Thursday, July 17, 2025

पैसा फ़ंड काच कारखाना आणि चवे गावचे कै. अंताजी दामोदर काळे.

पैसा फ़ंड काच कारखाना आणि चवे गावचे कै. अंताजी दामोदर काळे.


महात्मा गांधींच्या स्वदेशी चळवळीच्या कितीतरी आधी म्हणजे ७ ऑगस्ट १९०५ रोजी लॉर्ड करझन यांनी अखलेल्या बंगालच्या फाळणीच्या निषेधार्थ कलकत्ता येथे सुरेंद्रनाथ बॅनर्जी, बिपीनचंद्र पाल, लोकमान्य टिळक आणि लाला लाजपत राय सारख्या मान्यवर नेत्यांनी ती कलकट्टा येथे सुरू केली.


त्याचा एक भाग म्हणून महाराष्ट्रात रत्नागिरी येथील चवे गावचे अंताजी दामोदर काळे यांनी बाळ गंगाधर टिळक यांचे समोर एक प्रस्ताव मांडला की आपल्यासारख्या शेतीप्रधान देशात नुसते स्वदेशी चळवळ करून चालणार नाही तर त्यासाठी स्वतःची कारखानदारी आवश्यक आहे आणि ती करण्यासाठी आपण भांडवल गोळा केले पाहिजे तरी आपण केसरी मध्ये अग्रलेख लिहून तसें भांडवल तयार करण्यासाठी आवाहन करा. 


टिळकानी स्पष्ट सांगितले की अशी कामे अग्रलेख लिहून होत नाहीत. त्यासाठी तुम्हांला शेतकऱ्यांच्या दारोदारी जाऊन आपण काय करणार आहोत त्याचा आराखडा लोकांना समजावले पाहिजे. जर लोकांना त्यात तथ्य वाटले तर लोक आपल्याला पैसे देतील. 


ह्या कल्पनेतून तयार झाला तळेगांव, पुणे येथील पैसा फ़ंड काच कारखाना. ह्या साठी अंताजी काळे आणि त्यांचे सहकारी यांनी शेतकऱ्यांच्या दारोदारी जाऊन पै पै जमवून हा कारखाना उभा केला.


पण खरी गोम होती ती तंत्रज्ञानाची. त्यावेळी भारतात काच बनत नव्हती. अलिगड येथे जन्मलेला एक देशभक्त तरुण ईश्वर दास वर्षणेयी ह्याने हे काम पूर्ण केले. हा जपान येथे साखर कारखान्याचे तंत्रज्ञान शिकण्यासाठी गेला होता. त्या दरम्यान वागळे नावाच्या एका सदगृहस्थाने "इंडियन पिपल" ह्या मासिकात एक लेख लिहिला होता की भारतात काच बनवणे अशक्य आहे. तो लेख वाचून ईश्वर दास च्या मनात जिद्ध निर्माण झाली. त्याने साखर कारखान्यांचा अभ्यास सोडून दिला आणि जपान आणि अमेरिकेतील MIT मध्ये ग्लास टेक्नॉलॉजी वर कोर्स पूर्ण केला आणि तो भारतात आला. त्याने ह्या पैसा फ़ंड काच कारखान्याला तंत्रज्ञान दिले. १९०८ मध्ये असा राहिला उभा पैसा फ़ंड काच कारखाना.



कारखान्याने सुरुवातीला विविध प्रकारच्या काचेच्या उत्पादनावर लक्ष केंद्रित केले, ज्यात रेल्वे सिग्नल लेन्स आणि राउंडल्समध्ये वापरल्या गेलेल्यांचा समावेश होता आणि पहिल्या महायुद्धादरम्यान भारताच्या काचेच्या मागणीची पूर्तता करण्यात महत्त्वपूर्ण भूमिका बजावली.

पुढे ह्याच संस्थेने स्वदेशी शिक्षणासाठी तळेगाव दाभाडे येथे पैसा फ़ंड शाळा काढली.


आपल्या ज्ञातीतील कै. अंताजी दामोदर काळे सारख्या दूरदृष्टी असलेल्या धुरीणांचा तसेच देशभक्त ईश्वर दास वर्षणेयी आणि लोकमान्य बाळ गंगाधर टिळक यांना मीं आदरपूर्वक नमस्कार करतो.


माधव भोळे 


No comments:

Post a Comment