Tuesday, August 16, 2022
७९ वर्षाचा कर्मयोगी अशोक सुटा
७९ वर्षाचा कर्मयोगी अशोक सुटा.
साधारणपणे साठी ओलांडली की लोक निवृत्ती आणि परमार्थाच्या मागे लागतात. पण कर्मयोगी अशी व्यक्ती असते की ती आयुष्यभर सतकर्माच्या पाठी असते. असाच एक कर्मयोगी आहे श्री अशोक सुटा ज्याने वयाच्या ७९ व्या वर्षी आणखी एका कम्पनीची घोषणा ७ जुलै 22 ला केली. त्या कंम्पनीचे नाव आहे हॅपीयेस्ट हेल्थ.
कोण आहेत हे अशोक सुटा.
12 नोव्हेंबर 1942 साली दिल्ली येथे जन्मलेले अशोक सुटा, 1960 साली लखनऊच्या प्रसिद्ध अशा "ला मार्टनिर" कॉलेजमधून इंटर सायन्स झाले आणि 1964 साली पुढे आय आय टी रुरकी ( त्या वेळची युनिव्हर्सिटी ऑफ रुडकि ) मधून बी ई इलेक्ट्रॉनिकस तसेच 1973 साली एशियन इन्स्टिट्यूट ऑफ मॅनेजमेंट फिलिपीन्स मधून एम बी ए झाले. ( ही त्यावेळी आशिया मधील एक जग प्रसिद्ध मॅनेजमेंट इन्स्टिट्यूट होती. आजही आहे. ).
त्यावेळी श्रीराम ग्रुप ऑफ इंडस्ट्रीज ( Delhi cloth mill DCM group, दिल्ली ) ने प्रथमच भारतात मायक्रोप्रोसेसर वर आधारित कॉम्प्युटर बाजारात विकायला आणला होता. त्यामध्ये त्यांनी 1965 ला नोकरीला सुरवात केली. आपल्या माहितीसाठी लिहितो HCL चे आताचे यशस्वी अध्यक्ष शिव नाडर ह्यांनी सुद्धा येथूनच व्यावसायिक आयुष्याची सुरवात केली आणि मग HCL स्थापन केली. नंतर सुटानी विप्रो कंपनी मध्ये नोकरी करून 1984 ते 1999 पर्यंत त्यांनी विप्रो चे उपाध्यक्ष म्हणून काम केले आणि 1984 च्या वार्षिक 2 मिलियन डॉलर टर्नओव्हर वरून 500 मिलियन डॉलर एव्हडा नेऊन ठेवला. विप्रो च्या वाढीत त्यांचा फार मोठा वाटा आहे.
त्यानंतर त्यांनी 1999 मध्ये विप्रोतुन राजीनामा देऊन 10 व्यवसाईक आणि व्हेंचर कॅपिटल पार्टनर च्या साहायाने माईंड ट्री नावाची सॉफ्टवेअर कम्पनी काढली आणि 2011 पर्यंत तिचा टर्नओव्हर 402 मिलियन डॉलर वर नेऊन ठेवला. त्याआधी 2007 साली त्यांनी माईंड ट्री चा शेयर बाजारात आणला तो 100 पेक्षा जास्त वेळा ओव्हर सबस्क्राईब झाला. 2019 साली लार्सन अँन्ड टूब्रो इन्फोटेक ने माईंड ट्री ला विकत घेतले त्यावेळी त्यांचा ट्टर्नओव्हर 1 बिलियन डॉलर होता आणि त्यांचे कडे 20,000 लोक काम करत होते.
त्यानंतर आपल्या सहकाऱ्यांच्या आणि त्यांचे, कम्पनीचा विस्तार कसा करावा याबद्दल मतभेद झाल्याने त्यानी 2011 मध्ये माईंड ट्री मधून बाहेर पडून आपल्या मित्रांच्या साहाय्याने हॅपीएसट माईंड नावाची सॉफ्टवेअर कम्पनी काढली. 2021 मध्ये त्यांचा टर्नओव्हर 104 मिलियन डॉलर आहे. सध्या
हॅपीएसट माईंड ची घोडदौड जोरात सुरू आहे. ते सुरू असतानाच त्यांनी आता आपले लक्ष वैदयकीय विषयाकडे केंद्रित करून गेल्या वर्षी "वाढते वय आणि न्यूरॉलॉजीकल समस्या" याविषयावर संशोधन करण्यासाठी स्कॅन नावाचे एक ना-नफा एन जी ओ (ना-सरकारी ) संशोधन केंद्र काढले आहे.
या विषयातील पुढील पाउल म्हणून सर्वसामान्य माणसाचे आरोग्य, त्याचे प्रश्न, त्यावरील तज्ञ मते, आयुर्वेदिक, ऑलोपथिक, युनानी, होमिओपॅथी विषयातील उपचार पद्धती इत्यादी सर्व गोष्टींचा उहापोह करण्यासाठी "हापीएसट हेल्थ" नावाची कम्पनी सुरू केली आहे. स्वतःचे वय 79 असताना त्यांची समर्पित जीवन जगण्याची आणि आपले ज्ञान आणि संपत्ती लोकोपयोगी व्हावी यासाठी चाललेली धडपड बघून आनंद आणि आश्चर्य नक्कीच वाटते.
हे सर्व करत असताना ते स्वतः मिळवलेल्या संपत्ती मधील काही वाटा अपंग मंडळींसाठी ट्रस्ट काढून खर्च करत आहेत.
त्यांच्या कार्याला सलाम आणि शुभेच्छा.
माधव भोळे.
Subscribe to:
Post Comments (Atom)
No comments:
Post a Comment