Tuesday, February 4, 2025

श्री अशोकरांव मुळे, एक निस्सीम, सच्चा कार्यकर्ता.

 श्री अशोकरांव मुळे, एक निस्सीम, सच्चा कार्यकर्ता. 


मुळगांव तळवली, तालुका गुहागर, परंतु नोकरींनिमित्त डोंबिवली येथील रहिवासी असलेले श्री अशोकरांव मुळे यांना देवरुखे ब्राह्मण समाजात ओळखणार नाही असा माणूस विरळच. अशोकरांव म्हणजे ग्रामीण आणि शहरी संस्कृतीचा सुंदर मिलाफ. आधुनिक विचार आणि पारंपरिक विचारधारा यांचा सुरेख संगम. समाजकार्य आणि सांस्कृतिककार्य यांचा विणलेला सुंदर गोफ म्हणजे अशोकरावं. 


गेले ३५ ते ४० वर्ष मीं अशोकरांवाना ओळखत आहे. हा लेख लिहिण्याचे निमित्त म्हणजे रविवार दिनांक १ फेब्रुवारी २०२५ रोजी ब्राह्मण महासंघ, डोंबिवली तर्फे त्यांचा झालेला सत्कार. बरोबर २५ वर्षांपूर्वी श्री अशोकरांव, श्री प्रशांत जोशी ह्या आपल्या डोंबिवली येथील देवरुखे ब्राह्मण संघातील कार्यकर्त्यानी त्यांच्या डोंबिवली येथील इतर मराठी ब्राह्मण समाजाच्या कार्यकर्त्यांबरोबर लावलेल्या "ब्राह्मण महासंघ डोंबिवली" या रोपाचा आता वटवृक्ष झाला. त्याची आठवण म्हणून ब्राह्मण महासंघ, डोंबिवलीने त्यांचा आणि प्रशांत जोशी यांचा सत्कार केला. 


अशोकरांव मुळातच स्वभावाने गरीब. त्यात गरिबीमुळे शिक्षणात अनेक अडचणी आल्या. तरीपण तळवली येथून मुंबईत येऊन त्यांनी माधवाश्रम मुंबईच्या साहाय्याने चिकाटीने आपले शिक्षण पूर्ण केले. मग माधवश्रमातच त्यांना लिपिक म्हणून नोकरीं लागली. सुरवातीला काउंटर सांभाळण्यापासून सुरवात केली. पुढे त्यांच्यातील सदगुण ओळखून माधवाश्रमातील व्यवस्थापनाने त्यांच्यावर अनेक जबाबदाऱ्या सोपवल्या. दररोज डोंबिवली ते चर्नीरोड हा खडतर प्रवास त्यांनी जवळजवळ ५० वर्ष केला. आमच्या वीर गावची माहेरवाशिण सौं. अनिताताई सारखी सुविद्य पत्नी त्यांना लाभली.


हे करीत असताना ज्या समाजाने आपल्याला आधार दिला त्या समाजाचे आपणही काही देणे लागतो हे लक्षात ठेवून त्यांनी देवरुखे ब्राह्मण समाजात काम करायला सुरवात केली. सुरवातीला देवरुखे ब्राह्मण संघ डोंबिवली, वैद्यकीय मदत निधी, ब्राह्मण महासंघ डोंबिवली या सारख्या स्थानिक संस्थामध्ये त्यांनी आपल्या कामाचा ठसा उमटवला. 


त्यांची बहुआयामी, बहु्गुणी प्रतिमा लक्षात घेऊन रामभाऊ निमकरांसारख्या धोरणी माणसाने, पारख करून "देवरुखे ब्राह्मण अनाथ कौटुंबिक निधी" आणि "देवरुखे ब्राह्मण शिक्षण फंड" या संस्थांमध्ये त्यांची विश्वस्त पदावर नियुक्ती केली. पुढे ते विद्यार्थी सहायक संस्था मुंबई मध्ये विश्वस्त म्हणून निवडून आले आणि पुढे अध्यक्ष सुद्धा झाले. योगायोगाने या तीनही संस्था मध्ये त्यांच्याबरोबर काम करण्याचे मला सौभाग्य लाभले.


संगीत, तबला, अभिनय हे त्यांच्या घरातील पारंपारिक गुण त्यांनी सहज आत्मसात केले. आमच्या वीर चे जावई असल्यामुळे, त्यांचे सन्मित्र कै. दिगू काळे, कै. पद्मनाभ वा. वीरकर उर्फ गजूकाका आणि कै. सूर्यकांत वीरकर यांचे वर्तुळात त्यांनी अनेक व्यवसायिक नाटकात आणि वीर, तळवली,देऊड, चवे, आरे येथील वार्षिक उत्सवात नाटकांमध्ये नाट्य दिग्दर्शक आणि कलावंत म्हणून कामे केली आहेत. शिवाय संगीताची आणि भजनाची आवड असल्यामुळे डोंबिवली येथील २/३ भजन मंडळामध्ये त्यांचा सक्रिय सहभाग होता. 


तळवली येथील ग्रामस्थ मंडळ तसेच तळवली पंचक्रोशी मंडळाचे गेले कित्येक वर्ष ते सक्रिय सभासद तसेच विश्वस्त आहेत. तीन वर्षांपूर्वी त्यांना ८१ वर्ष पूर्ण झाली म्हणून तळवलीकरानी त्यांचा सत्कार केला होता त्यावेळी त्याला उत्तर देताना आग्रहाखातर नटसम्राट मधील आणि इतर दोन तीन नाट्य प्रवेश त्यांनी म्हणून दाखवले. ते मीं व्हिडिओ मध्ये बघितल्यावर लक्षात येते की वय हा नुसता आकडा आहे पण जातिवंत कलाकार आपले गुण कायम राखून असतो आणि संधी मिळाली की ते सादर करू शकतो. त्याला वयाचे बंधन नाही. 


कालच्या सत्कारानिमित्त नेहमीप्रमाणे मीं त्यांना अभिनंदन करण्यासाठी फोन केला होता. अजूनही तोच खणखणीत आवाज, तीच आपुलकी. कोणताही अहंकार किंवा अढी मनात नाही. निव्वळ परमानंद.


त्यांना श्री. अमित, सौं. मनीषा धोपटकर आणि सौं. मंजिरी पिंपुटकर सारखी सुविद्य आणि सुसंस्कृत मुले आणि अनिताताईनसारखी सुविद्य पत्नी लाभली आहे. 


ईश्वर त्यांच्यावर अशीच कृपा करो आणि त्यांना निरामय, सुखी आणि आनंदी शतकोत्तर जीवन लाभो ही प्रार्थना.


माधव भोळे 

No comments:

Post a Comment