शेयर मार्केट, ट्रिगर आणि संपत्ती
शेयर मार्केट हे अतिशय अस्थिर तसेच गंभीर प्रकरण आहे, तेथे येऱ्या गबळ्याचे काम नाही. शेयर मार्केट हे तीन मुख्य तत्वानंवर चालते.
१) कंपनीची आर्थिक स्थिती ज्याला फंडामेंटलंस म्हणतात
२) विकणारे आणि विकत घेणारे यातील चढाओढ याला टेक्निकलं अनॅलिसिस म्हणतात.
३) आजूबाजूची क्षेत्रीय स्पर्धात्मक, भौगोलिक किंवा जागतिक परिस्थिती. ह्या मध्ये सत्य अथवा पसरवलेल्या बातम्या हे सुद्धा येते.
पैकी क्रमांक ३) मुळे क्रमांक २) वर सतत परिणाम होत असतो आणि त्यामुळे शेयरचे भाव रोजच्या रोज मिनिटा मिनिटाला खाली वर होत असतात. ज्याला ह्या तिघांची जेव्हडी चांगली समज तेव्हडा तों त्यातून खूप संपत्ती कमावू शकतो.
काल अमेरिकन शेयर मार्केट मध्ये अचानक एक वादळ आले आणि ५ दिवसापूर्वी Nvedia ह्या जगातील सर्वात जास्त किमती असलेल्या, सॉफ्टवेअर आणि कॉम्पुटर AI साठी लागणाऱ्या ग्राफिक्स चिप्स बनवणाऱ्या कंपनीचे शेयर्स काल एकाच दिवसात १८.१८% नी घसरले. ५ दिवसापूर्वी १४३ डॉलर्स प्रति शेयर किंमत असलेल्या शेयरचा भाव काल ११७ डॉलर्स प्रति शेयर एव्हडा खाली आला.
एका दिवसात NVedia कंपनीची किंमत सुमारे ४५० बिलीयन डॉलर्सनी कमी झाली. म्हणजेच मुकेश अंबानीच्या रिलायन्स इंडस्ट्रिजच्या सारख्या २ कंपन्या बाजारातून उठल्या इतकी कमी झाली. त्यामुळे जगातील प्रसिद्ध अशा सर्व आय टी कंपन्याचे शेयर्स बाजारात पत्याच्या बंगल्याप्रमाणे ( Dominos effect) १० ते १५ टक्के पडले.
काय कारण आहे असे व्हायला?
शेयर बाजार कमी व्हायला काहीतरी कारण लागते, त्याला ट्रिगर म्हणतात. उदा. डोनाल्ड ट्रम्प जरी शिंकले आणि त्यांना हॉस्पिटल मध्ये चेकिंग करायला जरी पाठवले तरी त्यांनी आखलेली धोरणे किंवा त्यांची दूरदृष्टी याचा वरील घटनेमुळे अमेरिकेच्या आणि पर्यायाने अमेरिकन व्यवसायावर किंवा अंतर राष्ट्रीय संबंध या वर काही परिणाम होण्याची शक्यता मोजून शेयर मार्केट मध्ये घाबराहट निर्माण होऊ शकते. ह्या घेटनेला ट्रिगर असे म्हणतात.
तर ज्या NVedia च्या चिप्सचा उपयोग AI कॉम्पुटिंग साठी होतो त्या AI म्हणजेच आर्टिफिशल इंटिलिजन्सला लागणारे सॉफ्टवेअर ज्याला चॅट बॉट म्हणतात ते तयार करणारी DeepSeek नावाची एक सक्षम कंपनी चीन मध्ये उदयास आली आणि तिचा दावा आहे की ज्या चॅटबॉटला तयार करण्यासाठी अमेरिकन कंपन्यानी बिलीयन्स ऑफ डॉलर्स खर्च केले ते सॉफ्टवेअर ह्या DeepSeek ने अवघ्या ६ मिलीयन डॉलर्स मध्ये बनवले ( १ बिलीयन डॉलर्स म्हणजे १००० मिलीयन डॉलर्स ). शिवाय ते म्हणतात की त्या सॉफ्टवेअरचे सुयोग्य परिणाम दिसण्यासाठी लागणारी गृहीतकांची संख्या ( number of Parameters) त्यांनी अतिशय कमी केली असून त्यामुळे ते परिणाम तयार करण्यासाठी लागणारी कॉम्पुटर प्रोसेसिंग पॉवर ( कॉम्पुटर शक्ती ) सुद्धा कमी लागेल. त्यांचा आणि त्यांच्या वापर कर्त्यांचा दावा आहे की DeepSeek चे तंत्रज्ञान जास्त समृद्ध आणि स्वस्त आहे.
म्हणजेच AI ला लागणारी जास्तीतजास्त कॉम्पुटर प्रोसेसिंग पॉवर देऊन कमी खर्चात देऊन NVedia ने जीं ऐकाधीकारशाही ( monopoly ) तयार केली होती तिची गरज कमी झाली. अर्थात त्याचा परिणाम NVedia च्या मागणी आणि पुरवठा आणि पर्यायाने आर्थिक स्थिती वर होऊ शकेल. त्यामुळे Nvedia च्या शेयर्स ची किंमत कमी झाली.
अशा वेळी विचार करायला हवा की DeepSeek चे दावे किती प्रमाणात खरे आहेत याची? ह्या घटनेचा प्रत्यक्ष परिणाम हा चॅट बॉट तयार करणाऱ्या इतर कंपन्यानवर आहे, NVedida हा फक्त साईड इफेक्ट आहे. खरोखर NVedia ची एकाधिकार शाही कमी होणार का? NVedia या परिस्थिती वर काही उपाय योजना करणार का? हे पुढील काही दिवसात कळून येईल. पण आजची स्थिती अशी आहे.
तर सांगण्याचा मुद्धा एव्हडाच की शेयर मार्केट मध्ये गुंतवणूक करणाऱ्यांनी मनाने खंबीर आणि सय्यमी असून त्यांनी सारासार विचार करावा. आपल्याकडे असलेली सर्व पुंजी एकाच असेट क्लास मध्ये ( गुंतवणूक पर्याय ) ठेवू नये.
माधव भोळे
No comments:
Post a Comment