Tuesday, August 16, 2022
ब्राह्मण संस्था आणि प्रगती
12.08.22
ब्राह्मण संस्था आणि प्रगती;
काल एक आजोबा भेटले होते. ते कुठल्याशा ब्राह्मण सभेच्या वार्षिक सभेला गेले होते. म्हणाले काय सांगू तुम्हाला, सकाळी 10 वाजता सभा सुरू झाली ती संध्याकाळी 5 वाजता अडजर्न करायची वेळ आली, आणि हे दरवर्षीचेच आहे.
एका पेक्षा एक सुशिक्षित लोक आहेत पण मुद्यावरून गुद्यावर कधी येतील सांगता येत नाही. एकमेकांना समजावून सांगणे राहिले बाजूला पण प्रत्येकाला वाटते की मीच शहाणा आणि समोरच्याला काही समजत नाही. बरे प्रत्येकाला वाटते की मी जे बोलतो ते समाज हिताचच आहे. पण मग एव्हडे एकमेकांच्या विरुद्ध का आणि कसे? त्याचे कारण गटबाजी आणि अहंकार. अमक्याची मी चार लोकांत कशी हजामत केली हे सांगण्यात त्यांना आनंद वाटतो. पण त्यांना सांगा की अमुक दिवशी संस्थेत काम आहे जरा येशील का मदतीला, मग शंभर कारणे सांगतील. बरे दुसऱ्याने केलेल्या कामाची कदर नाही आणि समजून घ्यायची तयारी नाही.
यांच्या बापजाद्यानी पै पै जमवून इस्टेटी उभ्या केल्या, त्यातून काही काळ उत्पन्न मिळत होते पण आता महागाई मुळे उत्पन्नाचा आणि खर्चाचा ताळमेळ बसत नाही. देणगीदार स्वयंकेंद्रीत झाल्यामुळे आखडले. त्यात हे असे घोळ बघितले तर कोण येणार ह्या बजबजपुरीमध्ये? त्यामुळे तरुण वर्ग लांब आणि हे अनुभवी भांडत बसले आपसात तर कशी प्रगती होणार आपल्या समाजाची सांगा मला?
ते म्हणतात ठीक आहे एखाद्या मुद्यावर नाही पटणार म्हणून काय सर्वच मुध्ये चुकीचे असू शकतील का? पण कोणी एखादी सूचना केली की त्याला उपसूचना आलीच म्हणून समजा, मग मूळ सुचनेवरील चर्चा राहते बाजूला आणि उपसूचनेवरच चर्वण होते. या मध्ये सामान्य सभासदांचा वेळ फुकट जातो आणि तो निराश होतो.
मी त्या काकांना म्हटले की जर अशी परिस्थिती असेल तर त्या मंडळींनी प्रथम ज्या विषयात मतभिन्नता आहे किंवा होईल असे वाटते त्या विषयावर स्वारस्य ( interested ) असलेल्या माणसांचा अभ्यासगट नेमावा, त्यावर त्या अभ्यास गटात सखोल चर्चा व्हायला हवी. मत पटत नाही म्हणून बहिष्कार टाकणारी व्यक्ती किंवा आपले मत ग्राह्य व्हावे म्हणून गटबाजी करणारी व्यक्ती यात न घेतलेली चांगली पण जे चार चांगले लोक आहेत ते तरी त्या विषयाचा अभ्यास करून त्याचा अहवाल कार्यकारीणीला सादर करतील आणि मग कार्यकारिणी त्यावर विचार करून निर्णय घेईल म्हणजे वार्षिक सभेतील बरेचसे मुध्ये आधीच निकाली लागलेले असतील.
