Sunday, November 15, 2026
अराजकता, डीप स्टेट, नक्की वास्तव काय आहे?
अराजकता, डीप स्टेट, नक्की वास्तव काय आहे?
सध्या फ्रांस मध्ये विद्यार्थ्यांच्या दंगली आणि जाळपोळ सुरू आहे. अनेक लोक अनेक देशामध्ये चाललेल्या अशाच प्रकारच्या आंदोलनांना डीपस्टेटचा पाठिंबा आहे असे बोलून त्या उद्वेगामागील वास्तवाकडे डोळेझाक करीत आहेत.
या सर्व देशांमधील वाढलेला अमर्याद भ्रष्टाचार, वशिलेबाजी, गरिबी आणि श्रीमंती यामधील वाढत चाललेली दरी, सत्तेजवळील माफिया राज, बेरोजगारी आणि त्यामुळे आलेली व्यसनधिता या सर्वांचा परिपाक ह्या आंदोलनात दिसून येतो. राजे गेले, सारंजाम शाही गेली परंतु राज्यकर्त्यांची मानसिकता तशीच आहे.
मान्य आहे की बाहेरील शक्ती त्याला खतपाणी घालत आहेत. मान्य आहे की आंदोलनकारी अहिंसक, दिशाहीन होत आहेत.
परंतु सत्ताधिश आणि त्यांच्या चेल्याचपाट्याकडे कमी वेळात आलेली आर्थिक सुबत्ता, हजारो एकर सरकारी जमीन कवडीमोल भावात आपल्याच ओळखीमध्ये बिना टेंडर वर्ग करणे, विरोधकांवर ईडी, मात्र दलबदलू गुन्हेगारांना अभय, पेपर फुटी, वशिले बाजी, मेरिटचा अवमान, न्यायाधीश आणि राजकारणी यांच्याकडे नोटांची पोतीच्या पोती भरलेली आहेत मात्र सामान्य शेतकऱ्याला २ वेळच्या भाकरीची मोदात आहे, निरढावलेले उद्योगपती लाखो करोडोचा घोटाळा करुन, बँकाना डुबवून पालायन करतात पण सामान्य माणसाचा किंवा गरीब शेतकऱ्याचा एक हप्ता चुकला की नोटीस येतात, दलाल बंगले माड्या बांधत आहेत आणि शेतकरी भाव मिळत नाही म्हणून पिकावर नांगर फिरवत आत्महत्या करत आहे, आपल्या बापाची जमीन आपल्या नावावर करायला अधिकाऱ्याला लाच द्यायला लागत आहे, मंदिरातील पूजा पाळीसाठी लिलाव होत आहेत तर मंदिरावर ट्रस्टी बनायला राजकीय आश्रय हवा आहे, सहकार क्षेत्रात भागधारक शेतकरी सभासद राजकारणी हितचिंतकांच्या निवडणुक चढाओढीकडे बघत हातचोळत बसला आहे, अशा अनेक गोष्टी या उद्वेगाला कारणीभूत आहेत.
जेथपर्यंत प्रशासन जनतेवर हवी होत आहे, जेथपर्यंत राजकारणी अन्याय, अत्याचार आणि भ्रष्टाचारात डुबले आहेत आणि त्याला अप्रत्यक्ष पाठिंबा देत आहेत तेथपर्यंत अशी आंदोलने होतच राहणार मग डीप स्टेट मदत करुंदे अथवा न करुंदे.
म्हणतात ना राजा कालस्य कारणम.
रोम जळत असताना राजा व्हायोलीन चा आनंद घेत होता, म्हणून त्याला फाशी दिली गेली.
माधव भोळे
सोन्याचांदीचा देव, त्याला चोराचा भेव
"सोन्याचांदीचा देव, त्याला चोराचा भेव" — राष्ट्रसंत तुकडोजी महाराज म्हणतात 🙏🙏🙏
राष्ट्रसंत तुकडोजी महाराजांचे हे एक छोटेसे वाक्य आहे; पण त्यामागे संपूर्ण समाजाला आरसा दाखवणारे गहन तत्त्वज्ञान दडलेले आहे. "सोन्याचांदीचा देव, त्याला चोराचा भेव" म्हणजे ज्या देवाला आपण सर्वशक्तिमान, विश्वाचा निर्माता आणि रक्षणकर्ता मानतो, त्यालाच जर सोन्या-चांदीच्या दागिन्यांनी सजवून कुलूपबंद करावे लागत असेल, सीसीटीव्ही लावावे लागत असतील, पोलीस बंदोबस्त ठेवावा लागत असेल, तर तो देव लोकांचे रक्षण कसे करणार? हा प्रश्न तुकडोजी महाराजांनी अत्यंत मार्मिकपणे समाजासमोर ठेवला.
