Wednesday, February 12, 2025

प्रॉमिस डे

प्रॉमिस डे.

काल ११ फेब्रुवारी म्हणजेच प्रॉमिस डे होता. अलीकडे तारुण्यात आलेली मंडळी हा प्रॉमिस डे, व्हॅलेंटाईन डे वगैरे डे अगदी मनाने पाळतात. डे तरी नक्की पाळतात. मग दिलेले प्रॉमिस पाळतात की नाही कोणजाणे?

आमच्या भारतीय संस्कृती मध्ये सुद्धा असेच एक वचन सर्व विवाहित जोडपी एकमेकांना विवाहाच्या दिवशी सप्तपदी करताना करतात. धर्मेच, अर्थेच,कामेच् नातीचरामी.

म्हणजेच धर्माच्या राक्षणासाठी, संसराच्या अर्थकारणासाठी आणि विवाह बद्ध कामक्रिडेसाठी माझ्या चांगल्या आणि वाईट दिवसात मीं तुला साथ देईन. 


आपल्या हिंदू धर्माचा पाया ह्या अतूट विश्वासावर अवलंबून आहे. वचन हे एक स्वतः घालून दिलेले बंधन आहे. पण आपण ते खरोखर पाळतो का? हे प्रत्येकाने स्वतःला विचारायला हवे. 

एके काळी दशरथाने कैकयीला दिलेले वचन पाळले, जे पाळण्यासाठी प्रभू श्री रामाला १४ वर्ष वनवासात काढावी लागली. 

हेच वचन सैरध्रीने म्हणजेच द्रौपदिने पाळले, जरी तिच्या अब्रूचे धिंडवडे दुर्योधन आणि दुष्यासनाने भर सभेत हतबल अशा तिच्या पाच पतींसमोर काढले. 

अगदी राजा हरिषचंद्राने सुद्धा स्वप्नात विश्वामित्राला आपले संपूर्ण राज्य दिल्याचे वचन सुद्धा पाळले. 

कधी कधी अशा नीतिमत्तेचा राग येतो आणि चूक काय बरोबर काय हाच प्रश्न निर्माण होतो. 


ह्या वचना निमित्त एक सुंदर गीत आठवते 

स्वरगंगेच्या, काठावरती

वचन दिले तू, मला......

गतजन्मीची, खूण सापडे,

ओळखले का मला

वदलीस तू मी, सावित्री ती.....

शकुंतला मी, मी दमयंती

नाव भिन्न परि, नाव भिन्न परि

मी ती प्रिती

चैतन्याचा पूर तेधवा, गंगेला पातला

या, स्वरगंगेच्या, काठावरती

वचन दिले तू, मला......


माधव भोळे 

Monday, February 10, 2025

निश्चयाचा महामेरू - आनंद बनसोडे

निश्चयाचा महामेरू - आनंद बनसोडे 

आनंद बनसोडे हे नांव तुम्ही कदाचित ऐकले ही असेल. 

प्रबळ ईच्छाशक्ती, घोर मेहनत,  साहसी वृत्ती, नवनवीन आव्हाने स्वीकारण्याची आणि अडचणीनवर मात करण्याची तयारी आणि या सर्वांचा उपयोग आपल्या आयुष्यात करण्यासाठी लागणारे व्यवहारज्ञान याचे सुंदर मिश्रण म्हणजे आनंद बनसोडे.   

      सोलापूर मधील एका अतिशय सामान्य घरात जन्मलेल्या आनंद बनसोडेला जन्मा पासूनच बोलण्यातील  तोतरे पणा (Rhotacism)आणि शिक्षणातील लिहिता वाचता येण्यामधील अडचणी (dyslexia) होत्या. त्यामुळे बुद्धी असूनही तो शिक्षणात मागे पडला. शाळेत बोलताना त्याच्यावर अनेकजण हसत असत त्यामुळे तो एकलकोंडा असे. त्यात तो 9वी नापासही झाला. नापास होऊनही पुढे पुन्हा 9 वी व पुढील शिक्षण सुरु ठेवले. 

        अनेक अपमानातून जगण्यासाठी लहानपणीचे त्याचे स्वप्न होते, 'जगाच्या सर्वोच्च उंचीवर जायचे'. 12 वी नंतर गिर्यारोहणा मध्ये आनंद मिळू लागला. त्यानंतर तो घरचा विरोध पत्करून वेगवेगळ्या ठिकाणी ट्रेक व गिर्यारोहाणाच्या कोर्सेसला जात असे. 


