Saturday, June 22, 2024
एकच ध्यास कोकण चा विकास!!
एकच ध्यास कोकण चा विकास!!
महाराष्ट्र हे देशातील सर्वात प्रगतिशील राज्य मानले जाते. त्यात कोकणाला निसर्गाने दिलेले वरदान म्हणजे अथांग समुद्र आणि स्वच्छ किनारे, डौलदार वळणाच्या नागमोडी खाड्या, उंचच उंच डोंगर, हिरवीगार वनसंपदा, बारमाही वाहणारे धबधबे, लहान मोठ्या नद्या आणि मुख्य म्हणजे प्रदूषण मुक्त वातावरण. काय नाही ते सांगा इथे? मग एव्हढे करून कोकण प्रगती पथावर का नाही? आपल्या जिल्ह्याचा विकास कसा करता येईल हा प्रश्न माझ्याप्रमाणेच सर्वानाच पडलेला असेल!!
आपल्या सुपीक तांबड्या जमिनीवर तयार होणारी फळ आणि फुल संपदा ह्याचा आपण विकास करायला हवा. आंबा, काजू ह्या पारंपरिक पिकांबरोबर काळीमिरी, लवंग, दालचीन सारखे मसाल्याचे पदार्थ, बांबू, करवंद, कोकम ह्या विषयात आपण व्यवसायिक लागवड करायला हवी. बांबूचे कोंब माकडे खातात तर ते फुटल्यानंतर त्याला कडुलिंबाच्या तेलाचा एक हात ब्रशने मारावा आणि पावसाळ्यात वर प्लास्टिक बांधावे म्हणजे वानर, माकडे खाणार नाहीत आणि किडही लागणार नाही. एकदा बांबू 1 ते 1.5 फुटाचे वर गेला की मग तो माकडे खात नाहीत. डोंगर उतारावर आपले पावसाळी पाणी झटकन ओसरून जाते, त्याठिकाणी मोठमोठाली शेततळी बांधून त्यातून किंवा बोअरच्या साहाय्याने ड्रिप इरिगेशन व्यवस्था करून पोफळीच्या बागा वाढवायला हव्यात आणि त्यावर काळी मिरीचे आंतरपीक घ्यायला हवे. त्यामुळे आपले वार्षिक उत्पन्न वाढेल. वानर आणि माकडे काळी मिरी खात नाहीत.
शेडनेट च्या सहायाने सिझनला वेलवर्गीय भाजीपाला, भोपळी मिरची सारखे रोख उत्पन्न घेता येते. सणासुदीच्या सिझन मध्ये झेंडूची फुले चांगली कमाई करून देतात जे अगदी डोंगर उतारावर सुध्दा होते आणि माकडे खात नाहीत. ज्या ठिकाणी इरिगेशन ची व्यवस्था होऊ शकत नाही अशा ओसाड जमिनीमध्ये आयन, किंजळ, भेळा, बांबू अशी जंगली झाडे लावावीत, त्याचे उत्पन्न साधारण 10 वर्षात तयार होते. त्याला पाणी द्यावे लागत नाही. साग 20 वर्षानंतर तयार होतो तो म्हातारपणाचा प्रोवीडांट फंड आहे. आमच्या गावात एकाने 5000 साग लावले आहेत, 10 वर्षात फार उंच आणि मजबूत झाले आहेत. आपल्या कोकणात चंदनाचे सुध्दा झाड होते पण लहान असताना माकडांपासून थोडी निगा राखायला हवी. एकदा मोठे झाले की ती खात नाहीत.
आपल्या जिल्ह्यात असलेल्या शेती मदतनिसांचा आपण उपयोग करून घेत नाही. सरकारी योजना भरपूर आहेत पण आम्ही लाभ घेत नाही. कित्येक जमिनी सामाईक असतात, त्यावर ना हरकत प्रमाण पत्राअभावी काही कामे रखडतात. आमच्या पैकी कित्येकांनी आपल्या जमिनीचे परीक्षण करून आपल्या झाडांना काय खते लागतात, काय मायक्रो न्युट्रियांट्स लागतात याची माहिती घेतलेली नाही. कोणी सांगेल तसे किंवा दुकानदार सांगेल ते खते आणि औषधे वापरतात.
जिथपर्यंत आपण मोठे जमीन तुकडे आणि व्यवसायिक गुंतवणूक करणार नाही तेथपर्यंत त्याच्या आर्थिक गणिताचा ताळमेळ बसणार नाही. त्यासाठी वेळ पडल्यास सामूहिक शेती करता येईल का हा विकल्प पण विचारात घ्यायला हवा. आपण सर्व प्रश्नांना एकच उत्तर, प्रश्न विचारून देत आलो आहोत. "वानर आणि माकडांचा खूप त्रास आहे बंदोबस्त कसा करायचा ते आधी सांगा?". जी फळे आणि झाडे माकडे खात नाहीत त्यावर भर द्यावा. थोडी फार राखण ठेवली तर माकडांचा त्रास कमी होतो.
फूड प्रोसेसिंग ह्या विषयात आपण फार पाठी आहोत. कोकम सरबत, अंबावडी, फणस पोळी, फारफार तर लोणची ह्या पलीकडे आपण अजूनही गेलो नाही. आपली आंबा कॅनिंग कपॅसिटी कमी असून आपला बहुतेक माल गुजरात मध्ये जातो. आपला बहुतेक काजू गोवा आणि केरळ मध्ये प्रोसेसिंगला जातो. आंबा, फणस, काजू, कोकम, आवळा, करवंद, जांभूळ ह्यापासून अनेक पदार्थ तयार होऊ शकतात. वेगवेगळ्या प्रकारचे जाम, मोरंबे, चुंदा, बर्फी, सरबते इत्यादी पदार्थ तसेच सर्व प्रकारचे पापड, फेण्या, कुरडया इत्यादी वाळवणाच्या पदार्थाना खूप मागणी आहे. तसेच सर्व प्रकारच्या पिठाना, नाचणी सत्त्व ह्या पदार्थाना शहरात खूप मागणी आहे. त्यासाठी योग्य कमिशनवर लोक घरगुती विक्री करायला तयार आहेत. पण त्याला आधुनिकतेची सुध्दा जोड हवी. महिला बचत गट एकत्र येवून या विषयात महत्वाची कामे करू शकतील. फक्त भारताचे फूड प्रोसेसिंग मार्केट 25 लाख कोटी रुपये आहे.
