसरवायला कष्ट घ्यायला लागतात म्हणून हा प्रयत्न.


कै. इंद्रनील तावडे यांच्या स्मृतीला माझे विनम्र अभिवादन.


माधव भोळे 

Thursday, October 9, 2025

स्वप्न !!

 स्वप्न !!


आज एक लेख वाचत होतो, त्याचे शीर्षक होते "मुंबईमध्ये १ लाख मराठी फेरीवाले दिसायला हवेत". या आधी वडापाव / झुणका भाकर केंद्रे आणि नारळ विक्री मराठी माणसाची असायला हवीत असे स्वप्न एका मोठ्या नेत्याने पाहिले होते.


स्वप्नच पाहायची असतील तर मोठी स्वप्न बघायला हवीत. वसई, पुणे, सांगली, औरंगाबाद आणि इतर महाराष्ट्रातील निदान २५% उत्पादक मराठी असायला हवेत. 


मराठी शेतकऱ्यांचे स्वतःचे मार्केटिंग फेडरेशन हवे.

मुबलक किनारा लाभलेला महाराष्ट्र मत्स्योत्पादनामध्ये निदान २ नंबरवर असायला हवा.


महाराष्ट्रातून एक्स्पोर्ट होणारा कारगो आणि कंटेनर मालात महाराष्ट्रीय उत्पादनाची भागीदारी निदान २५% असायला हवी. 


फेरीवाले बनून आयुष्यभर मराठी माणसाने रस्त्यावरच काढावे का? म्हणजे परप्रांतीय मोठमोठ्या टॉवर मध्ये येऊन राहणार आणि त्यांना रस्त्यावरील मराठी फेरीवाले सर्व्हिस देणार? काय पण स्वप्न?😰


इंग्रजीमध्ये एक म्हण आहे, "Having low aim is crime, failure is not".


माधव भोळे

Wednesday, October 8, 2025

राजा कालस्य कारणम!

 राजा कालस्य कारणम!


संस्कृत मधील एक सुभाषित आहे राजा कालस्य कारणम! याचा अर्थ कोणत्याही अडचणीला किंवा येणाऱ्या काळाला राजा जबाबदार असतो. 


सध्या जगाचे दोन किंवा तीन अनभिशिक्त राजे आहेत. अमेरिका, रशिया आणि चीन. भारत अजून बराच पाठी आहे. 


आज Ravindra Datar यांची एक पोस्ट वाचली. अमेरिकेनी AIM-120-C आणि काही तत्सम प्रगत मिसाईल पाकिस्तानला निर्यात करण्याचे ठरवले आहे.

AMRAAM ह्या नवीन पॅकेजच्या अंतर्गत अमेरिकेने त्यांच्या ३० मित्र देशांना ४१.६ बिलीयन डॉलर्सचा प्रगत शस्त्र पुरवठा करण्याचे ठरवले आहे. हा म्हणे अमेरिकेच्या इतिहासातील सर्वात मोठी शस्त्र निर्यात पॅकेज आहे. 


अमेरिका येन केन प्रकारे जगाचा तारणहर्ता आणि पालक बनण्यासाठी सर्व प्रकारचे उपाय योजत असते, त्यातील एक म्हणजे देशा देशात भांडणे लावणे, त्यांना शस्त्र पुरवठा करणे आणि मग शांततेचे नोबेल पारितोषिक मिळवण्यासाठी शांतता प्रस्तापित करण्याचे ढोंग करणे. 


आता पाकिस्थानला नवीन शस्त्र पुरवठा झाला म्हणजे भारत अर्थातच नवीन शस्त्रास्त्र खरेदीसाठी रशियाकडे धाव घेणार किंवा जे जमेल ते स्वतः तयार करणार. थोडक्यात ही शस्त्रास्त्र शर्यत सुरूच राहणार. अशीच शस्त्र शर्यत रशिया आणि युरोप मध्ये गेले कित्येक वर्ष सुरू आहे. थोडक्यात काय जगात अस्थिरता निर्माण करायची आणि त्याचा फायदा घेऊन आपली शस्त्र विकून आपला दबादबा वाढवायचा.


