Monday, November 17, 2025

निर्मळची जत्रा

निर्मळची जत्रा 


वसईजवळील नालासोपारा हे एक मोठे ऐतिहासिक गांव आहे. त्याचे पूर्वीचे नांव शूर्पारक असे आहे. अगदी प्राचीन काळापासून हे एक उत्कृष्ट बंदर म्हणून ओळखले जात होते. अरब आणि रोमन सम्राज्याचे व्यापारी येथून समुद्रमार्गे गलबातातून माल नें आण करीत. 


पुढे पंडित भगवानलाल इंद्रजिच्या पुढाकाराने १८८२ साली झालेल्या पुरातत्व विभागाच्या उतखननामध्ये येथील सोपारा गावाजवळ सम्राट अशोकाचा बौद्ध स्तूप आणि बौद्ध भिक्षुकांची भिक्षा पात्रे, सोन्याची नाणी, सुवर्णं फुले, चांदीची भांडी इत्यादी वस्तू मिळाल्या. ( त्या एशियाटीक सोसायटी फोर्ट येथे ठेवल्या आहेत. ). 


असे म्हणतात सम्राट अशोकाने बौद्ध धर्माच्या प्रसारासाठी गावोगाव बौद्ध भिक्षुकांच्या फौजाच्या फौजा पाठवल्या होत्या त्यातील काही भिक्षुक जोगेश्वरी गुंफा ( ज्या पुढे योगेश्वरी देवीच्या मंदिरात परिवर्तीत केल्या गेल्या), बोरिवली ईस्ट कान्हेरी गुंफा, बोरिवली पश्चिम मंडपेश्वर येथे रहात होते. काही ह्या सोपारा भागात वास्तव्य करुन होते. त्याकाळी त्या बौद्ध भिक्षुनी तेथे वास्तव्य असलेल्या वसई,नालासोपारा, विरार भागात तेथील नागरिकांचे खूप धर्मांतरण केले. 


या बौद्ध आक्रमाणाला उत्तर देण्यासाठी हिंदूं धर्माने सुद्धा महाप्रयत्न केले. त्याचाच एक भाग म्हणून जगन्नाथ पुरी येथील ५ वे शंकराचार्य जगदगुरू स्वामी विद्यारण्य आपल्या नालासोपाऱ्या जवळील निर्मळ गावात १९ वर्ष वास्तव्य करून होते आणि तेथेच त्यांचे महानिर्वाण झाले. 


ज्या ठिकाणी त्या शंकराचार्यांची समाधी आहे तेथे एका बाजूला शंकर पार्वती आणि दुसऱ्या बाजूला लक्ष्मी विष्णु अशी दोन छोटी देवळे आहेत. हे सर्व ज्या मंदिर आवारात आहे ते मंदिर प्रथम चालुक्य राजाने आणि नंतर पुढे वसई वर विजय मिळवल्या नंतर चिमाजी अप्पा यांनी बांधले.


ज्या नागरिकांना शंकरचार्या नी बौद्ध धर्मातून हिंदू धर्मात परत आणलेले ते सर्व सामवेदि झाले. त्याचा अपभ्रमश म्हणजे समेधी होय.


दर कार्तिक कृष्ण एकादशी पासून तेथे १५ दिवस जत्रा भरते. या वर्षी ती दिनांक १५ नोव्हेंबर २०२५ ला सुरू झाली. त्या जत्रेला जाण्याचा योग काल १६.११.२५ रोजी माझे मित्र श्री प्रकाश वीरकर, विरार आणि श्री विशाल वीरकर, नाला सोपारा यांच्या सहकार्यामुळे आला. 


मुंबई शहराजवळ असून सुद्धा निर्मळ गांव अजून काही प्रमाणात गावासारखेच असून जवळच एक मोठा नैसर्गिक गोड्या पाण्याचा निर्मळ तलाव आहे शिवाय गावात कमीतकमी ६/७ छोटे गोड्या पाण्याचे तलाव आहेत. तेथून जवळच कळंबचा समुद्र किनारा आहे. स्वच्छ हवा आणि भरपूर उजेड असलेल्या ह्या भागात वातावरण आल्हाददाई होते. 


जत्रेला विविध स्थानिक खाद्य प्रकार, वेगवेगळी खेळणी, कणगरे, काटेकरंदे, कोनफळी कंद, सुकलेली सुकेळी इत्यादी रानमेवा, गृह वस्तूइत्यादी विकण्यासाठी सुमारे २५० ते ३०० स्टॉल होते तसेच मोठा फिरता पाळणा, आणि मेरी गो राउंड चक्र वगैरे बच्चे कंपनीचे आकर्षण होते.


नालासोपारा पश्चिम स्टेशन पासून २५१ नंबरची विसई विरार महापालिकेची बस निर्मळ नाक्याला आपल्याला सोडते तेथून ५ ते ७ मिनिटे चालत हे शंकराचार्य समाधी मंदिर आहे. शिवाय शेयर रिक्षा स्टेशन ते सोपारा आणि सोपारा ते निर्मळ अशा जातं असतात.


आपणांस शक्य असेल तर एकदा जरूर भेट द्या.


माधव भोळे 

No comments:

Post a Comment