Sunday, July 5, 2026

हळदीघाट, राजस्थानचे एक पर्यटन केंद्र.

हळदीघाट, राजस्थानचे एक पर्यटन केंद्र.

लेख क्रमांक २


राजस्थान मधील मेवाड संस्थानाचे १२ वे महाराणा उदयसिंग-२ यांचा जन्म १५२२ साली चितोडगड येथे झाला. उदयसिंगांच्या पिताजींच्या पश्चात उदयसिंगाचे काका बनवीरसिंग धोक्याने मेवाड संस्थानाचा राजा बनल्यानंतर त्यांनी उदयसिंग यांना झोपेत ठार मारण्याची योजना १५३७ मध्ये आखली. याची कुणकुण त्यांची लहानपणीची दाई पन्ना हिला लागली. तिने आपला मुलगा चंदन ह्याला उदयसिंगाच्या जागी झोपवले आणि उदयसिंगना कुंभलगड येथे लपून छपून पाठवले. बनवरसिंग ह्यांनी उदयसिंग समजून चंदनची हत्या केली. बनवीरसिंग जरी राजघराण्यातील होता तरी त्याच्या जन्माबद्दल काही शंका असल्यामुळे त्याला मेवाडमधील सरदारांनी आणि मोठया घराण्यानी पाठिंबा दिला नाही. पुढे १५४० मध्ये उदयसिंगाने मावलीच्या युद्धात बनवीर सिंगला ठार मारले आणि उदयसिंग मेवाडचे राजे झाले. १५५९ मध्ये मुघलं आक्रमाणापासून सुरक्षित अश्या आरवली पर्वत राजीच्या, गेरवा दऱ्या खोऱ्यात, मेवाडमधील पाण्याचे दुर्भीक्ष लक्षात घेता तलावांची नगरीं असलेल्या उदयपूरची महाराजा उदयसिंग यांनी स्थापना केली. १५६८ मध्ये मुघल बादशहा अकबराकडुन मेवाडची राजधानी असलेल्या चितोडगडचा पाडाव झाल्यानंतर मेवाडची राजधानी उदयपूर बनली. 


उदयसिंगला १८ राण्यांपासून २४ मुले झाली. त्यातील सर्वात मोठी महाराणी जयवंतीबाई सांगोरा हींच्या पासून १८ मे १५४० साली अतिशय पराक्रमी महाराणा प्रताप हा सर्वात मोठा मुलगा झाला.


२८ फेब्रुवारी १५७२ रोजी पिता उदयसिंग-२ यांच्या पश्चात महाराणा प्रताप यांचे मेवाडचे महाराणा म्हणून राज्याभिषेक झाला. महाराणा प्रताप अतिशय शूर आणि धाडसी होते. एकदा कुंभळगडच्या जंगलात महाराणा प्रताप यांनी बिबट्या वाघाला साध्या बिचव्याने यमसदनास पाठवले होते.


नाथद्वारा वरून उदयपूरच्या रस्त्यावर हळदीघाट लागतो. चारही बाजूला आरवली पर्वतरांगा आहेत. त्यावेळी राजस्थान आणि उत्तर भारतातील बहुतेक राजे बादशहा अकबराचे मांडलिक होते. १८ जून १५७६ रोजी अंबरचे राजा मानसिंग-१ ( मिर्झाराजे जयसिंग यांचे आजोबा ) ह्या मुघल बादशहा अकबरच्या मांडलिक सरदाराने हळदी घाटी येथे महाराणा प्रतापच्या सैन्यावर जोरदार हल्ला केला. मानसिंग स्वतः कच्छुवा राजपूत होता. तर महाराणा प्रताप शिशोदिया वंशाचे राजपूत होते. 


त्यावेळी मानसिंगकडे १०,००० सैन्य, प्रचंड शस्त्रसाठा आणि हत्ती घोडे होते तर महाराणा प्रतापकडे ३००० ते ४००० सैन्य होते. राजा मानसिंगने प्रथम महाराणा प्रतापला अकबराला शरण येण्यास सांगितले परंतु महाराणा प्रतापने स्पष्ट नकार दिला. 

जोरदार घमासान युद्ध झाले. महाराणा प्रतापकडे राजपूत, भिल्ल आणि अफगाणि योद्धे होते तर राजा मानसिंगकडे राजपूत, मुघल आणि परदेशीं योद्धे होते. भिल्ल योद्धे धनुष्यबाण वापरून शत्रूला नामोहरम करीत. 

