Friday, September 26, 2025

आधुनिक महंमद तुघलक

आधुनिक महंमद तुघलक

गेल्या २ दिवसात ट्रम्प तात्याने दिनांक २२.०९.२०२५ पासून  H1B विसा ( रोजगार विसा ) वर वार्षिक १ लाख डॉलर्सची फी लावली आणि संपूर्ण सोशल मीडिया त्याच्या ह्या अध्यक्षीय अध्यादेशा भोवती नाचू लागली. ट्रम्प च्या आदेशामुळे अमेरिकन कंपन्या भारतात आपली गुंतवणूक वाढवतील आणि भारतीय आय टी इंडस्ट्रीला पुन्हा पालवी फुटेल इथं पासून ते अमेरिकेतील ३ लाख भारतीय लोकांना पुढील ३ वर्षात आपल्या नोकऱ्या गमवाव्या लागतील, वगैरे वगैरे विषयावर घोळून घोळून लिहिले गेले.  ट्रम्प चे म्हणणे आहे कीं ज्या नोकऱ्या H1B वाले घेतात त्या योग्य ते प्रशिक्षण देऊन अमेरिकन लोकांना मिळाव्यात, त्या साठी त्यांनी खेळलेली ही चाल आहे. त्याने आकडेवारीनिशी दाखवून दिले कीं H1B मुळे किती अमेरीकन लोकांच्या नोकऱ्या कमी झाल्या आहेत आणि म्हणून ही पाऊले उचललि गेली आहेत.
काही प्रमाणात हे सत्य असले तरी हेच सत्य आहे असे नाही.

पण त्यांचे परिणाम सखोल आहेत.
१. दरवर्षी ३,३०,००० विध्यार्थी अमेरिकेत शिकायला जातात. त्यातील ९०% लोक ह्या आशेवर जातात कीं त्यांना अमेरिकेमध्ये नोकरी मिळेल आणि मग तेथे ग्रीन कार्ड इत्यादी मिळेल. जर H1B मिळण्याच्या शक्यता अतिशय धुसर असेल तर कोणता विद्यार्थी ५० ते ७० लाख खर्च करून अमेरिकेत शिकायला जाईल? अमेरिकेतील अनेक विद्यापीठे परदेशींय विद्यार्थ्यांच्या फी वर जगतात. त्याच बरोबर विद्यापीठाच्या त्या गावातील व्यवहार सुद्धा त्याच विद्यार्थ्यांवर अवलंबुन असतात ही सुद्धा एक बाजू आहे.

२. अमेरिकन कंपन्यांना योग्य ती प्रशिक्षित मानव संसाधने योग्य खर्चात मिळाली नाहीत तर ते आपली उत्पादने बाहेर हलवतील. विशेषतः ज्या बाबतीत तसें शक्य असेल तर ते तसें करतील. आणि तसें होऊ शकत नसेल तर त्या कंपन्यांचा उत्पादन खर्च वाढेल आणि नफा कमी होऊन अमेरिकन सरकारला कमी टॅक्स मिळेल.

३. अमेरिकन लोकांना प्रशिक्षित करायला हवे हे म्हणणे जरी तात्विक दृष्ट्या बरोबर असले तरी बेडूक फुगला म्हणून बैल होत नाही. जों बुद्धिमान नसेल त्याला तसें ट्रेनिंग देणे सोपे होणार नाही. त्यामुळे अमेरिकन कंपन्याच्या प्रगतीवर निश्चित परिणाम होऊन ते जगाच्या स्पर्धेत पाठी पडतील आणि ते अमेरिकेला परवडणार नाही.
४. अमेरिकेत एकंदर 16,33,94,000 एव्हडे लोक नोकरीं करतात.  त्या पैकी सुमारे ६ लाख लोक H1B व्हीसा वर काम करतात. म्हणजेच एकंदर नोकऱ्यांच्या फक्त  ०.३७ % एव्हडेच लोक H1B वर काम करतात. ही  संख्या अतिशय नगण्य आहे परंतु ह्या H1B वाल्या मंडळीची प्रगती इतर अमेरिकन लोकांच्या डोळ्यात भरते. तरी बरे त्याच कामाला अमेरिकन ३ पट पैसे घेतात.
५. सन २००० पूर्वी H1B कोटा फक्त ६५,००० होता तो काही काळा करीता १,१५,००० केला होता. सध्या कोटा ६५,००० + २०,००० ( अमेरिकेत मास्टर्स  शिक्षण घेतलेले ) म्हणजे एकूण ८५,००० असा आहे. म्हणजेच भारतातील ३,३०,००० लोक अमेरिकेत शिकायला जातात त्यातील फक्त २०,००० लोकांना H1B visa मिळण्याची शक्यता होती ( ह्या कोटा मध्ये सर्व देशातील नागरिक येतात. फक्त भारतीयच नाही. ). ट्रम्प सरकारने सरसकट सर्वांनां १,००,००० अमेरिकन डॉलर्स ची वार्षिक फी लावली आहे.