हापूस हा आंब्याचा राजा समजला जातो. हापूस ची चव जगात उत्कृष्ट आंब्याची चव मानली जाते. भारतात 1500 प्रकारचे आंबे तयार होतात. त्यातील 1000 प्रकारचे आंबे व्यवसायिक उत्पादन देतात. भारतात एकंदर 200 लाख मे. टन आंबा उत्पादन होते पैकी सर्वात जास्त उत्तरप्रदेश मध्ये 40 लाख टन होते तर सर्वात कमी महाराष्ट्रात 5,66,000 मे. टन होते म्हणजे संपूर्ण भारताच्या सुमारे 2.5%. पेप्सी, कोका कोला, पार्ले सारख्या कंपन्यांना त्यांच्या माझा, फ्रूटी, सारख्या आंबा पेयांमध्ये लाखो टन आंब्याची गरज आहे. एकटा कोका कोला माझा पेयासाठी वर्षाला 70,000 मेट्रिक टन आंबा भारतातून विकत घेतो.
आपल्या जिल्ह्यात डॉ. बाळासाहेब सावंत कृषी विद्यापीठ,दापोली, कॉलेज ऑफ ऍग्रिकलचर, दापोली, कॉलेज ऑफ फोरेस्ट्री दापोली, डेअरी आणि ऍनिमल हजबंड्री शाखा, दापोली आहे. त्याच विद्यापीठाच्या अंतर्गत भाट्ये नारळ संशोधन केंद्र आहे, शिरगाव येथे मत्स्य व्यवसाय आणि मत्स्योत्पादन कॉलेज आहे. सावर्डे येथे गोविंदराव निकम कृषी कॉलेज, दहीवली, चिपळूण येथे शरद पवार कृषी कॉलेज, शरद पवार कॉलेज ऑफ फूड टेक्नॉलॉजी आणि होरटीकलचर सुध्दा आहे. ह्या सर्व ठिकाणी तयार झालेले विद्यार्थी आपल्याला शेतात काम करताना दिसत नाहीत. ते शहरात नोकरीला जातात. यातील उच्च शिक्षित कधी बँकांच्या अग्रिकलचरल लोन डिपार्टमेंट मध्ये नाहीतर पीक विम्याच्या कंपन्यांत किंवा शेतीविषयक केमिकल विकणाऱ्या कंपन्यांत काम करतात. शहरात 10 x 12 ची भाड्याची खोली असली तरी चालेल पण बापजाद्यानी 5 एकर जमीन आणि मोठे घर ठेवले असेल ते नको. त्याची दोन कारणे एक म्हणजे रोख पैसा आणि दुसरी म्हणजे विवाह समस्या.
आपण सरकारी योजनांचा लाभ पूर्णपणे घेत नाही. भाऊबंदकी मुळे आपल्या कित्येक जमिनी ओसाड आहेत. ह्यासाठी समाज म्हणून आपण एकत्र यायला हवे. आपल्या खाडी किनारच्या जमिनी सुध्दा ओसाड आहेत. त्यात मत्स्योत्पादन विषयक शेती करायला हवी. आपण खारे आणि गोड्या पाण्यातील मत्स्योत्पादन सुध्दा करू शकतो. जगाची मत्स्योत्पादन मागणी 228 बिलियन डॉलर ची आहे त्यापैकी भारताचा वाटा फक्त 7.7 बिलियन डॉलर एवढाच आहे. आपण कलचर्ड मोत्याची शेती करू शकतो. त्याला जगात खूप मागणी असून हे उत्पन्न 15 ते 18 महिन्यात तयार होते. तसेच रंगीत ( ऑर्नामेंटल ) माश्यांची पैदास करून ती शहरात किंवा परदेशी विक्रीस पाठवू शकतो. जगात 322 मिलियन डॉलर चा ऑर्नामेंटल फिशचा व्यवसाय आहे त्यात भारत फक्त 3.22 मिलियन डॉलर एक्सपोर्ट करतो तर सिंगापूर सारखा छोटा देश 62 मिलियन डॉलर करत आहे.
अलीकडे आपल्या जिल्ह्याने पर्यटन क्षेत्रात खूप प्रगती केली आहे. परंतु आपल्या भागातील रस्ते आणि दळणवळणाची साधने सुधारायला हवी. कोकण रेल्वे च्या फेऱ्या वाढवायला हव्यात तसेच त्यात चिपळूण, रत्नागिरी साठी विशेष डब्याची सोय हवी. एस टी च्या सेवेचा दर्जा सुधारायला हवा. प्रत्येक रेल्वेगाडीला कनेक्टिंग पब्लिक ट्रान्सपोर्टची सोय हवी. खात्रीशीर आणि वक्तशीर टुरिस्ट गाड्या आणि टुरिस्ट टॅक्सीची खूप आवश्यकता आहे. भारताच्या इतर भागात ही सोय खूप चांगली आहे पण कोकणात वक्तशीर आणि खात्रीशीर पणाची कमतरता आहे. यातील बऱ्याच गोष्टी ऑनलाईन वर मिळायला हव्यात. त्याचीं योग्य पारदर्शक माहिती इंटरनेटवर / वेबसाईट वर उपलब्ध हवी. तितका प्रोफेशनलपणा अजून आपल्याकडे आला नाही. आपल्याकडे कमीत कमी माहिती देण्याचा कल आहे. त्यामुळे विश्वासार्हता कमी होते.
कोकणातील खाड्यामध्ये केरळ प्रमाणे हाऊस बोट किंवा बोटिंगची सफर करण्याची सोय तेथील तालुका किंवा गाव पातळीवर झाली तर कोकण सारखे नंदनवन जगात कोठे असणार नाही इतके आपले कोकण सुंदर आहे.
फक्त नेत्यांवर अवलंबून विकास होणार नाही. यातील कोणत्याही बाबतीत स्वतः पासून सूरवात करायला हवी दोष देणे बंद करून स्वतः सुधारणा करायला हवी.