दिनांक १९ मे २०१२ रोजी त्याने एव्हरेस्टवर  यशस्वी चढाई केली. शारीरिक आणि मानसिक तयारीचा तो कसोटीचा क्षण होता. एका बाजूला तो पुण्यात शिकत होता आणि दुसऱ्या बाजूला तो जगातील अत्यूच्चं शिखरांवर गिर्यारोहणाच्या चढाया यशस्वी करीत होता. भयानक थंडी असताना सुद्धा एव्हरेस्ट कॅम्प २ वर गिटार वाजवण्या पासून ते चारही खंडातील उंचच उंच गगन चुंबी शिखरे पादाक्रांत करण्याचे रेकॉर्ड्स त्यांनी गाजवले आहेत. Guinness Book of रेकॉर्ड्स , Limca Book of रेकॉर्ड्स , India Book of रेकॉर्ड्स , and High Range Book of रेकॉर्ड्स ह्या चारही पुस्तकात त्याच्या नांवे वेगवेगळे रेकॉर्ड्स नमूद आहेत. 

   त्यानंतर २०१५ साली अमेरिकेतील अलास्का येथे देनाली ह्या शिखरावर चढाई करीत असताना त्याला त्याच्या वडिलांच्या दुःखद निधनाची बातमी समजली आणि ती चढाई त्याला अर्धवट सोडून द्यायला भाग पडले. म्हणतात ना दुःख आली की चहूं बाजूनी येतात तसेच झाले. २०१५ मध्येच एक दिवस अचानक त्याच्या मणक्याला इंज्यूरी झाली आणि तो अंथरुणात खिळून राहिला. त्याच्या डॉक्टरनी त्याला सांगितले की कदाचित तो आयुष्यात परत कधीच चालू शकणार नाही. परंतु आनंदचे मन ते मानायला तयार नव्हते. महिनानुमहिने अतिशय परिश्रमपूर्वक फिजियोथेरपी,  व्यायाम आणि विश्रांती ह्यांच्या साहाय्याने त्या अडचणीनवर मात करत त्याने गाडी परत पूर्व पदावर आणली. यात सर्वात मोठी साथ दिली त्याच्या घरच्यांनी व त्याची त्यावेळची मैत्रीण व सध्याची बायको अक्षया हिने. वडिलांच्या निधनानंतर त्याला आणि त्याच्या कुटुंबाला आर्थिक अडचणीचा सामना करावा लागला. वडिलांचे निधन व त्यात कोणतेही आर्थिक उत्पन्नाचे स्रोत नव्हते. आनंदच्या सर्व हालचालीवर मर्यादा आल्या होत्या. 

        अशातच 26 जानेवारी 2016 रोजी अक्षया व आनंद यांनी कोणतीही शास्वती नसताना फक्त प्रेमावर विश्वास ठेवून विवाह केला. घर चालवण्यासाठी आर्थिक बळ पाहिजे हे त्यांनी जाणले. त्यात २०१६ मध्ये त्याच्या पत्नीने एका क्लासेसमध्ये शिकवायला सुरवात केली पण अवघ्या १२ दिवसातच तिला नोकरीवरून काढले. त्यानंतर स्वतःचे "अक्षय्य क्लासेस" या नावाने क्लासेस सुरु करून अक्षयाने कुटुंबास आधार दिला.

     तो म्हणतो की त्या अडचणीच्या काळात त्याला अनेक परिचित आणि अपरिचित लोकांनी खूप मदत केली आणि त्यामुळे काम्युनिटी सपोर्ट चे महत्व त्याला माहिती झाले. 

गिर्यारोहणाच्या अनुभवामुळे कमीतकमी सुखसोयी आणि जास्तीतजास्त मानसिक तणावात काम करण्याची त्याला सवय झाली. 

