Sunday, October 26, 2025

विवाह जमणे किंवा जमवणे, एक अडथळा शर्यत?

 विवाह जमणे किंवा जमवणे, एक अडथळा शर्यत?


आज काल समाज माध्यमातून एक विशेष चर्चा सुरू असते. ती म्हणजे आजकालच्या मुलामुलींचे विवाह योग्य वयात होत नाहीत. अर्थात त्याची अनेक कारणे आहेत. पण काही तरुणांशी बोलल्यानंतर असे लक्षात आले की आजकालचे विवाह जमणे किंवा जमवणे म्हणजे एक अडथळा शर्यत आहे. आणि समजा तो जमला तर तो विवाह टिकणे म्हणजे आणखी एक दिव्य कसोटी आहे.


ह्या बाबतीत काही व्यक्तींशी चर्चा करता असे लक्षात आले की, वेगवेगळ्या कारणांमुळे समाज विखूरला गेल्यामुळे बहुतेक तरुण तरुणी मॅरेज ब्युरोच्या इंटरनेटवरील ऍपचा वापर करतात. त्यामध्ये आपण किंवा आपल्या पालकांनी विवाहेच्छुक व्यक्तीची, त्याच्या कुटुंबियांची माहिती आणि संभाव्य वधू / वराबद्धल अपेक्षा यांची माहिती भरून देणे इत्यादी. 


येथपर्यंत प्रक्रिया योग्य आहे. खरी मजा पुढेच आहे. ती म्हणजे त्या व्यक्तीचा प्रोफाइल भरताना काही ऍप असे काही अंनशन्ट प्रश्न विचारतात की त्यांचे प्रोफाइल फिल्टरिंग म्हणजे अतिरेक वाटतो. ज्यांना ह्या विषयाचे काही अगाध ज्ञान आहे असे ते समजतात ती मंडळी प्रोफाइल मध्ये खालील प्रश्न विचारतात. ते बघून प्रश्न पडतो की ही मंडळी विवाह जमवण्यासाठी आहेत की आपली मेम्बरशिप कायम राहून गल्ला भरण्यासाठी आहेत?

उदा.?

१. आपण विवाह कशा प्रकारे साजरा करू इच्छिता?

    १.a) साधा समारंभ फक्त जवळचे नातेवाईक सहित १.b) हाय फाय हॉटेल किंवा डेस्टिनेशन विडींग १.c) रजिस्टर्ड विवाह १.d) मित्र मैत्रिणी, जवळचे नातेवाईकां सह.

२. पहिले मुलं लग्न झाल्यानंतर किती वर्षानंतर व्हावे असे वाटते?

    ३.a) 0 ते ३ वर्षांमध्यें ३.b) ३ ते ६ वर्षा मध्ये ३.c) ६ वर्षानंतर ३.d) कधीच नाही.

३. लग्न झाल्यानंतर हनिमूनला कुठे जावे असे वाटते?

    ३. a जवळपास च्या ठिकाणी ३.b भारतात कोठेही ३.c परदेशीं

४. जर आपला घटस्फोट झालाच तर आपण तो कसा हाताळाल ( ह्या प्रश्नाबद्दल मीं खात्री पूर्वक सांगू शकत नाही पण कोणी तरी असे विचारते असे कळते ).

४.a सहमतीने ( mutual consent ) ४.b भरभक्कम पोटगी मागून ४.c समोरच्या व्यक्तीला त्रास होणार नाही अशी आर्थिक सोय मागून.


असे अनेक प्रश्न विचारले जातात. अनेक मंडळी ह्या प्रश्नाची उत्तरे बघूनच अनेक चांगल्या प्रोफाइलकडे दुर्लक्ष करतात. अरे ज्या गोष्टी अजून काहीच ठरल्या नाहीत. अजून त्या दोघांनी एकमेकांची तोंडे सुद्धा बघितली नाहीत त्यांची ह्या विषयातील मते विचारून तुम्ही तरुणांच्या मनात अडथळे आणि गोंधळ निर्माण करत आहेत. कारण नसताना एखाद्या विषयावर काल्पनिक ( hypothetical) चर्चा करणे बरोबर नाही. 


विवाह जमवायचा असेल तर सुरवातीला एकमेकांना भेटायला हवे तुमचे चार चांगले गुण आणि दुसऱ्याचे चांगले चार गुण एकमेकांना माहिती व्हायला हवेत. अनेक प्रश्न चर्चा करून सोडवता येतात. जर आधीच एव्हडे प्रश्न असतील तर कोणताही विषय कधीच सुटू शकणार नाही. 


चर्चा केल्यावर माणसाची मते बदलू शकतात. परंतु असे अनशन्ट प्रश्न विचारून तुम्ही ह्या विवाह जमवण्याच्या प्रक्रियेत फक्त अडथळे निर्माण करत असता. शिवाय हजारो प्रोफाइल समोर असल्यामुळे प्रत्येक वेळी बघणाऱ्या व्यक्तीला वाटते की अजून चांगले, अजून चांगले स्थळ मिळेल आणि त्या नादात तो काहींना काही कारण काढून समोर असलेले स्थळ घालवून बसतो. इंग्रजीत एक म्हण आहे "A bird in the hand is worth two in the bush" म्हणजे हातात असलेला पक्षी झुडपात असलेल्या पक्षा पेक्षा जास्त महत्वाचा कारण झुडपातील पक्षी उडून जाऊ शकतो. किंवा हातचे सोडून पळत्याच्या पाठी लागणे.


त्या मुळे विवाह जमवण्यासाठी फक्त आवश्यक तेव्हडीच माहिती घ्यायला हवी. प्रथम एकमेकांना भेटायला हवे, फोन वर किंवा प्रत्यक्ष काही वेळा चर्चा करायला हवी मगच एखाद्या व्यक्तीबद्दल आपण निश्चित मत बनवू शकता.


लोकांच्या मनात असे काही भरलेले असते की सांगता येत नाही. माझा एक मित्र त्याच्या एका ज्योतिष मित्रावर फार विश्वास ठेवे. कोणतीही मुलगी सांगून आली की प्रथम आपल्या मित्राकडे तिची पत्रिका दाखवे. आणि काही ना काही कारण काढून नकार देत असे. एकदा तो म्हणाला "ज्योतिष मित्र म्हणतो मुलीचे बाकी सर्व गुण जुळत आहेत पण तिच्या पहिल्या डिलिव्हरीला थोडा अडथळा आहे. मग काय करू?". मीं मित्राला म्हटले. अरे काय तू विचार करतोस? आधी लग्न तर जमू दे मग पहिल्या डिलिव्हरीचा विचार कर. असे करता करता वयाची ४२ उजाडली तेव्हा एक दिवस अचानक लग्न जमले. 


पूर्वी सुद्धा लोक पत्रिका बघत पण त्यांच्या अपेक्षा आणि अटी कमी असत. मुलगी संसार करण्यासाठी योग्य आहे की नाही याला महत्व जास्त होते आणि बाकीचे विषय गौण मानले जायचे. आता कोणता विषय महत्वाचा आणि कोणता नाही यामध्येच गोंधळ उडतो कारण प्रश्न आणि विषय जास्त झालेत.


बघा तुम्हांला पटते का?


माधव भोळे 



No comments:

Post a Comment