Wednesday, September 3, 2025

एकीचे बळ

एकीचे बळ 


इंग्रजी मध्ये एक म्हण आहे, "United we win, divided we ruin" किंवा "United we stand, divided we fall", या म्हणीचा प्रत्यय गेल्या पाच दिवसात मराठा आरक्षणाच्या बाबतीत आला. जरी १२ वि पर्यंत शिक्षण झाले असलेल्या मनोज जरांगेला लोकांनी ४ थी पास म्हणून हिणवले. विशेष म्हणजे ज्या पद्धतीने त्यांनी आपल्या आंदोलनाची बांधणी केली तसेच ज्या पद्धतीने त्यांनी वाटघाटी केल्या त्यावरून त्यांच्या बुद्धिमतेचा नक्कीच कस लागतो. शिक्षणाने माणूस हुशार बनतो पण बुद्धिमत्ता शिक्षणावर अवलंबुन नसते. ती जन्मजात असते, ती कोणत्या डिग्रीवर अवलंबुन नाही. तारतत्म्य कळायला कॉमन सेन्स लागतो. आपल्याकडे असलेल्या मॅनपॉवर, रिसॉर्सेस, वकील, अभ्यासक यांचा वापर करत त्याने सिद्ध केले कीं तो एक नेता आहे. स्वतःची घरची परिस्थिती बिकट असून सुद्धा आपल्यापूर्ती विचार न करता सर्वसामान्य शेतकरी कुटुंबातील कुणबी मराठा मंडळींसाठी त्यांनी स्वतःला झोकून दिले. यात त्यांचा वैयक्तिक स्वार्थ नाही असे लोकांना वाटल्यामुळे लोक आपला नोकरीं धंदा सोडून त्यांच्या पाठी उभे राहिले. अर्थात त्यांचा सुद्धा त्यात फायदाच होणार आहे म्हणूनही. 


अनेक लोकांनी टीका केली कीं आमक्या तमक्या नी रसद पुरवली वगैरे वगैरे परंतु आलेला सर्वच मराठा बांधव काही पैसे घेऊन आलेला नक्कीच दिसत नव्हता. 

त्यांच्या समाजाच्या एकीचे बळ त्यांना मिळाले आणि त्याचे फळ सुद्धा ते चाखतील;


पण ;


ज्यावेळी साखरसम्राट शेतकऱ्यांच्या घामाचा पैसा लुबाडतात, सहकारी साखर कारखाने कर्जबाजारी करून स्वस्तात विकत घेतात, राजकारणी पॅनल बनवून सहकारी बँकेत निवडणुका लढतात आणि निवडून आलेले लोक सहकारी बँकेत घोटाळे करतात, छोट्या मोठ्या इन्व्हेस्टमेंट कंपनीच्या नादाला लागून शेतकरी आणि शहरवासीय डुबतात, दलालांच्या अडवणूकीमुळे आणि सावकारांच्या लुटी मुळे शेतकरी कर्जबाजारी होतात आणि आत्महत्या करतात त्यावेळी हीच एकी कुठे असते? 


प्रत्येकाने स्वार्थी असणे गैर नाही पण स्वार्थ म्हणजे नेमके काय याचा अर्थ समजला पाहिजे. ज्यावेळी तुमची शक्ती संघटित असते तेव्हा राजकारणी तुमच्यातील कच्चे दुवे शोधून काढतात आणि त्यांना हाताशी धरून तुमची एकी तोडतात. ब्रिटिशांनी हेच काम करून १५० वर्ष राज्य केले. आताचे राजकारणी तेच करीत असतात. प्रत्येक गावा गावात, तालुका ठिकाणी, जाती जातीत, धर्मा धर्मात, पक्षा पक्षामध्ये, कसब्या कसब्या मध्ये वाद लावून आपल्या पोळ्या भाजतात आणि नेते बनले कीं सर्व सहकारी संस्थांवर डल्ला मारून सामान्य जनाना लुटतात ही वस्तू स्थिती आहे. अर्थात काही अपवाद आहेत पण फारच थोडे. 


चला तर आता प्रत्येक समाजाने एकत्र होऊन आपापल्या सहकारी संस्था, साखर कारखाने, शहरातील खेळाची मैदाने, उद्योग धंदे इत्यादी भ्रष्टाचारापासून वाचवूया!


माधव भोळे 

ता.क. ही पोस्ट आरक्षणाबद्दल नसून त्यावर कोणीही कॉमेंट करू नये ही विनंती.


No comments:

Post a Comment