अगदी हीच नीती वापरून पूर्वी ईस्ट इंडिया कंपनीने, भारतात, समृद्ध अशा भारतीय संस्थानिकांमध्ये भांडणे लावून त्यांना आपले सैन्य आणि दारुगोळा पुरवून, त्या संस्थानिकांना खिळखिळे करून टाकून अक्खा देश गिळनकृत केला आणि भारतावर १५० वर्ष राज्य केले आणि तेच संस्थानिक त्यांचे मांडलिक झाले. इंग्रज व्यापारी म्हणून आले आणि घराघरामध्ये सोन्याचा धूर निघणाऱ्या भारताला बेघर करत गरिबीच्या खाईत लोटून राजे म्हणून निघून गेले. 


जगामध्ये महामारी, भुकमारी, बेरोजगारी, पर्यावरण बदल, नैसर्गिक आपत्ती इत्यादी मानव जातीला हैराण करणारे अनेक प्रश्न असताना ते सोडवण्यासाठी प्रयत्न करण्याऐवजी मूठभर लोक आणि त्यांच्या कंपन्या चालण्यासाठी मेक अमेरिका ग्रेट ह्या पोकळ कल्पनेच्या नावाखाली असे मानवसंहारक उपदव्याप चालवायचे हे अत्यंत घातक आहे. ट्रम्पच्या आधीच्या लोकांनी सुद्धा हेच केले आहे. बरे एकाने शस्त्र हातात घेतल्यानंतर दुसऱ्याला गाल पुढे करता येणार नाही म्हणून तो ही ह्याच शर्यतीत अडकतो आणि फसतो. 


आज पाकिस्तान आणि बांगलादेश सारख्या देशात महागाईचा डोंब उसळला आहे. एका रोटीची किंमत २५ पाकिस्तानी रुपया झाला असून पाकिस्तानी रुपयाची किमत १ पाकिस्तानी रुपया = ०.३२ भारतीय रुपया आहे. 


ग्लोबल हंगर इंडेक्स २०२४ ( जागतिक भुकमारी निर्देशांक २०२४) मध्ये १२७ देशामध्ये पाकिस्तानचा १०९ तर भारताचा १०५ वा क्रमांक लागतो. भारताचे म्हणणे आहे की ही खरी स्थिती नाही. नसेल सुद्धा. पण आपण पहिल्या ५० मध्ये नक्कीच नाही ). ह्या वरून एक गोष्ट स्पष्ट होते की मानव हितासाठी अजून बऱ्याच गोष्टी करणे बाकी आहे. 


एक दिवस युद्ध चालणे म्हणजे १ वर्ष अधोगती करण्यासारखे आहे. ( असे असताना सुद्धा पेहेलगाम अटॅक नंतर मोदींनी युद्ध होता होता टाळले म्हणून राहुल गांधी, प्रणिती शिंदे सारखे काही नासमज नेते मोदींना डिवचत बसले ). 


यावर उपाय काय आहे? पूर्वी आपल्याला इसापनीती मधील एक गोष्ट शिकवली होती. दोन माकडांच्या वादात मांजराने पूर्ण लोणी फस्त केले. त्यावरून धडा घेऊन वागायचे. कोणी उचकवले म्हणून उचकायचे नाही. आपल्या प्रगतीच्या आणि उदिष्ठानच्या आड येणारी प्रलोभने किंवा संकटे शांत डोक्याने कशी टाळता येईल ते बघायचे. 


राजाने हेच करायला हवे. तरच "राजा कालस्य कारणम " ह्या उक्तीचा सुंदर आणि खरा अर्थ जगाला सापडेल.


माधव भोळे

ईश्वर आणि नास्तिकता

 ईश्वर आणि नास्तिकता 


सरन्यायाधिशांच्या सनातन धर्माविरुद्धच्या वक्तव्यावरून आस्तिक आणि नास्तिक यांच्यामध्ये समाज माध्यमांवर जुगल बंदी सुरू आहे. त्यातील एक परकोटीचा विषय एका नास्तिकाने मांडला तो म्हणजे "एव्हडा पूर आला, एव्हडे भूकंप झाले पण त्यावेळी तुम्हांला वाचवायला देव आला होता का?".


