Saturday, October 3, 2026

अंबानी आणि चंद्राबाबू नायडू

अंबानी आणि चंद्राबाबू नायडू काल २ ऑक्टोबरला गांधी जयंतीचे दिवशी, आंध्र प्रदेश मधील अन्नमाया जिल्ह्यातील मदनपल्ले येथे राज्याचे मुख्यमंत्री श्री चंद्रबाबू नायडू यांच्या उपस्थितीमध्ये रिलायन्स इंडस्ट्रिजचे पूर्णकाळ कार्यकारी निर्देशक ( व्होलटाईम एक्सिक्यूटीव डायरेक्टर ) श्री अनंत अंबानी यांच्या हस्ते आंध्र मधील प्रसिद्ध अशा इंडियन स्कुल ऑफ बिझिनेसच्या धर्तीवर, इंडियन स्कुल ऑफ अग्रीकलचर ह्या मॅनेजमेंट कॉलेजची पायाभरणी झाली. सार्वजनिक आणि खाजगी भागीदारी पद्धतीने हे करण्याची मूळ कल्पना असलेल्या चंद्राबाबू नायडू यांनी रिलायन्स इंडस्ट्रिला या कॉलेजमध्ये भागीदार घेतले आहे. आधुनिक पद्धतीने नफ्याची शेती करण्यासाठी तरुणांनी शेतीकडे वळावे या साठी हा मोठा निर्णय घेतला गेला आहे. शेती क्षेत्रामध्ये कृत्रिम बुद्धिमत्ता (AI), ड्रोनचा वापर, अनेक नवनवीन तंत्रज्ञानाचा अभ्यास, वापर आणि संशोधन करणे, शेतीविषयक स्टार्टअप्सना प्रोत्साहन देणे आणि मार्गदर्शन करणे, शेतकऱ्यांना अन्नदाता बरोबर ऊर्जा दाता बनवणे आणि त्यासाठी बायोएनर्जी, बायोफ्युएल ह्या विषयात काम करणे आणि शेती हा घरगुती उद्योग न समजता त्याचे कॉर्पोरेट लेव्हल प्रमाणे व्यवस्थापन करत त्या कॉलेज मार्फत सीईओ तयार करणे हा ह्या मॅनेजमेंट कॉलेजचा उद्देश आहे. रिलायन्सने त्यांच्या जिओ आभासी वर्गाचे ( virtual classrooms) साहाय्याने, AI, आणि अग्रीकल्चर ह्या विषयात ज्ञानार्पण करत तरुण शेतकऱ्यांना नफ्याची शेती करण्यासाठी प्रवृत्त करणे हा त्यातील एक भाग आहे. आज अनंत अंबानी अतिशय आत्मविश्वासाने उदघाटनाचे भाषण करताना त्याने आपल्या नेहमीच्या शैलीमध्ये आपल्या नम्रपणाची झलक दाखवली. त्या वेळी व्यासपिठावर अर्थमंत्री निर्मला सीतारामन, चंद्राबाबू नायडू, उपमुख्यमंत्री पवन कल्याण, चंद्राबाबुंचा मुलगा नारा लोकेश उपस्थित होते. अशा वेळी भाषणात एका ठिकाणी अनंत अंबानी म्हणाले "मला आपल्या आंध्रप्रदेशचा मुलगा समजा, आणि आपण सर्वांनी मला मार्गदर्शन करा की मी आणि रिलायन्स इंडस्ट्रि आंध्रप्रदेशच्या विकासासाठी आणि शेतकऱ्यांच्या प्रगतीसाठी काय करू शकते". त्या आधी त्याच दिवशी आंध्र प्रदेशने त्यांच्या रायलसीमा ह्या दुष्काळग्रस्त भागामध्ये अनंतपूर, अन्नमाया, चित्तूर, कर्नूल, नांद्याल, श्री सत्य साई , तिरुपती, कडाप्पा, प्रकाशम, मार्कांपुराम ह्या जिल्ह्यात एक जागतिक फळबाग केंद्र ( ग्लोबल हॉर्टिकल्चर