इंजिनियर्स डे आणि कवित्व
कालच्या इंजिनियर्स डे निमित्ताने bhogle s suchitchandra यांनी स्वतः इंजिनियर आहे म्हणून लेख लिहितो आहे असे म्हणून रस्ता बनवणाऱ्या इंजिनियरांवर एक विडंबनपर लेख लिहिला तो वाचायला मिळाला. त्यात त्यांनी इंजिनियर लोक डॉक्टरांपेक्षा किती महत्वाचे असून रोजगार निर्मितीमध्ये त्यांचा किती मोठा वाटा आहे असे म्हणत खराब रस्त्यामुळे गाड्यांची स्पेयर पार्टची चालणारी दुकानें, पंक्चर वाले, ओरथ्रोपेडिक सर्जन, आयुर्वेद आणि पंचकर्म यांचे चालणारे दवाखाने, विमा कंपन्या इत्यादी रोजगार निर्मिती होते असे लिहून म्हणत "कुऱ्हाडीचा दांडा गोतांस काळ" म्हणतात तसें सध्या सुरू असलेल्या पितृपक्षात आपल्याच कुळाचा उद्धार केला.
पण इंग्रजी मध्ये एक म्हण आहे "beauty is in the beholder's eyes" किंवा "दृष्टी तशी श्रुष्टि".
त्या लेखक महाशयाना, रेल्वे गाडीचा आवाज अचानक बदलला म्हणजे रेल्वे लाईनला तडा गेला आहे असे ठामपणे सांगून शेकडो प्रवाश्यांचे जीव वाचवणारा, ज्यांनी मैसूर जवळील कृष्णराजा सागर धरण बांधताना भारतात प्रथमच स्वयंचलित पूर नियंत्रक दरवाजे निर्माण करून बसवले आणि ज्यांच्या नावाने आपण इंजिनियर्स डे साजरा करतो ते भारतरत्न सर विशवेश्वरैया आठवले नाहीत!
त्यांना, वाफेचे इंजिन तयार करणारा जेम्स वॉट आठवला नाही, कीं इलेक्ट्रिकचा शोध लावणारा आणि त्याचा उपयोग करत संपूर्ण मानव जातीवर उपकार करणारा थॉमस अलवा एडिसन आठवला नाही. अत्याधुनिक शस्त्रक्रिया करून मानव जातीवर उपकार करण्यासाठी डॉक्टरांना लागणारी अत्याधुनिक यंत्रे तयार करणारे बायोमेडिकल इंजिनियर आठवले नाहीत?
त्याना काश्मीर सारख्या अतिशय थंड प्रदेशात थंडी पावसात भर जंगलात उभे राहून चेनाब नदीवरचा पूल बांधणारे आणि त्या पुलाचे अतिशय कल्पक आणि अत्याधुनिक तंत्रज्ञान तयार करून वापरणारे इंजिनियर आठवले नाहीत?
त्याना अंतराळामध्ये अडकलेल्या सुनीता विलीयम्स आणि बक विलमोर यांना सुखरूपपणे पृथ्वीवर परत अणणारे स्पेसएक्स क्रू ड्रगन स्पेसक्राफ्ट तयार करणारे इंजिनियर आठवले नाहीत?
अशी अनेक उदाहरणे देता येतील ज्यामुळे इंजिनियर्सनी मानव जातीसाठी चांगले काम केले आहे.
पण लेखकाला फक्त रस्ते बांधणी इंजिनियर आठवला ज्याचे यश, अपयश भारतात किंवा आपल्या महाराष्ट्रात तरी राजकारणी, नोकरशहा, स्थानिक गुंड इत्यादी बाह्य घटकांवर अवलंबुन आहे. तो बिचारा ह्या सर्व व्यवस्थेचा घटक आणि बळी आहे ज्याला नागरिक म्हणून आपण तितकेच जबाबदार आहोत, पण बळी मात्र त्याचा?
बिचारा वर्षभर शिव्या खातच असेल पण त्याच्या हक्काच्या दिवशी तरी त्याला मोकळा श्वास आनंदाने घेऊ ध्या.
असो आपण सर्व माझ्या बरोबर हॅपी इंजिनयर्स डे म्हणू या आणि त्यांच्या विद्वात्तेला आणि महत कार्याला प्रणाम करूया.
माधव भोळे
No comments:
Post a Comment