Tuesday, September 29, 2026
बॉम्बे शेविंग कंपनी
बॉम्बे शेविंग कंपनी
तुम्ही ह्या कंपनीचे नांव कदाचित ऐकले असेल. शंतनू देशपांडे नावाच्या एका मराठामोळ्या तरुणाची हीं यशोगाथा आहे. देशपांडे कुटुंब मूळचे इंदूरचे. वडील किरण देशपांडे हे पूर्वी टाटा कन्सलटन्सीतर्फे अमेरिकेत कार्यरत होते. पुढे ते टेक महिंद्रा कंपनीचे मॅनेजिंग डायरेक्टर आणि सीईओ झाले ( १९९६ ते २००१. याच काळात त्यांनी टेक महिंद्राला IPO साठी तयार केले.) शंतनूचा जन्म अमेरिकेतील टेक्सस मध्ये १९८७ साली झाला. पुढे काही वर्षांनी म्हणजे १९९६ साली देशपांडे कुटुंबीय भारतात पुणे येथे परतले.
शंतनू पुण्यातील विखे पाटील शाळेत शिकल्यानंतर पुढे त्यांनी नागपूर येथील प्रसिद्ध विश्वेश्वरैया नॅशनल इन्स्टिटयूट ऑफ टेक्नॉलॉजी मधून बी. टेक. आणि पुढे आय आय एम लखनऊ मधून एम.बी. ए. पूर्ण केले.
शिक्षण संपल्यानंतर सुरवातीला जून २०११ ते ऑगस्ट २०१५ पर्यंत इतर विद्यार्थ्याप्रमाणे त्यानी मॅकेंझी आणि कंपनी ह्या जगप्रसिद्ध कन्सलटिंग कंपनीमध्ये काम सुरू केले. पण वडिलांप्रमाणे काहीतरी मोठे आणि वेगळे करायचे हे सतत त्यांच्या डोक्यात घोळत होते.
त्यांच्या डोक्यात एक कल्पना आली. बाजारात असलेली सौंदर्य प्रसाधने जास्तीतजास्त स्त्रियाना विचारात घेऊन तयार केलेली असतात. पण अलीकडच्या काळात पुरुषांना सुद्धा अशा प्रसाधनांची गरज आहे. त्वचेची निगा राखणारी उत्पादने, हेअर स्टायलिंगची साधने आणि ग्रूमिंग सेवांचे महत्त्व वाढत असल्याने, पुरुष आपले व्यक्तिमत्त्व अधिक आकर्षक बनवण्यासाठी आणि आत्मविश्वास वाढवण्यासाठी नवनवीन मार्ग शोधत आहेत.
आपल्या विचारांना मूर्तरूप देण्यासाठी त्यांनी २०१६ साली आपले सहकारी मित्र दिपू पणिकर, रौनक मुनौत आणि रोहित जैस्वाल यांचे बरोबर बॉम्बे शेविंग कंपनी स्थापन केली. त्याचे रजिस्टर्ड नांव Visage लाईन्स पर्सनल केर प्रायव्हेट लिमिटेड. त्यांनी प्रथम २०१६ सालीच एक ६ रेझरचा पॅक असलेले किट २९०० रुपयाला ऑनलाईन विकायला सुरवात केली. परंतु एवढ्या महाग किमतीला कोणी घ्यायला तयार होईना. मग त्यांनी तीच वस्तू कमी किमतीत आणि एक एक करून सुटी विकायला सुरवात केली. त्यांनी प्रस्थापित डिस्ट्रिब्युटर, डीलर, एजंट, विक्रेता हीं साखळी न वापरता इंटरनेट माध्यमातून डायरेक्ट टू कस्टमर ( D2C) हा मार्ग अवलंबला.
त्या नंतर हळू हळू आपल्या प्रॉडक्टसची व्याप्ती वाढवली. दाढी करायच्या साधनापासून सुरवात करून मग इलेक्ट्रॉनिक ट्रिमर्स, हेयर रिमूव्हर्स, त्वचा आणि चेहरा प्रसाधने, सुगंधी पर्फुम्स, बॉडी केयर आणि गिफ्ट किट्स इत्यादी उत्पादने बाजारात आणली. या वेळी त्यांनी डीमार्ट, रिलायन्स रिटेल सारखी मोठ मोठाली रिटेल साखळी दुकानें, तसेच blinkit, zomato सारखे क्वीक कॉमर्स कंपन्या यांच्याशी संधान साधले.
२०२१ साली त्याने मॅकेंझी मधील नोकरीं सोडली आणि डिजिटल कॉमर्स ह्या विषयासाठी तो मॅकेंझीबरोबर बाह्य सल्लगार म्हणून काम करू लागले.
आर्थिक वर्ष २०२६ मध्ये कंपनीच्या वाढीला लक्षणीय गती मिळाली. कंपनीच्या आकडेवारीवर आणि ट्रॅक्सनवर आधारित एका अहवालानुसार, बॉम्बे शेविंग कंपनीची मूळ कंपनी, व्हिसेज लाइन्स पर्सनल केअर प्रायव्हेट लिमिटेडने मार्च २०२६ मध्ये संपलेल्या वर्षासाठी ₹६३५ कोटींचा परिचालन महसूल नोंदवला, जो आर्थिक वर्ष २०२५ मधील ₹२६६ कोटींच्या तुलनेत १३९% ची वार्षिक वाढ दर्शवतो. त्याच वेळी, कंपनीचा निव्वळ तोटा मागील वर्षातील ₹५८ कोटींवरून ८४.५% ने कमी होऊन सुमारे ₹९ कोटींवर आला. सुरवातीला मार्केट आणि प्रॉडक्ट एस्टाब्लिश होई पर्यंत मार्केटिंग खर्च खूप असतो.
बार्बर शॉप विथ शंतनू हा त्याचा पॉडकास्ट चॅनल आहे. बॉम्बे शेव्हिंग कंपनीने आता पर्यंत १४ वेळा वेंचर कॅपिटलच्या मार्फत एकंदर ६९.८ मिलीयन डॉलर्स एव्हडा निधी आपल्या कंपनीच्या विस्तार आणि IPO साठी उभारला असून तिचे सध्याचे व्हाल्यूएशन रु. ८२४ कोटी आहे.
सिक्सथ सेन्स वेंचर्स (Lead investor), कोलगेट पालमोलिव्ह, फायरसाईड वेंचर्स, रेकीट बेंकिंसर (RB), मलाबार इन्व्हेस्टमेंट्स , पटणी फॅमिली ऑफिस हे त्यांचे काही प्रमुख गुंतवणुकदार आहेत.
आक्रमक जाहिरात आणि मार्केटिंग, प्रॉडक्ट नावीन्य, अभ्यासू बिझिनेस मॉडेल, स्ट्राटीजिक विस्तार अशा पैलू मूळे बॉम्बे शेविंग कंपनी जिलेट सारख्या जागतिक दर्जाच्या कंपनीला टक्कर देत आहे. आणि हो, हे सर्व १० वर्षात. जिलेटला भारतात येऊन ४२ वर्ष झाली तर जगात ती १२५ वर्ष काम करीत आहे.
माधव भोळे.
Subscribe to:
Post Comments (Atom)
No comments:
Post a Comment