     आर्थिक स्थिरता आणण्यासाठी त्याने आपला छंद हाच आपला व्यवसाय करण्याचे ठरवले. सन २०१७ मध्ये त्याने 360 Explorer LLP हे ऍडव्हेंचर टुरिसमची (साहसी पर्यटन) कंपनी सुरू केली. ह्या कंपनीतर्फे तो जगभरामध्ये वेगवेगळ्या साहसी टूर, गिर्यारोहण, ट्रेकिंग आयोजन करतो. शिवाय एंटरप्रिनरशिप, बिझिनेस कोचं ह्या विषयावर तो ट्रेनिंग देतो. जगभरातील ३,००,००० विध्यार्थ्यांना वेगवेगळ्या विषयात त्याने  ट्रेनिंग दिले आहे. 2024 पर्यंत त्याने America आणि कॅनडा मध्ये वेगवेगळ्या कंपन्या स्थापन करून तेथील नागरिकांना तो साहसी पर्यटन, साहसी गिर्यारोहण इत्यादी विषयात सेवा पुरवतो. त्याच्या 360 Explorer LLP ह्या कंपनीला सिलिकॉन व्हॅली मधील ऍक्सिलरेटर प्रोग्राम मध्ये मान्यता मिळाली आहे. डिजिटल मार्केटिंग एक्सपर्ट असणाऱ्या आनंदने अनेकांना याची सेवाही पुरवली आहे व अनेकांना स्टार्टअप कोचिंग केली आहे. 

   त्याने आतापर्यंत ५ प्रेरणादायी पुस्तके लिहिली असून तो फिजिक्स मध्ये पीएच डी करत आहे. २०१७ मध्ये न्यू यॉर्क मधील युनायटेड नेशन्सचे headquarter मध्ये त्याचे भाषण झाले आहे. युनायटेड नेशन्स च्या सस्टेनेबल डेव्हलपमेंट गोल्स बरोबर तो ऍडव्हन्चर टुरिसम मध्ये काम करत आहे. एके काळी ९ वी मध्ये तो फेल झाला होता पण आज त्याच्या आयुष्यावर ९ वी इयत्तेच्या पुस्तकात हिंदी प्रथम भाषेत धडा आहे.

उद्योजगता, चिकाटी आणि लवचिकता हे त्याच्या यशाचे गमक आहे असे म्हणायला हरकत नाही.


माधव भोळे

Tuesday, February 4, 2025

श्री अशोकरांव मुळे, एक निस्सीम, सच्चा कार्यकर्ता.

 श्री अशोकरांव मुळे, एक निस्सीम, सच्चा कार्यकर्ता. 


मुळगांव तळवली, तालुका गुहागर, परंतु नोकरींनिमित्त डोंबिवली येथील रहिवासी असलेले श्री अशोकरांव मुळे यांना देवरुखे ब्राह्मण समाजात ओळखणार नाही असा माणूस विरळच. अशोकरांव म्हणजे ग्रामीण आणि शहरी संस्कृतीचा सुंदर मिलाफ. आधुनिक विचार आणि पारंपरिक विचारधारा यांचा सुरेख संगम. समाजकार्य आणि सांस्कृतिककार्य यांचा विणलेला सुंदर गोफ म्हणजे अशोकरावं. 


गेले ३५ ते ४० वर्ष मीं अशोकरांवाना ओळखत आहे. हा लेख लिहिण्याचे निमित्त म्हणजे रविवार दिनांक १ फेब्रुवारी २०२५ रोजी ब्राह्मण महासंघ, डोंबिवली तर्फे त्यांचा झालेला सत्कार. बरोबर २५ वर्षांपूर्वी श्री अशोकरांव, श्री प्रशांत जोशी ह्या आपल्या डोंबिवली येथील देवरुखे ब्राह्मण संघातील कार्यकर्त्यानी त्यांच्या डोंबिवली येथील इतर मराठी ब्राह्मण समाजाच्या कार्यकर्त्यांबरोबर लावलेल्या "ब्राह्मण महासंघ डोंबिवली" या रोपाचा आता वटवृक्ष झाला. त्याची आठवण म्हणून ब्राह्मण महासंघ, डोंबिवलीने त्यांचा आणि प्रशांत जोशी यांचा सत्कार केला. 


