प्रा. सुरेश द्वादशिवार, एक अजब व्यक्तीमत्व !!
काल आणीबाणी ह्या विषयावर प्रा. सुरेश द्वादाशिवार ह्या शिक्षित व्यक्तीचे आणीबाणीबद्दलचे विचार यु ट्यूब वर ऐकत होतो. सुरेश द्वादाशिवार हे लोकमत ह्या काँग्रेस धार्जीण्या प्रसिद्ध दैनिकाचे माजी संपादक आहेत. सुरेशराव हे उच्चशिक्षित परंतु एकांगी विचार करणारी व्यक्ती मी प्रथमच ऐकत होतो ( लिंक https://youtu.be/RaDIm-35oWo?si=JCXlIhUVmwVvPEIx )
त्या मध्ये त्यानी केलेली काही धक्कादायक विधाने खालील प्रमाणे,
A) सुरेशराव म्हणतात आणीबाणी वाईटच त्याचे मी समर्थन करीत नाही पण आणीबाणी लावण्यामागील कारणे सुद्धा समजून घ्यायला हवीत. प्रमुख कारण १९७३ मधील नवंनिर्माण आंदोलन त्याला जयप्रकाशचा पाठिंबा आणि जयप्रकाशाना नानाजी देशमुखचा ( पर्यायाने रा. स्व. संघाचा ) पाठिंबा, डायनामाईट केस आणि अलाहाबाद हायकोर्टाचा इंदिरा गांधींच्या निवडणुकीबाबत निर्णय. हे सर्वश्रुत आहे की प्रत्यक्षात आणीबाणी घोषित होण्याचे मुख्य कारण की इंदिरा गांधींचे सत्तेला चिकटून राहणे. ते म्हणतात इंदिराजी राजीनामा द्यायला तयार होत्या पण सुरेशराव आणीबाणीचा सर्व दोष सिद्धार्थ शंकर रे, सी सुब्रमणियम आणि इंदिरा गांधींच्या इतर सहकाऱ्यांना देतात. सुरेशराव सोयीस्कररित्या विसरतात की "राजा कालस्य कारणम" आणि सहकार्याच्या चुकीच्या विचारांना खतपाणी घालण्याव्हड्या एवढ्या इंदिराजी नक्कीच अबला नव्हत्या.
B) सुरेशराव म्हणतात नानाजी देशमुख सारख्या अतिरेकी व्यक्तीचा जयप्रकाश नारायण यांच्या जनआंदोलनाला पाठिंबा होता. नानाजी देशमुख यांना अतिरेकी म्हणताना त्यांनी सांगितले की गांधींचा खून करण्यासाठी नथुराम गोडसेला नानाजी देशमुखानी पिस्तूल पुरवले. आणि नानाजी देशमुख गांधी खून खटल्यात ८ वे आरोपी होते.
सत्य असे आहे की गांधीजींच्या खुनासाठी वापरलेले पिस्तूल Beretta M1934 हे ग्वाल्हेरच्या आयुर्वेदिक डॉक्टर दत्तात्रय परचुरे यांनी पुरवले. पुढे डॉ. दत्तात्रय परचुरे यांना जन्मठेप झाली. गांधी खून खटल्यातील प्रमुख आरोपी १) नथुराम गोडसे ( फाशी ) २) नारायण आपटे ( फाशी ) ३) विष्णु करकरे ( जन्मठेप ) ४) मदनलाल पहावा ( जन्मठेप ) ५) शंकर किस्ताईया ( जन्मठेप, अपिलात सुटका ) ६) गोपाळ गोडसे ( जन्मठेप पुढे सुटका ) ७) विनायक दामोदर सावरकर ( पुराव्या अभावी निर्दोष सुटका ) ८) डॉ. दत्तात्रय परचुरे ( जन्मठेप, अपिलात सुटका ) ९) गंगाधर दंडवते ( फरार ) १०) गंगाधर जाधव ( फरार ) ११) सूर्यदेव शर्मा ( फरार ) १२) दिगंबर बागडे ( माफिचा साक्षीदार ). नानाजी देशमुख यांचे नांव गांधी खून खटल्यात आल्याचे कोणीच वाचले नाही, ह्यांनी कुठे वाचले ते माहिती नाही. हा जाणून बोजून पसरवत असलेला खोटा इतिहास.
C) सुरेशराव म्हणतात जरी इंदिरा गांधींनी आणीबाणी लावली असली तरी इंदिरा गांधींचा स्वभाव मुळात हुकूमशाही नव्हता. हे पटवण्यासाठी उदाहरण देताना त्यांनी सांगितले की सिमला कराराच्या वेळी इंदिराजींनी भूत्तो ना दोन पर्याय दिले होते. एक ८०,००० सैनिक ताब्यात घ्या किंवा आम्ही जिंकलेला भुभाग ताब्यात घ्या. भूत्तोनी भुभाग मागितला आणि इंदिरा गांधींनी तो दिला आणि काही दिवसांनी सर्व सैनिक पण परत केले.
भूत्तो ना कोणी तरी विचारले की तुम्ही माणसे न मागता जमीन कशी परत मागितलीत? ते म्हणाले इंदिरा गांधी एक आई आहे ती सैनिकांशी वाईट वागणार नाही ही खात्री आहे. इंदिरा गांधींचे उदात्तीकरण करताना सुरेशराव म्हणाले इंदिरा गांधीकडे मातृत्व होते.
