कल्पना विलास
जगातील अनेक शोध हे कल्पना विलासामुळे लागले आहेत. ज्याला आपण दिवा स्वप्न म्हणतो, असे दिवा स्वप्न बघण्याची सवय अनेक लोकांना असते, पण फार थोडे, ती स्वप्न पूर्ण करण्यासाठी झटत असतात. अशाच एका स्वप्नाने झपाटलेल्या यशस्वी माणसाची कहाणी लिहीत आहे जी गेले चार - पाच महिने माझ्या मनात घोळत आहे.
एलोन मस्क (Elon Musk) हे नाव ऐकले नसेल असा इंजिनियर भारतात मिळणे मुश्किल असावा. आपण सायन्स किव्वा इंजिनीरिंगचे विध्यार्थी असाल तर नक्कीच ऐकले असणार. २८ जून, १९७१ रोजी साऊथ आफ्रिकेमध्ये जन्मलेल्या आणि पुढे अमेरिकेचे नागरिकत्व घेतलेल्या एलोन मस्क ने १९९७ साली पदार्थ विज्ञान तसेच अर्थ शास्त्रामध्ये मध्ये स्तानक पदवी घेतल्यानंर, या पट्ठ्याने नोकरी करण्या ऐवजी, व्यवसाय करायला सुरवात केली. व्यवसाय करण्यासाठी इंटरनेट, अपारंपरिक ऊर्जा स्रोत, वाहतूक आणि अवकाश शास्त्र या विषयात त्याचा विशेष ओढा आहे.
१९९५ साली तो आणि त्याचा भाऊ किंबल यांनी ते राहत असलेल्या शहराचे इंटरनेट सिटी गाईड बनवले आणि ते "न्यू यॉर्क टाइम्स" आणि "शिकागो ट्रिब्युन" या वर्तमानपत्र छापणाऱ्या कम्पन्याना विकले हि त्याची पहिली व्यवसाय कमाई ज्यात त्याला २२ दश लक्ष डॉलर मिळाले. त्या नंतर त्याने मित्रांचा साहाय्याने "पे पाल" हि ई-मेल पेमेंट कंपनी काढून ती "ई बे" या ईकॉमर्स कम्पनीला विकली त्यात त्याला आणखी १६५ दश लक्ष डॉलर मिळाले.
स्पेस एक्सप्लोरेशन टेक्नोलोंजि: त्या नंतर त्याने आपल्या आवडीच्या अपारंपरिक ऊर्जा स्रोत, आणि अवकाश शास्त्र या विषयांकडे लक्ष वळवले. त्याचे स्वतःचे असे मत बनले कि पृथ्वीवरील पर्यावरण दिवसेंदिवस धोक्यात येत असल्यमुळे किव्वा असा एखादा अवकाशातील लघुग्रह पृथ्वीवर आदळला किव्वा मोठा धरणीकंप किव्वा ज्वालामुखी, किव्वा एखादे मानव निर्मीत संहारक शस्त्र किव्वा अज्ञात धोका एक दिवस पृथ्वीवर मानवाला राहणे अशक्य करून टाकेल, या मुळे अशा वेळेला मानवाने आपली वस्ती इतर ग्रहांवर सुद्धा बसवली पाहिजे. त्या साठी मंगळावर एक "हरित गृह" कसे होईल आणि त्यात भाजीपाला कसा वाढवता येईल या साठी प्रयोग करण्याचे त्याने ठरवले. आताच्या स्थितीत खरोखरच हा कल्पना विलास किव्वा दिवा स्वप्न म्हणायला हरकत नाही. परंतु असे हरित गृह मंगळावर पाठवण्यासाठी एखादे रॉकेट किव्वा क्षेपणास्त्र पाहिजे म्हणून एखादे जुने सेकण्ड हॅन्ड आंतर खंडीय लांब जाईल असे बॅलेस्टिक क्षेपणास्त्र (ICBM) मिळते का हे पहाण्यासाठी तो रशिया येथे गेला. दोन वेळा चक्कर मारल्यानंतर त्याच्या लक्षात असे आले कि रशियन लोकांनी सांगितलेली ८ दश लक्ष डॉलर हि किंमत फार जास्त आहे.