अशोकरांव मुळातच स्वभावाने गरीब. त्यात गरिबीमुळे शिक्षणात अनेक अडचणी आल्या. तरीपण तळवली येथून मुंबईत येऊन त्यांनी माधवाश्रम मुंबईच्या साहाय्याने चिकाटीने आपले शिक्षण पूर्ण केले. मग माधवश्रमातच त्यांना लिपिक म्हणून नोकरीं लागली. सुरवातीला काउंटर सांभाळण्यापासून सुरवात केली. पुढे त्यांच्यातील सदगुण ओळखून माधवाश्रमातील व्यवस्थापनाने त्यांच्यावर अनेक जबाबदाऱ्या सोपवल्या. दररोज डोंबिवली ते चर्नीरोड हा खडतर प्रवास त्यांनी जवळजवळ ५० वर्ष केला. आमच्या वीर गावची माहेरवाशिण सौं. अनिताताई सारखी सुविद्य पत्नी त्यांना लाभली.


हे करीत असताना ज्या समाजाने आपल्याला आधार दिला त्या समाजाचे आपणही काही देणे लागतो हे लक्षात ठेवून त्यांनी देवरुखे ब्राह्मण समाजात काम करायला सुरवात केली. सुरवातीला देवरुखे ब्राह्मण संघ डोंबिवली, वैद्यकीय मदत निधी, ब्राह्मण महासंघ डोंबिवली या सारख्या स्थानिक संस्थामध्ये त्यांनी आपल्या कामाचा ठसा उमटवला. 


त्यांची बहुआयामी, बहु्गुणी प्रतिमा लक्षात घेऊन रामभाऊ निमकरांसारख्या धोरणी माणसाने, पारख करून "देवरुखे ब्राह्मण अनाथ कौटुंबिक निधी" आणि "देवरुखे ब्राह्मण शिक्षण फंड" या संस्थांमध्ये त्यांची विश्वस्त पदावर नियुक्ती केली. पुढे ते विद्यार्थी सहायक संस्था मुंबई मध्ये विश्वस्त म्हणून निवडून आले आणि पुढे अध्यक्ष सुद्धा झाले. योगायोगाने या तीनही संस्था मध्ये त्यांच्याबरोबर काम करण्याचे मला सौभाग्य लाभले.


संगीत, तबला, अभिनय हे त्यांच्या घरातील पारंपारिक गुण त्यांनी सहज आत्मसात केले. आमच्या वीर चे जावई असल्यामुळे, त्यांचे सन्मित्र कै. दिगू काळे, कै. पद्मनाभ वा. वीरकर उर्फ गजूकाका आणि कै. सूर्यकांत वीरकर यांचे वर्तुळात त्यांनी अनेक व्यवसायिक नाटकात आणि वीर, तळवली,देऊड, चवे, आरे येथील वार्षिक उत्सवात नाटकांमध्ये नाट्य दिग्दर्शक आणि कलावंत म्हणून कामे केली आहेत. शिवाय संगीताची आणि भजनाची आवड असल्यामुळे डोंबिवली येथील २/३ भजन मंडळामध्ये त्यांचा सक्रिय सहभाग होता. 


तळवली येथील ग्रामस्थ मंडळ तसेच तळवली पंचक्रोशी मंडळाचे गेले कित्येक वर्ष ते सक्रिय सभासद तसेच विश्वस्त आहेत. तीन वर्षांपूर्वी त्यांना ८१ वर्ष पूर्ण झाली म्हणून तळवलीकरानी त्यांचा सत्कार केला होता त्यावेळी त्याला उत्तर देताना आग्रहाखातर नटसम्राट मधील आणि इतर दोन तीन नाट्य प्रवेश त्यांनी म्हणून दाखवले. ते मीं व्हिडिओ मध्ये बघितल्यावर लक्षात येते की वय हा नुसता आकडा आहे पण जातिवंत कलाकार आपले गुण कायम राखून असतो आणि संधी मिळाली की ते सादर करू शकतो. त्याला वयाचे बंधन नाही. 


कालच्या सत्कारानिमित्त नेहमीप्रमाणे मीं त्यांना अभिनंदन करण्यासाठी फोन केला होता. अजूनही तोच खणखणीत आवाज, तीच आपुलकी. कोणताही अहंकार किंवा अढी मनात नाही. निव्वळ परमानंद.


त्यांना श्री. अमित, सौं. मनीषा धोपटकर आणि सौं. मंजिरी पिंपुटकर सारखी सुविद्य आणि सुसंस्कृत मुले आणि अनिताताईनसारखी सुविद्य पत्नी लाभली आहे. 


ईश्वर त्यांच्यावर अशीच कृपा करो आणि त्यांना निरामय, सुखी आणि आनंदी शतकोत्तर जीवन लाभो ही प्रार्थना.