याच्यासारखा तुघलकी निर्णय हाच करू शकतो. या मुळे अमेरिकन हाय टेक कंपन्या, संशोधने या सर्वांना उच्च शिक्षित मॅन पॉवर दुरापास्त होणार आहे. या मुळे अमेरिकेचेच नुकसान होणार आहे.

६. रशियाला नामोहरम करण्यासाठी आणि त्यासाठी भारतावर दबाव टाकण्यासाठी भारतीय उत्पादनांवर टारीफ वाढवणे, भारतीय पेट्रोलियम प्रोडक्ट्स वर बंदी घालणे, तसें करण्यासाठी युरोपियन देशांना आपल्या गुटात ओढणे इत्यादी करत असताना ट्रम्प आत्मघातकी निर्णय घेत आहे जे कोणाच्याच फायद्याचे नाही.

ट्रम्प चे सद्याचे निर्णय म्हणजे नवरा मेला तरी चालेल पण सवत विधवा होऊन दे या सूत्रावर आधारित आहे.

लवकरच ट्रम्पच्या या आणि अशा विवादीत कृती त्याची लोकप्रियता सब झिरो ( शून्य पेक्षा ही कमी ) करतील आणि ट्रम्प एयर फोर्स वन विमानातुन हवेतून जमिनीवर विचार करेल याची मला खात्री आहे.

तो पर्यंत "If you cannot avoid it then Enjoy".

माधव भोळे

नवीन SEZ कन्सेप्ट

 नवीन SEZ कन्सेप्ट


जर अमेरिकन कंपन्याना H1B विसा वर माणसे अमेरिकेत नेणे परवडणार नसेल तर महाराष्ट्राने पुणे किंवा नवी मुंबई येथे एक नवीन SEZ ( सॉफ्टवेअर एक्स्पोर्ट झोन ) सिटी काढावी जेथे फक्त परदेशींय कंपन्या भारतीय तंत्रज्ञ घेऊन आपली कामे करतील आणि त्यांना नो इन्कम टॅक्स, नो GST फॉर 10 years. 

जर १० वर्षात कामगार संख्या दुप्पट केली तर आणखी 5 वर्ष वाढवून मिळेल. 


हे शहर एक इंटींग्रेटेड स्मार्ट सिटी हवी जेथे ऑफिस आणि घर यामध्ये अंतर फक्त १५ मिनिटाचे असावे. म्हणजेच त्या शहरात राहणाच्या जागा, ऑफिसेस, डेटा सेंटर्स, स्पोर्ट्स कॉम्प्लेक्सस , बगीचे, लायब्ररी, शॉपिंग मॉल्स, जिम, थियटर इत्यादी सर्व असायला हवे. कमीत कमी ३,००,००० लोक वस्ती सहज माऊ शकेल असे हवे.


जर सरकारने मनात आणले तर ते शक्य आहे. जर गुजरात सरकार GIFT city बांधू शकते तर महाराष्ट्र का नाही करू शकत?