महाराजांचा उद्देश देवाचा अवमान करणे नव्हता. उलट, त्यांनी अंधश्रद्धा, दिखाऊ भक्ती आणि धर्माच्या नावावर चालणारा आडंबर यावर प्रहार केला. देव हा सोन्या-चांदीत नसतो; तो सत्य, प्रेम, दया, करुणा, प्रामाणिकपणा आणि सेवेमध्ये असतो. पण आज अनेक ठिकाणी देवापेक्षा देवाच्या दागिन्यांना जास्त महत्त्व दिले जाते. मंदिरांमध्ये कोट्यवधी रुपयांचे दागिने असतात; पण त्याच मंदिराबाहेर गरीब, भुकेले, आजारी आणि शिक्षणापासून वंचित लोक दिसतात. हा विरोधाभास समाजाने ओळखण्याची गरज आहे.
आज मंदिरांमध्ये दानपेट्या फोडल्या जातात, देवांचे मुकुट चोरीला जातात, दागिने लंपास होतात. मग प्रश्न पडतो की, जर देवाला स्वतःचे दागिनेही वाचवता येत नसतील, तर भक्तांनी देवाकडून चमत्कारांची अपेक्षा का ठेवावी? तुकडोजी महाराज याच मानसिकतेवर प्रहार करतात. ते सांगतात की देवाला सोन्याची गरज नाही, माणसाला माणुसकीची गरज आहे.
खरी भक्ती म्हणजे मोठमोठे हार अर्पण करणे, महागडे दागिने चढवणे किंवा लाखो रुपयांचे दान देणे नव्हे. खरी भक्ती म्हणजे एखाद्या भुकेल्याला अन्न देणे, गरिबाला शिक्षण देणे, रुग्णाला औषध देणे, शेतकऱ्याच्या घामाचा सन्मान करणे आणि अन्यायाविरुद्ध उभे राहणे. अशा ठिकाणी देव स्वतः वास करतो.
संतांनी नेहमीच सांगितले आहे की, "देव दगडात नाही, तो माणसाच्या अंतःकरणात आहे." ज्या हातांनी दुसऱ्यांचे अश्रू पुसले, तेच हात देवाची खरी पूजा करतात. ज्या मनात दया आहे, तिथेच देवाचे खरे मंदिर उभे असते.
आज धर्माच्या नावावर प्रचंड पैसा खर्च केला जातो; पण समाजातील मूलभूत प्रश्न अजूनही कायम आहेत. जर या संपत्तीचा काही भाग शिक्षण, आरोग्य, शेती, पर्यावरण आणि गरिबांच्या कल्याणासाठी वापरला गेला, तर तोच देवाला अर्पण केलेला सर्वात मोठा नैवेद्य ठरेल.
तुकडोजी महाराजांचा संदेश आजही तितकाच समर्पक आहे. त्यांनी समाजाला सांगितले की श्रद्धा ठेवा, पण विवेक गमावू नका. देवावर विश्वास ठेवा; पण माणुसकी विसरू नका. दागिन्यांनी देव मोठा होत नाही; तर माणसाच्या सदाचाराने, सेवाभावाने आणि सत्यनिष्ठेने देवत्व प्रकट होते.
"सोन्याचांदीचा देव, त्याला चोराचा भेव" हे वाक्य देवावरील श्रद्धेचा अपमान नसून, दिखाऊ धार्मिकतेवर केलेला कठोर प्रहार आहे. देवाला सोन्या-चांदीच्या साखळदंडात अडकवण्यापेक्षा, त्याला आपल्या विचारांत, कृतीत आणि माणुसकीत जिवंत ठेवणे हीच खरी भक्ती आहे.
कारण— देवाला सोन्याची नाही, तर स्वच्छ मनाची गरज आहे. देवाला दागिन्यांची नाही, तर दयाळू हृदयाची गरज आहे. आणि देवाचे सर्वात सुंदर मंदिर म्हणजे माणसाचे सद्सद्विवेकबुद्धीने भरलेले अंतःकरण होय.