माधव भोळे 

Sunday, February 2, 2025

शेयर मार्केट, ट्रिगर आणि संपत्ती

 शेयर मार्केट, ट्रिगर आणि संपत्ती

शेयर मार्केट हे अतिशय अस्थिर तसेच गंभीर प्रकरण आहे, तेथे येऱ्या गबळ्याचे काम नाही. शेयर मार्केट हे तीन मुख्य तत्वानंवर चालते. 

१) कंपनीची आर्थिक स्थिती ज्याला फंडामेंटलंस म्हणतात 

२) विकणारे आणि विकत घेणारे यातील चढाओढ याला टेक्निकलं अनॅलिसिस म्हणतात. 

३) आजूबाजूची क्षेत्रीय स्पर्धात्मक, भौगोलिक किंवा जागतिक परिस्थिती. ह्या मध्ये सत्य अथवा पसरवलेल्या बातम्या हे सुद्धा येते.


पैकी क्रमांक ३)  मुळे क्रमांक २) वर सतत परिणाम होत असतो आणि त्यामुळे शेयरचे भाव रोजच्या रोज मिनिटा मिनिटाला खाली वर होत असतात. ज्याला ह्या तिघांची जेव्हडी चांगली समज तेव्हडा तों त्यातून खूप संपत्ती कमावू शकतो.


काल अमेरिकन शेयर मार्केट मध्ये अचानक एक वादळ आले आणि ५ दिवसापूर्वी Nvedia ह्या जगातील सर्वात जास्त किमती असलेल्या, सॉफ्टवेअर आणि कॉम्पुटर AI साठी लागणाऱ्या ग्राफिक्स चिप्स बनवणाऱ्या कंपनीचे शेयर्स काल एकाच दिवसात १८.१८% नी घसरले. ५ दिवसापूर्वी १४३ डॉलर्स प्रति शेयर किंमत असलेल्या शेयरचा भाव काल ११७ डॉलर्स प्रति  शेयर एव्हडा खाली आला. 


एका दिवसात NVedia कंपनीची किंमत सुमारे ४५० बिलीयन डॉलर्सनी कमी झाली. म्हणजेच मुकेश अंबानीच्या रिलायन्स इंडस्ट्रिजच्या सारख्या २ कंपन्या बाजारातून उठल्या इतकी कमी झाली. त्यामुळे जगातील प्रसिद्ध अशा सर्व आय टी कंपन्याचे शेयर्स बाजारात पत्याच्या बंगल्याप्रमाणे ( Dominos effect) १० ते १५ टक्के पडले. 


काय कारण आहे असे व्हायला? 

शेयर बाजार कमी व्हायला काहीतरी कारण लागते, त्याला ट्रिगर म्हणतात. उदा. डोनाल्ड ट्रम्प जरी शिंकले आणि त्यांना हॉस्पिटल मध्ये चेकिंग करायला जरी पाठवले तरी त्यांनी आखलेली धोरणे किंवा त्यांची दूरदृष्टी याचा वरील घटनेमुळे अमेरिकेच्या आणि पर्यायाने अमेरिकन व्यवसायावर किंवा अंतर राष्ट्रीय संबंध या वर काही परिणाम होण्याची शक्यता मोजून शेयर मार्केट मध्ये घाबराहट  निर्माण होऊ शकते. ह्या घेटनेला ट्रिगर असे म्हणतात.


तर ज्या NVedia च्या चिप्सचा उपयोग AI कॉम्पुटिंग साठी होतो त्या AI म्हणजेच आर्टिफिशल इंटिलिजन्सला लागणारे सॉफ्टवेअर ज्याला चॅट बॉट म्हणतात ते तयार करणारी  DeepSeek नावाची एक सक्षम कंपनी चीन मध्ये उदयास आली आणि तिचा दावा आहे की ज्या चॅटबॉटला तयार करण्यासाठी अमेरिकन कंपन्यानी बिलीयन्स ऑफ डॉलर्स खर्च केले ते सॉफ्टवेअर ह्या DeepSeek ने अवघ्या ६ मिलीयन डॉलर्स मध्ये बनवले ( १ बिलीयन डॉलर्स म्हणजे १००० मिलीयन डॉलर्स ). शिवाय ते म्हणतात की त्या सॉफ्टवेअरचे सुयोग्य परिणाम दिसण्यासाठी लागणारी गृहीतकांची संख्या ( number of Parameters) त्यांनी अतिशय कमी केली असून त्यामुळे ते परिणाम तयार करण्यासाठी लागणारी कॉम्पुटर प्रोसेसिंग पॉवर ( कॉम्पुटर शक्ती ) सुद्धा कमी लागेल. त्यांचा आणि त्यांच्या वापर कर्त्यांचा दावा आहे की DeepSeek चे तंत्रज्ञान जास्त समृद्ध आणि स्वस्त आहे. 