ह्या बाबतीत प्रत्येक ग्राम सभेने ह्या वर काही विशेष सभा घेवून गावात रोजगार निर्मिती कशी होईल, पीक पाणी, शेती उत्पन्न या बाबत विचार करायला हवा. गणपती, शिमगा, वाडीची पूजा, गावची जत्रा अशावेळी येणाऱ्या चाकरमान्यांसमोर यातील एक दोन सभा व्हायला हव्यात. जिथपर्यंत हे होणार नाही तेथपर्यंत गावातून शहराकडे जाणारा लोंढा आटणार नाही.
जय रत्नागिरी, जय महाराष्ट्र, जय भारत
माधव भोळे
महत्वाचा संदेश
महत्वाचा संदेश
कॉपी पेस्ट
एका मुलाने आपल्या वडिलांना स्वादिष्ट जेवणाचा आनंद घेण्यासाठी एका रेस्टॉरंटमध्ये नेले. त्याचे वडील बऱ्यापैकी म्हातारे होते त्यामुळे थोडे अशक्तही होते. जेवताना अधूनमधून त्यांच्या शर्ट-पँटवर अन्न पडले. हॉटेल मधील इतर ग्राहकांचे चेहरे त्या म्हाताऱ्याला तिरस्काराने बघून वाकडे झाले होते.पण त्यांचा मुलगा शांत राहिला.
दोघांचे जेवण झाल्यानंतर मुलाने शांतपणे वडिलांना मदत केली आणि त्यांना शौचालयात नेले. त्याच्या सुरकुत्या पडलेल्या चेहऱ्यावरील अन्नाचे कण साफ केले. त्याच्या कपड्यांवरील अन्नाचे डाग धुवण्याचा प्रयत्न केला; दयाळूपणे त्याच्या पिकल्या केसांना कंगव्याने विंचरले आणि शेवटी चष्मा लावला.
तें दोघे बाथरूममधून बाहेर पडताच रेस्टॉरंटमध्ये शांतता पसरली. मुलगा बिल देऊन बाहेर जायला तयार होताच, पण जाण्यापूर्वी ग्राहकांपैकी एक म्हातारा माणूस उठला आणि त्याने पहिल्या म्हाताऱ्याच्या मुलाला विचारले: 'तुला वाटत नाही की तू इथे काही सोडून जातं आहेस?'
तरुणाने उत्तर दिले: 'नाही, मी काहीही सोडले नाही.' मग तो अनोळखी माणूस त्याला म्हणाला: 'तू इथे प्रत्येक मुलासाठी एक धडा आणि प्रत्येक वडिलांसाठी आशा ठेवली आहेस!
संपूर्ण रेस्टॉरंट एकदम शांत झाले, अगदी टाचणी पडली तरी ऐकू येईल असे.
आजपर्यंत माहित असलेल्या सर्वात मोठ्या सन्मानांपैकी एक म्हणजे, ज्यांनी आपली काळजी पूर्वी घेतली आहे त्यांची काळजी घेण्यास सक्षम असणे.
आमचे पालक आणि ते सर्व वडील ज्यांनी आपला सर्व वेळ, पैसा आणि प्रयत्न आमच्यासाठी बलिदान दिले, ते आमच्या आत्योच्च आदरास पात्र आहेत.
(मूळ इंग्रजी कथा मराठी भाषांतर माधव भोळे यांचे.)
CET आणि इंजिनीरिंग कॉलेजीस
CET आणि इंजिनीरिंग कॉलेजीस
नुकताच १६ जूनला CET चा रिझल्ट लागल्यामुळे इंजिनियरिंग ला जाणाऱ्या मुलांचे कॉलेज उपलब्धता आणि आपल्या पाल्याला अमुकच कॉलेज मिळावे या बद्दल बऱ्याच पालकांकडुन पोस्ट वाचायला मिळाल्या.
बहुतेक मुले प्रथम आपण कोणत्या शाखेला इंजिनिरिंगला जायचे आणि त्यासाठी कोणते कॉलेज जास्त चांगले आहे याचा विचार करून त्या प्रमाणे रेग्युलर सीट्स किंवा पेड सीट्सचा विचार करत असतात आणि त्याप्रमाणे आपले ऑप्शनस सिलेक्शन प्रोसस मध्ये टाकतात.
कित्येक वेळा असे लक्षात येते की ४ वर्ष इंजिनिरिंग केल्यानंतर त्या विषयातील नोकऱ्या भारतात उपलब्ध नाहीत किंवा त्यांचे पगार सुरवातीला अत्यल्प असतात किंवा त्या शाखेच्या नोकऱ्या आपल्या घरापासून खूपदूर दुसऱ्या शहरात उपलब्ध असतात. आणि मग ही मंडळी काहीतरी कोर्स करून आपल्या शिक्षण शाखा बदलतात. पण त्या मुळे आधीच्या ४ वर्षाच्या अभ्यासाचे पाणी होते. ही गोष्ट इतर कोर्सेसच्या बाबतीत सुद्धा असते जसे की हॉटेल मॅनेजमेंट करणारी मुलगी नंतर शिफ्ट ड्युटी करायला लागते म्हणून क्लेरीकलं जॉब घेते आणि ३/४ वर्षाचे हॉटेल मॅनेजमेंट विरघळून जातें.
त्या पुढची गोष्ट म्हणजे मंडळी मास्टर्स किंवा पि एच डी करायला जातात त्यात पुन्हा स्पेशलायझेशन असते त्यांचे हाल जॉब मार्केट मध्ये आणखीनच बघण्यासारखे असतात. बहुतेक मंडळी एब्रोड जॉब मार्केटचा विचार करून भारतात स्पेशियलिझेशन करतात. पण एब्रोड जॉब करण्यासाठी एब्रोड शिक्षण घेणाऱ्याला प्राधान्य मिळते. तसेच सर्वच देशांमध्ये अशा जॉब संधी असतात असे नाही. कालच एका प्रतिथयश माणसाचा ब्लॉग वाचत होतो. त्याने स्वतः इंडियन स्टॅटिस्टिकलं इन्स्टिटयूट, दिल्ली सारख्या अत्यंत प्रेस्टिजीयस कॉलेज मधून मास्टर्स केले होते परंतु कॉम्पुटर च्या नोकरीत भुरळ पडल्यामुळे पुढे स्टॅटिस्टिक्स चे अत्यंत कठीण असे परीक्षा देऊन घेतलेले शिक्षण निरूपयोगी ठरले असे त्याने लिहिले होते.
