Friday, September 18, 2026
तरकट विद्यानंद बापट!
तरकट विद्यानंद बापट!
गेले काही दिवस विद्यानंद बापट नावाचे गारुड सोशल मीडिया आणि TV channels मध्ये गाजत आहे. बापट यांच्या DJ बंदीला माझा पूर्ण पाठिंबा आहे परंत नास्तिक म्हणून गाजत असलेली त्यांची वक्तव्ये मुळातच अपरिपक्व ज्ञानामूळे आहेत असे मी मानतो.
नास्तिक माणूस ईश्वराचे अस्तित्वच नाकारत असतो तर श्रद्धाळु किंवा आस्तिक हा कोणत्या तरी शक्तीला सगुण रूपात मानून त्याची पूजा अर्चा करतो आणि त्याद्वारे ईश्वरकृपा प्राप्त करण्याचा प्रयत्न करीत असतो.
नास्तिकांना ईश्वर अस्तित्वात नाही हे सिद्ध करायला अनेक तर्क आणि दाखले द्यायला लागतात पण श्रद्धाळू व्यक्तीला ईश्वर अस्तित्वात आहे हे सिद्ध करायची गरजच पडत नाही. कारण तो आहे आणि त्याचा माझ्या आयुष्यात एक विशिष्ट स्थान आहे हीं श्रद्धा आणि विश्वासच त्याला जीवनकार्य पुढे न्यायला मदत करते.
ईश्वराचे अस्तित्व नाकारणे म्हणजे संपूर्ण चराचरामध्ये असलेल्या त्याच्या प्रकटीकरणाशी प्रतरणा करणे. महात्मे सांगतात. अहं ब्रह्मास्मि. माझ्यात ब्रह्म आहे.
आपल्या शरीराचा प्रत्येक भाग असा बनला आहे की तो दुसरा कोणीही तयार करू शकत नाही. ज्या नास्तिकते बद्दल बापट सांगतात त्यासाठी कोणत्या परकीय लेखकाची ऊदाहरणे ते देतात याचा आपण विचार केला तर कोणते तरी पुस्तक त्यांनी कधीतरी वाचलेले असते त्यातील योग्य संदर्भ ते जेव्हा देतात ते त्यांच्या स्मरणातून बुद्धी तर्क ताडून त्यांच्या स्वरयंत्रा मार्गे व्याकरण शुद्ध भाषेत उदघृत होतात आणि त्याचबरोबर त्या वेळी त्यांचे चेहऱ्यावरचे हावभाव सुद्धा बदलतात. म्हणजे विचार, व्याकरण शुद्ध वाक्य यांचा समतोल सांभाळून हे कार्य त्यांच्याकडून करवून घेणारी हीं शक्ती कोणती?
ते ज्यावेळी बाहेर बघतात त्यावेळी बाहेरच्या दृश्याची प्रतिमा त्यांच्या बुभूळामार्फत त्यांच्या मज्जा पटलावर पडते आणि त्या मज्जा पटलावर असलेल्या लाखो बिंदू मध्ये असलेल्या नसामार्फत ती मेंदूमध्ये पोचते, तो मेंदू त्या प्रतिमेचे विश्लेषण करतो आणि त्या प्रतिमेचा संदर्भ लावून एखादी गोष्ट किंवा इतिहास त्यांच्या स्मरणात येतो आणि तो त्यांच्या मनात काही भावना निर्माण करतो. मजा म्हणजे चालू प्रसंगमध्ये मेंदू अशा कमीतकमी १५ ते जास्तीतजास्त २०० प्रतिमा एका सेकंदात मेंदू पर्यंत पोचवून त्याचे विश्लेषण करू शकतो.
हृदय शरीरातील अशुद्ध रक्त घेऊन फुपुसे, किडनी आणि लिव्हर मार्फत शुद्ध केलेले रक्त अहो रात्र पंप करीत सर्व शरीराच्या नसानसा मार्फत अत्यंत छोट्या अशा पेशीना पुरवत असते.
आपल्या शरीरातील अशी कित्येक कार्य आपापली कार्यें सर्व बिनबोभाट अहो रात्र आणि कित्येक वर्ष करत असतात आणि त्यासाठी लागणारी ऊर्जा काय तर २ वेळचे जेवण.
एवढ्या सर्व गोष्टी एकाच शरीरात होत असतात आणि विशेष म्हणजे ज्यावेळी एखाद्या बाळाचा जन्म होतो तेव्हा सुमारे ३.५ ते ४ किलो वजन असलेल्या त्या बाळामध्ये सुद्धा ह्या यंत्रणा ७० ते ८५ टक्के विकसित झालेल्या असतात आणि जसजसे ते बाळ मोठा होत जातो तसा ह्या सर्व यंत्रणाचा आणखी विकास होतो.
आता तुम्ही म्हणाल की हे सर्व आता AI सुद्धा करते. होय आता तरी AI काही प्रमाणात करते पण त्याला जेव्हडे शिकवले आहे तेव्हडेच AI चांगले करू शकतो परंतु असे अनेक विषय आहेत की जेथे प्रतिभा शक्ती, नवनिर्मिती आणि संशोधन ह्या विषयामध्ये AI अजून पूर्ण यशस्वी होऊ शकला नाही कारण जे आढ्यात नसेल तर पोहोऱ्यात कुठून येणार?
AI साठी प्रचंड प्रमाणात बाह्य ऊर्जा लागते आणि त्यासाठी तसेच डेटा सेंटर चालवण्यासाठी लागणारी ऊर्जा आणि पाणी आणि त्याचे पर्यावरण दुष्परिणाम याचे प्रमाण प्रचंड आहे. या उलट माणसाला हे सर्व करायला कमीकमी ऊर्जा लागते.
हे सर्व तयार करणारी आणि नियंत्रण करणारी व्यवस्था म्हणजेच ईश्वर मानला गेला आहे. हीं व्यवस्था निर्गुण आहे परंतु मानवाने सामान्यजनाचा अकालनासाठी त्याला सगुण रूपात आणले आहे. अर्थात यातील अनेक यंत्रणा इतर प्राणी मात्रात आणि चराचरातील श्रुष्टी मध्ये सुद्धा वेगवेगळ्या पद्धतीने विकसित झालेल्या आहेत परंतु त्या ईश्वराला समजण्याची आणि त्याचे आभार मानण्याची बुद्धी ईश्वराने मानवाला दिली आहे तशी ती इतर प्राणीमात्रा मध्ये आहे की नाही याचा अजून तरी शोध लागला नाही.
त्यामुळे तुम्ही नास्तिक असणे हा तुमच्या व्यक्तिगत प्रश्न आहे परंतु दुसऱ्यांनी आस्तिक असू नये हे सांगण्याचा कोणताही अधिकार नाही.
मी तर म्हणतो ईश्वर नाही हे समजण्यासाठी त्याना बाहेरच्या जगात डोकावे लागले पण ईश्वर आहे हे समजण्यासाठी त्यांनी आपल्या शरीरात जरी डोकावून बघितले असते तरी तो त्याना समजला असता.
माधव भोळे
Subscribe to:
Post Comments (Atom)
No comments:
Post a Comment