माधव भोळे 

Thursday, September 18, 2025

इंजिनियर्स डे आणि कवित्व

इंजिनियर्स डे आणि कवित्व 


कालच्या इंजिनियर्स डे निमित्ताने  bhogle s suchitchandra यांनी स्वतः इंजिनियर आहे म्हणून लेख लिहितो आहे असे म्हणून रस्ता बनवणाऱ्या इंजिनियरांवर एक विडंबनपर लेख लिहिला तो वाचायला मिळाला. त्यात त्यांनी इंजिनियर लोक डॉक्टरांपेक्षा किती महत्वाचे असून रोजगार निर्मितीमध्ये त्यांचा किती मोठा वाटा आहे असे म्हणत खराब रस्त्यामुळे गाड्यांची स्पेयर पार्टची चालणारी दुकानें, पंक्चर वाले, ओरथ्रोपेडिक सर्जन, आयुर्वेद आणि पंचकर्म यांचे चालणारे दवाखाने, विमा कंपन्या इत्यादी रोजगार निर्मिती होते असे लिहून म्हणत "कुऱ्हाडीचा दांडा गोतांस काळ" म्हणतात तसें सध्या सुरू असलेल्या पितृपक्षात आपल्याच कुळाचा  उद्धार केला.


पण इंग्रजी मध्ये एक म्हण आहे "beauty is in the beholder's eyes" किंवा "दृष्टी तशी श्रुष्टि". 


त्या लेखक महाशयाना,  रेल्वे गाडीचा आवाज अचानक बदलला म्हणजे रेल्वे लाईनला तडा गेला आहे असे ठामपणे सांगून शेकडो प्रवाश्यांचे जीव वाचवणारा, ज्यांनी मैसूर जवळील कृष्णराजा सागर धरण बांधताना  भारतात प्रथमच स्वयंचलित पूर नियंत्रक दरवाजे निर्माण करून बसवले आणि ज्यांच्या नावाने आपण इंजिनियर्स डे साजरा करतो ते भारतरत्न  सर विशवेश्वरैया आठवले नाहीत!


त्यांना, वाफेचे इंजिन तयार करणारा जेम्स वॉट आठवला नाही, कीं इलेक्ट्रिकचा शोध लावणारा आणि त्याचा उपयोग करत संपूर्ण मानव जातीवर उपकार करणारा थॉमस अलवा एडिसन आठवला नाही. अत्याधुनिक शस्त्रक्रिया करून मानव जातीवर उपकार करण्यासाठी डॉक्टरांना लागणारी अत्याधुनिक यंत्रे तयार करणारे बायोमेडिकल इंजिनियर आठवले नाहीत?


त्याना काश्मीर सारख्या अतिशय थंड प्रदेशात थंडी पावसात भर जंगलात उभे राहून चेनाब नदीवरचा पूल बांधणारे आणि त्या पुलाचे अतिशय कल्पक आणि अत्याधुनिक तंत्रज्ञान तयार करून वापरणारे इंजिनियर आठवले नाहीत?


त्याना अंतराळामध्ये अडकलेल्या सुनीता विलीयम्स आणि बक विलमोर यांना सुखरूपपणे पृथ्वीवर परत अणणारे स्पेसएक्स क्रू ड्रगन स्पेसक्राफ्ट तयार करणारे इंजिनियर आठवले नाहीत?


अशी अनेक उदाहरणे देता येतील ज्यामुळे इंजिनियर्सनी मानव जातीसाठी चांगले काम केले आहे.


पण लेखकाला फक्त रस्ते बांधणी इंजिनियर आठवला ज्याचे यश, अपयश भारतात किंवा आपल्या महाराष्ट्रात तरी राजकारणी, नोकरशहा, स्थानिक गुंड इत्यादी बाह्य घटकांवर अवलंबुन आहे. तो बिचारा ह्या सर्व व्यवस्थेचा घटक आणि बळी आहे ज्याला नागरिक म्हणून आपण तितकेच जबाबदार आहोत, पण बळी मात्र त्याचा?


बिचारा वर्षभर शिव्या खातच असेल पण त्याच्या हक्काच्या दिवशी तरी त्याला मोकळा श्वास आनंदाने घेऊ ध्या.


असो आपण सर्व माझ्या बरोबर हॅपी इंजिनयर्स डे म्हणू या आणि त्यांच्या विद्वात्तेला आणि महत कार्याला प्रणाम करूया.


