Sunday, November 15, 2026

१४ नोव्हेंबर

१४ नोव्हेंबर आज अचानक नेहरुंच्या चांगल्या वाईट आठवणी, स्पष्टीकरण, खोटे आणि खरे नरेंटिव्ह फेसबुकवर वाचायला मिळाले. नंतर लक्षात आले की आज बाल दिन म्हणजे चाचा नेहरुंचा वाढदिवस आहे. लहानपणी आम्हाला या दिवसाबद्दल खूप अप्रूप आणि कुतूहल वाटायचे कारण शाळेत या विषयावर कार्यक्रम व्हायचे. भाषणे व्हायची. पण त्यावेळी काही समज नव्हती. जसे मोठे झालो, वाचन सुधारले तसें नेहरुंच्या चांगल्या आणि वाईट दोन्ही बाजू हळूहळु समजायला लागल्या. अतिशय दूर दृष्टी असलेले नेहरू देशाच्या विकासाचा अजेंडा घेऊन काम करत होते पण त्याचबरोबर आपला गांधीजीबरोबर असलेला संबंध त्यांनी आपल्या प्रगतीसाठी वापरून आपल्या हातात सत्तेचे केंद्रिकरण करण्यात कसूर केली नाही. त्यासाठी त्यांनी पटेल, बोस या सारखे तितकेच देशप्रेमी आणि हुशार नेते खड्यासारखे बाजूला केले. भले कितीही चूक असले तरी गांधीजींना दुःख होईल अशी कोणतीही गोष्ट करायची नाही कारण सत्तेच्या चाव्या गांधीजींकडे होत्या हे नेहरुंना ठाऊक होते. अनेक प्रश्नावर मान्य नसताना सुद्धा त्यांनी गांधीजींच्या हा ला हा मिळवली आणि आपले सत्तास्थान बळकट केले. हा त्यांचा लवचिक स्वभाव सत्तेच्या समीकरणामध्ये त्यांची ताकद बनला. या उलट सत्तेमध्ये आल्यानंतर जीं गोष्ट त्यांनी निर्धारित केली त्याविरुद्ध जों आला त्याला ते बाजूला सारत गेले. भले ते आपले मित्र असतील किंवा देशातील महत्वाचे विरोधी पक्ष नेते असतील. बाबासाहेब आंबेडकर, चिंतामणराव देशमुख, श्यामा प्रसाद मुखर्जी सारखे पहाडाएव्हडी उंची असलेले नेते अशा राजकारणात टिकू शकले नाहीत आणि त्यामुळे नेहरू गांधी घराणे प्रस्थापित झाले. याला हल्ली लोक कणखर नेतृत्व म्हणतात. इंदिरागांधींनी याचे पुरेपूर बाळकडू नेहरुंकडून घेतले होते. पण देशाच्या विकासाबद्धल त्यांच्या संकल्पना, त्यांनी घेतलेले परिश्रम, जागतिक संबंध, त्यातील चुका, जागतिक अलिप्त चळवळ, देशाचा खजिना खाली असताना सुद्धा भाकरा नांगल, आई आय टी, आय आय एम्स, एम्स सारख्या जागतिक स्थरांवरच्या संस्था, घटनात्मक संस्थांची उभारणी त्यांनी केली. देशाचे संरक्षण, खनिज, तेल आणि ऊर्जा, टेलिकॉम, विमान वाहतूक, सागरी वाहतूक आणि रेल्वे सारखी दळण वळण साधने खाजगी उद्योजकांच्या हाती एकवटू नयेत म्हणून तयार केलेला परंतु पुढे व्यवस्थापनाच्या स्वार्थीपणा मुळे सुस्त झालेले आणि भ्रस्टाचारामुळे बदनाम झालेले सार्वजनिक उपक्रम, मिश्र अर्थव्यवस्था, आणि प्लॅनिंग कमिशन या सारख्या गोष्टीमध्ये त्यांची दूरदृष्टी दिसून येते. मोठमोठाली धरणे, जागतिक संस्था, सार्वजनिक उपक्रम यांना नेहरू नेहमी आधुनिक मंदिरे म्हणत. या उलट आता मोठमोठाली धार्मिक मंदिरे बांधून धर्माच्या नावाखाली ध्रुवीकरण करून मते मिळवण्याचा आटोकाट प्रयत्न होत आहे. आजच्या विकासपुरुषाच्या प्रगतीची मुळे, नेहरुंच्या मूळ संकल्पनांवर आधारित आहेत. स्वतः मोदीजींनी कधी नेहरुंना नांवे ठेवताना मी कधी ऐकले नाही. आणि तशी ती ठेवली असतील तर त्यांचे नेहरुंबद्धलचे आकलन कमी पडते. लोक नेहरुंच्या सार्वजनिक जीवनातील भरीव कामगिरीपेक्षा त्यांच्या खाजगी आयुष्यातील प्रसंगाबद्धल जास्त टीका करताना दिसतात. आता ज्याची जशी सोच तशी त्याची टीका. प्रत्येक देश प्रगती करीत असताना काही चुका करत असतो तर काही सुधारणा सुद्धा करीत असतो. नेहरूंनी सुद्धा एकदा कबूल केले की भलीमोठी धरणे बांधून पर्यावरणाचा ऱ्हास होण्यापेक्षा आणि तेथील जन जातींच्या आयुष्याची वाट लागण्यापेक्षा छोटी धरणे बांधणे जास्त उपयुक्त ठरेल. असो नेहरुंच्या आठवणी परत काँग्रेस काढायला लागले आणि सोशल मीडियावर सोनिया गांधीच्या पुस्तकाचा परिचय जोरात व्हायला लागल्यावर समजून जा, राहुल गांधीना पंतप्रधान बनवण्यासाठी आणखी एक प्रयत्न सुरू झाला आहे. जीं उंची नेहरुंना मिळाली ती पुढे त्यांच्या घराण्यातील सर्वांनां मिळेल असे नाही. माधव भोळे

No comments:

Post a Comment