याचे साधे उत्तर आहे ते असे:


जगातील अनेक नैसर्गिक आपत्ती मानव निर्मित आहेत. बेसुमार जंगलतोडी मुळे भूसखलन होते, पर्यावरण घातक कार्यक्रमांमुळे ओझोन लेयर कमी होतो, त्याचा वातावरणावर परिणाम होऊन अतिवृष्टी आणि महापूर येतात ह्या सारख्या अनेक गोष्टी मानव निर्मित आहेत. त्यामध्ये ईश्वराला दोष का द्यायचा? 


नास्तिकाने कितीही डांगोरा पिटला तरी एक गोष्ट सर्वांनी समजून घ्यायला हवी की तुम्ही हे जे लिहीत आहेत किंवा विचार पुढे मांडत आहात ते देवाने तुम्हांला जिवंत ठेवले आहे म्हणूनच. तुमचा प्रत्येक श्वास ईश्वर नियंत्रित आहे. जेथपर्यंत तो तुमच्यावर राजी आहे तो पर्यंत तुम्ही खूष. जेव्हा त्याचा तुमच्याबाबतीत मूड बिघडेल तेव्हा जगातील उत्तमातील उत्तम डॉक्टर सुद्धा तुमचे प्राण वाचवू शकणार नाही.


आपल्या शरीराची रचना एव्हडी गुंतागुंतीची आहे की दररोज नवनवीन शोध लावले जात आहेत तरी अजूनही माणसाच्या शरीराचा अभ्यास पूर्ण झालेला नाही. यातील एखादा घटक जरी असंतुलित झाला तरी माणसाला पीडा निर्माण होते. हे सर्व घटक सुरळीत चालतात म्हणून आपण जिवंत आहोत. 


एका डॉक्टरकडे पाटी बघितली "We treat, he cures". जों खरोखर ज्ञानी आहे तो हे समजू शकेल.


हीच गोष्ट नैसर्गिक आपत्ती बद्दल आहे. त्या ठिकाणी तुम्ही असणे किंवा नसणे किंवा तुमचे संकट काही प्रमाणात कमी असणे हे सुद्धा ईश्वरी ईच्छाच म्हणायला हवी.


आता कोणी म्हणेल की संकटात सोडवायचेच होते तर तो आपल्यावर संकट का आणतो?


जर संकटे आली नाहीत तर आपल्या अस्तित्वाचा आणि ईश्वराच्या अस्तित्वाचा कस लागत नाही. चांगले आणि आनंदी जगणे आपण आपला हक्क मानतो. जे आपण करतो तेच योग्य असे मानव मानतो. पण तसें नसते. अशा वेळी ईश्वर वेगवेगळ्या पद्धतीने मार्गदर्शन करीत असतो. ते ज्यावेळी समजून घेतले जातं नाही त्या वेळी आपले अस्तित्व दाखवायची वेळ ईश्वराला येत असते. 


ईश्वर एक माना किंवा अनेक माना पण ईश्वर ही संकल्पना मानवाने आपल्या कल्याणासाठीच केली आहे, मग तो कोणत्याही धर्माचा असो. त्याच्यावर शिंतोडे कशाला उडवायचे. तुम्ही नास्तिक असणे हा तुमचा चॉईस आहे पण दुसऱ्याचे मन दुखवायचा तुम्हांला कोणी अधिकार दिला?


माधव भोळे

Thursday, October 2, 2025

भारत विरोधी शक्ती!!

भारत विरोधी शक्ती!!


भारताला खिळखिळे करण्याचे काम देश विघातक शक्ती, अंतर्गत शत्रू आणि बाह्य शत्रू सातत्याने करत असतात.


देशाच्या प्रत्येक भागात धर्म विरुद्ध धर्म, जाती विरुद्ध जाती, सनातनी विरुद्ध पुरोगामी, राज्य विरुद्ध राज्ये संघर्ष सुरूच आहे. रस्ता रोको, आंदोलने, बंद याच्या नावाखाली दंगा फसाद आणि तोडफोड सुरूच आहे. 