माधव भोळे 

Monday, September 8, 2025

पर्यावरण पूरक गणपती

 पर्यावरण पूरक गणपती


आज गिरगांव आणि जुहू चौपाटी येथील गणेश विसर्जनाचे काही फोटो बघितले. समुद्राचे कसे आहे, तो तारंगणारी कोणतीही वस्तू पोटात ठेवत नाही उलट किनाऱ्याकडे परत फेकतो. काल विसर्जन झालेल्या PoP ( Plaster of Paris ) च्या मूर्ती न विरघळ्यामुळे त्यांचे वेगवेगळे अवयव तुटलेल्या, रंग उतरलेल्या मूर्ती किनाऱ्यावर भग्न अवस्थेत बघायला मिळाल्या. 


ज्या मूर्ती आपण सन्मानाने घरी आणतो, देव म्हणून त्याची पूजा करतो त्याची अशी वाईट अवस्था बघितल्यावर कसे वाटेल? आपले कोठेतरी चुकतंय का? 


मूळ शास्त्रात पार्थिव गणेशाची पूजा असे सांगितले आहे. म्हणजे माती पासून तयार करून मतिमध्ये परत मिसळेल अशी मूर्ती पुजायला हवी. पण देखावे, भव्यता, उत्सव आणि उत्साह, स्टाईल या सारख्या बाह्य आकर्षणा साठी आपण PoP च्या मूर्ती विकत घेतो. पण त्याचे काय परीणाम असतात ते अनंत चतुर्थीच्या दुसऱ्या दिवशी चौपाटी किंवा अन्य तलावाजवळ जाऊन बघावे म्हणजे कळेल कीं त्या मूर्तिची काय आणि कशी विल्हेवाट लावली जाते.


त्याच बरोबर आरास करताना शक्यतो थर्माकोल वापरण्या ऐवजी कागद किंवा पुठ्ठा वापरावा कीं ज्याचा पुनर्वापर ( Recycling ). होऊ शकतो.


या बाबतीत काही मंडळींनी झाड्यांच्या बिया असलेल्या मातीपासून गणपतीच्या मूर्ती बनवल्या ज्या विसर्जनानंतर ती माती परत कुंडी मध्ये किंवा अंगणात मिसळली जाते आणि त्या पासून नवीन झाडें निर्माण होतात.


आपण खरोखरचं गणेश भक्त असाल तर या वर नक्की विचार कराल...!!


माधव भोळे



Saturday, September 6, 2025

फडणवीस सरकारचा कामगार विरोधी निर्णय!

फडणवीस सरकारचा कामगार विरोधी निर्णय!


काल फडणवीस सरकारने एक अंत्यत दुर्दैवी असा कामगार विरोधी निर्णय घेऊन खाजगी आस्थापनातील दुकानें आणि फॅक्टरी मधील कामगारांच्या कामाचे तास वाढवले. 


दुकानामध्ये ९ तासाच्या ऐवजी १० तास आणि फॅक्टरी मध्ये दररोज ९ तासाच्या ऐवजी १२ तास पर्यंत काम करण्यासाठी आणि मासिक ओव्हर टाईम लिमिट १२५ तासाऐवजी १४४ तास असा बदल फॅक्टरी ऍक्ट मध्ये केला आहे. त्यामुळे त्यांचे कामाचे तास आठवड्याला १०x ६ = ६० किंवा १२ x ६ = ७२ होणार आहे.


संपूर्ण जगातील कामगारांचे कामाचे सरासरी तास वानौटू मध्ये आठवड्याला २५ तास प्रति आठवडा तर भूतान सारख्या फक्त ८ लाख लोकसंख्या असलेल्या देशामध्ये ५४ तास प्रति आठवडा असून जगातील सरासरी कामाचे तास आठवड्याला ३५ ते ४५ असताना महाराष्ट्राने इतर राज्यातील कामगार विषयक नियमातील सुधारणाचा आधार घेत हे वरील कामाचे तास वाढवले आहेत.


