UPSC - IAS, IPS, IRS, IFS exams.
नुकताच UPSC मेन्सचा निकाल लागला. अनुज अग्निहोत्री हा राजस्थान मधील मुलगा जोधपूर एम्स मधून MBBS झाल्यानंतर UPSC परीक्षेत देशात पहिला आला. या वेळचा निकाल बघिता वेगवेगळ्या सामाजिक आणि आर्थिक स्तरातील मुलांना चांगले रँक मिळून पास होऊन त्यांचे IAS किंवा तत्सम होण्याचे स्वप्न पूर्ण होत आहे. वेगवेगळ्या शैक्षणिक पार्श्वभूमी असलेली मंडळी UPSC साठी आपले प्रयत्न नेटाने करून आपला मार्ग चोखाळत आहेत. UPSC परीक्षेमध्ये या सर्वांच्या बुद्धीमत्तेचा, ज्ञानाचा, निर्णयक्षमतेचा आणि प्रसंगावधानाचा कस लागत आहे. परीक्षा निश्चितच भारतातील सर्वोतकष्ट आहे.
परंतु एक गोष्ट त्यामध्ये तपासली जाऊ शकत नाही. ती म्हणजे देशप्रेम, माणुसकी, निर्भीड आणि निर्भयपणा. भारतात सरकारी नोकरीं साठी IAS किंवा तत्सम ही सर्वोच्च डिग्री असून देशाच्या प्रशासनात त्या IAS वर्गाचा मोठा सहभाग आहे. त्यांनी घेतलेल्या योग्य निर्णयाना सेंट्रल ऍडमिनिस्ट्रेटिव्ह त्रिबूनल ( CAT ) आणि डिपार्टमेंट ऑफ पर्सनल अँड ट्रेनिंग ( DoPt) अश्या दोन ऑथॉरिटी कडुन पाठिंबा असतो, असे असताना अनेक IAS ऑफिसर व्यक्तिगत स्वार्थासाठी, राजकीय दबावापोटी, प्रलोभन किंवा quid pro quo निर्णय घेताना दिसतात अशा वेळी जनतेचे आणि पर्यायाने देशाचे हित खुन्टीवर टांगले जाते.
नुकतेच योगेश सागर ह्या भाजप आमदाराने भर विधानसभेत BMC मधील भ्रष्ट IAS अधिकारी रोड कॉन्ट्रॅक्टर आणि सेवा पुरवठेदारांना खोटी कागदपत्र तयार करून कसे झुकते माप देतात याचे उदाहरण देत BMC मधील भ्रष्टाचाराची SIT चौकशीची मागणी केली. विशेष म्हणजे संपूर्ण जग डबल एंट्री अकाउंटिंग करत असताना BMC मध्ये वर्षानुवर्षे भ्रष्टाचाराला वाव देणारे सिंगल एंट्री अकॉउंटिंग चालते ते बदलण्याची हिंमत कोणत्याही कमिशनरने केली नाही. वर्षानुवर्षे मिठी नदी आणि इतर नाल्यामधील गाळ काढतना झालेला भ्रष्टाचार दरवर्षी पेपर आणि राजकीय सभा मध्ये चर्चीला जातो पण तेथेही हे IAS असलेले कमिशनर मूग गिळून बसतात. या उलट कोर्टाची ऑर्डर आली म्हणत गल्ली बोळातील गरीब फेरीवाल्याना अचानक धाड घालत त्यांचा माल जप्त करीत त्यांना नुकसान पोहोचवण्यात BMC धन्यता मानते. अनधिकृत बांधकामे तोडताना आपल्या पक्षाची किंवा हितसंबंधित वरिष्टांची बांधकामे सुरक्षित केली जातात. अतिक्रमण केलेले सरकारी प्लॉट जास्त किंमत देऊन विकत घेतले जातात.
मग अशा IAS ऑफिसरच्या बुद्धिमत्तेचा देशाला आणि जनतेला काय उपयोग?. सर्वच IAS ऑफिसर भ्रस्टाचारी असतात असे माझे म्हणणे नाही. या उलट तुकाराम मुंडे सारखे कर्तव्य दक्ष अधिकारी कायद्यात राहून आपले कर्तव्य पार पडत असताना त्यांची वारंवार बदली केली जाते. IAS पास होणे म्हणजे एक गुबगुबीत गादी असलेली मानाची खुर्ची, बंगला, गाडी, नोकरचाकर असलेल्या एका प्रशासकीय पिंजऱ्यात बंदिस्त होणे आणि त्या सिस्टीमचे तुम्ही नकळत गुलाम होता. ज्याला हा पिंजरा पसंत नाही किंवा जों तो तोडायला बघतो त्याला वेगवेगळ्या प्रकारे अध्यरुत शिक्षा केली जाते.
देशसेवेसाठी IAS बनून प्रशासकीय सेवेत जाणारे थोडेच असतात. बाकी सर्व आपापल्या विशिष्ठ उदिष्टाने येथे येत असतात.
UPSC विद्यार्थ्यांची निवड करताना ह्या गोष्टी कशा बघितल्या जातील याचा सुद्धा विचार करायला हवा. UPSC ची निवड प्रक्रिया अजून सखोल करायला हवी म्हणजे उडीदा माजी काळे गोरे असतील तर त्यातले निदान खडे तरी निघून जावेत.
माधव भोळे