त्यामुळे वोकेशनल चॉईस किंवा वोकेशनल गायडान्स हा अत्यंत गुंतागुंतीचा विषय आहे ज्याची दुकानें सर्व सामान्य मंडळी टाकून बसली आहेत. त्यामुळे असे कोर्सेस करताना आधी खूप background study करावा लागतो. काका मामाच्या वेळी अमुक स्थिती होती म्हणून आता त्याच गोष्टी राहतील असे नाही. तसेच लोक कितीही म्हणाले की कोअर इंजिनिरिंग ला मरण नाही म्हणून तू मेकॅनिकल किंवा इलेक्ट्रीकलं कर, तर त्याला मार्केट व्हॅल्यू काय आहे हे सुद्धा अभ्यास करावा लागतो. मी असे म्हणत नाही की अमुक लाईन वाईट किंवा तमुक चांगली.
सध्या बरीचशी मंडळी कोणतेही इंजिनिरिंग करून नंतर मनासारखा जॉब मिळत नाही म्हणून परत कोणतेतरी short टर्म कोर्स ( उदा. सिडॅक वगैरे ) करून आय टी मध्ये स्विच ओव्हर करताना दिसतात. म्हणजे वर सांगितल्या सारखीच परिस्थिती तयार होते.
कोर्स निवडताना प्रथम आपली पॅशन काही आहे का त्याचा विचार करावा. उगाच आई वडील सांगतात, मित्र करतात म्हणून उच्च शिक्षण नको. पॅशन असेल तर त्यात जीव तोडून काम करायची आणि वेळ पडल्यास लोकांच्या टिकेला तोंड देण्याची तयारी असेल तर त्या पॅशनला जवळ असलेला कोर्स करावा. जसे की आर्टिस्ट मंडळी आर्किटेक्चर, कमर्शीयल आर्ट, इंटिरियर डिझाईन, ज्वेलरी डिझाईन, ऍनिमेशन, गेमिंग, व्हिडीओ एडिटिंग सारखे कोर्सेस करतात. मागे एकदा मिलिंद गुणाजीचे वडील भेटले होते तें म्हणत होते मिलिंद चांगला इंजिनिरिंग शिकला आहे पण आवड भटकंतीची त्यामुळे एकाची सीट त्याने फुकट घालवली असे तें म्हणाले.
जर विशिष्ट पॅशन नसेल तर आपल्याला कोणता विषय आवडतो किंवा जमतो आणि त्यासंबंधी किंवा जवळचा कोणता कोर्स आहे जों आपल्याला चांगला जमू शकतो हे शोधून त्या संबंधित जॉब किंवा व्यवसाय प्रोस्पेक्ट्स किती आहेत तें शोधायला हवे. जर व्यवसाय करणार असाल तर आपल्याला प्रॅक्टिकलं ट्रेनिंग सुद्धा घ्यायला लागणार आणि त्यासाठी कमी पगाराची नोकऱी सुरवातीला काही वर्ष उमेदवाऱी करायला लागेल हे लक्षात ठेवणे आवश्यक आहे.
आजकाल अनेक नवनवीन विषय बाजारात आहेत ज्याकडे लोकांनी पाठ फिरवली असली तरी त्यामध्ये प्रचंड स्कोप आहे असे विषय शोधून काढावे. उदा. एका दाताच्या डॉक्टर कडे गेलो होतो. तो म्हणाला आमच्या व्यवसायात अनेक छोटे मोठे पार्ट किंवा उपकरणे लागतात तसेच दातांचे मोल्ड तयार करून लोकांच्या दातात ( कॅविटी ) मध्ये बसवायला लागतात. अशी मेडिकल इक्विकपमेंट पुरवणारी किंवा पार्ट तयार करणारी मंडळी ही एक प्रचंड वेगळी इकोनॉमिक साखळी आहे. तसेच त्यातील कित्येक भाग भारतात पण तयार करता येतील पण भारतीय उद्योग धंद्यानी त्यात पाठ फिरवली असून त्यातील बरेच सप्लाय इंपोर्टेड असतात आणि त्यात ही व्यापारी मंडळी आपला जमा बसवून प्रचंड प्रॉफिट कमवत असतात.
जर आपल्याला कॉरपोरेट जगतातच काम करायचे असेल तर आपल्या बुद्धिमतेला जास्त जमेल आणि त्याचा कॉरपोरेट जगतात डिमांड असेल असा कोर्स शोधून त्यात ऍडमिशन घ्यावी आणि त्यात टनगळमंगळ न करता अभ्यासात झोकून देऊन करणार असाल तर मग कॉलेज कोणतेही असो अपल्या प्रगतीला कोणीही रोखू शकणार नाही. कारण एखाद्या विषयांचे मार्गदर्शन तर आपल्याला इंटरनेट वर मोफत मध्ये अथवा लायब्ररीतील पुस्तकांमध्ये उपलब्ध आहे. फक्त त्याला वेळ द्यावा लागतो. आयते डोक्यात काहीही मिळत नाही (वाईट विचार सोडून.)
माधव भोळे
आवड असेल तर सवड आहे!!
आवड असेल तर सवड आहे!!
आर्टिफिशल इन्टीलीजन्ससाठी अत्यावश्य असलेले ग्राफिक्स कॉम्पुटर प्रोसेसर चिप्स बनवणारी, १९९३ साली स्थापन झालेली, अमेरिकन कंपनी NVIDIA ने नुकतीच बाजार मूल्यनुसार जगातील एक नंबरची कंपनी म्हणून काही काळा पुरता का होईना आपला झेंडा लावला.( पुढील ६ महिन्यात, मायक्रोसॉफ्टला मागे टाकत तीच एक नंबरची कंपनी होईल असा अंदाज व्यक्त केला जात आहे ) त्यांच्या ह्या यशाबाबत त्यांचे संस्थापक आणि अध्यक्ष जेन्सन हुँग, यांना त्यांच्या यशाचे गमक विचारले असता त्यांनी एक घटना आपल्या आयष्यात बदल करून गेली त्यामुळे आपणास हे यश मिळाल्याचे नमूद केले.