मामासाहेब दांडेकर उर्फ सोनोपंत दांडेकर
गुरुवर्य ह.भ.प. वैकुंठवासी श्री शंकर वामन तथा मामासाहेब दांडेकर उर्फ सोनोपंत दांडेकर : मामासाहेबांचा जन्म २० एप्रिल १८९६ वैशाख शुद्ध सप्तमीचा. मामा दीड वर्षाचे असताना त्यांचे मातृछत्र हरपले. त्यांचे वडील आणि बहिणी यांनी मामासाहेबांना मातृछत्राची उणीव भासणार नाही,याची दक्षता घेतली. जून 1905 ला नूमविच्या शाळेत इंग्रजी पहिली इयत्तेत प्रवेश घेतला. मामा मॅट्रिक होण्याच्या अगोदर त्यांचे पितृछत्र हरपले. मामांनी मॅट्रिकनंतर फर्ग्युसन कॉलेजमध्ये नाव दाखल केले. गुरुदेव रानडे,प्राध्यापक भाटे यांच्यासारखे प्राध्यापक त्यांना लाभले. जोग महाराज यांचे देखील अपूर्व सहाय्य त्यांना मिळाले.
गुरुदेव रानडे यांच्या सांगण्यावरून तत्वज्ञान हा विषय त्यांनी घेतला. मामा 1919 मध्ये एम.ए.झाले. तीन मार्च 1920 रोजी ते शिक्षण प्रसारक मंडळींचे आजीव सभासद झाले. ते होताना मामांनी दोन अटी घातल्या होत्या त्यातली पहिली अट मामा पंढरीचे वारकरी होते,त्यामुळे वारीला जायला महाविद्यालय रजा देईल आणि दुसरी अट मामांना जेव्हा निवृत्त व्हायचे असेल तेव्हा निवृत्त होता येईल. जोग महाराजांची सेवा त्यांनी केली. शेवटच्या काळात ते म्हणाले, " सोन्या माझ्या गळ्यात हा ब्रह्मचर्याचा ताईत आहे. कोणाला देऊ?" क्षणाचाही विलंब न होता सोनोपंत म्हणाले, "माझ्या गळ्यात घाला " आणि जोग महाराज निश्चिंतपणे गेले. त्यावेळी मामांचे वय अवघे 23 वर्ष होते.
जोग महाराजांनी स्थापन केलेल्या वारकरी शिक्षण संस्थेचे काम त्यांनी स्वतःचे समजून पुढे केले. सकाळी लवकर उठून ध्यानधारणा ते करत. दोन वेळेला संध्या, गायत्री जप करत. सोवळ्याने जेवत. मोजके जेवत. शिस्त आणि वक्तशीरपणा हे त्यांचे अभिजात गुण होते. किर्तन प्रवचने आणि त्याकरता बाहेरगावी जाणे सतत चालू असे. वेशही अगदी साधा म्हणजे धोतर,पांढरा अंगरखा,डोक्याला पांढरा फेटा किंवा टोपी आणि वर खादीचा सौम्य रंगाचा पांढराकोट आणि त्यावर उपरणे असा वेश असे.
मी चौथी,पाचवीत असेल. नाशिकला माझ्या मातुल घराण्याच्या आजी-आजोबांकडे यायचो. तेव्हा रुंगठा हायस्कूलमध्ये मामांची प्रवचने असायची. तेथे मामांचे दर्शनही घडले आहे आणि प्रवचनही ऐकले आहे. तेथे कैलासवासी बस्तीरामजी सारडा स्मृति महोत्सव होत होता. आजोबांबरोबर मी तेथे जायचो.मामा तेथे अनेक वर्ष यायचे. त्यामुळे मामासाहेब गेल्यानंतर माझे जेष्ठ स्नेही कैलासवासी देवकिसनजी सारडा यांनी मराठा विद्या प्रसारक समाजाला सिन्नर महाविद्यालयाला मामासाहेबांचे नाव देण्याकरता मोठी देणगी दिलेली आहे. नाशिकला मामांची प्रवचने होण्याअगोदर सिन्नर येथे होत होती. योगायोग असा की या महाविद्यालयापासून शिकवण्याचे काम मी सुरू केले. नंतर गोखले एज्युकेशन सोसायटीमध्ये लागलो.