म्हणजेच AI ला लागणारी  जास्तीतजास्त कॉम्पुटर प्रोसेसिंग पॉवर देऊन कमी खर्चात  देऊन NVedia ने  जीं ऐकाधीकारशाही ( monopoly ) तयार केली होती तिची गरज कमी झाली. अर्थात त्याचा परिणाम NVedia च्या मागणी आणि पुरवठा आणि पर्यायाने आर्थिक स्थिती वर होऊ शकेल. त्यामुळे Nvedia च्या शेयर्स ची किंमत कमी झाली.


अशा वेळी विचार करायला हवा की DeepSeek चे दावे किती प्रमाणात खरे आहेत याची? ह्या घटनेचा प्रत्यक्ष परिणाम हा चॅट बॉट तयार करणाऱ्या इतर कंपन्यानवर आहे, NVedida हा फक्त साईड इफेक्ट आहे. खरोखर NVedia ची एकाधिकार शाही कमी होणार का? NVedia या परिस्थिती वर काही उपाय योजना करणार का? हे पुढील काही दिवसात कळून येईल. पण आजची स्थिती अशी आहे. 


तर सांगण्याचा मुद्धा एव्हडाच की शेयर मार्केट मध्ये गुंतवणूक करणाऱ्यांनी मनाने खंबीर आणि सय्यमी असून त्यांनी सारासार विचार करावा. आपल्याकडे असलेली सर्व पुंजी एकाच असेट क्लास मध्ये ( गुंतवणूक पर्याय ) ठेवू नये.


माधव भोळे

ट्रम्प नीती आणि अमेरिका!!

 ट्रम्प नीती आणि अमेरिका!!

ट्रम्प अमेरिकेचा २ऱ्यांदा अध्यक्ष झाल्यानंतर त्याला स्वर्ग ठेंगणा वाटायला लागला. जगातील सर्व सत्ता फक्त अमेरिकेत एकवटावी आणि त्याचा राजा मीच असायला हवा असा विचार करून त्याने आल्या आल्या नवनवीन कार्यकारी अध्यादेश काढायला आणि वेगवेगळ्या धमक्या द्यायला सुरवात केली. 


आल्या आल्या त्याने अध्यादेश काढला की जीं मंडळी अमेरिकेत रहातात ती जर अमेरिकेचे नागरिक किंवा स्थायी रहिवासी ( ग्रीन कार्ड होल्डर ) नसतील तर त्यांच्या पुढील अपत्यांना अमेरिकेचे नागरिकत्व मिळणार नाही. 

त्याने वर्ल्ड हेल्थ ऑरगनायझेशन आणि वातावरण बदलाचा पॅरिस करार या दोघांमधून अमेरिकेला बाहेर काढले. 

त्याने अमेरिकन नागरिकांचे लिंग प्रकारांच्या विशिष्ठ मान्यता समाप्त करून लिंग बदल व्यक्ती किंवा त्रितिय लिंग व्यक्ती यांना मिळणाऱ्या सुविधा आणि हक्क काढून घेतले, ज्या पैकी अनेक ही नैसर्गिक करणी असते. 


असे एकंदरीत ४० अध्यादेश त्याने १० दिवसात काढले. त्यानंतर कॅनडा, मेक्सिको आणि चीन ह्या देशांकडुन अमेरिकेत होणाऱ्या आयातीवर भरमसाठ आयात कर टाकण्यात आला ज्याची सुरवात या रविवारी २ फेब्रुवारी २०२५ पासून होईल.त्याच्या मते या देशांकडून येणारा माल स्वस्त असल्यामुळे अमेरिकन लोक तों माल विकत घेतात आणि त्यामुळे देशी अमेरिकन माल खपत नाही म्हणून त्याचे उत्पादन कमी होत आहे. पण त्यामुळे आधीच अमेरिकन नागरिक कर्जाच्या आणि महागाईच्या ओझ्याखाली दबलेले असतात त्यांच्या यातना आणखी वाढतील, कारण सर्वच अमेरिकन काही महिना १ लाख डॉलर्स कमवीत नाही आणि कमवले तरी त्यातील जवळजवळ २४% इन्कम टॅक्स जातों.


