Saturday, March 14, 2026

भाजपा आणि नेहरू खानदान

भाजपा आणि नेहरू खानदान 

मोदी पंतप्रधान झाल्यापासून गेले काही वर्ष संसदेमध्ये जेव्हा केव्हा संधी मिळेल तेव्हा नेहरू, इंदिरा गांधी आणि सोनिया गांधी यांचा उद्धार करत संसदेत चर्चा होत असते. मग ते नेहरूचे एडविना माउंट बॅटन संबंध असोत की इंदिरा गांधी यांचे प्लॅनिंग कमिशनला खेचर वाहतूकीसंबंधि पत्र असो. त्यात जर सरदार पटेल चर्चेमध्ये आले तर मोदीजींना आणखीच रंग चढतो आणि अर्धा तासाचे भाषण १ तास लांबते.


काल तर निशिकांत दुबे ह्या भाजपच्या उच्च शिक्षित खासदारांने पामेला माउंटबॅटन ह्यांच्या पुस्तकातील एक उतारा वाचून दाखवत गांधींच्या जाण्याच्या दुःखाने नेहरू एक पूर्ण दिवस एडविना माउंटबॅटन ह्यांच्या सोबत एका बंद खोलीत शोक करत बसले होते असे विधान केले. 


जे काही ही सन्माननीय मंडळी सांगत असतात ते झालेही असेल पण ही सर्व इतिहासातील ( पुराणातील ऐवजी इतिहासातील ) वांगी उकरून भारताची प्रगती कशी होईल? संसद म्हणजे फक्त उखाळ्या पाखळ्या काढण्याची गावची चावडी आहे का? संसद म्हणजे  तुम्ही जास्त चुका केल्यात आम्ही कमी चुका करतो हे अभिमानाने सांगण्याचे व्यासपीठ आहे का? 


गेले काही वर्ष संसदेचे अधिवेशनाचा एक पॅटर्न ठरला आहे. तो म्हणजे कोणत्या तरी एका पक्षाने ( सत्ताधारी किंवा विरोधी पक्ष) काहीतरी अधिवेशनाशी असंबंधित वेगळेच इश्यू काढायचा, आणि मग दुसऱ्या बाजूने भडकाऊ भाषणे करायची, अध्यक्षाने हस्तक्षेप करत संसदेला आळा घालतोय असे दाखवायचे, मग निर्दशने, सभात्याग आणि संसद पायऱ्यावर घोषणाबाजी. प्रश्नोतर तासाच्या वेळी संबंधित मंत्र्यांची गैर हजेरी त्यावरून गदारोळ. तेथपर्यंत अधिवेशनाच्या कामकाजचे दिवस फुकट जातात. मग शेवटच्या दोन दिवसात ओढून ताणून उपस्थिती किंवा विरोधी पक्षाची गैरहजेरी असताना कोणतीही चर्चा न करता आवाजी मतदानाने ठराव मंजूर करून घ्यायचे. 


सत्ताधारी ह्यामध्येच भूषण मानतो की चर्चा न होता ठराव कसे पास करवून घेतले!. विरोधी पक्षाना कसे मूर्ख बनवले? तुम्ही विरोधी पक्षालाच नाही तर जनतेला मूर्ख करत आहात. आपल्या अंतरात्म्यास मूर्ख बनवत आहात. 


संसद हे कायदे मंडळ आहे. देशाचे दिशा दर्शक मंडळ आहे. संसदेत मंजूर झालेले कायद्यांचा संपुर्ण जनतेवर अमूलाग्र परिणाम होत असतो. युवक, महिला, वंचित इत्यादी वर्गाची प्रगती अशा कायद्यांवर, सुधारणानवर अवलंबुन असते. कायदे देशातील नागरिकांना सक्षम बनवतो आणि गुन्हेगारांना शिक्षा करीत असतो. संसदेतील चर्चा देशाच्या विकास आणि प्रगतीचा आराखडा बनवत असते. अशा वेळी फालतू विषयात आपला बहूमूल्य वेळ घालवून देशातील तरुणांना तुम्ही काय आदर्श ठेवणार आहात? 


वाजपेयी, नाथपै, मधू दंडवते, इंद्रजित सिंग सारख्या संसद पटूनी देशाची संसद आपल्या विचारांनी आणि अमोघ वक्तृत्वने गाजवली. आपल्याकडूनही तेच अपेक्षित आहे. कोणाच्या विचारांचे बाहुले बनण्यापेक्षा आपला आदर्श निर्माण करा. दुसऱ्या पेक्षा आपली कद मोठी करायची असेल तर आपली रेष मोठी करायची असेल तर तसें विचार मांडा. मी अमूक वेळा संसदेत गेलो, तमुक वेळा मंत्री झालो, तमुक वेळा संसदरत्न पुरस्कार मिळाला ह्या पेक्षा माझ्या कामाचा देशाला आणि पर्यायाने जनतेला, लोकशाहीला किती फायदा झाला हे महत्वाचे आहे.  आपण करत असलेल्या कार्याचा देशाच्या प्रगती वर किती परिणाम झाला? 


आज ईराण युद्धमुळे आत्मनिर्भर भारतची आणि ऊर्जा सुरक्षा कवचाचीं कशी धच्चीया उडाली आहे ते आपण बघतच आहात. LPG, CNG, क्रूड ऑइल सारख्या ऊर्जा देणाऱ्या पदार्थाबाबत आपण ८०% आयातीवर अवलंबुन आहोत. १० दिवस उद्ध चालले तर कमर्शीयल LPG चा तुटवडा तयार झाला आणि मुंबईतील आणि देशातील २०% रेस्टॉरंट बंद झाली. रेस्टॉरंट मध्ये सुद्धा भारतातील माणसेच जेवतात ना? नोकरीं साठी दुसऱ्या गावी गेलेली मुले आणि कामगार यांना हॉटेल शिवाय पर्याय आहे का? शिवाय त्यामुळे इंडस्ट्रियल गॅस वापर ठप्प होऊन त्याचा उत्पादनावर परिणाम होत आहे. 


तुम्हांला देशाचे प्रश्न सोडवायचे आहेत की पाठचे घासून पुसून सपाट झालेले विषय उकरून लोकांची दिशाभूल करायची आहे ते ठरवा.


माधव भोळे 


No comments:

Post a Comment