Monday, October 5, 2026
अंबानी आणि चंद्राबाबू नायडू
अंबानी आणि चंद्राबाबू नायडू
( हा काही राजकीय लेख नाही )
काल २ ऑक्टोबरला गांधी जयंतीचे दिवशी, आंध्र प्रदेश मधील अन्नमाया जिल्ह्यातील मदनपल्ले येथे राज्याचे मुख्यमंत्री श्री चंद्रबाबू नायडू यांच्या उपस्थितीमध्ये रिलायन्स इंडस्ट्रिजचे पूर्णकाळ कार्यकारी निर्देशक ( व्होलटाईम एक्सिक्यूटीव डायरेक्टर ) श्री अनंत अंबानी यांच्या हस्ते आंध्र मधील प्रसिद्ध अशा इंडियन स्कुल ऑफ बिझिनेसच्या ( ISB) धर्तीवर, इंडियन स्कुल ऑफ अग्रीकलचर ( ISA) ह्या मॅनेजमेंट कॉलेजची पायाभरणी झाली. सार्वजनिक आणि खाजगी भागीदारी पद्धतीने हे करण्याची मूळ कल्पना असलेल्या चंद्राबाबू नायडू यांनी रिलायन्स इंडस्ट्रिला या कॉलेजमध्ये भागीदार घेतले आहे.
शेती क्षेत्रामध्ये कृत्रिम बुद्धिमत्ता (AI), ड्रोनचा वापर, अनेक नवनवीन तंत्रज्ञानाचा अभ्यास, वापर आणि संशोधन करणे, शेतीविषयक स्टार्टअप्सना प्रोत्साहन देणे आणि मार्गदर्शन करणे, शेतकऱ्यांना अन्नदाता बरोबर ऊर्जादाता बनवणे आणि त्यासाठी बायोएनर्जी, बायोफ्युएल ह्या विषयात काम करणे आणि शेती हा घरगुती उद्योग न समजता त्याचे कॉर्पोरेटप्रमाणे व्यवस्थापन करत त्या कॉलेज मार्फत शेतकरी सीईओ तयार करणे हा ह्या मॅनेजमेंट कॉलेजचा उद्देश आहे.
रिलायन्सने त्यांच्या जिओ आभासी वर्गाच्या ( virtual classrooms) साहाय्याने, AI, आणि अग्रीकल्चर ह्या विषयात ज्ञानार्पण करत तरुण शेतकऱ्यांना नफ्याची शेती करण्यासाठी प्रवृत्त करणे हा त्यातील एक भाग आहे.
श्री अनंत अंबानीनी अतिशय आत्मविश्वासाने उदघाटनाचे भाषण करतेवेळी व्यासपिठावर अर्थमंत्री निर्मला सीतारामन, चंद्राबाबू नायडू, उपमुख्यमंत्री पवन कल्याण, चंद्राबाबुंचा मुलगा नारा लोकेश उपस्थित होते. अशा वेळी भाषणात आपल्या नेहमीच्या शैलीमध्ये आपल्या नम्रपणाची झलक दाखवली. एका ठिकाणी अनंत अंबानी म्हणाले "मला आपल्या आंध्रप्रदेशचा मुलगा समजा, आणि आपण सर्वांनी मला मार्गदर्शन करा की मी आणि रिलायन्स इंडस्ट्रिज आंध्रप्रदेशच्या विकासासाठी आणि शेतकऱ्यांच्या प्रगतीसाठी काय करू शकतो?".
रिलायन्स इंडस्ट्रिजने आंध्र प्रदेशमध्ये पशुपालन, प्राण्यांचे शेण, शेतीतील चिपाडे, ऑरगॅनिक वेस्ट यांचे साहाय्याने कम्प्रेस्ड बायोगॅस, हरित ऊर्जा ( ग्रीन एनर्जी ) आणि शेतीविषयक सुधारणा या विषयात एकंदर १ लाख कोटी गुंतवणूक करण्याची तयारी दाखवली आहे असे अनंत अंबानी म्हणाले.
त्या आधी, त्याच दिवशी आंध्र प्रदेशने त्यांच्या रायलसीमा ह्या दुष्काळग्रस्त भागामध्ये अनंतपूर, अन्नमाया, चित्तूर, कर्नूल, नांद्याल, श्री सत्य साई , तिरुपती, कडाप्पा, प्रकाशम, मार्कांपुराम ह्या जिल्ह्यात एक जागतिक फळबाग केंद्र ( ग्लोबल हॉर्टिकल्चर हब ) स्थापन केले आहे. त्याची पायाभरणी भारताच्या अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांच्या हस्ते झाली. हे केंद्र मुख्यत्वे आंबा, केळी, टोमॅटो, डाळिंब, ड्रॅगन फ्रुट, अवोकडो, वेगवेगळ्या बेरी, आणि स्ट्रॉबेरी ह्या सारख्या फळानच्या उत्पादना पासुन ते विक्री आणि निर्यातीवर भर देण्यासाठी तयार केले आहे. ह्या प्रकल्पाला रायलसीमा रायझिंग असे नांव दिले असून हा प्रकल्प ३ भागात १० जिल्ह्यामध्ये प्रस्थापित होणार आहे. ह्या साठी राज्य सरकार रु ४०,००० कोटी तर खाजगी गुंतवणूकदार रु. ६०,००० कोटी गुंतवणूक करणार आहे.
