आधुनिक महंमद तुघलक
गेल्या २ दिवसात ट्रम्प तात्याने दिनांक २२.०९.२०२५ पासून H1B विसा ( रोजगार विसा ) वर वार्षिक १ लाख डॉलर्सची फी लावली आणि संपूर्ण सोशल मीडिया त्याच्या ह्या अध्यक्षीय अध्यादेशा भोवती नाचू लागली. ट्रम्प च्या आदेशामुळे अमेरिकन कंपन्या भारतात आपली गुंतवणूक वाढवतील आणि भारतीय आय टी इंडस्ट्रीला पुन्हा पालवी फुटेल इथं पासून ते अमेरिकेतील ३ लाख भारतीय लोकांना पुढील ३ वर्षात आपल्या नोकऱ्या गमवाव्या लागतील, वगैरे वगैरे विषयावर घोळून घोळून लिहिले गेले. ट्रम्प चे म्हणणे आहे कीं ज्या नोकऱ्या H1B वाले घेतात त्या योग्य ते प्रशिक्षण देऊन अमेरिकन लोकांना मिळाव्यात, त्या साठी त्यांनी खेळलेली ही चाल आहे. त्याने आकडेवारीनिशी दाखवून दिले कीं H1B मुळे किती अमेरीकन लोकांच्या नोकऱ्या कमी झाल्या आहेत आणि म्हणून ही पाऊले उचललि गेली आहेत.
काही प्रमाणात हे सत्य असले तरी हेच सत्य आहे असे नाही.
पण त्यांचे परिणाम सखोल आहेत.
१. दरवर्षी ३,३०,००० विध्यार्थी अमेरिकेत शिकायला जातात. त्यातील ९०% लोक ह्या आशेवर जातात कीं त्यांना अमेरिकेमध्ये नोकरी मिळेल आणि मग तेथे ग्रीन कार्ड इत्यादी मिळेल. जर H1B मिळण्याच्या शक्यता अतिशय धुसर असेल तर कोणता विद्यार्थी ५० ते ७० लाख खर्च करून अमेरिकेत शिकायला जाईल? अमेरिकेतील अनेक विद्यापीठे परदेशींय विद्यार्थ्यांच्या फी वर जगतात. त्याच बरोबर विद्यापीठाच्या त्या गावातील व्यवहार सुद्धा त्याच विद्यार्थ्यांवर अवलंबुन असतात ही सुद्धा एक बाजू आहे.
२. अमेरिकन कंपन्यांना योग्य ती प्रशिक्षित मानव संसाधने योग्य खर्चात मिळाली नाहीत तर ते आपली उत्पादने बाहेर हलवतील. विशेषतः ज्या बाबतीत तसें शक्य असेल तर ते तसें करतील. आणि तसें होऊ शकत नसेल तर त्या कंपन्यांचा उत्पादन खर्च वाढेल आणि नफा कमी होऊन अमेरिकन सरकारला कमी टॅक्स मिळेल.
३. अमेरिकन लोकांना प्रशिक्षित करायला हवे हे म्हणणे जरी तात्विक दृष्ट्या बरोबर असले तरी बेडूक फुगला म्हणून बैल होत नाही. जों बुद्धिमान नसेल त्याला तसें ट्रेनिंग देणे सोपे होणार नाही. त्यामुळे अमेरिकन कंपन्याच्या प्रगतीवर निश्चित परिणाम होऊन ते जगाच्या स्पर्धेत पाठी पडतील आणि ते अमेरिकेला परवडणार नाही.
४. अमेरिकेत एकंदर 16,33,94,000 एव्हडे लोक नोकरीं करतात. त्या पैकी सुमारे ६ लाख लोक H1B व्हीसा वर काम करतात. म्हणजेच एकंदर नोकऱ्यांच्या फक्त ०.३७ % एव्हडेच लोक H1B वर काम करतात. ही संख्या अतिशय नगण्य आहे परंतु ह्या H1B वाल्या मंडळीची प्रगती इतर अमेरिकन लोकांच्या डोळ्यात भरते. तरी बरे त्याच कामाला अमेरिकन ३ पट पैसे घेतात.
५. सन २००० पूर्वी H1B कोटा फक्त ६५,००० होता तो काही काळा करीता १,१५,००० केला होता. सध्या कोटा ६५,००० + २०,००० ( अमेरिकेत मास्टर्स शिक्षण घेतलेले ) म्हणजे एकूण ८५,००० असा आहे. म्हणजेच भारतातील ३,३०,००० लोक अमेरिकेत शिकायला जातात त्यातील फक्त २०,००० लोकांना H1B visa मिळण्याची शक्यता होती ( ह्या कोटा मध्ये सर्व देशातील नागरिक येतात. फक्त भारतीयच नाही. ). ट्रम्प सरकारने सरसकट सर्वांनां १,००,००० अमेरिकन डॉलर्स ची वार्षिक फी लावली आहे.
याच्यासारखा तुघलकी निर्णय हाच करू शकतो. या मुळे अमेरिकन हाय टेक कंपन्या, संशोधने या सर्वांना उच्च शिक्षित मॅन पॉवर दुरापास्त होणार आहे. या मुळे अमेरिकेचेच नुकसान होणार आहे.
६. रशियाला नामोहरम करण्यासाठी आणि त्यासाठी भारतावर दबाव टाकण्यासाठी भारतीय उत्पादनांवर टारीफ वाढवणे, भारतीय पेट्रोलियम प्रोडक्ट्स वर बंदी घालणे, तसें करण्यासाठी युरोपियन देशांना आपल्या गुटात ओढणे इत्यादी करत असताना ट्रम्प आत्मघातकी निर्णय घेत आहे जे कोणाच्याच फायद्याचे नाही.
ट्रम्प चे सद्याचे निर्णय म्हणजे नवरा मेला तरी चालेल पण सवत विधवा होऊन दे या सूत्रावर आधारित आहे.
लवकरच ट्रम्पच्या या आणि अशा विवादीत कृती त्याची लोकप्रियता सब झिरो ( शून्य पेक्षा ही कमी ) करतील आणि ट्रम्प एयर फोर्स वन विमानातुन हवेतून जमिनीवर विचार करेल याची मला खात्री आहे.
तो पर्यंत "If you cannot avoid it then Enjoy".
माधव भोळे
No comments:
Post a Comment