भारताला प्रगतीशील बनवण्यासाठी कामगारांची पिळवणूक आवश्यक आहे का? भारतासारख्या लोकसंख्या बहुल्य देशात काम मागणारे हजारो हात काम मागत असताना त्यांना संधी द्यायची सोडून कामगारांचे कामाचे तास वाढवणे किंवा त्यांचे निवृतीचे वय वाढवणे हे अतिशय चुकीचे धोरण आहे.


जगातील अनेक तज्ञाच्या मते माणसाच्या आजारपणासाठी कामाचा ताण हा एक मोठा घटक असताना लोकांचे आयुष्यमान सुधारण्यासाठी सर्व जग "वर्क लाईफ बॅलन्स" बद्दल बोंब मारत असताना अशा प्रकारची कामाच्या तासाची वाढ करणे म्हणजे गुलामगिरीतुन सुटून परत गुलामगिरीत जाण्यासारखे आहे. देशात आणि महाराष्ट्रात इंटींग्रेटेड वसाहती ( जेथे कामाची कार्यालये आणि राहण्याची ठिकाणे एकत्र असणे ) नसल्यामुळे कामगारांना कामावर पोहोचण्यासाठी १ ते २ तास लागत असताना अशा प्रकारची वाढ करणे म्हणजे भांडवलदरांकडून होत असलेल्या कामगार शॊषण आणि पिळवणुकीला खत पाणी घालण्यासारखे आहे. 


विशेषत: हॉस्पिटल मधील नर्सेस ज्या ८ तासाची ड्युटी करतात किंवा जेथे कंटिन्यूस प्रोडक्शन असते, किंवा डायमंड कटिंग किंवा अन्य काही क्षेत्रे जेथे आणि तेल घालून काम करावे लागते तेथे हे नियम लागू केले तर ती मंडळी ५० व्या वर्षीचं निकामी होतील हे लक्षात घ्यायला हवे तसेच त्यांच्या कामाचा दर्जा सुद्धा घसरेल.


आपल्याला स्मार्ट काम करणारे कामगार हवेत कीं ओझी वाहणारे गाढवं ( हा सुद्धा गाढवाचा अपमानच आहे पण त्याला लोक तसेच वागवतात म्हणून लिहितो ) हवे आहेत? भांडवलदार आणि व्यापाऱ्यांची बाजू घेऊन केलेले हे काम निश्चितच निषेधार्थ आहे. आपल्या सारख्या सुज्ञ मुख्यमंत्र्याने या वर फेरविचार करावा म्हणून हे विनंती पत्र.


माधव भोळे

Friday, September 5, 2025

ब्रेकिंग न्यूज??

ब्रेकिंग न्यूज??