पण हे करण्यासाठी मांजराच्या गळ्यात घंटा कोण बांधणार ? माझ्या मते कार्यकारिणीने हे काम करावे म्हणजे सभासद, ( minority) स्टेक्स होल्डर किंवा विरुद्ध मत असलेल्या व्यक्तीची बाजूसुद्धा ऐकली जाते आणि जे संस्थेच्या हिताचे त्याचा निर्णय होतो. मी म्हणतो म्हणून तुम्ही ऐका हे आपापल्या घरी ठेवून संस्थेचे हित ते माझे हा विचार असायला हवा. अनेक लोक अशा संस्थांमध्ये येतात ते मोठेपणा घेण्यासाठी किंवा आपला मोठेपणा मिरवण्यासाठी. त्यांचा इगो एव्हडा मोठा असतो की त्यांना अशा गोष्टी कोणीही समजावून सांगू शकत नाही. त्यांच्या अशा वागण्यामुळे विरोधी वातावरण तयार होऊन संस्थेच्या आणि पर्यायाने समाजाच्या प्रगतीमध्ये अडसर निर्माण होतो.
माझा अनुभव सांगतो. आमच्या गावात कित्येक वर्षे (70) दोन मंडळे आहेत एक मुंबईकर आणि दुसरे ग्रामस्थांचे मंडळ आणि दोन्ही एकाच देवस्थानासाठी काम करतात पण पूर्वी पासून ही मंडळे विभक्त आहेत. मी ज्यावेळी आमच्या मुंबईच्या मंडळाचा सचिव झालो, त्यावेळी ही गोष्ट माहिती असल्यामुळे गावच्या मंडळातील अध्यक्षांना एक चार ओळींचे पत्र लिहिले "आपले मंडळ गेले कित्येक वर्षे श्रींची सेवा अतिशय उत्तम रीतीने करत आहे आणि ह्या पत्राद्वारे आमचे मंडळ त्याची दखल घेत आहे". उलट टपली त्यांच्या सचिवांचे पत्र आले. लिहितात, "गेल्या 75 वर्षात तुमच्या मंडळाने असे कधी म्हटले नाही. तू जी कौतुकाची थाप आमच्या मारलीस त्यामुळे आनंद वाटला. तुम्ही आमच्या कामाची दखल घेतलीत यातच सर्व आले. या पुढे तू कुठलेही मंदिराचे काम सांग आमचे संपूर्ण सहकार्य असेल." त्या प्रमाणे गेल्या 14 वर्षात आम्हाला त्यांचेकडून सम्पूर्ण सहकार्य मिळाले आहे आणि जोपर्यंत ही भावना राहील तोपर्यंत हे सुरूच राहील.
मी म्हणतो दुसऱ्याला मोठेपणा दिल्याने किंवा त्याच्या कामाचे कौतुक केल्याने काही नुकसान होत नाही उलट झाला तर फायदाच होतो पण त्यासाठी आपले मन मोठे असावे लागते.
मला एका शिक्षकाने सांगितलेली गोस्ट आठवते. एका पुलावर दोन मोठे शिंगवाले बकरे एकमेकांच्या विरुद्ध दिशेने येत होते. पूल एव्हडा छोटा होता की एकावेळी एकच प्राणी जाऊ किंवा येऊ शकत होता. हे समोरासमोर आल्यामुळे एकमेकांचा पुढे जाण्याचा रस्ता अडकला आणि ते लागले एकमेकांत शिंग घालायला. मग त्यातील एक समजूतदार बकरा होता तो खाली बसला आणि दुसऱ्या बकऱ्याला त्याच्या पाठीवरून पाय देऊन पुढे जाण्याची खूण केली. दुसरा बकरा पुढे गेला आणि त्याने त्याचे आभार मानले आणि विचारले की तू असे का केलेस? त्यावर तो म्हणाला आपण दोघे एकमेकांना शिंग मारत बसलो असतो तर दोघेही रक्तबंबाळ झालो असतो. आता तू तुझ्या मार्गाला जाऊ शकतोस आणि मी माझ्या. मी वाकुन खाली बसलो म्हणून कमजोर नाही हे समजून घे.
माधव भोळे
Subscribe to:
Post Comments (Atom)
No comments:
Post a Comment