हब ) स्थापन केले आहे. त्याची पायाभरणी भारताच्या अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांच्या हस्ते झाले. हे केंद्र मुख्यत्वे आंबा, केळी, टोमॅटो, डाळिंब, ड्रॅगन फ्रुट, अवोकडो, वेगवेगळ्या बेरी, आणि स्ट्रॉबेरी ह्या सारख्या फळानच्या उत्पादना पासुन ते विक्री आणि निर्यातीवर भर देण्यासाठी तयार केले आहे. ह्या प्रकल्पाला रायलसीमा रायझिंग असे नांव दिले असून हा प्रकल्प ३ भागात १० जिल्ह्यामध्ये प्रस्थापित होणार आहे. ह्या साठी राज्य सरकार रु ४०,००० कोटी तर खाजगी गुंतवणूकदार रु. ६०,००० कोटी गुंतवणूक करणार आहे. रिलायन्स इंडस्ट्रिने आंध्र मध्ये एकंदर १ लाख कोटी गुंतवणूक करण्याची तयारी दाखवली आहे. हा उपक्रम १० जिल्हे आणि २०१ क्लस्टर्समध्ये राबविला जाणार असून, २०३० पर्यंत फलोत्पादन क्षेत्राचा विस्तार ८.४१ लाख हेक्टरवरून १४.४१ लाख हेक्टरपर्यंत वाढवणे, उत्पादन दुप्पट करून ते ४३५ लाख टनांपर्यंत नेणे आणि सुमारे ९.६ लाख शेतकऱ्यांना त्याचा लाभ मिळवून देणे ही याची उद्दिष्टे आहेत. आपण कल्पना करू शकत नाही पण चंद्राबाबू नायडू हे अतिशय दूरदर्शी नेते आहेत. जानेवारी २०१५ मध्ये त्यांनी दावोस, स्वीझरलंड येथे जागतिक आर्थिक मंच ( World Economical forum ) ह्या परिषदेमध्ये पेप्सीको ह्या जागतिक शीतपेय कंपनीच्या सीईओ इंदिरा नुई ह्यांना आंध्र प्रदेश मध्ये पेप्सीकोची शीतपेय फॅक्टरी टाकण्यासाठी आग्रह केला. त्यानंतर एप्रिल २०१५ मध्ये त्या भारतात आंध्र प्रदेशमध्ये आल्या. त्यावेळी त्यांनी सांगितले की पेप्सीला दरवर्षी २५ कोटी टन एव्हडा आंबागर (पल्प) लागतो परंतु आंध्र प्रदेश जास्तीजास्त ७ कोटी टन एव्हढाच आंबा पल्प देऊ शकते. त्या नंतर पेप्सीने तो सर्व आंबा पल्प खरेदी करण्याची तयारी दर्शवली आणि पेप्सीने श्री सिटी इंडस्ट्रियल पार्क येथे १२०० कोटी रुपये खर्च करून ८६ एकर वर बसवलेला पेप्सीचा पहिला प्लांट उभा केला. त्याचवेळी चंद्राबाबू नायडू नी ३३,००० शेतकऱ्यांना अर्थ सहाय्य करून पुढील ७ वर्षात नवीन झाडें लावून आंबा उत्पादन दुप्पट करण्यासाठी प्रोत्साहन दिले. या आधी रिलायन्सने कॅम्प्पाकोला हीं बंद पडलेली कंपनी विकत घेऊन बेव्हरेजिस व्यवसायात पदार्पण केले आहे. कदाचित रायलसीमा रायझिंग हा ग्लोबल हॉर्टीकल्चर हबचा उपयोग पुढे रिलायन्स इंडस्ट्रि जुईस, ड्रिंक्स, फूड प्रोसेसिंग, बायो एनर्जी आणि बायो गॅस विषयात उद्योग उभारण्यासाठी नक्कीच करेल यात शंका नाही. माधव भोळे

No comments:

Post a Comment