तें म्हणाले आम्ही एकदा सहकुटुंब जपान येथे गेलो होतो. तेथील हॉटेलातील एक माळी छोट्या बांबूच्या चिमट्याने बगीच्याची निगा राखत होता. "मी त्याला विचारले की तू हे काय करत आहेस?. तो म्हणाला मी वाळलेले गवत आणि पाने बाजूला करून बगीचा साफ करत आहे. मी म्हटले बगीचा तर खूप मोठा आहे. तुला खूप वेळ लागेल असे करत बसलास तर!. त्यावर तो म्हणाला काही हरकत नाही. माझ्याकडे खूप वेळ आहे. गेले २५ वर्ष मी हेच काम करतो आहे. त्यावर माझ्या लक्षात आले की आवड असेल तर सवड आहे हेच तें तत्व.
त्या नंतर मी दररोज सर्वप्रथम उठल्यावर आपल्या आवडीचे काम करायला वेळ काढतो. ठरवलेला टास्क पूर्ण करतो आणि नंतर माझी इतर कामे आटोपतो. मग कोणीही माझ्याकडे आले तर मला वेळच वेळ असतो त्यांचे प्रश्न सोडवायला. आपल्या आवडीचे काम करायला मला कधीच कंटाळा येत नाही. गेले ३१ वर्ष आम्ही जे काम केले त्याचे आज सुंदर फळ मिळत आहे.
माधव भोळे
तिसरी अर्थव्यवस्था बनू पाहणाऱ्या भारताचा कच्चा पाया!!
तिसरी अर्थव्यवस्था बनू पाहणाऱ्या भारताचा कच्चा पाया!!
नुकताच मेडिकल शिक्षणासाठी प्रवेश परीक्षेमध्ये झालेला गोंधळ अजून सावरला गेला नाही तर आज मेडिकलच्या उच्च शिक्षणासाठी असलेली नीट-पिजी प्रवेश परीक्षा एक दिवस आधी रद्द झाली, हे ऐकून अतिशय वाईट वाटले. या आधी कॉलेज शिक्षकांसाठी असलेली मूल्यांकन परीक्षा UGC-NET जून २०२४ ( university grants commission - National Eligibility test) सुद्धा पेपरफुटी मुळे रद्द केली गेली.
कोणत्याही प्रगत देशाचा शिक्षण हा पाया आहे. शिक्षण चांगले आणि संस्कारीत नसेल तर त्याचे दुष्परिणाम सर्व समाजाला भोगावे लागतात.
गेले कित्येक वर्ष शिक्षण क्षेत्रात चाललेला घोळ, धन दांडग्याच्या हाती असलेल्या शिक्षण संस्था. मॅनेजमेंट कोट्यामधील प्रवेशासाठी असलेल्या डोनेशन, प्रवेश आणि नियमित परीक्षा मध्ये गोंधळ, वेळेवर निकाल जाहीर न होणे, शिक्षकांचा पेपर तपासणीमध्ये असहकार आणि शिक्षणाचा बट्ट्या बोळ या बाबतीत कोणत्याच सरकारने हवे तेव्हढे लक्ष दिलेले नाही. जसा कर्जाचा डोंगर वाढत जातो आणि देश कर्जबाजारी होतो तसेच हा भ्रस्टाचार संपूर्ण शिक्षण व्यवस्थेला खोकला करून ठेवत आहे.
शिक्षकांच्या भरतीमध्ये आरक्षण आणि भ्रष्टाचार या मुळे योग्य शिक्षक निवड होतच नाही, त्याचा परिणाम चांगले विद्यार्थी घडवणूकीवर होत आहे.
मेडिकल पोस्ट ग्रॅजयूएट मध्ये खाजगी प्रवेश मिळवायचा असेल तर रु. ८० लाख तें १.५ करोड प्रति सीट एव्हडी डिमांड आहे. एव्हडेच कशाला चांगल्या शाळेत प्रवेश मिळवण्यासाठी शिशु वर्गात सुद्धा ५० हजार तें ३ लाख डोनेशन आहे आणि गरीब बिच्चारे आई वडील मुलाच्या भवितव्याचा विचार करून, जीवाचे रान करून, मुकाटपणे पैसे भरत आहेत.
वर भरलेल्या जास्त पैशाची भरपाई डॉक्टर मंडळी पुढे पेशन्टला अवाढव्य चार्जेस लावून वसुल करत आहेत. तें भरायला लागू नयेत म्हणून विमा कंपन्या ग्राहकांना मोठमोठाले प्रीमियम भरायला सांगून आपली पोट भरत आहेत.
गेल्या वर्षी एका ओळखीच्या मंडळींनी फोन केला होता. म्हणाले पुणे येथील सिम्बॉयसिसच्या अमुक अमुक शाखेत मॅनेजमेंटचा कोर्स करायचा आहे तर त्याची २ वर्षाची फी २४ लाख रुपये आहे. जर परदेशात एव्हडी फी असेल तर समजू शकतो पण पुण्यात एव्हडी फी म्हणजे अवास्तव वाटते. तर हैद्राबाद मधील आई. एस. बि. च्या मॅनेजमेंट कोर्स ची फी रु. ४१.७० लाख आहे (जीचा एक संस्थापक भारतीय अमेरिकन नागरिक रजत गुप्ताला अमेरिकेत पुढे शेयर मार्केट भ्रष्टाचारामध्ये शिक्षा झाली ). असो आई. एस. बि. सुद्धा चांगली संस्था आहे पण ह्या फिया अवास्तव आहेत. म्हणे तेथे डिग्री घेतल्यावर चांगल्या कंपन्यामध्ये चांगले पॅकेज मिळते.