आमचे म्हणणे : असे xx लोक एखाद्या प्रसंगाचा आपल्याला सोयीस्कर अर्थ कसा लावतात याचेच आश्चर्य वाटते. आधी असा पर्याय भूत्तो यांना देणे हीच मुळात चूक होती. एका पर्याया प्रमाणे ८०,००० सैनिक सांभाळत बसलो असतो तर अंतरराष्ट्रीय नियमानुसार त्यांच्या जेवणखाणाचा प्रश्न, सुरक्षा इत्यादीच खर्च हा भारतावर बोजा होता उलट जमीन ताब्यात असती तर त्यातील उत्पन्न सुद्धा आपले झाले असते.
आपला फायदा होत असेल तर भूत्तोना इंदिरा गांधींना माता म्हणायला काय जात होते? त्यांनी जमीन पण घेतली आणि सैनिक पण घेतले. भारताला ह्या करारा फार काही फायदा झाला नाही. भारताने ह्या करारातून १३,००० sq km एव्हडा भुभाग पाकिस्तानला परत केला आणि फक्त ८८३ sq km महत्वाचा भाग स्वतःकडे ठेवला. लाईन ऑफ कंट्रोल कायम झाली पण काश्मीर प्रश्नाचा कायम तोडगा मिळाला नाही. फक्त हा प्रश्न त्रयसस्थाच्या मध्यस्थीशिवाय सोडवण्याचे आश्वासन मिळाले. बांगलादेश स्वतंत्र झाला एव्हडेच. गाजलेले स्टेट बँक ऑफ इंडिया रोखपाल मल्होत्रा प्रकरण किंवा ललित नारायण मिश्रा यांची हत्या या बद्दल सुरेशराव गप्प दिसले.
इंदिरा गांधी आणि नेहरू बद्दल आत्मीयता असायला हरकत नाही, आमची सुद्धा आहे, पण जे चूक ते चूकच आणि बरोबर ते बरोबर. इंदिरा गांधी माता होत्या पण त्या संजय गांधींच्या माता कारण तुर्कमान गेट मधील झालेल्या गोळीबाराबद्दल इंदिरागांधींनी काही प्रतिक्रिया दिलेली ऐकली नाही.
D) सुरेशरावांचा सावरकर, रा. स्व. संघ यांचेवर विशेष राग आहे. त्यांचे मते हा एक उच्चवर्णीय, उच्च कुलोत्पन्न मंडळींचा ग्रुप आहे. महात्मा गांधींबद्दल दुसऱ्या एका व्हिडिओ मध्ये ते म्हणतात. सावरकरांचा प्रभाव असल्यामुळे महात्मा गांधी महाराष्ट्राला कळलेच नाहीत. महात्मा गांधीसारख्या महान नेत्याबद्दल ह्या उच्चभ्रू मंडळींना घृणा आहे. ते म्हणतात की दुर्दैव असे की महात्मा गांधींवर मराठी मध्ये एकही चरित्र नाही किंवा नथुराम गोडसेने महात्मा गांधींची हत्या का केली याचे निट वर्णन नाही. ती कशी केली याबद्दल लिहिले आहे पण का केली या बद्धल नाही.
सत्य : १) अवंतिकाबाई गोखले यांनी १९१८ साली महात्मा गांधीबद्दल पहिले चरित्र लिहिले. सुदैवाने त्या उच्च कुलीन होत्या.
२) वि. स. खांडेकर यांनी सुद्धा "दुसरा प्रॉमिथियस - महात्मा गांधी" हे पुस्तक मराठीत लिहिले आहे. प्रॉमिथियस म्हणजे: मानवी कल्याणासाठी यातना सोसणारा. किंवा मानवअधिकारासाठी झगडणारा ग्रीक पौराणिक व्यक्ती.
३) महात्मा गांधी नक्कीच मोठे आणि जागतिक दर्जाचे भारतीय नेते होते आणि आणि त्यांच्याबद्दल मराठी लेखकांना विसर पडला ही गोष्ट काही प्रमाणात खरी आहे परंतु स्वतः गांधींचे "सत्याचे प्रयोग" हे अनुवादित आत्मचरित्र तसेच इतर भाषांमधून मराठीमध्ये गांधींवर अनुवादित खूप चरित्र प्रकाशित झाली आहेत. आणि हो त्यांच्याबद्दल चरित्र लिहायला सुरेशरावांना कोणी थांबवले होते किंवा आहे?.
चरित्र आणि आत्मचरित्र मधील फरक हाच असतो की चरित्रामध्ये त्या व्यक्तीचे काटेकोर मूल्यमापन होते आणि ते निष्पक्ष असावे लागते. सुरेशरावांना स्वतःला खात्री नसावी की ते एखाद्या विषयांचे निष्पक्ष विवेचन करू शकतील.
आता राहिला प्रश्न गांधीजींची हत्या का झाली याची कारण मिमांसा मराठी लेखकांनी केलेली नाही असे ते म्हणतात. नथुराम गोडसे यांचे बंधू आणि गांधी खून खटल्यातील एक गुन्हेगार श्री गोपाळ गोडसे यांनी लिहिलेले ५५ कोटींचे बळी हे पुस्तक तसेच प्रदीप दळवी लिखित "मी नथुराम गोडसे बोलतोय" हे नाटक सुरेश रावांच्या प्रश्नांची उत्तरे देतात.
मी स्वतः गांधी हत्येचे समर्थन करीत नाही तसेच संघाला त्या विषयात जबाबदार धरीत नाही. परंतु सुरेशराव ज्या पद्धतीने इतिहास मांडतात तो चुकीचा आहे हे सांगण्यासाठी ही पोस्ट लिहिली आहे.
ऍड असीम सरोदे, कुमार सप्तर्षी सारख्या मंडळीच्या संगतीत असलेल्या विद्वान सुरेशरावांकडून आपण त्यांच्याकडुन आणखी काय अपेक्षा ठेवू शकता?
माधव भोळे
No comments:
Post a Comment