भर युद्धामध्ये राणा प्रतापच्या चेतक नावाच्या घोड्याने थेट राजा मानसिंगच्या हत्तीवर घाला घातला, त्यामुळे राणा प्रतापने आपला भाला थेट अंबारीत बसलेल्या मानसिंगवर फेकला परंतु मानसिंग खाली बसला आणि भाला हत्तीच्या माहूताला लागला. माहूत घायाळ होऊन खाली पडला , त्यामुळे चावताळून हत्तीने आपल्या टोकदार दाताने चेतकच्या एका पायाला जखम केली. अशा वेळी चेतकला खूप वेदना झाल्या. अशाहीं परिस्थितीत चेतकने आपल्या ३ पायांचा वापर करून आपला स्वामीं राणा प्रतापला २२ फूट रुंद असलेल्या नाल्यावरून छलांग मारून जंगलातील सुरक्षित स्थळी नेले. त्यानंतर भयंकर जखमांमुळे चेतक मृत्यू पावला. त्या ठिकाणी चेतकची समाधी राणा प्रतापने बांधली. दोन्ही बाजूला खूप सैनिक मरण पावले. युद्ध इतके भीषण झाले कीं हळदी घाटाजवळील खामनोर जवळील नद्या, नाले, तलाव रक्तरंजित झाले. त्या भागाला पुढे "रक्त तलाई" असे नांव पडले. तलाई म्हणजे तलाव. युद्धात राजा मानसिंगचा विजय झाला परंतु महाराणा प्रतापला पकडून ठार करण्याचा त्याचा मनसुबा धुळीला मिळाला.


त्यानंतर राणा प्रतापने प्रतिज्ञा केली कीं जेथपर्यंत तो आपली स्वभूमी परत जिंकणार नाही तेथपर्यंत मी राजशैयेवर झोपणार नाही आणि सामान्य माणसाचे जीवन जगिन. राणा प्रताप वनवासात जीवन जगू लागला. हळूहळू त्याने जंगलातील भिल्ल तसेच आपल्याशी स्वामींनिष्ठ मंडळींना जमा करून युद्धासाठी परत जमावाजमवी सुरू केली. यावेळी त्याने उघड्या मैदानावरील युद्धनीती बदलून गनिमीकाव्याचा वापर करत मेवाडचा बराचसा भाग जिंकला परंतु अत्यंत मजबूत असा चितोडगड तो त्याच्या शेवटपर्यंत जिंकू शकला नाही. १९ जानेवारी १५९७ रोजीं राणा प्रतापचा शिकारीमध्ये झालेल्या जखमांमुळे मृत्यू झाला. मरतेसमई त्याने आपला सर्वात मोठा मुलगा अमरसिंग १ ह्याचे कडुन वचन घेतले कीं कधीही मोगलाना शरण जायचे नाही आणि आपण हरलेला चितोडगड परत घ्यायचा. 


बादशहा अकबरच्या मृत्यूनंतर जहाँगीर बादशहा झाला त्यानंतर अमर सिंग-१ ने १६१५ मध्ये चितोडगड मेवाड राज्यात परत आणला.


हळदीघाट जवळील छोटयाश्या पर्वतावर महाराणा प्रताप यांचा अश्वारूढ पुतळा आहे. या महायोद्याचा आणि हळदीघाटच्या लढाईचा गौरव आणि स्मरण कायम ठेवण्याच्या ध्येयाने प्रेरित झालेल्या डॉ. मोहनलाल श्रीमाळी ह्या शिक्षकाने आपली वडिलोपार्जित जमीन जुमला विकून, आपली चांगला पगार असलेली नोकरीं सोडून १२ वर्ष झटून महाराणा प्रताप म्युझियम १.५ हेक्टरवर उभारले आहे. हे त्या आश्वारुढ पुतळ्याच्या खालच्या भागात आहे. यामध्ये एक महाराणा प्रतापच्या जीवनावर आधारित १५ मिनिटाचा सिनेमा आणि त्याच्या जीवनातील विविध महत्वाचे प्रसंग ह्यावर सचित्र, समूर्त, लाईट आणि संगीत तसेच हिंदी समलोचन असलेले देखावे आहेत. त्याचे उदघाटन १९ जानेवारी २००३ रोजी झाले.


महाराष्ट्रात तर छत्रपती शिवाजी महाराजांचे आयुष्य,त्यातील विविध लढायांचे प्रसंग अतिशय प्रेरणादायी आहेत. त्याचे चित्रण डेरवण, ता. चिपळूण, रत्नागिरी येथे म्युरल फॉर्म मध्ये आहेत परंतु सचित्र समूर्ती लाईट आणि संगीत, मराठी समलोचन असलेले देखावे कोठे आहेत का मला माहिती नाही. 



माधव भोळे 


No comments:

Post a Comment