उत्तर प्रदेश मध्ये सुरू झालेली I Love Mohammed ही अशीच एक चळवळ. तिचे पडसाद देशभर उमटायला लागले. आज अहिल्यानगर मध्ये कोणी समाजविघातक शक्तींनी रस्त्यावर "I love Mohammed " लिहून जाणून बुजून वातावरण गढुळ करण्याचा प्रयत्न केला आणि त्याचे परिवर्तन दगडफेक आणि लाठी चार्ज होण्यात झाले. 


आरक्षणाच्या निमित्ताने मोर्चा काढणे, शक्ती प्रदर्शन करणे आणि स्थानिक व्यवहार आणि प्रशासन ठप्प करणे हा तर जन्म सिद्ध हक्कच झाला आहे. बरे एकाची मागणी मान्य झाली कीं लगेच चेन रिऍक्शन प्रमाणे दुसऱ्याची सुरवात झालेली असते. कोणतेही सरकार किती पूर्ण पडणार? 


शेतकरी जेव्हा उत्पादन जास्त होते तेव्हा शेतमालाला वाढीव भाव मिळावा म्हणून रस्त्यावर दूध ओतून आणि भाजीपाला फेकून त्या अन्नाचा अपमान करतात, हे चुकीचच आहे.


कधी कबुतरांसाठी कोणी जैन मुनी शस्त्र हातात घेण्याचे म्हणतो तर कोणी महाराज हिंदूंचा टक्का वाढण्यासाठी १० मुले जन्माला घालावी असे म्हणतो. सर्व बाजूनी टाळ्या वाजवायला लोक तयार आहेत. न सिद्ध झालेल्या वोटचोरी च्या नावाखाली तरुणांची माथी भडकवली जातात. सारासार विचार आणि विधिनिषेध काहीच राहिलेला नाही. 


माझी ही कृती देशप्रेमी आहे कीं देश विघातक आहे याचा प्रत्येकाने विचार करायला हवा. लाखो करोडो हात कामाचे तास वाया घालवत आहेत. काही तरी उदर निर्वाहाचे काम सोडून आंदोलने, मोर्चे, दंगे फसाद हेच काम राहिले आहे कारण मोफत तांदूळ, रेशन, औषधोपचार, विमा देऊन सरकार लोकांना आळशी बनवत आहे. 


आणि तुम्हांला माहितीच आहे कीं Empty mind is the devil. 


कोण हे नेते जे हे सर्व करायला लावतात?. कोण करतय हे काम? काही मुठीभर लोक वेगवेगळे निमित्त काढून लोकांना भडकवण्याचे काम करत आहेत. राजकारणी लोक आपल्या फायद्यासाठी अशा लढाया सुरूच ठेवत असतात. लोकशाहीचा अतिरेक सुरू आहे आणि शासन याचे नियंत्रण करण्यात कमी पडत आहे. 


सरकारने आणि प्रशासनाने या पाठी असलेल्या विघातक शक्तीना वज्र मूष्टीने चिरडून टाकायला हवे मग ते कोणत्याही जाती धर्माचे असो, कारण त्यांचा मूळ उद्धेश धार्मिक किंवा सामाजिक नसून देशात अस्थिरता निर्माण करण्याचा आहे.


एक वेळ बाहेरचा शत्रू परवडतो पण घरातील शत्रू नाही परवडत.


माधव भोळे 

राष्ट्रीय स्वयंसेवक संघ आणि विरोधक

राष्ट्रीय स्वयंसेवक संघ आणि विरोधक 


आज राष्ट्रीय स्वयंसेवक संघाला १०० वर्ष पूर्ण झाली. एक रोप लावले आणि त्याचा वटवृक्षच नाही तर एक वनराजी तयार झाली. आता वनराजी म्हटल्यावर काही लोक त्याकडे मनःशांती म्हणून बघतात तर काही लोक आत हिस्त्र प्राणी असतील असा ग्रह करुन घेऊन त्यांची चड्डी आधीच ओली होते.


कोणताही विचार आपण जगापुढे मांडा, त्याच्या बाजूने आणि विरुद्ध लोक असणारच. पण जों विचार १०० वर्ष तग धरून आहे तो स्वीकारार्ह आहे म्हणूनच तग धरून आहे हे साधे गणित आहे. 


