Wednesday, May 3, 2023
स्पेस टुरिझम आणि सर रिचर्ड ब्रँसन
स्पेस टुरिझम आणि सर रिचर्ड ब्रँसन
आपण ब्रिटन मधील व्हर्जिन अटलँटिक एअरवेज चे किंवा सर रिचर्ड ब्रँसनचे नांव नक्कीच ऐकले असेल. लहानपणापासूनच रिचर्डला लिहा वाचायला उशिरा येणे अशी अडचण होती. त्याला मेडिकल टर्म मध्ये dyslexia किंवा शिकण्याची अडचण असे म्हणतात. त्याच्यामते अशी मुले खूप क्रियेटिव्ह आणि बुद्धिमान असतात.
लहानपणी शाळेत असताना रिचर्ड ब्रँसन ( आताचे सर रिचर्ड ब्रँसन) याने 15 व्या वर्षी शाळा सोडून विद्यार्थ्यांचे एक मॅगझीन काढले. त्यावेळी त्याचे हेडमास्तर म्हणाले कि एक तर तू तुरुंगात तरी जाशील नाहीतर अब्जाधीश तरी होशील. रिचर्डच्या मते त्याला शाळेत शिकवत असलेल्या गणित, भूमिती, फ्रेंच ह्या सारख्या विषयात रस नव्हता. त्याचे म्हणणे होते कि मला आणि माझ्या सारख्या असंख्य मुलांना जगात काय चालले आहे ते माहिती हवे असते. मॅगझीन साठी लागणारा पेपर आणि प्रिंटिंग खर्च करण्याची मी तयारी ठेवली होती. त्यामुळे ती जोखीम मी घेतली असे तो म्हणतो. पुढे अनेक अडचणींवर मात करत तो एक यशस्वी अब्जाधीश व्यवसायिक बनला.
व्हर्जिन अटलँटिक एअर वेज ही कंपनी ब्रिटन मधील व्हर्जिन ग्रुप होल्डिंगची एक उपकंपनी आहे. सर रिचर्ड ब्रँसन हा त्याचा प्रवर्तक आहे. ह्या ग्रुपची विमानसेवा, ट्रॅव्हल टुरिझम, हेल्थ केयर, म्युझिक अँड एंटरटेनमेंट, टेलिकॉम अँड मीडिया, फायनान्स अँड बँकिंग, ज्वेलरी, अंतराळ इत्यादी विषयात व्यवसायिक गुंतवणूक आहे. व्हर्जिन ग्रुप मध्ये एकंदर 71,000 लोक काम करतात आणि ब्रँसनच्या निव्वळ मालमत्तेचे मूल्य 3.6 बिलीयन डॉलर्स आहे.
माणसाची स्वप्न, जिद्ध आणि जोखीम घेण्याची तयारी माणसाला कोठे घेऊन जाईल हे सांगता येत नाही. अंतराळ एक विहंगम, विलोभनीय दृश्य आहे आणि अनेकांना त्याचे आकर्षण आहे. 2004 साली रिचर्ड च्या मनात आले कि त्याच्या नेहमीच्या विमान कंपनी बरोबरच अंतराळ प्रवासासाठी लागणारे विमान किंवा स्पेस शटल तयार करून सामान्य माणसाला सुद्धा अंतराळाची सफर घडवून आणावी.
त्या साठी त्याने व्हर्जिन गॅलॅक्टिक नांवाची स्वतंत्र कंपनी 2004 साली काढली. त्या मार्फत अंतराळात सफर करण्यासाठी वेगवेगळे प्रयोग केले गेले. त्यापैकी एक सबसिडीयरी व्हर्जिन ऑर्बीट मध्ये त्यांनी छोटे साटेलाईट लॉचिंग, इंटरनेट आणि टेलिकॉम इत्यादी विषयात काम करण्यासाठी तिला वेगळी केली. या कंपनी तर्फे 25 मे 2020 रोजी पृथ्वीच्या गुरुत्वाकर्षण कक्षेच्या बाहेर जाणारे पहिले रॉकेट लॉन्च केले परंतु ते अपयशी ठरले.
