Saturday, September 26, 2026
जगन्नाथ पुरी जवळील कोनार्क / कोणार्क यात्रा
जगन्नाथ पुरी जवळील कोनार्क / कोणार्क यात्रा
दुसऱ्या दिवशी आम्ही ओरिसा मधील जगन्नाथपुरी पासून ३५ किलोमीटर दूर असलेले, १९८४ साली युनेस्को जागतिक वारसा स्थळ घोषित झालेले प्राचीन असे कोणार्क सूर्य मंदिर बघायला गेलो. हे सूर्य मंदिर पूर्व गंगा साम्राज्याचा राजा लांगुला नरसिंहदेव-१ याने इ.स. १२३८ मध्ये १२०० कामगारांच्या साहाय्याने १२ वर्षात म्हणजे १२५० मध्ये पूर्ण केले. हे मंदिर सूर्यदेवांना समर्पित केले गेले आहे. मंदिर मूलतहा: पिवळ्या तपकिरी खोंडालाईट दगडापासुन बनवले गेले आहे. संपूर्ण मंदिराची रचना पूर्व पश्चिम अक्षानंवर बसवली असून सूर्याचे पहिले किरण थेट गर्भगृहात जाते.
ह्या जागेला कोणार्क सूर्य मंदिर असे म्हणतात कारण संस्कृत मध्ये कोन म्हणजे कोपऱ्यातील आणि अर्क म्हणजे सूर्यदेवाचे किरण किंवा सूर्य देव. हे देऊळ भारताच्या दक्षिण पूर्व भागात आहे म्हणून ते कोन म्हणतात.
मूळ २२७ फूट उंच असलेल्या ह्या सूर्यरथ रुपी आकाराच्या वास्तूची आताची इमारत फक्त १०० फूट उंच एव्हडीच आहे. यातील काही भाग १५०८ मध्ये कालिंगवर स्वारी ( ह्या प्रदेशाला पूर्वी कलिंग साम्राज्य म्हणत ) करणाऱ्या मूर्तीभंजक मुसलमान आक्रमक सुलतान सुलेमान करानी ( काळा पहाड ) याने केलेल्या विध्वन्सक आक्रमणामूळे झाली असे इतिहासकार मानतात. तर काही भाग भूकंपाचे हादरे, तकलादु अस्थिर पाया, तसेच त्या विभागातील खाऱ्या हवेमुळे दगड ठिसूळ होऊन ते कोसळले असावेत असा निष्कर्ष आहे.
ह्या मंदिराचा आकार सूर्यरथासारखा असून, अरुण नावाचा सारथी आपल्या दोन पत्नी उषा आणि निशा ह्यांना घेऊन तो रथ चालवत आहे. ह्या दोन्ही पत्नी हातात धनुष्यबाण घेऊन अंधःकाराला तिर मारत आपल्या रथाला उजेडाकडे नेत आहेत अशी ती मूळ कल्पना आहे.
त्या रथाच्या डाव्या बाजूला रथाची १२ चाके / चक्रे आणि उजव्या बाजूला रथाची १२ चाके / चक्रे असून ती वर्षाच्या १२ महिन्यातील शुक्ल पक्ष आणि कृष्ण पक्ष दर्शवितात. ७ घोडे हा रथ चालवत असून रथाच्या डाव्या बाजूला ४ आणि उजव्या बाजूला ३ घोडे आहेत. सध्या यातील एकच घोडा सुस्थितीत आहे. ह्या असमतोल रचनेमूळे तो रथ कायम वर्तुळाकार फिरेल अशी कल्पना.
प्रत्येक चक्र ९ फूट ९ इंच व्यसाचे असून त्यावर नक्षी काम केलेले ८ आऱ्या ( स्पोक्स ) असून त्यामधील कोन परत आणखी ८ आऱ्यानी विभागले आहेत. प्रत्येक दोन मुख्य आरी मधील भूमितीय कोन एका प्रहराला दर्शवतो. एक प्रहर म्हणजे ३ तास. ८ प्रहर म्हणजे २४ तास. हीं चाके एक प्रकारचे सूर्य घड्याळ तबकडी असून जर चाकाच्या अक्षाजवळ आडवी काठीधरली तर तिची सावली जेथे पडेल त्यानुसार वेळ दर्शवते.
देऊळ मुख्यत्वे दोन भागात विभागले गेले आहे. सुरवातीला जगमोहन भाग ज्याला आपण सभामंडप म्हणतो जेथे बसुन भक्तगण मुख्य देवतेची आराधना करू शकतात आणि दुसरे गर्भगृह किंवा गाभारा ज्या मध्ये मुख्य देवता असते. हा गाभारा सुमारे २२७ फूट उंच होता.
अशी अख्यायिका आहे की ह्या गाभाऱ्यातील मूर्ती अष्टधातूची होती आणि ती हवेत तरंगती होती. ती तरंगण्याचे मुख्य कारण म्हणजे गाभाऱ्याच्या माथ्यावर एक ५२ टन वजनाचा मोठा दगड होता ज्यामध्ये लोहचुंबकीय गुणधर्म होते. ह्याच कारणामूळे त्या भागात युरोपीयन लोखंडी जाहजे आली की ती जोरात खेचली जाऊन कोठेतरी आपटली जायची. म्हणून युरोपिय खलाशी त्याला ब्लॅक पॅगोडा म्हणत. ब्लॅक म्हणजे ब्लॅक मॅजिक किंवा भुताटकी म्हणत.