जोग महाराजांच्या नंतर दरवर्षी चैत्र शुद्ध प्रतिपदेला ज्ञानेश्वर माऊलींच्या समाधीपुढे ते कीर्तन करत. ज्ञानदेवांच्या पालखी सोहळ्यात सामील होत. न्यू पूना कॉलेजचा एक आदरणीय प्राध्यापक हातात टाळ घेऊन दिंडीमध्ये सामील होतो याचे लोकांना फार कौतुक असे. अनेक जण मामांच्या पाठीमागून या ज्ञानदेव पालखी सोहळ्यात सामील होऊ लागले. मामांच्या वर्गाला अन्य कॉलेजातले तत्त्वज्ञान आणि तर्कशास्त्राचे प्राध्यापक येऊन बसत. 1934 मध्ये नूमवीचे म्हणजे ज्या शाळेत ते शिकले त्या शाळेचे ते मुख्याध्यापक झाले.
1940 मध्ये माटुंगा येथील राम नारायण रुईया कॉलेजचे ते उपप्राचार्य होते. पहिल्याच दिवशी मामा बी.ए. च्या वर्गावर गेले त्यांचा पोशाख पाहून मुलांनी मोठ्याने," पुंडलिक वरदा हरी विठ्ठल, ज्ञानदेव तुकाराम" अशी मोठी गर्जना केली मुले थांबताच मामा म्हणाले, " अगदी प्रारंभालाच तुम्ही देवाचे नाव घेतले. त्यामुळे तुमचा अभ्यास फारच चांगला होणार." मुले शांत झाली, निःशब्ध झाली. मामांबद्दलचा आदर एकदम वाढला. नोकरी करताना त्यांनी आपल्या तत्त्वांना आणि मूल्यांना समर्थपणे जपले. त्यासाठी कोणतीही तडजोड स्वीकारली नाही. श्रेष्ठ पदावर राहूनही त्यांची साधी राहणी व उच्च विचारसरणी कायम राहिली.
मुंबईला असताना माधवबागेत आणि अन्यत्र मामांची कीर्तन,प्रवचने होत.1945 मध्येस.प.विद्यालयात आले आणि प्राचार्य देखील झाले. विद्यार्थी वर्गात मामांच्या साधेपणाची आणि विद्वत्तेची प्रखर छाप पडत असे.मामा संसारिक नव्हते परंतु संसारीकांच्या सुखदुःखाची ते समरस होत असत.अनेक गरजू विद्यार्थ्यांची फी माफ करणे,अर्धी फी माफ करणे असे काम ते करीत.
मामांनी वैकुंठवासी जोग महाराजांच्या आज्ञेवरून कीर्तन करण्यास प्रारंभ केला. मामांचे कीर्तन 'वारकरी पद्धतीचे कीर्तन' असे. कीर्तनकाराच्या पायाला हात लावून नमस्कार करण्याची प्रथा आहे पण त्याला मामा हे अपवाद होते. आपल्याला नमस्कार करणे म्हणजे ज्ञानदेवांचा अपमान आहे असे मामांना वाटे.त्यामुळे मामांना नमस्कार केला तर दुःखच होत असे. शिक्षण आणि परमार्थ यांचा सुरेख संगम मामांच्या ठाई झाला होता. संपत्तीचा लोभ मामांच्या मनाला कधीही शिवला नाही. हजारो प्रवचने व कीर्तने करून मामांनी जनसेवा आणि ईश सेवा केली, ती ही कोणत्याही प्रकारे बिदागी न स्वीकारता केली.असा निस्वार्थी परमार्थिक अपवादानेच जन्माला येतो.
मामांनी अनेक प्रवचने पण दिली . ज्ञानदेव आणि प्लोटो हे व्याख्यान अजूनही काही जणांच्या स्मरणात आहे. मामासाहेबांनी ज्ञानेश्वरीला लिहिलेली 145 पानांची प्रस्तावना ही असामान्य कृती होती. या ज्ञानेश्वरीची छाप जेथे जेथे म्हणून मराठी माणूस आहे तेथे तेथे आजही आहे. मामांनी अनेक ग्रंथांना प्रस्तावना लिहिल्या. 1947 मध्ये मामा प्रसाद मासिकाचे संपादकही झाले. मामांचे मराठी आणि इंग्रजीवरती प्रभुत्व होते.