त्याच्या "आधी केले मग सांगितले" या बाण्याप्रमाणे, त्याने या उद्योगासाठी स्वतः मागे मिळवलेले १०० दश लक्ष डॉलर घालून स्पेस एक्सप्लोरेशन टेक्नोलोंजि (SpaceX ) अशी कम्पनी काढली. हि कंपनी अवकाशात कृत्रिम ग्रह सोडण्यासाठी लागणारी क्षेपणास्त्र तयार करते किव्वा अंतरिक्षयान पाठवणे अशी कामे करते (भारतात हे काम इसरो हि सार्वजनिक संस्था करते). स्पेस एक्स ने गेल्या सात वर्षात फाल्कन १ आणि फाल्कन ९ अशी दोन रॉकेटस आणि ड्रॅगन नावाचे अंतरिक्षयान यशस्वी तयार केले. २००६ मध्ये अमेरिकन नासाने याची दखल घेऊन त्यांना आपले या विषयातील संशोधन चालू ठेवण्यास करार करून आंतरराष्ट्रीय अवकाश प्लॅटफॉर्म (International Space Station) वर सामान नेण्यासाठी लागणारे अंतरिक्ष यान तयार करण्यास सांगितले आणि पुढे २०११ साली अकार्यक्षम होणाऱ्या "युएस स्पेसशटल" चे १२ वेळा या आंतरराष्ट्रीय अवकाश प्लॅटफॉर्मवर सामान नेण्याचे काम त्यांच्याकडे सोपवले. स्पेस एक्स हि अमेरिकेतील दुसरी खाजगी कम्पनी ठरली जी अशा प्रकारचे काम करते. २२ डिसेम्बर २०१५ रोजी त्या कम्पनीने त्यांचे फाल्कन रॉकेट पुन्हा याच कार्यक्रमात वापरून जगात एक नवा इतिहास घडवला आणि या तेच रॉकेट पुन्हा पुन्हा वापरल्या मुळे या कार्यक्रमात बचत घडवून आणली. स्पेस एक्स हि जगातील सर्वात मोठी खाजगी रॉकेट तयार करणारी कम्पनी आहे. तसेच त्यांच्या रॉकेटची, अवकाशात वस्तू उचलून नेण्यासाठी एक परिमाण असलेले, “कमीत कमी जोरात जास्तीत जास्त वजन उचलण्याची क्षमता” सर्वात जास्त आहे. या कम्पनी मध्ये मस्क चे ५४% शेयर आहेत.
टेस्ला मोटार कम्पनी: त्याच्या परग्रहावर वस्ती करण्याच्या कल्पनेचा (वेडाचा) पुढील कल्पना विलास म्हणजे टेस्ला मोटार कम्पनी. पृथ्वीवर असलेला प्राणवायू जर इतर ग्रहांवर नसेल तर पेट्रोल किव्वा डीझेल वर चालणाऱ्या गाड्या चालणार नाहीत त्या मुळे तेथे कमीत कमी इलेक्ट्रिक वर चालणारी आणि हलक्या वजनाचे वाहन असावे असे त्याला वाटले. त्या शिवाय त्यामुळे पृथ्वी वरील उष्णतामान वाढवणाऱ्या इंधनांवर पर्यायी उपाय तयार होईल असे त्याचे मत. त्या साठी त्याने टेस्ला नावाची एक मोटार कम्पनी काढली. या कम्पनी द्वारे आता टेस्ला स्पोर्ट्स कार्स आणि कमी किमतीच्या टेस्ला मॉडेल ३ कार्स बनवण्याचे काम चालू आहे. शिवाय त्यांच्या या कामातील एक भाग "पॉवर ट्रेन" हा ते स्वतः बनवून इतर प्रख्यात मोटार कम्पन्याना इलेक्ट्रिक कार्स साठी विकत आहेत.
सोलर सिटी: याच तत्वावर आधारित त्याने त्याच्या भावाबरोबर सोलर सिटी नावाची कम्पनी काढली त्या मध्ये ते सोलर पॅनल बनवतात. त्यांनी आता अशा प्रकारची छप्पर कौले काढली आहेत कि जी नेहमीच्या छप्परांपेक्षा स्वस्त पडतील आणि त्याच बरोबर सूर्य ऊर्जेचे विजेत रूपांतर करतील. सोलर सिटी हि अमेरिकेतील दोन नंबर चा सोलर पॅनल बनवणारी कम्पनी आहे. इलेक्ट्रिक मोटारची मोठी अडचण म्हणजे जसे जागो जागी पेट्रोल पंप असतात त्या प्रमाणे जागो जागी इलेक्ट्रिक चार्जिंगची व्यवस्था असणे आवश्यक आहे. त्याची टेस्ला कम्पनी अशा प्रकारच्या सोयी शहर शहरात करत आहे, परंतु या सोलर कंपनीच्या टेकनॉलॉजिचा वापर टेस्ला मोटार मध्ये करण्याची खटपट त्याची चालू आहे जेणे करून इलेक्ट्रिक मोटारीला लागणारी वीज तिच्या टपावरूनच मिळेल
हायपर लूप: ऑगस्ट २०१३ मध्ये त्याने ध्यास घेतला कि शहरीकरणामुळे सध्याची वाहतुकीची समस्या फार गंभीर आहे. एक तर ट्रॅफिक जॅम मुळे इंधन भरपूर जाते, पर्यावरणाचा तोल ढळतो आणि शिवाय वेळ सुद्धा वाया जातो. या वर उपाय म्हणजे हाय स्पीड ट्रान्सपोर्ट सिस्टिम तयार करणे, त्या साठी त्याच्याकडे २ पर्याय आहेत. एक म्हणजे एका शहरापासून दुसऱ्या शहरापर्यंत वाहतूक (Long Distance) आणि दुसरी शहरातल्या शहरात वाहतूक.
