Saturday, March 14, 2026

अहिंसा आणि अलिप्तता वाद

अहिंसा आणि अलिप्तता वाद 


कलिंग युद्धानंतर ज्यावेळी सम्राट अशोकाने आपल्या कर्तृत्वाचा आढावा घेतला त्यावेळी जरी त्याने युद्ध जिंकले असले तरी त्या युद्धामुळे मनुष्यबळ आणि अर्थव्यवस्थेची झालेली अपरिमित हानी याचा विचार करून त्याने हिसेंचा त्याग करणारा बौद्ध धर्म स्वीकारला. 


महात्मा गांधींचे गुरु गोपाळ कृष्ण गोखले, दादाभाई नवरोजी, डॉ. ऍनि बेसन्ट आणि त्यानंतर महात्मा गांधी आणि त्यांचे अनुयायी यांच्या एक गोष्ट लक्षात आली होती की त्यांच्यासमोर असलेला शत्रू बलाढ्य आहे. जगातील अनेक देशावर तो राज्य करत असून शस्त्रास्त्र आणि तंत्रज्ञान यामध्ये त्याची आघाडी आहे. १८५७ मध्ये झालेल्या भारतीयांच्या सशस्त्र उठावामुळे ब्रिटिश साम्राज्य सावध झाले असून त्यानंतर ब्रिटिशांनी भारतात कुमक वाढवलेली आहे, अशा वेळी हिंसेपेक्षा चर्चेने प्रश्न सोडवावे म्हणून त्यांनी अहिंसेचा मार्ग पत्करला. परंतु काही लोकांनी त्यांना मुर्खात काढले.


अरे म्हटले की कारे होणारच आणि जों बलवान तो दुसऱ्याची मुंडी पिरगळणार हे तर ओघाने आलेच. आज युक्रेन आणि रशिया यांच्यामधील युद्ध २४ फेब्रुवारी २०२२ पासून सुरू झाले ते आजपर्यंत सुरूच आहे. त्याची झळ युक्रेनच्या सामान्य नागरिकांना लागत असून त्यांची घरे दारे नष्ट होऊन त्यांच्या पुढील १०/ २० पिढ्यान्ची बरबादी झाली आहे. 


आज सर्व देश सांगत आहेत युद्धाने म्हणजेच हिंसेने प्रश्न सुटणार नाहीत आणि चर्चेनेच प्रश्न सुटतील. गेले काही वर्ष महात्मा गांधींच्या अहिंसा आणि नेहरूनच्या अलिप्तता वादाला सकाळ संध्याकाळ शिव्या घालणारे लोक आज युद्ध थांबवावे म्हणून ट्रम्प, इस्रायल आणि इराणकडे आशेने बघत आहेत.


भारत स्वतंत्र झाला त्यावेळी दुसरे महायुद्ध संपून नवीन जागतिक ऑर्डर तयार झाली होती. अमेरिका, युरोप हे भांडवलशाही गट एका बाजूला तर रशिया आणि चीन हे समाजवादी देश एका बाजूला. नेहरूना ह्या दोन्ही पैकी एकाही बाजूत गुंतायचे नव्हते. म्हणून त्यांनी युगोसलाविया, इंडोनेशिया, इजीप्त आणि घाना यांच्या अध्यक्षाच्या साहाय्याने Non alligned movement ( अप्लितता चळवळ ) सुरू केली. काळानुरूप ती मागे पडली असली तरी त्याचा गाभा हे अजूनही भारताच्या परराष्ट्र धोरणाचा एक महत्वाचा भाग आहे. अमेरिका, इस्रायल आणि ईराणरशिया दोन्ही गटांशी आपले मैत्रीपूर्ण संबंध आहेत. ना आपण अमेरिकेची मखलाशी करतो ना आपण रशियाचे पाय चाटतो. आपल्या देशाच्या हिताचे प्रश्न आपण स्वतः सोडवतो. पाकिस्तान आणि भारतातील काश्मीर बाबत चा संघर्षला आपण कोणाचीची मध्यस्ती नाकारली आहे. 


आज ईराण विरुद्धच्या युद्धला १४ दिवस नाही झाले तर लगेच भारतात गॅस, पेट्रोल, डिझेल टंचाईमुळे लोक हैराण व्हायला सुरवात झाली आहे. हेच युद्ध आणखी ६ महिने लांबले तर ईराण, इस्रायल आणि अमेरिका खड्यात जाईलच पण इतर देशांच्या अर्थव्यवस्थेची वाट लावून खड्यात जाईल. नुसत्या नेटवर सहनशिलतेचे पोस्ट टाकून प्रश्न सुटणार नाहीत. जेथपर्यंत आपल्याला झळ पोहोचत नाही तेथपर्यंत उपदेश करणे सोपे असते.


त्यामुळे आपल्या धुरीणानी पतकरलेले मार्ग त्या त्या काळानुरूप योग्यच होते हे न समजता टीका करायचे बंद करायला हवे असे मला वाटते.


माधव भोळे

No comments:

Post a Comment