येथपर्यंत ठीक आहे;


पण त्याने काल आणखी एक धमकी दिली. चिनच्या डीपसिक ह्या AI सॉफ्टवेअर तयार करणाऱ्या कंपनीच्या घवघवीत यशानंतर अमेरिकन सॉफ्टवेअर कंपन्यांचे धाबे दणाणले. त्यामुळे डीपसिक ह्या चिनी कंपनीला लागणारे हार्डवेयर जे अमेरिकन NVedia कंपनी बनवते त्याच्या निर्यातीवर निर्यात कर वाढवण्याचा विचार केला आहे, जेणेकरून डिपसिक च्या कामावर परिणाम होईल वगैरे. अमेरिकन लोक ह्या भ्रमात आहेत की जे हार्डवेअर NVedia बनवते ते हार्डवेअर जगात कोणीही बनवू शकत नाही. अगदी हीच गोष्ट त्यांना AI सॉफ्टवेअर बद्दल वाटली होती परंतु डिपसिक AI सॉफ्टवेअरने तों भ्रम तोडला. 


जेव्हडे तुम्ही दुसऱ्याला दाबायचा प्रयत्न कराल तेव्हडा तों जास्त ताकदवान बनाण्याचा प्रयत्न करतो आणि चीन तर नक्कीच करेल. आता जर चीनने आणखी काही दिवसात NVedia ला तोड देणारे हार्डवेअर तयार केले तर अमेरिकन कंपन्याना तोंडात मारल्यासारखे होईल. म्हणजे तेल ही गेले आणि तुपही गेले. 

त्या पेक्षा जेव्हडे दिवस चीन अमेरिकेवर हार्डवेअर साठी अवलंबून असेल तेव्हढे दिवस त्याला एक्स्पोर्ट सहज आणि सोपा करायचा म्हणजे चीन नवीन हार्डवेअर शोधण्याचा प्रयत्न कमी करेल. त्यांना गाफिल ठेवले असते तर अमेरिकेचा जास्त दिवसांचा फायदा होता. जीं गोष्ट सहज मिळते त्यासाठी लोक दुसरी धडपड करीत नाहीत. त्यामुळे अमेरिकेन कंपन्यानचा व्यवसाय वाढेल.


अगदी उदा. या पूर्वी अमेरिकेने अणूशक्ती आणि अणूऊर्जेसाठी अनेक देशांना जेरीस आणले तरी भारत, पाकिस्तान आणि इराणसारखे देश अणवस्त्र धारी बनलेच की? 


अर्थात ही घोषणा झाल्याबरोबर Nvedia चा CEO जेन्सन हुवंग कालच प्रेसिडेंट ट्रम्प ला भेटायला गेला होता आणि त्याने आपली बाजू मांडली असेलच.

नेहमी हत्ती होऊन लाकडे खाण्या पेक्षा मुंगी होऊन साखर खावी असे म्हणतात.


माधव भोळे 




ब्राम्हण विध्यार्थीनी साठी मोफत शिक्षण आणि निवास व्यवस्था

 ब्राम्हण विध्यार्थीनी साठी मोफत शिक्षण आणि निवास व्यवस्था 

(मेसेज जास्तीत जास्त ब्राह्मण व्हाट्सअप आणि फेसबुक ग्रुपवर, ब्राह्मण समुदायावर प्रसारित करावा जेणे करून ब्राह्मण समाजास या उपक्रमाचा फायदा होईल.)


प्रवेश .......