हा उपक्रम १० जिल्हे आणि २०१ क्लस्टर्समध्ये राबविला जाणार असून, २०३० पर्यंत फलोत्पादन क्षेत्राचा विस्तार ८.४१ लाख हेक्टरवरून १४.४१ लाख हेक्टरपर्यंत वाढवणे, उत्पादन दुप्पट करून ते ४३५ लाख टनांपर्यंत नेणे आणि सुमारे ९.६ लाख शेतकऱ्यांना त्याचा लाभ मिळवून देणे ही याची उद्दिष्टे आहेत.
आपण कल्पना करू शकत एव्हढे चंद्राबाबू नायडू हे अतिशय दूरदर्शी नेते आहेत. जानेवारी २०१५ मध्ये त्यांनी दावोस, स्वीझरलंड येथे जागतिक आर्थिक मंच ( World Economical forum ) ह्या परिषदेमध्ये पेप्सीको ह्या जागतिक शीतपेय कंपनीच्या सीईओ इंदिरा नुई ह्यांना आंध्र प्रदेश मध्ये पेप्सीकोची शीतपेय फॅक्टरी टाकण्याचा आग्रह केला. त्यानंतर एप्रिल २०१५ मध्ये त्या भारतात आंध्र प्रदेशमध्ये आल्या. त्यावेळी त्यांनी सांगितले की पेप्सीला दरवर्षी २५ कोटी टन एव्हडा आंबागर (पल्प) लागतो परंतु आंध्र प्रदेश जास्तीजास्त ७ कोटी टन एव्हढाच आंबा पल्प देऊ शकते. त्या नंतर पेप्सीने तो सर्व आंबा पल्प खरेदी करण्याची तयारी दर्शवली आणि पेप्सीने श्री सिटी इंडस्ट्रियल पार्क येथे १२०० कोटी रुपये खर्च करून ८६ एकर वर बसवलेला पेप्सीचा पहिला प्लांट उभा केला.
त्याचवेळी चंद्राबाबू नायडूनी ३३,००० शेतकऱ्यांना अर्थ सहाय्य करून पुढील ७ वर्षात नवीन झाडें लावून आंबा उत्पादन दुप्पट करण्यासाठी प्रोत्साहन दिले.
या आधी रिलायन्सने कॅम्प्पाकोला हीं बंद पडलेली कंपनी विकत घेऊन बेव्हरेजिस व्यवसायात पदार्पण केले आहे. कदाचित रायलसीमा रायझिंग ह्या ग्लोबल हॉर्टीकल्चर हबचा उपयोग पुढे रिलायन्स इंडस्ट्रिज ज्यूस, ड्रिंक्सस, फूड प्रोसेसिंग इत्यादी उद्योग उभारण्यासाठी नक्कीच करेल यात शंका नाही.
निसर्गाच्या जवळ राहण्याच्या अनंत अंबानी यांच्या वेगळ्याच विचारसरणीमूळे रिलायन्स इंडस्ट्रिने आपल्या व्यवसायाचा मोर्चा हरित ऊर्जा आणि शाश्वत निरंतर उत्पादने ( Sustainability) याकडे वळवला आहे. श्री अनंत अंबानीना त्यांच्या वनतारा ह्या वन्यजीव बचाव केंद्र ( wildlife rescue centre) आणि हरित ऊर्जा प्रोजेक्टचा तसेच रिलायन्स इंडस्ट्रिजचा जीवाष्म ऊर्जा ( fossile energy ) वरून हरित ऊर्जेकडे ( सोलार, ग्रीन हाईड्रॉजन इत्यादी ) वळवलेला मोर्चा यातील अनुभव लक्षात घेऊन प्रोफेसर ऑफ प्रॅक्टिस म्हणून न्यू कॅसल विद्यापीठ, युके, मध्ये दिनांक १४ सप्टेंबर २०२६ त्यांची मानद प्रोफेसर म्हणून नियुक्ती केली.
न्यू कॅसल विद्यापीठामध्ये ह्या विषयावर एक स्वतंत्र विभाग असून त्या विषयात अभ्यास आणि संशोधन केले जाते.
बाकीची राज्ये शेतकऱ्यांच्या भवितव्याचा विचार वेगळ्या पद्धतने करून भारताची शेतकरी केंद्रित अर्थव्यवस्था जिवंत ठेवण्यासाठी प्रयत्न करीत असताना महाराष्ट्र मात्र पर्यावरण घातक प्रकल्पाना पायघड्या घालत आहे हे दुर्दैवी आहे.
माधव भोळे
Subscribe to:
Post Comments (Atom)
No comments:
Post a Comment