माझ्या मते तें शिकवत असलेले ज्ञान म्हणजे उच्चशिक्षित कारकून, जे कॉम्प्युटरचे सेल्सफॉर्स आणि सॅप सारखे तयार पॅकेजेस उत्तम चालवू शकतात. ह्या सर्व संस्था एक चांगला नोकरदार तयार करतात. पूर्वी ब्रिटिशांनी उच्च शिक्षित इंग्रजी समजणारे कारकून तयार केले तर हे उच्च शिक्षित सुपर कारकून तयार करतात जे गोऱ्या मंडळींनी स्थापन केलेल्या मल्टी नॅशनल कंपन्या भारतात आणि भारता बाहेर चालवतात. ह्यांचा जास्त उपयोग सर्व्हिसेस मध्ये आहे. यातील बरीच मंडळी मार्केटिंग, एच आर आणि फायनान्स मध्ये शिक्षण घेतात. या पैकी किती मंडळी स्वतःचे व्यवसाय सुरु करतात किंवा करू शकतात? तर ५% सुद्धा नाही.
पण मी म्हणतो धीरूभाई (रिलायन्स ), अनिल अगरवाल (वेदांता ), दिलीप शांघवी (सन फार्मास्युटिकलंस), अगदी अलीकडे राधाकृष्ण दमाणी ( डी मार्ट ) या सारखी मंडळी कुठल्या मॅनेजमेंट कॉलेज मध्ये गेले होते? उलट तेच अशा सुपर क्लार्क ना नोकरीवर ठेवत आहेत.
मी असे म्हणत नाही की फॉर्मल शिक्षणाला काहींच किमत नाही पण जिद्ध, प्रक्टिकल ज्ञान आणि कॉमन सेन्स हा ह्या सर्व मंडळीच्या यशाचा पाया आहे. त्यासाठी आपल्या आजूबाजूला घडतं असलेल्या गोष्टींचे ज्ञान आणि जग हेच मोठे विद्यापीठ आहे.
चायनाने संपूर्ण जगाला नवनवीन प्रोडक्ट्स बनवून व्यापून टाकले आहे. त्यांचा सर्वच क्षेत्रातील उत्पादनाचा पाया मजबूत आहे. तुम्ही कितीही ओरडा स्क्रू ड्रायव्हर पासून अगदी मोठमोठाली टनल बोअरिंग मशीन तें अत्यन्य हेवी ड्युटी क्रेन पासून तें वेगवेगळी केमिकलंस, होम प्रोडक्ट्स, इंटिरियर, लायटिंग अगदी सर्व क्षेत्रामध्ये भारत चीन कडुन इम्पोर्ट करत आहे.
गेल्या पाच वर्षात भारताने चीनला फक्त वार्षिक १६ बिलीयन डॉलर्स च्या वस्तू आणि सर्व्हिसेस विकल्या आहेत तर त्याच काळात चीनने आपला भारताबरोबरचा व्यवसाय ७० बिलीयन डॉलर्स वरून गेल्यावर्षी १०१ बिलीयन डॉलर्स वर नेला असून भारत आणि चीन मध्ये एकंदरीत ३८७ बिलीयन डॉलर्स ची दरी आहे. तुम्ही कितीही तोंडाने चीन वर बहिष्कार टाका, बऱ्याच गोष्टींवर आपण चीनवर अवलंबुन आहोत.
जागतिक अर्थ व्यवस्थेत भारताला ३ऱ्यांच काय पण पहिल्या क्रमांकावर राहायचे असेल तर तिने सर्व्हिसेस, मन्यूफाचरिंग आणि अग्रीकल्चर ह्या अर्थव्यवस्थेच्या तीन महत्वाच्या स्तंभानवर भर द्याला हवा. आणि तें शक्य आहे कारण भारतात उपलब्ध असलेले नैसर्गिक रिसॉर्सेस पाणी, जमिन, समशितोष्ण तपमान, सूर्यप्रकाश जों क्लीन एनर्जी देऊ शकतो, अथांग समुद्र किनारा जों जल संपत्ती, विंड एनर्जी आणि स्वस्त दळणवळण सुविधा देऊ शकतो, मिनरलस आणि सुशिक्षित मानव संसाधन हे सर्व भारताकडे आहे.
पण आजकाल जों अग्रीकल्चर शिक्षण घेतो तो अग्रीकल्चर विमा किंवा अग्रीकल्चर लोन विकण्यासाठी वित्तीय संस्थेमध्ये नोकरीं पकडतो नाहीतर पेस्टीसाईड विकणाऱ्या कंपनीमध्ये नोकरीं करतो. नवीन तरुण तर अग्रीकल्चर मध्ये हात काळे करायला तयारच नाहीत.
मन्यूफॅक्चरिंग अवस्था तेवढीच वाईट आहे. सरकारी अनास्थे मुळे आणि प्रशासकीय अव्यवस्थेमुळे व्यवसायिक नवनवीन गुंतवणूक करत नाहीत म्हणून नवनवीन उत्पादने बाजारात येत नाहीत. म्हणून इंजिनिरिंग क्षेत्राचा अर्थव्यवस्थेवरील प्रभाव कमी होत आहे. त्यामुळे कॉम्प्युटर सोडले तर इतर ठिकाणी इंजिनियरिंग प्रवेश मध्ये चढाओढ दिसत नाही.
ही परिस्थिती सुधारण्यासाठी सरकारने ठोस पाऊले उचलली पाहिजे. उद्योग धंद्याचे प्रश्न लवकरात लवकर सोडवून वीज, पाणी आणि अन्य रिसॉर्सेस रास्त दरात उपलब्ध करून दिले तर, उत्पादक आपली उत्पादने आणि व्यवसाय विस्तार वाढवून सरकारी नोकऱ्यांवरील ताण कमी होऊन योग्य विद्यार्थ्यांना योग्य रोजगार मिळेल.
ग्रॅजयूट पर्यंत उत्तम शिक्षण सर्वाना खुले आणि मोफत करायला हवे. खाजगी शिक्षण संस्थांवर फी बाबतीत आणि दर्जाच्या बाबतीत कठोर नियंत्रण हवे. शिक्षण क्षेत्रातील भ्रष्टाचार आणि गैरव्यवस्था शून्यावर आणायला हवी.
तिसरी अर्थ व्यवस्थाच का? पहिली बनण्यासाठी फक्त इन्फ्रास्त्रकचर वर भर न देता manufacturing अँड अग्रीकल्चर वर सर्वांगीण भर द्यायला हवा तर एक्स्पोर्ट उत्पादन वाढेल. जर उत्पादन वाढले तरच भारताची अर्थव्यवस्था सुधारून मोफत शिक्षण देणे शक्य होईल.