पहिल्या प्रश्नासाठी त्यांनी हायपर लूप नावाची कम्पनी काढली, त्या मध्ये ग्रेटर लॉस अँजेल्स आणि सॅन फ्रान्सिस्को बे एरिया या दोन शहरांच्या अंदाजे ६०० कि मी अंतरासाठी एक नवीन डिझाईन तयार केले, त्या मध्ये एक पूर्ण पोकळ कमी हवेच्या दाबाची अशी पाईप लाईन तयार केली जाईल आणि त्या मध्ये तरंगणारे आणि इंडक्शन मोटर्स तसेच एयर कॉम्प्रेसर च्या साहाय्याने पुढे जाणारे बंदिस्त असे डबे ठेवले जातील. त्या बंदिस्त डब्यामधून माणसे प्रवास करतील. त्याचा ताशी वेग ७५० कि मी असेल. या सगळ्याचे तिकीट सुद्धा विमानाच्या तिकीट पेक्षा कमी असणार आहे या ठिकाणी होणारे घर्षण कमी असल्यामुळे त्याला शक्ती (पॉवर) कमी लागेल असे त्याचे म्हणणे आहे, शिवाय ज्वलनशील इंधनाला फाटा दिल्यामुळे पर्यावरणाचा समतोल सुद्धा राखला जाईल. त्याच्या मते हे ६०० कि मी अंतर जे मोटारीने ५.३० तासात कापता येते किव्वा विमानाने १ तास २५ मिनिटात कापता येते ते या पर्यायाने फक्त ३० मिनिटात कापता येईल, या व्यवस्थेत प्रवासी आणि मालवाहतूक दोन्हीहि होऊ शकेल. आता या बाबतीत यशस्वी चाचणी झाल्या नंतर मस्क ला अमेरिकेच्या वाहतूक विभागाकडून २५ जुलै २०१७ ला न्यू यॉर्क ते वॉशिंग्टन डी. सि. या मार्गावर फिलाडेल्फिया आणि बाल्टिमोर या दोन स्टेशनांवर थांबा देत २२६ कि मी चा प्रवास मार्ग बांधण्याची परवानगी मिळाली आहे. अशाच प्रकारची परंतु थोड्या वेगळ्या डिझाईन वर आधारित शहरात भुयारी मार्गाने वाहतूक करण्याची तयारी त्याच्या आणखी एका कम्पनी "द बोरिंग कम्पनी" ने सुरु केली आहे. हे सर्व अशक्य वाटणाऱ्या गोष्टी जर या पुढील ३-५ वर्षाच्या काळात प्रत्यक्षात आल्या तर आश्चर्य वाटायला नको. या प्रकारच्या वाहतुकीवर हायपरलूप इंडिया या कम्पनीने श्री नितीन गडकरी यांना मुंबई - दिल्ली, कलकत्ता- चेन्नई, आणि दिल्ली- जयपूर या तीन मार्गासाठी ताशी १३०० किमी धावणाऱ्या व्यवस्थेचे प्रस्ताव दिले असून जर ते मान्य झाले तर २०२१ पर्यंत काम पूर्ण होईल असे त्यांचे म्हणणे आहे. हे सर्व करत असताना ते सरकारकडून कोणतीही अनुदान मागत नाहीत. त्यांच्या मते या वाहतुकीमुळे जेव्हडी कारबर्न उत्सर्जित कमी होईल त्याचे जे फायदे मिळतील तेच आमचे अनुदान असेल. तज्ज्ञांच्या मते जर हे यशस्वी झाले तर ३०,००० कोटी खर्चून बांधणारी महागडी बुलेट ट्रेन चा पत्ता कट होईल.
या शिवाय यंत्र मानवात (Robot) मध्ये उपयोगी येणारी कृत्रिम बुद्धिमत्ता या विषयात सुद्धा त्याचे काम सुरु आहे.
अशी म्हण आहे कि “यशस्वी माणूस वेगळ्या गोष्टी करत नाहीत, ते त्याच गोष्टी वेगळ्या पद्धतीने करतात”. त्या पुढे जाऊन मी असेहि म्हणीन कि ते चाकोरी बाहेर जाऊन सुद्धा विचार करतात.
Madhav Bhole
Madhavbhole99@gmail.com (Mob: 8451886759)
No comments:
Post a Comment