राजा कालस्य कारणम!
संस्कृत मधील एक सुभाषित आहे राजा कालस्य कारणम! याचा अर्थ कोणत्याही अडचणीला किंवा येणाऱ्या काळाला राजा जबाबदार असतो.
सध्या जगाचे दोन किंवा तीन अनभिशिक्त राजे आहेत. अमेरिका, रशिया आणि चीन. भारत अजून बराच पाठी आहे.
आज Ravindra Datar यांची एक पोस्ट वाचली. अमेरिकेनी AIM-120-C आणि काही तत्सम प्रगत मिसाईल पाकिस्तानला निर्यात करण्याचे ठरवले आहे.
AMRAAM ह्या नवीन पॅकेजच्या अंतर्गत अमेरिकेने त्यांच्या ३० मित्र देशांना ४१.६ बिलीयन डॉलर्सचा प्रगत शस्त्र पुरवठा करण्याचे ठरवले आहे. हा म्हणे अमेरिकेच्या इतिहासातील सर्वात मोठी शस्त्र निर्यात पॅकेज आहे.
अमेरिका येन केन प्रकारे जगाचा तारणहर्ता आणि पालक बनण्यासाठी सर्व प्रकारचे उपाय योजत असते, त्यातील एक म्हणजे देशा देशात भांडणे लावणे, त्यांना शस्त्र पुरवठा करणे आणि मग शांततेचे नोबेल पारितोषिक मिळवण्यासाठी शांतता प्रस्तापित करण्याचे ढोंग करणे.
आता पाकिस्थानला नवीन शस्त्र पुरवठा झाला म्हणजे भारत अर्थातच नवीन शस्त्रास्त्र खरेदीसाठी रशियाकडे धाव घेणार किंवा जे जमेल ते स्वतः तयार करणार. थोडक्यात ही शस्त्रास्त्र शर्यत सुरूच राहणार. अशीच शस्त्र शर्यत रशिया आणि युरोप मध्ये गेले कित्येक वर्ष सुरू आहे. थोडक्यात काय जगात अस्थिरता निर्माण करायची आणि त्याचा फायदा घेऊन आपली शस्त्र विकून आपला दबादबा वाढवायचा.
अगदी हीच नीती वापरून पूर्वी ईस्ट इंडिया कंपनीने, भारतात, समृद्ध अशा भारतीय संस्थानिकांमध्ये भांडणे लावून त्यांना आपले सैन्य आणि दारुगोळा पुरवून, त्या संस्थानिकांना खिळखिळे करून टाकून अक्खा देश गिळनकृत केला आणि भारतावर १५० वर्ष राज्य केले आणि तेच संस्थानिक त्यांचे मांडलिक झाले. इंग्रज व्यापारी म्हणून आले आणि घराघरामध्ये सोन्याचा धूर निघणाऱ्या भारताला बेघर करत गरिबीच्या खाईत लोटून राजे म्हणून निघून गेले.
जगामध्ये महामारी, भुकमारी, बेरोजगारी, पर्यावरण बदल, नैसर्गिक आपत्ती इत्यादी मानव जातीला हैराण करणारे अनेक प्रश्न असताना ते सोडवण्यासाठी प्रयत्न करण्याऐवजी मूठभर लोक आणि त्यांच्या कंपन्या चालण्यासाठी मेक अमेरिका ग्रेट ह्या पोकळ कल्पनेच्या नावाखाली असे मानवसंहारक उपदव्याप चालवायचे हे अत्यंत घातक आहे. ट्रम्पच्या आधीच्या लोकांनी सुद्धा हेच केले आहे. बरे एकाने शस्त्र हातात घेतल्यानंतर दुसऱ्याला गाल पुढे करता येणार नाही म्हणून तो ही ह्याच शर्यतीत अडकतो आणि फसतो.
आज पाकिस्तान आणि बांगलादेश सारख्या देशात महागाईचा डोंब उसळला आहे. एका रोटीची किंमत २५ पाकिस्तानी रुपया झाला असून पाकिस्तानी रुपयाची किमत १ पाकिस्तानी रुपया = ०.३२ भारतीय रुपया आहे.
ग्लोबल हंगर इंडेक्स २०२४ ( जागतिक भुकमारी निर्देशांक २०२४) मध्ये १२७ देशामध्ये पाकिस्तानचा १०९ तर भारताचा १०५ वा क्रमांक लागतो. भारताचे म्हणणे आहे की ही खरी स्थिती नाही. नसेल सुद्धा. पण आपण पहिल्या ५० मध्ये नक्कीच नाही ). ह्या वरून एक गोष्ट स्पष्ट होते की मानव हितासाठी अजून बऱ्याच गोष्टी करणे बाकी आहे.
एक दिवस युद्ध चालणे म्हणजे १ वर्ष अधोगती करण्यासारखे आहे. ( असे असताना सुद्धा पेहेलगाम अटॅक नंतर मोदींनी युद्ध होता होता टाळले म्हणून राहुल गांधी, प्रणिती शिंदे सारखे काही नासमज नेते मोदींना डिवचत बसले ).
यावर उपाय काय आहे? पूर्वी आपल्याला इसापनीती मधील एक गोष्ट शिकवली होती. दोन माकडांच्या वादात मांजराने पूर्ण लोणी फस्त केले. त्यावरून धडा घेऊन वागायचे. कोणी उचकवले म्हणून उचकायचे नाही. आपल्या प्रगतीच्या आणि उदिष्ठानच्या आड येणारी प्रलोभने किंवा संकटे शांत डोक्याने कशी टाळता येईल ते बघायचे.
राजाने हेच करायला हवे. तरच "राजा कालस्य कारणम " ह्या उक्तीचा सुंदर आणि खरा अर्थ जगाला सापडेल.
माधव भोळे
No comments:
Post a Comment