1918 पासून मामांनी खादीचे कपडे घालायला सुरुवात केली होती. स्वातंत्र्य मिळाल्यानंतर 1951 मध्ये मामांनी महाविद्यालयातून सेवानिवृत्ती घेतली. 1951 मध्ये अखिल भारतीय तत्त्वज्ञान परिषदेचे अध्यक्ष झाले. एकंदर स्वतंत्र बारा ग्रंथ. तीन संपादित ग्रंथ. आणि अनेक लेख त्यांनी लिहिले. 1945 ते 1951 या काळात सप महाविद्यालयात प्राचार्य त्यांनी भूषवले. महाराष्ट्र सरकारने ज्ञानेश्वरीची देखील संशोधित आणि स्वस्त वृत्ती काढण्याकरता एक समिती नियुक्त केली त्याचे अध्यक्ष सोनोपंत दांडेकर हेच होते. मामांच्या चाहत्यांनी त्यांचा सत्कार घडवून आणला. डॉक्टर धनंजय राव गाडगीळ यांच्या अध्यक्षतेखाली सत्कार झाला. त्यावेळी 35 हजार रुपयांची थैली देण्यात आली पण मामांनी त्यातला एकही पैसा घेतला नाही. विश्वस्त निधी स्थापून त्यांच्याकडे ही रक्कम सोपवण्यात आली या मंडळाच्या द्वारा गेल्या 30 वर्षात बहुमोल ग्रंथांचे प्रकाशन करण्यात आले आहे.
पिंपळनेर येथील निळोबारायांचे मंदिर,नेवासे येथील ज्ञानरायांचे मंदिर इत्यादी मंदिराच्या उभारणीत मामांचे हात लागले आहेत. यासारखी कितीतरी अज्ञात कार्य मामांच्या हातून घडली. मामा येरवड्याच्या तुरुंगात कैद्यांना शिकवायला जात. वाणीच्या प्रभावाने अनेक व्यक्तींचा मनपालट आणि कायापालट मामांनी केला. ह.भ. प.धुंडा महाराज यांच्या ज्ञानेश्वरी सेवेच्या समारंभाचा सोहळा मामांच्या आणि राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे त्यावेळचे प्रमुख गोळवलकर गुरुजी यांच्या प्रमुख उपस्थितीत झाला. स.प. महाविद्यालयाचा सुवर्ण महोत्सव 13 जानेवारी 1967 रोजी झाला त्यात मामांनी कविताही केली होती.
जोग महाराजांचे चरित्र मामांनी लिहले. नऊ जुलै 1968 रोजी मामांनी आपला देह ठेवला. 10 जुलैला पुणे ते आळंदी अशी अपूर्व अंतयात्रा निघाली. मामांचे मोठेपण यात होते की मामांनी वारकऱ्यांचे नेतृत्व तर केलेच पण शहरी विभागात सुशिक्षित मध्यमवर्गाला संत वाङ्मयाकडे आकर्षित केले. महाराष्ट्रात चमत्कार म्हणता येईल अशा व्यक्ती होऊन गेल्या, त्यामध्ये मामासाहेबांचे नाव अग्रक्रमाने घ्यायला लागेल ------
मिलिंद मधुकर चिंधडे.
१४ नोव्हेंबर
१४ नोव्हेंबर
आज अचानक नेहरुंच्या चांगल्या वाईट आठवणी, स्पष्टीकरण, खोटे आणि खरे नरेंटिव्ह फेसबुकवर वाचायला मिळाले. नंतर लक्षात आले की आज बाल दिन म्हणजे चाचा नेहरुंचा वाढदिवस आहे.
लहानपणी आम्हाला या दिवसाबद्दल खूप अप्रूप आणि कुतूहल वाटायचे कारण शाळेत या विषयावर कार्यक्रम व्हायचे. भाषणे व्हायची. पण त्यावेळी काही समज नव्हती.
जसे मोठे झालो, वाचन सुधारले तसें नेहरुंच्या चांगल्या आणि वाईट दोन्ही बाजू हळूहळु समजायला लागल्या. अतिशय दूर दृष्टी असलेले नेहरू देशाच्या विकासाचा अजेंडा घेऊन काम करत होते पण त्याचबरोबर आपला गांधीजीबरोबर असलेला संबंध त्यांनी आपल्या प्रगतीसाठी वापरून आपल्या हातात सत्तेचे केंद्रिकरण करण्यात कसूर केली नाही. त्यासाठी त्यांनी पटेल, बोस या सारखे तितकेच देशप्रेमी आणि हुशार नेते खड्यासारखे बाजूला केले.
