Wednesday, May 3, 2023
Unique selling proposition ( अद्वितीय विक्री विधान )
Unique selling proposition ( अद्वितीय विक्री विधान ).
एकदा लोकमान्य टिळक म्हणाले होते, माझ्या मुलाने मोच्याचा व्यवसाय केला तरी मला चालेल, पण त्याने असे जोडे बनवावेत कि ते इंग्लंडच्या राणीने मागवून वापरावेत. थोडक्यात जो व्यवसाय कराल त्यात आपण सर्वोत्कृष्ट सेवा किंवा उत्पादन विका किंवा तयार करा ज्यामुळे आपण त्या व्यवसायासाठी ओळखले जाल.
जगातील सर्वात श्रीमंत (एक नंबर ) म्हणजे 2.61 ट्रीलीयन डॉलर मार्केट कॅपिटलाएझेशन असलेल्या आणि 394.3 बिलीयन डॉलर्स वार्षिक टर्न ओव्हर (2022) असलेल्या ऍपल कॉम्पुटर कंपनी चा सी. ई. ओ. "टीम कुक" काल ज्यावेळी मुंबईत आपल्या भारतातील पहिल्या शोरूमचे उदघाट्न करण्यासाठी आला आणि भारतातातील मोठं मोठया उद्योगपतीना भेटण्याच्या व्यस्त कार्यक्रमात सुद्धा, सुप्रसिद्ध बॉलिवूड अभिनेत्री माधुरी दीक्षित बरोबर वेळ काढून वडापाव खाण्यासाठी आवर्जून गेला त्या वेळी मुंबईच्या वडापाव बरोबरच त्या छोट्या विश्रांतिगृहाची सुद्धा कीर्ती द्विगुणित होते हे नक्की. संपुर्ण जगात ही बातमी पसरली.
हे विश्रांती गृह म्हणजे स्वाती स्नॅक्स, ज्याच्या मुंबईत फक्त दोन शाखा आणि अहमदाबाद येथे दोन शाखा आहेत. हे रेस्टॉरंट 1963 साली मीनाक्षी झवेरी यांनी ज्यावेळी या व्यवसायात महिला नव्हत्या तेव्हा सुरु केले. त्यांचे पहिले विश्रांती गृह 110 sq ft जागेत ताडदेव येथे सुरु झाले.
यांच्या विश्रांती गृहातील पदार्थ अत्यंत घरगुती जसे कि केळीच्या पानावर दिले जाणारे वेगवेगळ्या प्रकारचे घावन (ज्याला ही मंडळी पानकी म्हणतात ). सर्व प्रकारची चाट ( भेळपुरी, पाणी पुरी, वडापाव, दाबेली, ढोकळा इत्यादी ), सर्व प्रकारांचे डोसे, थालीपीठ, इत्यादी. पण असे म्हणतात कि त्याची चव एव्हडी उत्कृष्ट असते कि अंबानी ते कुटुंबीयांचे एक आवडते खाण्याचे ठिकाण आहे. आता मीनाक्षी नंतर त्यांच्या कन्या आशा झवेरी हे विश्रांती गृह अतिशय जोमाने चालवत असून त्यांच्या 4 शाखा आहेत. सुरवातीला आशा ला ह्या सर्व विषयात बिलकुल रस नव्हता परंतु जबाबदारी पडल्यानंतर त्यांनी सर्व गोष्टी शिकून घेऊन मेनू मध्ये मागणीनुसार नावीन्य पूर्ण बदल केले आणि आता आशियातील सर्वात श्रेष्ठ अशा 50 रेस्टॉरंट मध्ये त्यांचा नंबर लागतो. आपणास ऐकून आश्चर्य वाटेल कि तेथे एक वडापाव रु 165 ला विकला जातो.
नवीन विश्रांती गृह प्रशस्त असून त्याचे इंटीरियर मोड्रेट आणि मॉडर्न आहे. जास्त फाफट पसारा नाही. ह्या व्यवसायावर आशा झव्हेरी कोट्याधीश झाल्या आहेत.
ह्या व्यवसायात तुम्ही किती किमत लावता ह्या पेक्षा ते कसे बनवताहेत ( हायजीन ), कोणत्या दर्जाचे पदार्थ वापरतात, चव कशी आहे, सर्व्ह कसे करता, प्रेझेंटेशन आणि ग्राहकांची विचारपूस ह्या गोष्टींना महत्व आहे.
आशा झव्हेरिनी ह्या सर्व विषयांत कडी केली आहे म्हणून तर टीम कुक आणि अंबानीं सारखी मंडळी वडापाव खायला तेथे जातात, नाहीतर आमच्या पुण्या, मुंबईत, गल्लोगली वडापाव, वडेवाले, मिसळ आणि त्यांचे फ्रंचाईस पडले आहेत पण ते आशियन बेस्ट रेस्टॉरंट यादीत मध्ये अजून झळकळे नाहीत.
असो आपण ही आपल्या व्यवसायाचे एखादे Unique Selling Proposition बनवा आणि आजच कामाला लागा असे वाटले म्हणून हा लेखन प्रपंच.
माधव भोळे
Subscribe to:
Post Comments (Atom)
No comments:
Post a Comment