ईश्वर आणि नास्तिकता
सरन्यायाधिशांच्या सनातन धर्माविरुद्धच्या वक्तव्यावरून आस्तिक आणि नास्तिक यांच्यामध्ये समाज माध्यमांवर जुगल बंदी सुरू आहे. त्यातील एक परकोटीचा विषय एका नास्तिकाने मांडला तो म्हणजे "एव्हडा पूर आला, एव्हडे भूकंप झाले पण त्यावेळी तुम्हांला वाचवायला देव आला होता का?".
याचे साधे उत्तर आहे ते असे:
जगातील अनेक नैसर्गिक आपत्ती मानव निर्मित आहेत. बेसुमार जंगलतोडी मुळे भूसखलन होते, पर्यावरण घातक कार्यक्रमांमुळे ओझोन लेयर कमी होतो, त्याचा वातावरणावर परिणाम होऊन अतिवृष्टी आणि महापूर येतात ह्या सारख्या अनेक गोष्टी मानव निर्मित आहेत. त्यामध्ये ईश्वराला दोष का द्यायचा?
नास्तिकाने कितीही डांगोरा पिटला तरी एक गोष्ट सर्वांनी समजून घ्यायला हवी की तुम्ही हे जे लिहीत आहेत किंवा विचार पुढे मांडत आहात ते देवाने तुम्हांला जिवंत ठेवले आहे म्हणूनच. तुमचा प्रत्येक श्वास ईश्वर नियंत्रित आहे. जेथपर्यंत तो तुमच्यावर राजी आहे तो पर्यंत तुम्ही खूष. जेव्हा त्याचा तुमच्याबाबतीत मूड बिघडेल तेव्हा जगातील उत्तमातील उत्तम डॉक्टर सुद्धा तुमचे प्राण वाचवू शकणार नाही.
आपल्या शरीराची रचना एव्हडी गुंतागुंतीची आहे की दररोज नवनवीन शोध लावले जात आहेत तरी अजूनही माणसाच्या शरीराचा अभ्यास पूर्ण झालेला नाही. यातील एखादा घटक जरी असंतुलित झाला तरी माणसाला पीडा निर्माण होते. हे सर्व घटक सुरळीत चालतात म्हणून आपण जिवंत आहोत.
एका डॉक्टरकडे पाटी बघितली "We treat, he cures". जों खरोखर ज्ञानी आहे तो हे समजू शकेल.
हीच गोष्ट नैसर्गिक आपत्ती बद्दल आहे. त्या ठिकाणी तुम्ही असणे किंवा नसणे किंवा तुमचे संकट काही प्रमाणात कमी असणे हे सुद्धा ईश्वरी ईच्छाच म्हणायला हवी.
आता कोणी म्हणेल की संकटात सोडवायचेच होते तर तो आपल्यावर संकट का आणतो?
जर संकटे आली नाहीत तर आपल्या अस्तित्वाचा आणि ईश्वराच्या अस्तित्वाचा कस लागत नाही. चांगले आणि आनंदी जगणे आपण आपला हक्क मानतो. जे आपण करतो तेच योग्य असे मानव मानतो. पण तसें नसते. अशा वेळी ईश्वर वेगवेगळ्या पद्धतीने मार्गदर्शन करीत असतो. ते ज्यावेळी समजून घेतले जातं नाही त्या वेळी आपले अस्तित्व दाखवायची वेळ ईश्वराला येत असते.
ईश्वर एक माना किंवा अनेक माना पण ईश्वर ही संकल्पना मानवाने आपल्या कल्याणासाठीच केली आहे, मग तो कोणत्याही धर्माचा असो. त्याच्यावर शिंतोडे कशाला उडवायचे. तुम्ही नास्तिक असणे हा तुमचा चॉईस आहे पण दुसऱ्याचे मन दुखवायचा तुम्हांला कोणी अधिकार दिला?
माधव भोळे
No comments:
Post a Comment