अशी अख्यायिका सांगितली जाते की राजाने त्या १२०० कारागिराना हे मंदिर १२ वर्षाच्या मुदतीत पूर्ण करण्यास सांगितले होते. १२ वर्षाची मुदत पूर्ण व्हायला फक्त एक / दोन रात्र बाकी होती. अजून गाभाऱ्यावरील ५२ टनी दगड २२७ फूट उंचीवर नेऊन बसवायचा बाकी होता. तो तसा बसवला गेला नाही तर १२०० कामगारांना फाशी दिली जाणार होती.
मुख्य वास्तूशास्त्रज्ञ् बिशु महाराणा हे सर्व काम बघत होता. त्याचा १२ वर्षाचा मुलगा धर्मपद त्याला भेटायला आला होता. त्याने बघितले की आपले वडील फार चिंतेत आहेत. त्याने त्याचे कारण विचारले. वडिलांनी कारण सांगितल्यावर धर्मपदने डोके चालवले आणि तो ५२ टनी दगड वर रातोरात नेण्यासाठी काहीतरी युक्ती सुचवली आणि त्यामुळे दुसऱ्यादिवशी सकाळी काम पूर्ण झाले. जे काम १२०० कारागिराना जमले नाही ते एका १२ वर्षाच्या मुलाने अगदी कमी वेळात करून दाखवले, हीं बातमी सर्वत्र पसरून आपली नाचक्की होऊ नये यासाठी त्या कामगारांनी बिशू महाराणाला जबरदस्ती केली की तु तुझ्या मुलाला मारून टाक नाहीतर आमची इज्जत जाईल. वडिलांनी ह्या गोष्टीला स्पष्ट नकार दिला. त्या नंतर १२०० कारागीरांची आणि आपल्या वडिलांची अब्रू वाचवण्यासाठी धर्मपदने ३ किलोमीटर दूर असलेल्या चंद्रभागा समुद्र किनाऱ्यावर भर समुद्रात उडी मारून जीव दिला.
संपूर्ण देऊळ हे त्या वेळच्या समाज चालीरीती, शृंगारिक शिल्पे आणि पौराणिक कथा दाखवणाऱ्या दगडी भिंती चित्रा( म्युरलस )ने भरले आहे.
मंदिराच्या सुरवातीला एक नाट्य मंडप होता त्यातील काही भाग अजून शिल्लक आहे. त्यावर नाट्य, नृत्य आणि संगीता संबंधी चित्रे कोरली आहेत.
वरील मंदिरा पैकी मूळ गाभाऱ्याचे शिखर कोसळले असून त्यातील मुख्य मूर्ती आणि तो ५२ टन वजन असलेला दगड गायब आहे. अनेक शिल्प ब्रिटिशांनी आपल्या म्युझियम मध्ये नेऊन ठेवली आहेत. मंदिरा समोरील सूर्य स्तंभ, पुरी येथील जगन्नाथ मंदिरात हलवला गेला आहे. आक्रमकांकडुन खूप लुटालूट आणि तोडफोड झाली आहे. शिवाय ७७५ वर्षात पर्यावरण आणि खाऱ्या हवेतील वातावरणाचा परिणाम सुद्धा झाला आहे.
असे हीं सांगितले जाते की कृष्णाचा मुलगा सांब ह्याला महारोग झाला होता. त्याने १२ वर्ष तपश्चऱ्या केल्यानंतर त्याने ह्याच ठिकाणी मूळ सूर्य मंदिर बांधले होते.
त्या नंतर ९ व्या शतकात ह्याच ठिकाणी सूर्य उपासक सोमवंशी राज्यांनी येथे एक सूर्य मंदिर बांधले होते. आताचे मंदिर हे त्याची सुधारलेली मोठी आवृत्ती आहे.
कोणार्क सूर्यमंदिराची सविस्तर वास्तुशिल्प रचना, नियोजनाचे दस्तऐवज आणि बांधकामाचा इतिहास हे, हिशोब आणि व्यवस्थापन माहिती, १९६० च्या दशकातील सर्वेक्षणादरम्यान कोणार्क परिसरातील गावांमध्ये सापडलेल्या प्राचीन ताडपत्रांवरील हस्तलिखितांमध्ये जतन केलेले आढळले.
ह्या सूर्य मंदिराबद्धल अधिक आणि सचित्र माहिती देण्यासाठी इंडियन ऑइल फाउंडेशन तर्फे एक विशेष दालन उभारले गेले आहे. शिवाय तेथे लाईट आणि साउंड शॊ सुद्धा आहे.
संपुर्ण परिसर आर्किओलोजीकल सर्व्हे ऑफ इंडिया ह्या भारत सरकारच्या सांस्कृतिक मंत्रालयाच्या विभागाच्या अख्त्यारीत आणि निगराणी खाली आहे.
माधव भोळे.
Subscribe to:
Post Comments (Atom)
No comments:
Post a Comment