सद्या समाज माध्यमातून किंवा टीव्ही चॅनल मधून "अमेरिकेला भारताचा सर्वात मोठा धक्का", "ट्रम्पची बोलती बंद" , इत्यादी इत्यादी मथळे असलेल्या बातम्या सतत येत असतात.  अमेरिकेची ताकद काय आहे हे न कळल्यामुळे असे बालिश चाळे माध्यमे करीत असतात.
मीं देशाभिमानी परंतु डोळस भारतीय आहे.
जरा एका आकडेवारी कडे नजर टाकूया:
१) भारताचा जिडीपी ४.१९ ट्रिलीयन डॉलर्स आहे तर अमेरिकेचा ३०.५०७ ट्रिलीयन डॉलर्स म्हणजे ७.२८ पट जास्त.
२) भारताचे दर डोई उत्पन्न २९३७ डॉलर्स तर अमेरिकेचे ८९,१०५ डॉलर्स म्हणजे २९.५ पट जास्त
३) भारताचा ऐयर फोर्स २,४३० विमाने (१,३९,५७६  ऍक्टिव्ह ड्युटी फोर्स) तर अमेरिकेचा एयर फोर्स ५,२१७ फायटर विमाने (३,३०,१५९  ऍक्टिव्ह ड्युटी फोर्स )
४) भारता कडे एकंदर  १७ पारंपरिक सबमरीन आणि २ न्यूक्लीयर पॉवरड सबमरीन तर  अमेरिका ७१ न्यूक्लीयर पॉवरड सबमारिन्स आहेत.
५) भारताकडे १३५ नेव्हल शिप्स आहेत तर अमेरिकेकडे ४७० नेव्हल शिप्स आहेत.
६) भारताकडे एकंदर ५१ लाख मिलिटरी माणसे आहेत तर अमेरिकेकडे २८.६ लाख मिलिटरी माणसे आहेत. या बाबतीत भारत मोठा आहे.
७) भारताकडे १८० न्यूक्लीयर वॉर हेड्स आहेत तर अमेरिकेकडे ५५८० न्यूक्लीयर वॉर हेड्स आहेत.
८) अमेरिकेचे क्षेत्रफळ ९८ लाख वर्ग फूट तर भारताचे क्षेत्रफळ ३२.८७ लाख वर्ग फूट आहे म्हणजे अमेरिका क्षेत्रफळाने भारताच्या ३ पट  मोठा आहे.
९) अमेरिकेची लोकसंख्या ३४.७३ कोटी तर भारताची १४६.३९ कोटी आहे.
१०) अमेरिका जगामध्ये ३.२ ट्रिलीयन डॉलर्सचा एक्स्पोर्ट करते तर भारत जगात ८२४.९ बिलीयन डॉलर्स चा एक्स्पोर्ट करतो.
११) तंत्रज्ञान, आर्थिक ताकद, औद्योगिक गुंतवणूक, संशोधन, इन्फ्रा स्ट्रक्चर, शैक्षणिक प्रगती आणि विद्यापीठे इत्यादी विषयात अमेरिका भारताच्या कितीतरी पुढे आहे.

१२) गेल्या काही वर्षात भारताची कामगिरी जरी चांगली असली तरी कर्ज माफी, भ्रष्टाचार, काळा पैसा, अनियंत्रित सरकारी खर्च,  लोकशाहीचा अतिरेक या सारख्या गोष्टीमुळे अमेरिकेला मागे टाकण्यास भारताला या शतकात तरी शक्य होईल असे दिसत नाही.

मग एव्हडे असताना कोणत्या आधारवर ही मंडळी "भारताचा अमेरिकेला मोठा धक्का"  असा मथळा देऊन ब्रेकिंग न्यूज चालवतात? उगाच काहीतरी बरळत राहायचे.
त्या तात्या ट्रम्पचा एक ढिल्ला आहे पण बाकी सगळ्यांनी तरी जपून लिहायला हवे.
असो गणराया तात्या ट्रम्प ला आणी ह्या चाटू समाज माध्यमाना चांगली बुद्धी दे आणि जगावरील आलेली संकटे दूर होवोत हीच प्रार्थना.!

माधव भोळे

Thursday, September 4, 2025

परीक्षेतील यश अपयश!!

 परीक्षेतील यश अपयश!!


गेल्या ५ दिवसात मा. मुख्यमंत्री श्री देवेंद्र फडणवीस आणि मनोज जरांगे पाटील यांच्या नेतृत्वाचा कस लागला होता. जरांगे आपल्या समाजाच्या मागण्यांसाठी अडून बसले होते आणि फडणवीस सरकारचे प्रतिनिधीत्व करीत मंत्रीमंडळाला विश्वासात घेऊन सरकारची बाजू मांडत होते. मुद्धा शेवटी कोर्टात गेला. दोन्ही बाजूला फटकारले गेले. दोन्ही बाजूला काही चुका झाल्या. समाजाकडून, प्रसार माध्यमांकडून, विरोधी पक्षांकडून आणि अस्तनीतील निखऱ्यांकडून दोन्हू बाजुनंवर टीका झाली. पण सरते शेवटी दोन्ही बाजूनी समन्वय साधत एका ज्वलंत प्रश्नावर तोडगा काढण्याचा प्रयत्न केला. 


पण टीका तर होणारच. जों समाजासाठी काम करतो त्यावर टीका होणारच. कारण कोणीही बिनचूक नसतो. काही ना काही चुका होणारच. जों काम करतो त्यांच्याच चुका होतात. जों काम करत नाही त्याच्या चुका कशा होतील? 