भले कितीही चूक असले तरी गांधीजींना दुःख होईल अशी कोणतीही गोष्ट करायची नाही कारण सत्तेच्या चाव्या गांधीजींकडे होत्या हे नेहरुंना ठाऊक होते. अनेक प्रश्नावर मान्य नसताना सुद्धा त्यांनी गांधीजींच्या हा ला हा मिळवली आणि आपले सत्तास्थान बळकट केले. हा त्यांचा लवचिक स्वभाव सत्तेच्या समीकरणामध्ये त्यांची ताकद बनला.
या उलट सत्तेमध्ये आल्यानंतर जीं गोष्ट त्यांनी निर्धारित केली त्याविरुद्ध जों आला त्याला ते बाजूला सारत गेले. भले ते आपले मित्र असतील किंवा देशातील महत्वाचे विरोधी पक्ष नेते असतील. बाबासाहेब आंबेडकर, चिंतामणराव देशमुख, श्यामा प्रसाद मुखर्जी सारखे पहाडाएव्हडी उंची असलेले नेते अशा राजकारणात टिकू शकले नाहीत आणि त्यामुळे नेहरू गांधी घराणे प्रस्थापित झाले. याला हल्ली लोक कणखर नेतृत्व म्हणतात. इंदिरागांधींनी याचे पुरेपूर बाळकडू नेहरुंकडून घेतले होते.
पण देशाच्या विकासाबद्धल त्यांच्या संकल्पना, त्यांनी घेतलेले परिश्रम, जागतिक संबंध, त्यातील चुका, जागतिक अलिप्त चळवळ, देशाचा खजिना खाली असताना सुद्धा भाकरा नांगल, आई आय टी, आय आय एम्स, एम्स सारख्या जागतिक स्थरांवरच्या संस्था, घटनात्मक संस्थांची उभारणी त्यांनी केली. देशाचे संरक्षण, खनिज, तेल आणि ऊर्जा, टेलिकॉम, विमान वाहतूक, सागरी वाहतूक आणि रेल्वे सारखी दळण वळण साधने खाजगी उद्योजकांच्या हाती एकवटू नयेत म्हणून तयार केलेला परंतु पुढे व्यवस्थापनाच्या स्वार्थीपणा मुळे सुस्त झालेले आणि भ्रस्टाचारामुळे बदनाम झालेले सार्वजनिक उपक्रम, मिश्र अर्थव्यवस्था, आणि प्लॅनिंग कमिशन या सारख्या गोष्टीमध्ये त्यांची दूरदृष्टी दिसून येते.
मोठमोठाली धरणे, जागतिक संस्था, सार्वजनिक उपक्रम यांना नेहरू नेहमी आधुनिक मंदिरे म्हणत. या उलट आता मोठमोठाली धार्मिक मंदिरे बांधून धर्माच्या नावाखाली ध्रुवीकरण करून मते मिळवण्याचा आटोकाट प्रयत्न होत आहे.
आजच्या विकासपुरुषाच्या प्रगतीची मुळे, नेहरुंच्या मूळ संकल्पनांवर आधारित आहेत. स्वतः मोदीजींनी कधी नेहरुंना नांवे ठेवताना मी कधी ऐकले नाही. आणि तशी ती ठेवली असतील तर त्यांचे नेहरुंबद्धलचे आकलन कमी पडते.
लोक नेहरुंच्या सार्वजनिक जीवनातील भरीव कामगिरीपेक्षा त्यांच्या खाजगी आयुष्यातील प्रसंगाबद्धल जास्त टीका करताना दिसतात. आता ज्याची जशी सोच तशी त्याची टीका.
प्रत्येक देश प्रगती करीत असताना काही चुका करत असतो तर काही सुधारणा सुद्धा करीत असतो. नेहरूंनी सुद्धा एकदा कबूल केले की भलीमोठी धरणे बांधून पर्यावरणाचा ऱ्हास होण्यापेक्षा आणि तेथील जन जातींच्या आयुष्याची वाट लागण्यापेक्षा छोटी धरणे बांधणे जास्त उपयुक्त ठरेल.
असो नेहरुंच्या आठवणी परत काँग्रेस काढायला लागले आणि सोशल मीडियावर सोनिया गांधीच्या पुस्तकाचा परिचय जोरात व्हायला लागल्यावर समजून जा, राहुल गांधीना पंतप्रधान बनवण्यासाठी आणखी एक प्रयत्न सुरू झाला आहे. जीं उंची नेहरुंना मिळाली ती पुढे त्यांच्या घराण्यातील सर्वांनां मिळेल असे नाही.
माधव भोळे
Subscribe to:
Posts (Atom)