सिमोल्लंघन!!
आज विजयादशमी, आज सिमोल्लंघन!!
पूर्वी राजे रजवाडे हा सण अतिशय उत्साहात साजरा करायचे. नवनवीन प्रदेश पादाक्रांत करण्यासाठी ते मोठ मोठ्या मोहिमा आखायचे आणि त्याचा मुहूर्त ते आज विजयादशमीला करायचे. विजयादशमी हा साडे तीन मुहूर्तामधील एक अत्यंत शुभ मुहूर्त मानला जातो. मैसूर सारख्या एकेकाळच्या संस्थांनामध्ये अजूनही विजयादशमीचा अतिशय देखणा सोहोळा होत असतो.
पण इंटरनेटच्या ह्या सीमाविरहित युगात अशा सिमोल्लंघनाला काही महत्व राहिले आहे का? आणि सव्वा लाख रुपये १० ग्राम सोने असताना असे कोणते सोने आहे जे आपण खुले आम मोफत वाटू शकतो?
जरी काळ बदलला असला तरी या उत्सवांचे महत्व कधीच कमी होणार नाही. ट्रम्प सारख्या विक्षिप्त माणसाने दाखवून दिले कीं तुम्ही जगात सर्व गोष्टी आपल्या हक्काच्या आहेत असे समजून राहू शकत नाही. तुम्हांला दुर्बल राहून चालणार नाही. तुम्हाला स्वतःची ताकद निर्माण करायलाच हवी. रशिया आणि युक्रेन मधील युद्धानंतर "बळी तो कान पिळी" ही म्हण पुन्हा पुन्हा अधोरेखित केली आहे.
आता या पुढे भारतीय बाजारपेठांमध्ये परदेशी, तकलादू, चकाचक माल दिसण्यापेक्षा मजबूत, टिकावू, पर्यावरण पूरक, कार्यक्षम आणि ऊर्जा कार्यक्षम ( energy efficient ) तसेच नावीन्यपूर्ण ( innovative ), सुंदर डिझायनिंग, आकर्षक पर्यावरण पूरक पॅकेजिंग असलेला आणि रास्त किंमत असलेला भारतीय मालच दिसायला हवा. अशा आत्मनिर्भर भारतीय उत्पादनांनी जगाच्या पाठीवर राज्य करायला हवे.
आमची वरील सर्व उत्पादने आणि सॉफ्टवेअर उत्पादने जगाच्या पाठीवर विविध भाषांमध्ये, उपभोक्ता अनुकूल ( User friendly ), तेथील देशाच्या प्रचलित कायद्याचे पालन करणारी, तेथील बाजारपेठांमध्ये उपलब्ध असायला हवी कीं जेणेकरून तेथील जनता आपल्या मौखिक प्रसिद्धीने भारतीय माल आपल्या देशात प्रचार आणि प्रसार करण्यास आणि विक्री करण्यासाठी मदत करेल.
जर भारतीय शेतकरी, उत्कृष्ट दर्जाचा, सकस, सेंद्रिय शेतमाल, मोठ्या प्रमाणात तयार करू शकले आणि कोल्ड स्टोरेज चेन किंवा अन्य प्रकारे ताजे राहतील असे जर इतर देशात पोहोचवू शकले तर मग जेनेटिकली मॉडिफाईड बियाणे आणि उत्पादने कचऱ्याच्या भावाने सुद्धा कोणी विकत घेणार नाही.
आपल्याला आता नवीन पद्धतीने सिमोल्लंघन करायला हवे. आपण तर परदेशात पोहोचुच पण आपली उत्पादने आणि सेवा सुद्धा तेथे पोहोचल्या पाहिजेत. तेथे ट्रम्प सारखा किंवा पुतीन सारखा आसुरी विजय न मिळवता त्यांच्या मनावर प्रथम विजय मिळवायला हवा.
१९८४ साली प्रथमच अमेरिकेत सॉफ्टवेअर इंजिनियर म्हणून जाताना हीच भावना माझ्या हृदयात होती. त्यावेळी H1B मिळणे कठीण होते म्हणून आम्ही B1/B2 विसा वर आमच्या कंपनी तर्फे गेलो होतो. ज्या वेळी आम्ही असखलित इंग्रजी मध्ये बोलू लागलो त्यावेळी तेथील स्टाफला आश्चर्य वाटले. ते म्हणाले तुमचे इंग्रजी तर उत्तम आहे. आम्ही समजत होतो भारत म्हणजे एक गारुड्यांचा आणि जंगलांचा प्रदेश आहे. अर्थात तेथे उत्तम रीतीने सॉफ्टवेअरमध्ये काम करून आम्ही आणि आमच्यावेळच्या सॉफ्टवेअर इंजिनियरांनीं भारताच्या IT इंडस्ट्रिचा पाया मजबूत केला आणि त्याची पुढे प्रगती दिसतेच आहे. त्यावेळी भारतात हातांच्या बोटावर मोजण्या इतक्या सॉफ्टवेअर कंपन्या अमेरिकेत सॉफ्टवेअर इंजिनियर पाठवत असत. अगदी इन्फोसिस जरी १९८१ साली स्थापन झाली तरी त्यांना अमेरिकेत पहिला इंजिनियर पाठवायला १९८३ साल उजाडल होते. त्यानी १९८३ साली डॉन लिलीच्या डेटा बेसिक कोरपोर्शन अमेरिकेत पहिल्यांदा सॉफ्टवेअर इंजिनियर पाठवला.
आपल्या सिमोल्लंघन करायचे असेल तर प्रथम आपल्यातील रावण दहन करायलाच हवेत. बाहेरील शत्रू आपण मारूच पण आपल्यातील अंतर्गत शत्रू आपण प्रथम मारायला हवेत. आपल्यातील सारासार विचार करण्याची कमतरता, जोखीम न पतकरणे, कोणत्याही विषयाचा पुरेसा अभ्यास न करता त्यात उतरणे, आर्थिक अव्यवस्थापन, मानवी मूल्ये आणि मानस शास्त्राचा अभ्यास नसणे किंवा असल्यास त्याचा गैरवापर करणे इत्यादी रिपुंचे दहन आपल्याला करायला हवे. हे आपण आजपासूनच सुरवात करून सिमोल्लंघन करूया.
हे सर्व करण्यासाठी आणि भारत एक मजबूत, सर्व दृष्टीने सक्षम राष्ट्र बनण्यासाठी सर्वांनां विजयादशमीच्या हार्दिक शुभेच्छा.
माधव भोळे
No comments:
Post a Comment