जगाच्या इतिहासात अनेक तत्ववेत्ते आणि नेते होऊन गेले. मार्क्स, हिटलर, गांधी, सावरकर या सारखे अनेक प्रभावी नेते होऊन गेले पण त्यांचे विचार त्यांच्या बरोबर संपले. पण श्रीराम, येशू ख्रिस्त, श्रीकृष्ण, महावीर, गौतम बुद्ध, गुरु नानक यांचे विचार आजही तग धरून आहेत कारण ते कोणा एका व्यक्तीच्या फायद्यासाठी किंवा एखाद्या समाजाच्या फायद्या साठी तयार झाले नसून मानव जातीच्या भल्यासाठी तयार झाले. 


संघांचे सुद्धा असेच आहे. संघांचे विचार हे राष्ट्र सेवेसाठी समर्पित आहेत. अर्थात विचार म्हटले कीं चर्चा होणारच आणि सर्वच विचार लोकांना पटतील असेही नाही पण एक मोठे उदिष्ट म्हणजे आपल्या देशाची सर्वांगीण प्रगती, देश प्रेम आणि निष्ठा. या तिन्ही बाबतीत संघ स्वयंसेवक पूर्ण पणे परीक्षेत उतरताना दिसतात. हा एक प्लस पॉईंटच बाकी सर्व तथाकथित मायनस विचार पुसून टाकतो. मीं संघीय नव्हतो आणि नाही. पण जे योग्य आहे ते लिहायला मीं कचरणार नाही.


मग विरोधक किती भुंकत आहेत ते भुंकुंदेत. 


असो, सर्व देशप्रेमी मंडळींना आणि राष्ट्रीय स्वयंसेवक संघाला दसऱ्याच्या शुभेच्छा.


माधव भोळे 

सिमोल्लंघन!!

सिमोल्लंघन!!

आज विजयादशमी, आज सिमोल्लंघन!!

पूर्वी राजे रजवाडे हा सण अतिशय उत्साहात साजरा करायचे. नवनवीन प्रदेश पादाक्रांत करण्यासाठी ते मोठ मोठ्या मोहिमा आखायचे आणि त्याचा मुहूर्त ते आज विजयादशमीला करायचे. विजयादशमी हा साडे तीन मुहूर्तामधील एक अत्यंत शुभ मुहूर्त मानला जातो. मैसूर सारख्या एकेकाळच्या संस्थांनामध्ये अजूनही विजयादशमीचा अतिशय देखणा सोहोळा होत असतो. 


पण इंटरनेटच्या ह्या सीमाविरहित युगात अशा सिमोल्लंघनाला काही महत्व राहिले आहे का? आणि सव्वा लाख रुपये १० ग्राम सोने असताना असे कोणते सोने आहे जे आपण खुले आम मोफत वाटू शकतो?


जरी काळ बदलला असला तरी या उत्सवांचे महत्व कधीच कमी होणार नाही. ट्रम्प सारख्या विक्षिप्त माणसाने दाखवून दिले कीं तुम्ही जगात सर्व गोष्टी आपल्या हक्काच्या आहेत असे समजून राहू शकत नाही. तुम्हांला दुर्बल राहून चालणार नाही. तुम्हाला स्वतःची ताकद निर्माण करायलाच हवी. रशिया आणि युक्रेन मधील युद्धानंतर "बळी तो कान पिळी" ही म्हण पुन्हा पुन्हा अधोरेखित केली आहे. 


आता या पुढे भारतीय बाजारपेठांमध्ये परदेशी, तकलादू, चकाचक माल दिसण्यापेक्षा मजबूत, टिकावू, पर्यावरण पूरक, कार्यक्षम आणि ऊर्जा कार्यक्षम ( energy efficient ) तसेच नावीन्यपूर्ण ( innovative ), सुंदर डिझायनिंग, आकर्षक पर्यावरण पूरक पॅकेजिंग असलेला आणि रास्त किंमत असलेला भारतीय मालच दिसायला हवा. अशा आत्मनिर्भर भारतीय उत्पादनांनी जगाच्या पाठीवर राज्य करायला हवे. 


