देवानंतर दुसरे देव म्हणजे डॉक्टरच!
२०२० मधील गोष्ट. लंडन मधील जेस नावाचा मुलगा ज्याची दृष्टी जन्मताच कमजोर होती. डोळ्यातील बाहुलीच्या पाठी असलेला पडदा ज्याला रेटीना असे म्हणतात ज्यावर समोर दिसणाऱ्या वस्तूची रंगीत प्रतिमा पडते आणि त्या प्रतिमेतील रंग, उजेड तीव्रता तसेच वेगवेगळे आकार याच्याबद्दल संदेश एका तारसदृश अवयवाचे द्वारे मेंदू पर्यंत पोहचवून मेंदू दृश्य बघू शकतो तो पडदा म्हणजे रेटीना. त्या रेटीना मधील फोटो सेन्सिटिव्ह ( उजेड संवेदनशिल) पेशी आकार्यक्षम झाल्यामुळे जेसची दृष्टी दिवसेंदिवस कमी होत चालली होती.
अशा वेळी ग्रेट ओरंमोंड स्ट्रीट हॉस्पिटल आणि मुरफिल्ड आय हॉस्पिटल जे दोन्ही हॉस्पिटल लहान मुले आणि डोळ्यासंबंधित संशोधन क्षेत्रात जगात अग्रगण्य आहेत त्यांनी जेसच्या डोळ्यावर एक अतिशय नाजूक अशी शस्त्रक्रिया करण्याचे ठरवले. त्यांनी एका अतिसूक्ष्म छिद्राच्या सहायने इंजेक्शन द्वारे AIPL 1 नावाचे बीज सूत्र ( जिन gene ) त्याच्या एका डोळ्याच्या रेटीना मध्ये घुसवले. आपल्या बीज सूत्रांमध्ये एक सूत्र असे असते की जे उजेड संवेदनशील असते. तेच AIPL 1. ( The photoreceptor/pineal-expressed gene, AIPL1, encoding aryl-hydrocarbon interacting protein-like 1).
ह्या मुळे हळू हळू जेसच्या रेटीना मधील मूळ असलेल्या मृतवत उजेड संवेदनशील पेशी कार्यरत होऊ लागल्या आणि त्याला आकार समजायला लागले, रंग समजायला लागले आणि तो वस्तू ओळखायला लागला. त्याची दृष्टी अजूनही एकदम पूर्ववत झाली नसली तरी त्यात बरीच सुधारणा होत आहे.
अशा प्रकारे नवनवीन प्रयोग करून माणसाचा ईह लोकीचा प्रवास सुखकर करणारे, त्यांना त्यांच्या शारीरिक समस्या सोडवून बळ देणारे असे डॉक्टर हे देवाचाच अवतार म्हणायला काय हरकत आहे?
माधव भोळे
No comments:
Post a Comment