आहो आपण नोकरीं मध्ये असताना एखादा साधा ड्राफ्ट जरी बनवला तरी त्यात साहेब चुका काढतो. कोणता तरी शब्द बदलतो. इकडचे वाक्य तिकडे करत ड्राफ्टला न्याय देण्याचा प्रयत्न करतो. माझ्या मते अशा गोष्टींना जास्त मनावर घेऊ नये. काम करणाऱ्याने काम करावे. टीका काराने टिका करावी. शेवटी काम महत्वाचे. त्यासाठी तर आपण नोकरींमध्ये एकत्र आलो असतो. कोण शहाणा याला महत्व नाही.


असो,


माधव भोळे


Wednesday, September 3, 2025

एकीचे बळ

एकीचे बळ 


इंग्रजी मध्ये एक म्हण आहे, "United we win, divided we ruin" किंवा "United we stand, divided we fall", या म्हणीचा प्रत्यय गेल्या पाच दिवसात मराठा आरक्षणाच्या बाबतीत आला. जरी १२ वि पर्यंत शिक्षण झाले असलेल्या मनोज जरांगेला लोकांनी ४ थी पास म्हणून हिणवले. विशेष म्हणजे ज्या पद्धतीने त्यांनी आपल्या आंदोलनाची बांधणी केली तसेच ज्या पद्धतीने त्यांनी वाटघाटी केल्या त्यावरून त्यांच्या बुद्धिमतेचा नक्कीच कस लागतो. शिक्षणाने माणूस हुशार बनतो पण बुद्धिमत्ता शिक्षणावर अवलंबुन नसते. ती जन्मजात असते, ती कोणत्या डिग्रीवर अवलंबुन नाही. तारतत्म्य कळायला कॉमन सेन्स लागतो. आपल्याकडे असलेल्या मॅनपॉवर, रिसॉर्सेस, वकील, अभ्यासक यांचा वापर करत त्याने सिद्ध केले कीं तो एक नेता आहे. स्वतःची घरची परिस्थिती बिकट असून सुद्धा आपल्यापूर्ती विचार न करता सर्वसामान्य शेतकरी कुटुंबातील कुणबी मराठा मंडळींसाठी त्यांनी स्वतःला झोकून दिले. यात त्यांचा वैयक्तिक स्वार्थ नाही असे लोकांना वाटल्यामुळे लोक आपला नोकरीं धंदा सोडून त्यांच्या पाठी उभे राहिले. अर्थात त्यांचा सुद्धा त्यात फायदाच होणार आहे म्हणूनही. 


अनेक लोकांनी टीका केली कीं आमक्या तमक्या नी रसद पुरवली वगैरे वगैरे परंतु आलेला सर्वच मराठा बांधव काही पैसे घेऊन आलेला नक्कीच दिसत नव्हता. 

त्यांच्या समाजाच्या एकीचे बळ त्यांना मिळाले आणि त्याचे फळ सुद्धा ते चाखतील;


पण ;


ज्यावेळी साखरसम्राट शेतकऱ्यांच्या घामाचा पैसा लुबाडतात, सहकारी साखर कारखाने कर्जबाजारी करून स्वस्तात विकत घेतात, राजकारणी पॅनल बनवून सहकारी बँकेत निवडणुका लढतात आणि निवडून आलेले लोक सहकारी बँकेत घोटाळे करतात, छोट्या मोठ्या इन्व्हेस्टमेंट कंपनीच्या नादाला लागून शेतकरी आणि शहरवासीय डुबतात, दलालांच्या अडवणूकीमुळे आणि सावकारांच्या लुटी मुळे शेतकरी कर्जबाजारी होतात आणि आत्महत्या करतात त्यावेळी हीच एकी कुठे असते? 


