Tuesday, June 11, 2024

वेस्ट तें बेस्ट पर्यावरण पूरक!!

वेस्ट तें बेस्ट पर्यावरण पूरक!! दरवर्षी साधारण नोव्हेंबर डिसेंबर पासून पेपरात बातम्या वाचतो की दिल्लीतील हवा दूषित झाली असून खरीफ हंगामाच्या शेवटी ऑक्टोबरमध्ये आणि रब्बी हंगामाच्या शेवटी एप्रिलमध्ये हरियाणा आणि पंजाब मधील शेतकरी भात, गहू आणि इतर धान्यांची गवते, आणि इतर निरूपयोगी भाग जाळतात त्यामुळं हे प्रदूषण होते. २०२२ मध्ये इंडियन ऑइलने एक योजना आखली आणि पानिपत हरियाणा ( होय तेच पानिपत जेथे मराठेशाहीचे पानिपत झाले ) ह्या ठिकाणी एक 2G रिफायनरी प्लांट उभारला तसेच 3G प्लांट उभारला. 3G प्लांट रिफायनरी नसून शेती निरूपयोगी गवत आणि तत्सम वस्तूपासून इथेनॉल बनवण्यासाठी आणि डांबर बनवण्याचा हा प्लांट आहे. इथेनॉल हे नैसर्गिक घटकांपासून तयार केलेले बायोडिझेल असून त्यामुळे कार्बन उत्सर्जन अत्यल्प होते. तर ह्या प्लांट मुळे दरवर्षी २.१ लाख मेट्रिक टन सुखे गवत आणि तत्सम शेती निरूपयोगी वस्तूंपासून ३ लाख लिटर इथेनॉल तयार होईल तसेच त्यामुळे पर्यावरणाला हानी पोहोचवणाऱ्या ३ लाख मेट्रिक टन कार्बन डायोक्सईडचे उत्सर्जन कमी होईल. थोडक्यात ६२,००० गाड्या भारतीय रस्त्यावर धावण्याचा परिणाम कमी होईल. नोव्हेंबर २०२२ मध्ये वातावरणातील बदल आणि पर्यावरण ह्या विषयातील युनायटेड नेशन्सने इजीप्त मधील शर्म-एल-शेख येथे भरवलेल्या जागतिक परिषदेमध्ये ( COP27) भारताने मान्य केलेल्या करारनुसार हे पाऊल उचलले आहे. ह्या कामासाठी इंडियन ऑइल फार्मर प्रोड्यूसर कंपनींमार्फत वरील शेतमाल जमा करतील जे शेतकऱ्याकडून घेऊन इंडियन ऑइलला पुरवतील, त्यासाठी फार्मर प्रोड्यूसर कम्पनी ला रु. १८०० प्रति टन तर शेतकऱ्याला रु. १००० प्रति टन मिळतील. २०२५ भारताने डिझेल आणि पेट्रोलमध्ये २०% इथेनॉल वापरण्याचे उद्धीष्ठ ठेवले आहे. इंडियन ऑइल ने केलेल्या एका सर्वे नुसार प्लांटच्या ५० किमी परिसरात ८.९ लाख मेट्रिक टन एव्हडा शेतमाल उपलब्ध असून त्यातील फक्त २.१ लाख मेट्रिक टन आता त्यांची गरज आहे. याच्यावरून कल्पना करा भारतात किती इथेनॉल तयार होऊ शकते. ब्राझील प्रमाणे येथेसूद्धा पुढे फक्त इथेनोलवर चालणाऱ्या गाड्या तयार झाल्या तर आश्चर्य वाटायला नको. महाराष्ट्रात हे इथेनॉल उसाच्या चिपाडा पासून बनते. इथेनॉल एक प्रकारचा अल्कोहोल आहे. कोकणात काजुफळावर प्रक्रिया केली तर इथेनॉल बनू शकेल पण नाणार च्या विरोधानंतर कोणी कंपनी येथे येण्यास धजत नाही!! यामुळे शेतकऱ्यांचा ही फायदा होईल आणि भारताचे डिझेल वरील इम्पोर्ट बिल सुद्धा कमी होईल. हीच विकसित भारताची ओळख असेल. माधव भोळे

No comments:

Post a Comment