माधव भोळे
Wednesday, June 12, 2024
गडकरिंचा नाद खुळा!
गडकरिंचा नाद खुळा!
काल नितीन गडकरिंचा एक छोटा व्हिडिओ बघितला. तें म्हणत होते, मी गणितातून एक गोष्ट शिकलो.
समजा अ आणि ब दोन कार्यकर्ते आहेत आणि दोघेही उत्तम काम करतात. त्यांची वेगवगळी कामगिरी = (अ वर्ग + ब वर्ग ) समजू या.
पण त्या दोघांनी एकत्र काम केले तर त्यांची कामगिरी ( अ + ब ) वर्ग = अ वर्ग + ब वर्ग + २xअ xब एवढी होते.
हे २xअ xब हे एकत्र कामगिरीचे जास्तीचे फळ आहे. म्हणून नेहमी संघटनेने काम करावे त्याचा फायदा अनेक गुणित होईल.
किती छान आणि सोपी पद्धत असते काही माणसांची समजावून सांगण्याची.
माधव भोळे
Tuesday, June 11, 2024
वेस्ट तें बेस्ट पर्यावरण पूरक!!
वेस्ट तें बेस्ट पर्यावरण पूरक!!
दरवर्षी साधारण नोव्हेंबर डिसेंबर पासून पेपरात बातम्या वाचतो की दिल्लीतील हवा दूषित झाली असून खरीफ हंगामाच्या शेवटी ऑक्टोबरमध्ये आणि रब्बी हंगामाच्या शेवटी एप्रिलमध्ये हरियाणा आणि पंजाब मधील शेतकरी भात, गहू आणि इतर धान्यांची गवते, आणि इतर निरूपयोगी भाग जाळतात त्यामुळं हे प्रदूषण होते.
२०२२ मध्ये इंडियन ऑइलने एक योजना आखली आणि पानिपत हरियाणा ( होय तेच पानिपत जेथे मराठेशाहीचे पानिपत झाले ) ह्या ठिकाणी एक 2G रिफायनरी प्लांट उभारला तसेच 3G प्लांट उभारला. 3G प्लांट रिफायनरी नसून शेती निरूपयोगी गवत आणि तत्सम वस्तूपासून इथेनॉल बनवण्यासाठी आणि डांबर बनवण्याचा हा प्लांट आहे. इथेनॉल हे नैसर्गिक घटकांपासून तयार केलेले बायोडिझेल असून त्यामुळे कार्बन उत्सर्जन अत्यल्प होते.
तर ह्या प्लांट मुळे दरवर्षी २.१ लाख मेट्रिक टन सुखे गवत आणि तत्सम शेती निरूपयोगी वस्तूंपासून ३ लाख लिटर इथेनॉल तयार होईल तसेच त्यामुळे पर्यावरणाला हानी पोहोचवणाऱ्या ३ लाख मेट्रिक टन कार्बन डायोक्सईडचे उत्सर्जन कमी होईल. थोडक्यात ६२,००० गाड्या भारतीय रस्त्यावर धावण्याचा परिणाम कमी होईल.
नोव्हेंबर २०२२ मध्ये वातावरणातील बदल आणि पर्यावरण ह्या विषयातील युनायटेड नेशन्सने इजीप्त मधील शर्म-एल-शेख येथे भरवलेल्या जागतिक परिषदेमध्ये ( COP27) भारताने मान्य केलेल्या करारनुसार हे पाऊल उचलले आहे.
ह्या कामासाठी इंडियन ऑइल फार्मर प्रोड्यूसर कंपनींमार्फत वरील शेतमाल जमा करतील जे शेतकऱ्याकडून घेऊन इंडियन ऑइलला पुरवतील, त्यासाठी फार्मर प्रोड्यूसर कम्पनी ला रु. १८०० प्रति टन तर शेतकऱ्याला रु. १००० प्रति टन मिळतील.
२०२५ भारताने डिझेल आणि पेट्रोलमध्ये २०% इथेनॉल वापरण्याचे उद्धीष्ठ ठेवले आहे. इंडियन ऑइल ने केलेल्या एका सर्वे नुसार प्लांटच्या ५० किमी परिसरात ८.९ लाख मेट्रिक टन एव्हडा शेतमाल उपलब्ध असून त्यातील फक्त २.१ लाख मेट्रिक टन आता त्यांची गरज आहे. याच्यावरून कल्पना करा भारतात किती इथेनॉल तयार होऊ शकते. ब्राझील प्रमाणे येथेसूद्धा पुढे फक्त इथेनोलवर चालणाऱ्या गाड्या तयार झाल्या तर आश्चर्य वाटायला नको.
महाराष्ट्रात हे इथेनॉल उसाच्या चिपाडा पासून बनते. इथेनॉल एक प्रकारचा अल्कोहोल आहे. कोकणात काजुफळावर प्रक्रिया केली तर इथेनॉल बनू शकेल पण नाणार च्या विरोधानंतर कोणी कंपनी येथे येण्यास धजत नाही!!
यामुळे शेतकऱ्यांचा ही फायदा होईल आणि भारताचे डिझेल वरील इम्पोर्ट बिल सुद्धा कमी होईल.
हीच विकसित भारताची ओळख असेल.
माधव भोळे
Sunday, June 9, 2024
चंद्रबाबू नायडू, एक उमदा नेता!!
चंद्रबाबू नायडू, एक उमदा नेता!!
१९९५ तें २००४ आणि परत २०१४ तें २०१९ या काळात ३ वेळा मुख्यमंत्री बनलेले चंद्रबाबू नायडू यांचे आंध्रप्रदेश आणि देशाच्या जडणघडणीत मोठे योगदान आहे. रामाराव यांनी २९ मार्च १९८२ रोजी स्थापन केलेल्या पक्षाचे नेतृत्व, एन टी रामाराव यांचे जावई असलेल्या नायडू यांनी २०१५ पासून केले.