आमची वरील सर्व उत्पादने आणि सॉफ्टवेअर उत्पादने जगाच्या पाठीवर विविध भाषांमध्ये, उपभोक्ता अनुकूल ( User friendly ), तेथील देशाच्या प्रचलित कायद्याचे पालन करणारी, तेथील बाजारपेठांमध्ये उपलब्ध असायला हवी कीं जेणेकरून तेथील जनता आपल्या मौखिक प्रसिद्धीने भारतीय माल आपल्या देशात प्रचार आणि प्रसार करण्यास आणि विक्री करण्यासाठी मदत करेल. 


जर भारतीय शेतकरी, उत्कृष्ट दर्जाचा, सकस, सेंद्रिय शेतमाल, मोठ्या प्रमाणात तयार करू शकले आणि कोल्ड स्टोरेज चेन किंवा अन्य प्रकारे ताजे राहतील असे जर इतर देशात पोहोचवू शकले तर मग जेनेटिकली मॉडिफाईड बियाणे आणि उत्पादने कचऱ्याच्या भावाने सुद्धा कोणी विकत घेणार नाही.


आपल्याला आता नवीन पद्धतीने सिमोल्लंघन करायला हवे. आपण तर परदेशात पोहोचुच पण आपली उत्पादने आणि सेवा सुद्धा तेथे पोहोचल्या पाहिजेत. तेथे ट्रम्प सारखा किंवा पुतीन सारखा आसुरी विजय न मिळवता त्यांच्या मनावर प्रथम विजय मिळवायला हवा. 


१९८४ साली प्रथमच अमेरिकेत सॉफ्टवेअर इंजिनियर म्हणून जाताना हीच भावना माझ्या हृदयात होती. त्यावेळी H1B मिळणे कठीण होते म्हणून आम्ही B1/B2 विसा वर आमच्या कंपनी तर्फे गेलो होतो. ज्या वेळी आम्ही असखलित इंग्रजी मध्ये बोलू लागलो त्यावेळी तेथील स्टाफला आश्चर्य वाटले. ते म्हणाले तुमचे इंग्रजी तर उत्तम आहे. आम्ही समजत होतो भारत म्हणजे एक गारुड्यांचा आणि जंगलांचा प्रदेश आहे. अर्थात तेथे उत्तम रीतीने सॉफ्टवेअरमध्ये काम करून आम्ही आणि आमच्यावेळच्या सॉफ्टवेअर इंजिनियरांनीं भारताच्या IT इंडस्ट्रिचा पाया मजबूत केला आणि त्याची पुढे प्रगती दिसतेच आहे. त्यावेळी भारतात हातांच्या बोटावर मोजण्या इतक्या सॉफ्टवेअर कंपन्या अमेरिकेत सॉफ्टवेअर इंजिनियर पाठवत असत. अगदी इन्फोसिस जरी १९८१ साली स्थापन झाली तरी त्यांना अमेरिकेत पहिला इंजिनियर पाठवायला १९८३ साल उजाडल होते. त्यानी १९८३ साली डॉन लिलीच्या डेटा बेसिक कोरपोर्शन अमेरिकेत पहिल्यांदा सॉफ्टवेअर इंजिनियर पाठवला. 


आपल्या सिमोल्लंघन करायचे असेल तर प्रथम आपल्यातील रावण दहन करायलाच हवेत. बाहेरील शत्रू आपण मारूच पण आपल्यातील अंतर्गत शत्रू आपण प्रथम मारायला हवेत. आपल्यातील सारासार विचार करण्याची कमतरता, जोखीम न पतकरणे, कोणत्याही विषयाचा पुरेसा अभ्यास न करता त्यात उतरणे, आर्थिक अव्यवस्थापन, मानवी मूल्ये आणि मानस शास्त्राचा अभ्यास नसणे किंवा असल्यास त्याचा गैरवापर करणे इत्यादी रिपुंचे दहन आपल्याला करायला हवे. हे आपण आजपासूनच सुरवात करून सिमोल्लंघन करूया. 


हे सर्व करण्यासाठी आणि भारत एक मजबूत, सर्व दृष्टीने सक्षम राष्ट्र बनण्यासाठी सर्वांनां विजयादशमीच्या हार्दिक शुभेच्छा.


माधव भोळे