संप्रदाय गुरुकुल पाठशाळा, नाशिक, शैक्षणिक वर्ष 2025-2026 (पूर्वी ब्रह्माव्हॅली, अंजनेरी, त्र्यंबकेश्वर येथे असलेली)

संप्रदाय पाठशाळा, कलाश्रय, कौसल्या नगर, पाण्याच्या टाकी जवळ, नाशिक 422003 या ठिकाणी महाराष्ट्रातील सर्व थरातील ब्राह्मण मुलींसाठी मोफत पाचवी पासून शालेय पदवी पदव्युत्तर शिक्षणापर्यंतची व सांप्रदायिक संस्कार शिक्षणाची निवासी उत्तम व्यवस्था असलेली संस्था महाराष्ट्रात सुरू आहे. संप्रदाय पाठशाळेत 2025-26 शैक्षणिक वर्षांसाठी मुलींची नाव नोंदणी /Registration करणे सध्या सुरू झाले आहे.

पाठशाळा इंग्रजी माध्यमाची आहे. मुलींना शालेय शिक्षणाच्या व्यतिरिक्त संगीत, खेळ, धर्म, सांस्कृतिक, भारतीय परंपरा, योगा आणि संस्कृत भाषेचे प्रशिक्षण देण्यात येते . 


श्री कांची कामकोटी पीठम संचालित संप्रदाय पाठशाळा, नाशिक येथे महाराष्ट्रातील ब्राम्हण मुलींसाठी ही व्यवस्था जगद्गुरू श्री शंकराचार्य कांची पीठाधीश्वर परम पूज्य स्वामी विजयेंद्र सरस्वतीजी व स्वामी गोविंद गिरीजी यांच्या आशीर्वादाने सुरू असून येथे प्रवेश घेतलेल्या ब्राह्मण मुलींच्या निवास, भोजन आणि शिक्षण खर्च श्री कांची कामकोटी पीठम संचालीत संप्रदाय पाठशाळा नाशिक ही संस्था करत आहे. 

 उपक्रमात आज अनेक मुली सर्वप्रकारचे शिक्षण उत्तमरीतीने घेत आहेत .* 

या पाठशाळे मध्ये जून 2025 पासून सुरु होणा-या शैक्षणिक सत्रासाठी ब्राह्मण मुलींना निवासी शिक्षणासाठी नवीन प्रवेश देण्यात येणार आहे .

मराठी माध्यमात शिकत असलेल्या मुलींना देखील प्रवेश घेता येणार आहे.  


ह्या व्यवस्थेचा कारभार एस.एन.डी.टी. विद्यापीठ मुंबईच्या माजी कुलगुरू डॉ.चंद्राकृष्णमूर्ती पाठशाळेचा कार्यभार सांभाळत आहेत. 


संप्रदाय पाठशाळा नाशिक, महाराष्ट्रातील सर्व थरातील ब्राह्मण मुलींसाठी मोफत शालेय इयत्ता ५ वी ते पदवी पदव्युत्तर शिक्षणापर्यंतची व सांप्रदायिक संस्कार शिक्षणाची निवासी उत्तम व्यवस्था असलेली संस्था महाराष्ट्रात अनेक वर्षांपासून सुरू आहे. आधीच्या 10 वी च्या दोन बॅचेस चा शंभर टक्के निकाल आणि ७५ टक्के मुली डिस्टींकशन आल्या आहेत . मुलींच्या अभ्यासाकडे पूर्ण लक्ष आणि मार्गदर्शन. 

अधिक माहीती यु ट्युब चॅनलवर मिळु शकते.

 *Sampradaya patshala, Nashik* 

*हा उपक्रम उत्तरोत्तर उत्तम चालू रहावा व वृद्धिंगत होऊन समाजास एक सक्षमता यावी म्हणून तन मन धनाने आपण सहाय्यता करू शकतात.


नवीन प्रवेश घेऊ इच्छिणा-या पालकांसह विद्यार्थिनींची मुलाखत घेण्यात येणार आहे . मुलींच्या प्रवेशासाठी इच्छुक असलेल्या पालकांनी त्वरित संपर्क करून अधिक माहिती साठी कार्यालय संपर्क

* सौ दीप्ती गोखले मोबाईल नंबर 9967443284 , 

* सौ प्रतिभा गायधनी मोबाईल नंबर 7875391348,  

* संचालिका Dr. चंद्रा कृष्णमूर्ती मॅडम मोबाईल नंबर 9820966324

शैक्षणिक वर्ष 2025-2026 

नवीन प्रवेश घेणार आहेत अशा विद्यार्थीनी व पालकांची प्रत्यक्ष मुलाखत Interview व लेखी परीक्षा April 2025 मधे घेण्यात येणार आहे.