आपल्या मुख्यमंत्री काळात, मायक्रोसॉफ्ट, गुगल सारख्या मातबबर सॉफ्टवेअर कंपन्याना हैद्राबाद मध्ये आणून हैद्राबाद आणि त्यावेळच्या आंध्रप्रदेशला भारताचे आय टी हब बनवण्यात तें यशस्वी झाले. ज्या ज्या वेळी संधी मिळेल त्या त्या वेळी दावोस, स्वीतझरलंड येथील जागतिक आर्थिक मंचामध्ये आपल्या प्रदेशाचा नारा वाजवून पेप्सी, विविध सॉफ्टवेअर आणि फायनानशियल आणि औषध कंपन्याना आमंत्रित करून टॅक्सद्वारे आंध्रप्रदेशच्या खजिन्यात मोलाची भर घातली.
परंतु या त्यांच्या प्रयत्नांना शेतकरी विरोधी ठरवून विरोधी पक्षाने संगनमताने २००४ तें २०१४ आणि २०१९ तें २०२४ पर्यंत सत्ते पासून दूर ठेवले. २०११ साली झालेल्या सर्वमतानुसार २०१४ साली तेलंगणा आंध्रप्रदेश पासून वेगळा झाला आणि तेलंगणा मध्ये के चंद्रशेखर राव यांचे काँग्रेसच्या पाठिंब्याने वर्चस्व वाढले. आणि चंद्रबाबू नायडू पाठी पडले.
२०१४ साली नायडूनी निगुतीनी तयार केलेले हैद्राबाद तेलंगणाकडे गेल्यामुळे, आंध्र प्रदेशला महसूलाचा मोठा फटका बसला त्यात अमरावती ( AP) ह्या नवीन राजधानीला बसवणे आणि परत दुसरी आय टी हब तयार करणे हे मोठे आव्हान बाबू पुढे राहिले. त्यामुळे त्यांनी आंध्रप्रदेशला वेगळा दर्जा मागण्याचे आटोकाट प्रयत्न केंद्राकडे केले परंतु मध्यंतरीच्या काळात जगनमोहन रेड्डी च्या आव्हानमुळे आणि राजकीय मजबुरीमुळे त्यांना एन डी ए ची साथ सोडावी लागली त्यामुळे आंध्र प्रदेशच्या मागण्या पूर्ण झाल्या नाहीत.
२०१५ मध्ये ज्यावेळी चंद्राबाबू पेप्सीकोच्या इंद्रा नियोगी यांना भेटले त्यावेळी त्यांनी पेप्सीको साठी लागणारा आंबा आणि इतर फळानचा पल्प पुरवण्या संबंधि बोलणी केली. नियोगी ताई म्हणाल्या की आम्ही भारतातून २५० मिलीयन टन आंबा विकत घेऊ शकू पण आंध्र फक्त ७० मिलीयन टन आंबा देऊ शकते तर आम्ही पेप्सी चा प्लांट इकडे कसा उभा करणार? त्यावेळी बाबू नी हमी दिली की पुढील ५/७ वर्षात तुम्हांला आणखी आंबा मिळेल. त्यांनी श्री सिटी आंध्र प्रदेश येथे ८६ एकर जमिन दिली त्यावर १२०० कोटी रुपये खर्च करून पेप्सी ने आपला कारखाना सुरु केला. पुढील पाच वर्षात आंबा शेतकऱ्यांना भरघोस मदत आणि मार्गदर्शन करत नायडूनी आपले वचन पूर्ण केले आणि ३३,००० आंबा उत्पादकांना शाश्वत खरेदीदार मिळाला.
शेतकरी विरोधी हे बिरूद त्यांना मुळीच आवडले नाही आणि २०१६ साली त्यांनी सुभाष पाळेकर यांना आंध्र सरकारचे सल्लागार नेमून ऑरगॅनिक फार्मिंग वर जोर दिला आणि आंध्रला आयटी बरोबरच हॉर्टीकलचरल हब बनवायचे उदिष्ट ठेवले. त्यांनी "हरिता आंध्र" नावाचे एक मिशनच सुरु केले.
अमरावती ( AP) बद्दल बोलताना तें म्हणतात, आता परत अमरावती ( AP) आणि विजाग ह्या दोन ठिकाणी मोठी आय टी हब बनवण्याचे त्यांचे स्वप्न असून त्या ठिकाणी जुन्या पद्धतीने विकास न करता आता ब्लॉकचेन, आर्टिफिसिल इन्टीलीजन्स, आय. ओ. टी, क्लाउड कोम्पुटिंग, सायबर सिक्युरिटी सारख्या अत्याधुनिक तंत्रज्ञानात काम करणाऱ्या कंपन्याना तें येथे पाचरण करून परत एकदा आंध्र प्रदेशला दैदीप्यामान बनवण्याचा त्यांचा विचार आहे.
आमचे मराठी नेते फॉक्सकॉन, नाणार, जागतिक फायनानशियल सेंटर सारख्या अनेक प्रकल्पाना गुजरातने चोरले हे सकाळ संध्याकाळ टीव्ही वर बोंब मारत असताना, आणि पुणे येथील ३७ आय टी कंपन्या, पुण्यातील ट्राफिक जाम मुळे त्रस्त होऊन पुण्या बाहेर जाणार असल्याचे ऐकल्यामुळे, नवीन आयटी हब तयार करून नायडूननी येथील काही आय टी उद्योग तेथे नेले तर दोष कुणाचा?
महाराष्ट्रातील आय टी कंपन्या पुणे येथे जास्त केंद्रित आहेत परंतु आय टी पार्क, एम आय डी सी, पुणे नगरपालिका आणि पिंपरी चिंचवड नगर पालिका यांचे तिढे एकमेकात सुटत नसल्यामुळे नवीन रस्ते तयार न होऊन पुणेकरांना आणि आय टी कंपन्याना ट्राफिक जाम सहन करावा लागतो या कडे प्रशासनाने वेळीच लक्ष देणे आवश्यक आहे. अगदी पुणे मुंबई एक्सप्रेस वे ला सुद्धा पर्यायी एक्सप्रेस वे आवश्यक आहे.
अशा परिस्थिती मध्ये आपल्या राज्यासाठी, आणि आपल्या माणसांसाठी झटणाऱ्याऱ्या ७४ वर्षीय चंद्राबाबु नायडू याला एक उमदा नेता म्हटले तरी वावगे ठरणार नाही.
माधव भोळे
Subscribe to:
Posts (Atom)