प्रत्येकाने स्वार्थी असणे गैर नाही पण स्वार्थ म्हणजे नेमके काय याचा अर्थ समजला पाहिजे. ज्यावेळी तुमची शक्ती संघटित असते तेव्हा राजकारणी तुमच्यातील कच्चे दुवे शोधून काढतात आणि त्यांना हाताशी धरून तुमची एकी तोडतात. ब्रिटिशांनी हेच काम करून १५० वर्ष राज्य केले. आताचे राजकारणी तेच करीत असतात. प्रत्येक गावा गावात, तालुका ठिकाणी, जाती जातीत, धर्मा धर्मात, पक्षा पक्षामध्ये, कसब्या कसब्या मध्ये वाद लावून आपल्या पोळ्या भाजतात आणि नेते बनले कीं सर्व सहकारी संस्थांवर डल्ला मारून सामान्य जनाना लुटतात ही वस्तू स्थिती आहे. अर्थात काही अपवाद आहेत पण फारच थोडे. 


चला तर आता प्रत्येक समाजाने एकत्र होऊन आपापल्या सहकारी संस्था, साखर कारखाने, शहरातील खेळाची मैदाने, उद्योग धंदे इत्यादी भ्रष्टाचारापासून वाचवूया!


माधव भोळे 

ता.क. ही पोस्ट आरक्षणाबद्दल नसून त्यावर कोणीही कॉमेंट करू नये ही विनंती.


Tuesday, September 2, 2025

यशस्वी होण्याचा सोपा मंत्र!

यशस्वी होण्याचा सोपा मंत्र! 

ब्राह्मणांना शिव्या घाला आणि आपले अपयश लपवा!


आजकाल ब्राह्मणांना शिव्या घालणे ही फॅशन झाली आहे. भारतात कोठेही कोणालाही काहीही अपयश आले मग ते निवडणुकीत असो, शिक्षणाच्या स्पर्धेत असो, नोकरीं व्यवसायात असो की कला क्षेत्रात असो, भारतात ही फॅशन झाली आहे कीं ब्राह्मणांना शिव्या घाला आणि आपले अपयश लपवा!


पण  ज्यावेळी भारत रशिया कडुन तेल विकत घेतो आणि अमेरिकेच्या दबावाला झुकत नाही असे लक्षात आल्यावर अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष ट्रम्पचा व्यापार मंत्री पीटर नव्हेरो यानेही ज्यावेळी हेच उद्गार काढले कीं भारतात ब्राह्मण मंडळी इतर भारतीय लोकांच्या जीवावर नफेखोरी करतात, त्यावेळी मात्र मीं ब्राह्मण असल्यामुळे माझी छाती गर्वाने भरून आली कीं माझी ज्ञाती एव्हडी प्रसिद्ध आहे कीं ते अमेरिकेचे सिंहासन सुद्धा डळमळवू शकते. या पूर्वी अनेक ब्राह्मणांनी आपल्या तपस्चर्येने इंद्राचे सिंहासन डळमळवाल्याचे कथा पुराणात वाचले होते पण आता प्रत्यय आला.!!


विशेष म्हणजे ज्या भारताबद्धल ते बोलत आहेत त्याचे पंतप्रधान मा. नरेंद्र मोदी हे अब्राह्मण आहेत तरी सुद्धा असे वाक्य म्हणणे म्हणजे पीटर नव्हेरो हे काबीले टारीफ ( तारीफ ) असेच म्हणायला हवे.


पूर्वी सर्व कथामध्ये म्हटलेले असायचे कीं "आटपाट नगर होते त्यात एक गरीब दरिद्री ब्राह्मण होता". म्हणजे ब्राह्मण दरिद्री असून सुद्धा त्याच्या विद्वत्तेमुळे त्याला मान होता. मग आता तर सरस्वती पुत्र असलेल्या ब्राह्मणांना लक्ष्मी पुत्र व्हायला विकसित भारतात अनेक संधी आहेत, तर त्यांनी आणि त्यांच्या पुढील पिढ्यानी प्रचंड मेहेनत घेऊन खूप संपत्ती जमा करावी आणि आपला कमी झालेला महिमा परत मिळवून घ्यावा आणि संपुर्ण जगावर राज्य करावे असे मीं आवाहन करतो. म्हणजे निदान आरक्षणासाठी  आझाद मैदानावर आंदोलन करायला नको 


माधव भोळे