17 जानेवारी 2021 रोजी त्यांनी परत एकदा आपल्या चुका सुधारून अमेरिकेतील नासा साठी डेमॉन्स्ट्रेशन म्हणून लॉन्चर वन ह्या रॉकेट चा वापर करून 10 छोटे उपग्रह यशस्वीपणे अंतराळात सोडले. त्यानंतर ही कंपनी मूळ व्हर्जिन गॅलॅक्टिक मध्ये विलीन केली गेली.
हे करत असताना व्हर्जिन गॅलॅक्टिक ह्या मूळ कंपनी तर्फे अंतराळ यान पाठवण्यासाठी प्रयोग सुरुच होते.
13 डिसेंबर 2018 रोजी व्हि.एस.एस युनिटी-3 ह्या त्यांच्या अंतराळ यानाने प्रथम 2 पायलटसह पृथ्वीच्या गुरुत्वाकर्षण कक्षेच्या बाहेर 51.4 मैल जाऊन परत येण्याची यशस्वी सफर करून दाखवली. ( नासाच्या मते पृथ्वीच्या कक्षेबाहेर 50 मैल लांब गेल्यानंतरच त्याला सब ऑरबिटल म्हणतात जेथे पृथ्वीचे गुरुत्वाकर्षण संपून अंतराळ सुरु होते. तेथे गुरुत्वाकर्षण नसल्यामुळे वजन विरहित अवस्था तयार होते. या ठिकाणी त्या विमानाचा किंवा रॉकेटच्या परतीच्या प्रवासाची दिशा पृथ्वीच्या दिशेने ठेवावी लागते नाहीतर ते अंतराळात भरकटेल).
त्या नंतर 11 जुलै 2021 रोजी स्वतः रिचर्ड ब्रँसन, वयाच्या स्वतःच्या 70 व्या वर्षी, इतर 3 अंतराळ सोबतींना घेऊन 15 मिनिटे वि. एस.एस. युनिटी-4 मधून अंतराळात गेला, पैकी 1.5 मिनिटे तो प्रत्यक्ष विमानाबाहेर वजन विरहित अवस्थेत तरंगत होता. त्याने मीडिया ला सांगितले कि आज माझे लहानपणीचे स्वप्न प्रत्यक्षात आले आहे.
त्या नंतर त्यांच्या कंपनीने फेब्रुवारी 2022 मध्ये हा स्पेस टुरिझम चा कार्यक्रम लोकांसाठी आगाऊ बुकिंग साठी खुला केला असून 2023 पासून महिन्याला 3 या प्रमाणे ते ही विमाने सोडणार आहेत. त्यांच्या ह्या कार्यक्रमाला आजपर्यंत 2,00,000 ते 4,50,000 डॉलर्स प्रति तिकीट या प्रमाणे आतापर्यंत 700 लोकांनी तिकिटे बुक केली आहेत. त्यासाठी 1,50,000 डॉलर्स अनामत ठेवावी लागणार आहे. एकंदर प्रवास दीड तासाचा असणार आहे आणि त्यापैकी काही काळ लोक सीट बेल्ट सोडून वजन विरहित अवस्थेत राहणार असून 17 खिडक्या असलेल्या विमानातून पृथ्वी तसेच क्षितिज बघू शकतील. आता तेथील विमान आणि अंतराळ रेग्युलटरी ओथॉरिटी नी हिरवा सिग्नल दिला कि हा प्रवास सुरु होईल.
असेच स्पेस टुरिझम, जेफ बेझो प्रमुख असलेल्या ऍमेझॉन कपंनीच्या ब्लू ओरिजिन ह्या स्पेस टुरिझम कंपनीने सुद्धा यशस्वी रित्या सुरु केले आहे.
माधव भोळे
Subscribe to:
Post Comments (Atom)
No comments:
Post a Comment